सिमकार्ड चा प्रीपेड ताप

Submitted by Kavita Datar on 20 February, 2022 - 10:07

सिमकार्ड चा प्रीपेड ताप

कॉलेज संपल्यावर अवनी घरी आली. एकामागून एक लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, लायब्ररी सेशन्स अशा दिवसभराच्या व्यस्त दिनचर्ये मुळे ती थकली होती. फ्रेश होऊन, थोडं खाऊन, तिनं मोबाईल फोन हातात घेतला. ड्युएल सिम कार्डची व्यवस्था असलेल्या तिच्या मोबाईल फोन मध्ये दोनच दिवसांपूर्वी तिने एयरसेल प्रीपेड सिम टाकून घेतलं होतं. त्याचा चांगला इंटरनेट स्पीड मिळत असल्याने ती खुशीत होती.

तिच्या मोबाईल फोनची रिंग वाजताच व्हाट्सअप, इन्स्टा वर रमलेली अवनी भानावर आली. नवीन नंबर वर कॉल आला होता. अननोन नंबर फ्लॅश होत होता. तिने कॉल रिसीव केला.
"हॅलो..."
"हमारे अकाउंट से निकाले हुए पैसे सिधी तरह से वापीस करो, नही तो अंजाम बुरा होगा... देख लेना..."
"हॅलो...आप किस से बात करना चाहते है ? शायद रॉंग नंबर लग गया है आपका..."
"यह 8763×××××× नंबर है ना ?"
"हां... नंबर तो सही है.. "
"छह-सात महिनें पहले, इस नंबर से कॉल करके तुने हमारा एटीएम कार्ड नंबर और पिन पूछ लिया और हमारे अकाउंट से पैसे निकाल लिए... हम नींद मे थे इसलिये गलती कर दी और तुमको कार्ड नंबर और पिन बता दिया..."
"लेकिन यह नंबर तो मुझे परसो ही मिला है..."
"ऐ लडकी... ज्यादा नाटक मत कर... हमारे पैसे कब वापस करेगी ये बता... पुलीस के चक्कर काटते काटते मै थक गया हूँ . अरे कुछ तो रहम कर. गरीब आदमी हु मै.."
पलीकडच्या माणसाने कॉल डिस्कनेक्ट केला. अवनी चक्रावली.
'ही काय भानगड आहे ?'
ती मनात म्हणाली.

काही वेळ ती त्या आलेल्या फोन कॉल बद्दल विचार करत राहिली. पण तिच्या व्यस्त दिनक्रमा मुळे लवकरच तिला त्या घटनेचा विसर पडला.

हे आणि अशाच प्रकारचे कॉल्स दर दोन तीन दिवसाला यायला लागल्यावर मात्र ती चांगलीच काळजीत पडली. कधी तोच माणूस तर कधी एखादी स्त्री पलीकडून बोलत असत. निरनिराळ्या नंबर वरून कॉल्स येत असत. तिने ट्रू कॉलर वर नंबर ब्लॉक केले. पण एक नंबर ब्लॉक केला की दुसऱ्या नंबर वरून कॉल यायचे. सगळ्या इन्कमिंग कॉल्सचा सूर एकच...तू आमचे कार्ड डिटेल्स घेऊन पैसे काढले किंवा तू आमचे अकाउंट हॅक करून रिकामे केलेस.

अवनी च्या लक्षात आलं, की तिला दिलेला नंबर नक्कीच आधी कोणा सायबर चोराचा असणार. त्यांनं तो पूर्वीच सरेंडर केल्याने किंवा रिचार्ज न केल्याने रिसायकल होऊन तिला मिळाला असणार. कंटाळून शेवटी तिने ते सिमकार्ड सरेंडर करायचं ठरवलं. त्याच दिवशी तिच्या नावाने लखनऊ पोलीस मुख्यालयातून एक पाकीट स्पीड पोस्टने घरी आलं. लखनऊ पोलिसांत कोणीतरी तिच्या मोबाईल फोन नंबरच्या आधारे माहिती घेऊन तिच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती. पोलिसांनी तिला समन्स बजावून प्रत्यक्ष हजर राहायला किंवा समाधानकारक उत्तर द्यायला सांगितलं होतं.

ते सर्व वाचून अवनी मटकन खालीच बसली. आतापर्यंत आई-बाबांना तिने हे सगळं सांगितलं नव्हतं. पण आता मात्र बाबांची मदत घ्यावीच लागणार होती.

तिचे बाबा ऑफिसमधून आल्यावर तिने हा सगळा घटनाक्रम त्यांना पहिल्यापासून सांगितला. तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेत बाबांनी तिला धीर दिला आणि त्यांच्या वकील मित्राला कॉल करून त्यांचा सल्ला घेतला.

दुसऱ्या दिवशी अवनी आणि तिचे बाबा, ज्या मोबाईल गॅलरी मधून तिने ते प्रीपेड सिम कार्ड घेतले होते, तिथे गेले. तिथून त्यांनी प्रीपेड सिम कार्ड घेतल्यापासून चे तिच्या नावाचे ॲक्टिवेशन सर्टिफिकेट मिळवले.

साधारणतः प्रीपेड सिम कार्ड वापरकर्त्याने रिचार्ज न करता सिम कार्ड वापरणे बंद केले की कोणतीही मोबाईल कंपनी सहा महिने थांबून तो नंबर दुसर्‍या ग्राहकाला देते.

सहा महिन्यांपूर्वी हा नंबर कोणाच्या नावावर होता ? त्याच्याबद्दल कंपनीच्या कॉल सेंटर मध्ये काही चौकशी किंवा तक्रार करण्यात आली होती का ? ही सर्व माहिती अवनीच्या बाबांनी मोबाईल कंपनीला देण्यास सांगितले.

विलंबाने का असेना, पण त्या मोबाइल कंपनीने सर्व माहिती एका लिखित पत्राच्या स्वरूपात त्यांना पाठवली. त्या माहितीनुसार सहा-सात महिन्यांपूर्वी पर्यंत तो नंबर झारखंड मधील जामतारा येथील संतोष यादव नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता. त्या नंबर बद्दल किमान वीस ते तीस वेळा मोबाईल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये चौकशी केली गेली होती.

अवनीने मोबाईल कंपनी कडून मिळालेले एक्टिवेशन सर्टिफिकेट आणि वरील सर्व माहिती असलेले मोबाईल कंपनीचे अधिकृत पत्राच्या प्रती लखनऊ पोलीस मुख्यालयाकडून आलेल्या समन्सला उत्तर म्हणून पाठवून दिल्या. अवनीच्या बाबांनी मोबाईल कंपनीविरुद्ध वादग्रस्त नंबरचे सिमकार्ड दिल्याबद्दल ग्राहक मंचात तक्रार केली.

अवनी या संकटातून सुटली खरी.. पण तिला आणि तिच्या कुटुंबाला झालेला मनस्ताप विचारात घेऊन, ग्राहक न्यायालयाने मोबाईल कंपनीला अवनी आणि तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

(सत्य घटनेवर आधारीत..)

प्रिय वाचक,
अशी घटना दुर्मिळ असली तरीही प्रीपेड सिम कार्ड च्या बाबतीत घडण्याची शक्यता पोस्टपेड सिमकार्ड पेक्षा जास्त असते. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे जरूरी आहे.

-मोबाईल नंबर कारणाशिवाय शक्यतोवर बदलू नाही. त्याऐवजी सर्विसेस बद्दल किंवा स्पीड बद्दल तक्रार असल्यास पोर्टेबिलिटी सुविधा वापरावी.
-नवा नंबर घेतल्यास शक्य असल्यास ट्रूकॉलर किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या ॲप वरून त्या नंबरचा जुना मालक शोधावा.
-प्रीपेड किंवा पोस्टपेड चे एक्टिवेशन सर्टिफिकेट डीलर कडून सिम कार्ड घेताना जरूर घ्यावे.
-नवीन घेतलेल्या नंबर वर आलेल्या कॉल्स बाबत आक्षेप किंवा शंका असल्यास जुन्या वापरकर्त्याची माहिती, आरटीआय ( माहितीचा अधिकार) अंतर्गत मोबाईल कंपनीस देण्यास सांगावे.

सजग आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

©कविता दातार

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद...एक नवीन फसवणूक प्रकाराची माहिती दिल्या बद्दल...
खरं तर तांत्रिक अडचण नसेल तर नवीन ग्राहकांना पूर्वी कोणी वापरलेला नंबर देऊ नये...

मला एकदा जळगाव येथून एकदा कॉल आला होता. तिथे कुठल्या तरी एका बाईला माझा वापरात असलेला नंबर दिलेला होता. कंपनीने व्हेरीफिकेशन साठी मला कॉल केला. आता असे व्हेरीफिकेशन होत नाही.

चांगली माहिती, पण एक शंका...
जिओ, एअरटेल सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या माहिती अधिकाराच्या (RTI) कक्षेत येतात का?
(येत असतील तर लवकरच जिओ, एअरटेल आणि वोडक्याचे काही खरे नाही!!!)

लेखाचा बराचसा भाग पूर्णपणे समजला नाही.

लायब्ररी सेशन्स अशा दिवसभराच्या व्यस्त दिनचर्ये मुळे ती थकली होती.
पण तिच्या व्यस्त दिनक्रमा मुळे लवकरच तिला त्या घटनेचा विसर पडला.
>>
इथे व्यग्र हा शब्द हवा.

अभिप्राय/सूचना दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

वि.मु. अजून तरी खाजगी कम्पनी माहिती अधिकार कक्षेत नाहीत.
पण वरीलप्रमाणे Exceptional cases मध्ये मात्र पोलिसांचे परवानगी पत्र दाखवून माहिती घेता येते.

खरं तर तांत्रिक अडचण नसेल तर नवीन ग्राहकांना पूर्वी कोणी वापरलेला नंबर देऊ नये......

सुरवातीला मोबाईल क्रमांक केवळ १० अंकाचे असायचे आणि ते बहुतेक '९' या अंकाने सुरु होणारे असायचे. त्यामुळे उपलब्ध नंबर (number combinations) च्या संख्येवर मर्यादा असायची. शिवाय काही वर्षांपूर्वी काही मोबाईल कंपन्या ग्राहक वाढवण्यासाठी '३० रुपयांत सिम घ्या आणि १०० रुपये talktime मिळवा' असल्या स्कीम्स चालवायच्या. त्यामुळे कॉलेजला जाणारी मुले अशी सिम घेऊन talktime संपला की फेकून द्यायची व तो नंबर फुकट जायचा.
यावर इलाज म्हणून Department of Telecome (DoT) ने '८' अंकापासून सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकाला परवानगी दिली. नंतर '७' या अंकापासून सुरु होणारे, '६' या अंकापासून सुरु होणारे मोबाईल क्रमांक दिसायला लागले. यामुळे मोबाईल क्रमांकाच्या उपलब्धतेत वाढ झाली. मात्र दरम्यानच्या काळात मोबाईल वापरकर्त्यांमध्येही वाढ झाली. सिम कार्ड घालावे लागणाऱ्या उपकरणांमध्ये वाढ झाली. व पुन्हा नंबर कमी पडतील की काय अशी परिस्थिती होऊ लागली.

यावर इलाज म्हणून १ जुलै २०१८ पासून ज्या उपकरणांना केवळ इंटरनेटजोडणी (data) हवी आहे, त्यावरून कोणीही बोलणार नाही किंवा त्या उपकरणाचा नंबर कोणीही डायल करणार नाही अशा उपकरणांना १३ अंकी मोबाईल क्रमांक देण्यास सुरुवात केलेली आहे. यात आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरतो त्या सिम कार्डचा समावेश नाही, कारण तो नंबर कोणालातरी डायल करावाच लागतो. परंतु card swipe machines, Paytm / PhonePe / BharatPe यांचे soundbox (payment confirmation speakers), बस conductor कडे असणारी ticket machines, बस / कचऱ्याच्या गाड्या / cash vans आदी गाड्यांमध्ये लावले जाणारे GPS trackers, बस stop वर बस किती वेळात येईल हे live दाखवणारे digital display अशा अनेक उपकरणांमध्ये सिम कार्ड असते जे केवळ इंटरनेट साठीच वापरले जाते. म्हणजे त्यांचा नंबर जाणून घेऊन त्याला कॉल केला जात नाही. अशा ठिकाणी १३ अंकी मोबाईल क्रमांक वापरायला सुरुवात झालेली आहे व १० अंकी मोबाईल क्रमांक हे आता निव्वळ मोबाईल फोनच्या वापरासाठी (ज्याचा numbar dial करावा लागतो) राखीव ठेवलेले आहेत. त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीचा बंद झालेला क्रमांक सहसा दुसऱ्याला दिला जात नाही.
13 digit mobile number.JPG

जर कथा नाही लिहिली, नुसते points लिहिले तर एकतर technical लेख पाहून लोक वाचण्याची शक्यता कमी होते, कारण सगळ्यांनाच technical गोष्टी वाचायला आवडत नाहीत. शिवाय नुसते points लिहून त्या विषयाचे गांभीर्य कळेलच असे नाही, जे कथारुपातून कळते. अमुकएका पात्रासोबत झाले ते उद्या माझ्यासोबतही होऊ शकते, असे वाटून वाचक मुद्दे गांभीर्याने घेतात. उलट नुसते मुद्दे लिहिले की 'एवढे सगळे कोण सेटिंग करेल? मला कोण कशाला फसवेल? तसाही मी साधा माणूस. माझा नंबर असून असून कोणाकडे असणार?' अशी विचारसरणी होते.

१) ज्या लखनौ पोलिस नी अवनी ल समन्स पाठवले त्या पोलिस स्टेशन चा तपास अधिकारी,त्या पोलिस स्टेशन चा वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोर्टाने बडतर्भ करायला हवा होता.
आणि त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या पोलिस अधिकाऱ्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे होते.
२) सामान्य व्यक्ती नवीन सिम कार्ड विकत घेतात ही काही त्याची चूक नाही.
कंपनी जुने सिम बंद झालेले त्याच नंबर सहित नवीन customer ल देते हे पण मान्य करता येईल.
पण गुन्ह्या मध्ये तो मोबाईल नंबर सामील असेल तर गुन्हा घडलेला पिरियड आणि त्या काळात ते सिम कोणाकडे होते ह्याची चोकशी करणे पोलिस न चे पहिले कर्तव्य आहे.

भारतात इतकी उच्च दर्जा ची व्यवस्था असण्याची बिलकुल शक्यता नाही.
त्या मुळे लोकांनीच सावध राहावे.

तुमचे आधीचे लेख वाचलेले आहेत. साध्या सोप्या भाषेत कथारूपातून समजवून सांगण्याची तळमळ जाणवते. अशा लेखांच्या प्रतिक्षेत. पुलेशु.
( नकारात्मक प्रतिसादांकडे दुर्लक्ष कराल यात शंका नाही)

>>> त्या काळात ते सिम कोणाकडे होते ह्याची चोकशी करणे पोलिस न चे पहिले कर्तव्य आहे.
Exactly हेमंत, आपले म्हणणे बरोबरच आहे. उगीच कुणी तक्रार केली म्हणून कुणालाही असे समन्स पाठवता येत नाही त्या आधी असली प्राथमिक चौकशी झालीच पाहिजे होती.

>>> भारतात इतकी उच्च दर्जा ची व्यवस्था असण्याची बिलकुल शक्यता नाही.
आजच्या टेक्निकल काळात ही अगदीच सामान्य गोष्ट आहे, आज कुणीही स्वतः आपल्या आधारकार्डावर किती सिम ऍक्टिव्ह आहेत आणि कधीपासून आहेत हे पाहू शकतो आणि तशीच व्यवस्था तपासयंत्रणाकडे विस्तृत स्थरावर असेलच.

आजच्या टेक्निकल काळात ही अगदीच सामान्य गोष्ट आहे, आज कुणीही स्वतः आपल्या आधारकार्डावर किती सिम ऍक्टिव्ह आहेत आणि कधीपासून आहेत हे पाहू शकतो....

Exactly!
https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/
या साईट वर जाऊन आपल्या मोबाईल क्रमांकाने लॉगीन घेतले की आपल्या नावावर अन्य किती क्रमंक नोंदणीकृत आहेत ते पाहता येते, आणि एखादा नंबर संशयास्पद वाटला म्हणजे असा क्रमांक जो कधी आपण घेतलाच नव्हता पण आपल्या नावाने नोंदणीकृत आहे किंवा आपलाच जुना एखादा क्रमांक जो आपण आता वापरत नाही पण तरीही आपल्या नावावर आहे तर असे क्रमांक केवळ एका क्लिकने बंद करता येतात!

किंवा आपलाच जुना एखादा क्रमांक जो आपण आता वापरत नाही पण तरीही आपल्या नावावर आहे तर असे क्रमांक केवळ एका क्लिकने बंद करता येतात!

बरोबर आहे पोलिस नी सरळ सरळ चुकीच्या व्यक्तीला समन्स पाठवले आहे.
खूप मोठी चूक केली आहे.निष्पाप व्यक्ती ला मनस्ताप दिला आहे.
कोर्टाने संबंधित सर्व पोलिस ना बडतर्फ करून गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे त्या पोलिस न वर दाखला करून जेल मध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे होती.

भारतात लोकसेवक कडून होणाऱ्या गाढव चुकांना न्यायालय का गंभीर पने घेत नाही ह्याचे आश्चर्य वाटत आहे.

कोर्टाने संबंधित सर्व पोलिस ना बडतर्फ करून गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे त्या पोलिस न वर दाखला करून जेल मध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे होती.>>> Lol Lol Rofl