कर्मचारी सुधारणा कार्यक्रम

Submitted by पाचपाटील on 12 February, 2022 - 10:32

('कर्मचारी सुधारणा कार्यक्रम': एक केस स्टडी;
समस्या, सोल्यूशन्स, उद्देश, अटी, शर्ती वगैरेसहित)

१. जमलेल्या माझ्या तमाम सभ्य आणि विद्वान
स्त्री-पुरुष होss,

घसघशीत इन्क्रीमेंट्स, घरांचे हप्ते किंवा आयुष्यातली एकूणच स्टॅबिलिटी वगैरे किरकोळ गोष्टींचा, एवढा का बरे विचार करता तुम्ही..!
आपल्याकडे तर तब्बल चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांची संधी आहे..! या गोष्टी आज नाही मिळाल्या तरी कधी ना कधी
कुठल्यातरी जन्मात मिळतीलच..! काळजी का करता ?
श्रद्धा और सबुरी..! हे तत्त्व अतिमहत्वाचं..!
तेवढं सांभाळावं मानसानं..!
{बाकी घरं वगैरे घ्यायची आणि रिटायरमेंटपर्यंत हप्ते भरत कंबरेचे टाके ढिले करून घ्यायचे, हा कन्सेप्ट मला तरी समजत नाही..! मी पूर्वीच स्वतःस झोपडपट्टीत शिफ्ट करून घेतले आहे.. अर्थात नगरसेवक, अधिकारी वगैरे असंतुष्ट आत्मे असतात.. पण मानधन वगैरे देऊन त्यांची पिरपिर बंद करता येते.. आणि मग सगळं पद्धतशीर अधिकृत होऊन जातं. असो.}

२. शिवाय तुम्ही आपापल्या केबिनमध्ये उगाचच टवाळक्या करत बसू नये, म्हणूनच तुमच्यासाठी हा एवढा सुंदर,
बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक घुसळण करणारा...
किंवा करियरीस्टीक विचारमंथनाच्या दिशेने तुम्हास अत्यंत फोर्सफुली ढकलणारा 'सुधारणा कार्यक्रम' आयोजित केला गेला आहे..!!

अर्थात, तुम्ही भाग्यवंत पुण्यवंत वगैरे असल्यामुळे तुमची या 'कार्यक्रमा'साठी निवड झालेली आहे, असे प्लीज समजू नका..! तेवढंच काही पुरेसं नसतं आयुष्यात..!
त्यासोबतच कष्टही महत्वाचे..! तर तुम्ही आजवर उपसलेल्या अपार कष्टांचे फळ म्हणून तुमच्या पदरात
ही दैवी संधी टाकण्यात आली आहे, याबद्दल तुम्ही
खात्री बाळगा, सभ्य विद्वज्जन हो..!

{{हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असल्याचा गैरसमज
आपल्या काही सहकाऱ्यांनी करून घेतला होता आणि
ते सवयीप्रमाणे ताबडतोब रजिस्ट्रेशन वगैरे करून मोकळेही झाले होते..!
परंतु पहिल्या दिवशी झूम लिंकची वाट बघत असतानाच
त्यांस समजले की याठिकाणी प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या
उपस्थित राहूनच स्वतःत सुधारणा करून घ्यायची आहे..!
आणि हे समजताच सदर सहकारी जलदगतीने
लंपास झाल्याचे आपल्या लक्षात आलेच असेल..!
परंतु तुम्ही तसे नाही आहात..! तुम्ही खरे दर्दी
आहात...! तुम्हा सर्वांमध्ये ज्ञानप्राप्तीची जबरदस्त चाह, तडप वगैरे दिसून येते...! तुमच्या डोळ्यांतूनच ती टपकतेय..! आणि म्हणूनच याठिकाणी आम्ही प्रथमतः तुमचे मनापासून
अभिनंदन करतो, सभ्य स्त्री-पुरुष होss..!}}

३. तुम्ही सर्वजण ह्या 'कार्यक्रमा'चा कचकावून लाभ घ्याल आणि ज्ञानसाधनेत अजिबात हयगय करणार नाही, अशी आम्हाला खात्रीच आहे.
त्यासाठीच ही सगळी उत्तम आरामदायी व्यवस्था,
पिण्यासाठी स्वच्छ पारदर्शक पाणी, शिवाय वडापाव
इत्यादीचेही नियोजन करण्यात आलेले आहे.
समजा तुम्हाला आवडत नसेल, तर ते न खाण्याचंही
स्वातंत्र्य तुम्हास बहाल केलेलं आहे..! खाल्लंच पाहिजे,
असा काही आग्रह, हट्ट किंवा करारपत्र आम्ही करू इच्छित नाही.. कारण शेवटी डाएटींग किंवा फिगर मेंटेनन्स वगैरे मुद्दे असतात..!

४. बाकी भोजनाची वगैरे व्यवस्था ही नेहमी स्वतःची स्वतःच करावयाची‌ असते, हे उघड वैश्विक गुपितही आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुमच्या लक्षात आलंच असेल..!
तेही नको असल्यास निर्जळी कडकडीत उपवास करण्याचे स्वातंत्र्यही तुम्हांस आहेच, हे आणखी एकदा सांगतो..!
कारण खरे पाहता, उपवास केल्यास आणखीनच
उत्कृष्ट गोष्ट होईल..!

म्हणजे मग दुपारच्या प्रसंगी राक्षसी घोरणे किंवा खतरनाक डुलक्या घेत खुर्चीतून पडता पडता दचकून उठणे वगैरे
टाळून उत्तम प्रकारे बौद्धिक घुसळण करता येईल..!
आणि परिणामी, तुम्ही कितीही नकार दिलात तरी हे
ज्ञानशिंतोडे किंवा तत्सम ज्ञानपिचकाऱ्या, ज्ञानफव्वारे
वगैरे तुमच्या मेंदूत अगदी खोलपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा आम्हास विश्वास वाटतो..!

५. दुनियाभरच्या म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, सिंगापूर, चीन किंवा फ्रान्स वगैरे देशांतील लोकांना अलीकडे विशेष काही उद्योग उरलेला नाही..!
शिवाय जगण्याच्या सगळ्या गरजा पुरेपूर भागल्यामुळे,
वेळ कसा घालवायचा, हीच एक भेदक समस्या त्यांस
भेडसावत असते..!
त्यामुळे ते घाऊक स्वरूपात रोज नवनवीन सॉफ्टवेअर्स, सर्टीफिकेशन कोर्सेस पैदा करून बाजारात मांडून ठेवतात..‌ बाकी मग त्यासाठी तुंबळ मार्केटिंग वगैरे असतेच..
आपल्याकडच्या लोकांनाही पैसा, वेळ वगैरे खर्चून ते सगळं शिकून घेण्याची तीव्र इच्छा, कुतूहल, जिज्ञासा, मुमुक्षा वगैरे व्यक्त करावी लागते..! इलाज नसतो, ही समजा एक गोष्ट.

आणि शिवाय नंतर समजा, मी अमुक अमुक एवढ्या
अत्याधुनिक गोष्टींचा अगदी मुक्तहस्ते वापर करू शकतो,
ही गोष्ट चारचौघांत सांगताना काळजास मोठ्या गुदगुल्या होतात, आल्हाद वगैरे वाटतो.!
अर्थात, त्यात वाईट असे काही नाही..! हे असं स्वतःबद्दल बरं वाटणं, हीसुद्धा अत्यंत मानवीय अशीच गोष्ट आहे..!

६. बाकी तुम्हास दिलेले लॅपटॉप्स प्राचीन किंवा जुनाट किंवा मंद किंवा विषाणूग्रस्त वगैरे आहेत आणि त्यावर समजा अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सचा काईच संबंध नसतो...!
परंतु अशा किरकोळ अडचणींमुळे तुम्ही खोळंबून राहणे,
फारसे योग्य होणार नाही.
तुम्हाला हवा तो आधुनिक कॉन्फिगरेशनचा वगैरे लॅपटॉप स्वखर्चाने विकत घेण्याची तयारी तुम्ही ताबडतोब
दाखवालच..!
थांबा.. थांबा..!
आता लगेच सगळ्यांनी आपापल्या आर्थिक अडचणी
मांडायला सुरूवात करू नका..! कारण तुम्ही कर्ज वगैरे
काढू शकताच ना..! किंवा समजा आधीचेच मुबलक कर्ज डोक्यावर असल्यामुळे बॅंका कर्ज देत नसतील तर
खाजगी सावकार वगैरे असतातच..! त्यांच्याकडे स्वतःला गहाण ठेवावे लागले तरी आपल्या व्यापक प्रगती
डोळ्यासमोर ठेवली तर त्यात काही चुकीचे म्हणता येणार नाही..!

बाकी आपल्या सर्वांना निसर्गतः दोन-दोन किडन्यासुद्धा
मिळालेल्या असतात.. परंतु खरेतर एका किडनीवरसुद्धा आपले काम सुरळीतपणे चालू शकते.
वेळप्रसंगी गरज पडल्यास दुसरी किडनी विकता यावी, याच उदात्त हेतूने निसर्गाने ती सोय केलेली आहे.
तर आपण एक किडनी समजा काळ्या बाजारात वगैरे
विकली, तर पैशांचा प्रश्नच मिटतो..!

बाकी तिकडे तेलसमृद्ध अरबी देशांमधले अतिश्रीमंत म्हातारे अशा तंदुरूस्त किडन्यांच्या शोधात असतात, हे आपण
'अंदाधुन' ह्या चित्रपटात पाहिले असेलच ना..!
तर असल्या किडनीविक्या डॉक्टर्स किंवा तत्सम एजंटांचा पत्ता आपणांस हवा असेल तर 'अंदाधुन'च्या निर्मात्यांशी
संपर्क साधावा..! कारण शेवटी असं आहे की,
सगळ्या गोष्टी आम्हीच सांगायच्या तर मग तुम्ही काय
करणार ना..!

७. शिवाय समजा 'कार्यक्रमा'तील काही संकल्पना तुम्हाला समजल्या नाहीत तरीही निराश होण्याची काहीच गरज नाही..!
(अर्थात, अशा पद्धतीची विनोदी निराशा तुमच्या टणक
मनास कधीच शिवणार नाही, हे आम्हांस ऑलरेडी माहितीच आहे..! त्यामुळे ते एक जाऊच देऊ.)

आणि समजा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची तुमची इच्छाच नसली, तरीही काही हरकत नाही..! तसे पाहता,
तुम्ही कुणीच कुणाबद्दल हरकत घेणार नाही.. कारण आपण सगळेच मनातल्या मनात एकमेकांना दबकून असतो..!
पण तरीही वक्ता बोलत असताना अधूनमधून कौतुक, आदर किंवा कधीकधी थोडेसे आश्चर्यचकित झाल्यासारखे चेहऱ्यावर दाखवले, तर बरे होईल..!
{उगाचच 'ह्याला काय कळतंय' 'लै शाना लागून गेला' 'तोंड बघा ह्येचं' अशी अनुत्पादक शेरेबाजी शक्यतोवर टाळता आली तर बघा}

बाकी मग भाषणाच्या शेवटी अचूकपणे सगळ्यांनी एकसाथ टाळ्या वाजवण्याचं ट्रेनिंग तर आपल्या सगळ्यांना शाळकरी वयापासून मिळालेलंच असेल.!

त्यामुळे शेवटी जरा उत्साही रितीने टाळ्या वाजवून त्यांचा
हौसला बुलंद केला तर बरं होईल, अशी कळकळीची विनंती मी तुम्हांस याठिकाणी करतो आहे..!

त्याचं कारण असं आहे की सगळे वक्ते हे आपलेच आहेत..! आणि आपल्याच माणसांना मानधन वगैरे देणे आम्हांस फारच ऑकवर्ड वाटते..! असे मानधन वगैरे देऊन त्यांच्या
प्रेमाचा अपमान करण्याचे पाप आम्ही करू इच्छित नाही..!
त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त लेटर ऑफ ॲप्रीसिएशन
पुरेसे आहे, असे सर्वानुमते ठरले आहे.

८. बाकी हा 'सुधारणा कार्यक्रम' शुक्रवारपर्यंत लांबवण्याचे मुक्रर केले आहे..!
शुक्रवारी संध्याकाळी बरोब्बर सव्वाचार वाजता आपण सर्वजण, वेगवेगळ्या तंत्रप्रणालींच्या हाताळणीमध्ये अगदी तंतोतंत एक्स्पर्ट किंवा मास्टर किंवा अगदी बोलीभाषेतच सांगायचे झाले तर 'खिलाडी' वगैरे होऊनच बाहेर पडाल..! बाकी त्यासाठी तुम्हाला कोण मोटीव्हेट वगैरे करणार..!
तुम्ही सगळे ऑलरेडी तुडुंब मोटीव्हेटेडच आहात..!

तर तुम्हा सर्व विद्वान, भाग्यवान आणि सभ्य स्त्री-पुरुषांना
शुभेच्छा देतो आणि याठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो, अध्यक्ष महोदय..!
जै हिंद. जै महाराष्ट्र. इत्यादी.

## तळटीप किंवा Postscript:-
''फक्त पार्टीसिपेशन सर्टीफिकेट मिळविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम अटेंड करू नका, तर नॉलेज मिळवण्यासाठी करा!''..

हे एक चमकदार वाक्य प्रत्येक कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी आम्हांस फेकावं लागतं.!
या वाक्यात आता तसा काहीच दम राहिला नाही...पण तरीही असली मोडीत निघालेली भंगार वाक्यं, कल्हई मारून मारून पुन्हा पुन्हा वापरत रहावी लागतात.!

आता तर माईकपुढे नुसते उभे राहिलो तरी अशी वाक्यं
आपोआपच तोंडातून घरंगळून बाहेर पडायला लागतात..!
सवयीनेच होतं ते.‌.! नाईलाज..!
तुम्हा सर्वांनाच अशी वाक्यं हास्य-उत्पादक वाटतात,
हे स्पष्टच आहे..! कारण ऑलरेडी जमवलेल्या अशा
सर्टीफिकेट्सच्या रद्दीचं काय करायचं हाच प्रश्न
तुमच्यापुढे अजून खुला आहे..! तिथे ह्या आणखी
एका सर्टीफिकेटचं काय कौतुक..!

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं कशासाठी मग??
तर करावं लागतं..! वरिष्ठ असतात..! त्यांचे नवनवीन फंडे असतात.. ! त्यांनाही कुणालातरी दाखवावं लागतं...!
असले खूप वेडे चाळे अधूनमधून करावे लागतात. ! किंवा केल्यासारखे दाखवावे लागते... ! किंवा करत आहोत असे दाखवावे लागते..!

मग अशा वरीष्ठ पदांवरचे मोगॅम्बो किंवा शाकाल
किंवा तत्सम तात्या विंचू किंवा समजा कुबड्या खवीस वगैरे मंडळी खुश होतात...! किंवा कधीकधी ते खुश झाल्याचा आभास निर्माण करतात आणि शेवटी त्यांना करायचं तेच करतात...!

पण ते एक असोच.. कारण तो आणखी एक वेगळाच फाटा फुटेल..! आणि शिवाय सगळंच काय आपल्या हातात नसतं..! प्रयत्न करत रहावं मानसानं..! कृष्ण परमात्म्यानं तरी दुसरं काय सांगितलंय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users