सुट्टी असेल आणि समजा दुपारी घनघोर झोप झाली
असेल तर संध्याकाळी मला जरा जोर येतो.. मग
जेएम रोडवरून रेंगाळत डेक्कनला वळसा घालून
एफसी रोड वगैरे परिसरात असतो.. विशेष काही काम
नसतं.. सहज रेंगाळणं..! शरीर मिळालेलं आहेच..! तर
त्यामाध्यमातून जीवन वगैरे अनुभवणं..
बाकी शरीराचंही तसं काही विशेष नाही एवढं.. म्हणजे
हेवा वाटण्यासारखं काही नाही त्यात..! अगदीच
अन्अर्बनाईज्ड आहे ते..! आणि त्यात ढेरी वगैरे..!
ढेरीचा कसला आलाय हेवा.!
तर पांडेजींची पानटपरी..! तिथे दोन मुली..! बऱ्यापैकी
आकर्षक..!
एक म्हणतेय 'भैय्या, एक बडी गोल्डफ्लेक देना.'
भैय्याकडे बडी गोल्डफ्लेक नाहीये..भैय्या लगेच
शेजारच्या टपरीवरून आणून त्यांना देतोय.
मी भैय्यास नंतर म्हटलं की पांडेजी हे बरंय तुमचं.. मी
मघाशी मोठी गोलडफ्लेक मागितली तर नाही म्हणाला..
आणि ह्यांना स्वतः जाऊन आणून दिलीत..
ह्या स्त्री-दाक्षिण्याबद्दल तुम्ही अभिनंदनास पात्र आहात..!
तर आता तुम्ही एक काम करा पांडेजी..! तुम्ही त्या
मुलीवर कविता वगैरे करा.. म्हणजे तिच्या डोळ्यांवर
कविता करा.. तिच्या पापण्यांवर कविता करा.. तिच्या
गालांवर कविता करा.. तिच्या भिवयांच्या कमानींवर
कविता करा..तिच्या मनगटातल्या धाग्यांवर कविता करा.. तिच्या मॅचिंग नेलपेंटवरही कविता करा...!
आणि त्या समस्त कवितांच्या माध्यमातून तमाम
व्याकुळ प्रेमीयुगुलांच्या हृदयाला हात वगैरे घाला...!
तर यावर पांडेजी गुबूगुबू लाजले..! अगदी लालबुंद वगैरे..!
बाकी इकडची भिकारी मंडळी माझ्याकडेही पैसे मागतात,
याचं राहून राहून मला आश्चर्य वाटतं.. एवढ्या दिवसांत माझा एकंदरीत वकुब त्यांनी समजून घ्यायला काय हरकत होती..
'वाडेश्वर'च्या समोरच्या फुटपाथवर मस्त टेकून बसायला
कट्टे वगैरे बांधून ठेवले आहेत अलीकडेच..
तिथे 'संकल्पना' म्हणून एका नगरसेवकाच्या नावाची
पाटी आहे..! हे सगळं बांधण्याची संकल्पना, कष्ट कुणाचे आहेत कुणास ठाऊक..!
पाटी लावण्याची संकल्पना मात्र आपल्या ह्या विशिष्ट
नगरसेवकाची आहे..! आणि तशी संकल्पना त्यास स्फुरणं ही अत्यंत ग्रेट मानवी गोष्ट आहे..! नायतर मग जनतेला
कळणार कसं ?
तर तिथे मी पायावर पाय टाकून ते सहज हलवत, हवा
खात बसलो असता तिघे जण जवळ आले.. दोन तरुण
आणि एक तरूणी..! सगळे तिशीच्या आतले.! टकाटक
गोरेगोमटे.! स्मार्ट..! चेहऱ्यांवर समजा प्रशिक्षित
आत्मविश्वासपूर्ण कार्पोरेट हास्यं वगैरे..!
"Hello Sir..! How are you..!! Actually we are doing a survey for UNESCO.. And this is basically regarding happiness among the working professionals... So we just want to know whether you are happy or not?"
मी चपळाईने हिंदीचा आश्रय घेत म्हटलं की बाबा युनेस्कोको कबसे मेरे हॅप्पीनेस में इंटरेस्ट आने लगा? और वैसे ये आनंद वगैरे तो डिपेंड करता है ना मतलब ?
सिच्युएशनपर, मूडपर रह्यताय वो... कोई आदमी हमेशा
हॅप्पी रह्य सकताय क्या? डू यू गेट माय पॉईंट??
"नई नई सर.. अब्बी का बोलो...अबी आप मुस्कुरा रहे हो मतलब हॅप्पी हो..! राईट?"
हेहे..! अरे ऐसे कैसे ? तुमने अबी मेरेपर आनंदी होने का आरोप किया..! मेरे अंदरका फाटलेपण तुमें दिखाय नई दिया शायद..!
"नई नई सर.. हम समझते हैं ना..! आपका स्माईल बिलकुल जेन्यूईन हैं सर..!"
नै नै.. वैसा कुच नै हे.. हमारा आनंद नकली है.. सच्चा आनंद तो फूल के माफीक होता है.. म्हणजे फूलामधे सुगंध मावत नसतो.. त्येच्यामुळे ते फूल आपोआपच सगळीकडं स्वतःला बेबंदपणे उधळत राहतं.. हमारा वैसा नय है बाबा... उलट आम्हाला हितं आरडून ओरडून आमचा माल इकावा लागतो.. "झालै उडालैss.. झालै उडालैss. ईसला डजन्.. ईसला डजन्... झालंय उडालंयss .."
ऐसा रह्यता सबकुच.. समझे ना आप लोग ? तो अबी आप लोग ऐसा करो... बाद में युनेस्कोको जाकर बताओ की, ये आदमीमें अंदरसे ऐसी एक कोवळी कोवळी थरथर है करके..!
"व्हॉट व्हॉट? व्हॉट थरथर? व्हॉट डिड ही जस्ट से?"
थरथर मतलब वो बाकबूक जैसेही रह्यता वो..! उसमें कैसा रह्यता की आदमी को दुनिया के प्रति भरवसा नय रह्यता.. और फिर आप जैसे हायफाय लोग अचानक आकर उसके अंदर का प्रायव्हसी खलास करते है.. तो उसके पास दूसरा चॉईसच नय रह्यता... त्येच्यामुळं होतं असं की आमच्या
बडबडीला असं पागल स्वरूप धारण कराय लागतं..
"ओह् के ओक्केss.. एनीवेज.. थॅंक यू सर..थॅंक यू वेरी मच.. आपसे बात करके अच्छा लगा...चलोss.. संजोलीss लेट्स गो.. बाssय सर..!"
आवो.. थांबा ना.. माझं काय चुकलं काय?? ओss संजोली मॅडम.. हे असं का करताय तुम्ही...? आसं घाईघाईनं निघून का चाल्लाय एकदमच? अहो आत्ता आत्ता तर जरा कुठं ओपन-अप व्हायला लागलो होतो मी.. आणि तुम्ही लगेच
निघून चाल्ला? माझ्या वाटणीचं दु:ख सोसायला असा स्पष्ट नकार का बरं देताय तुम्ही ? हे असं बरं नाही..! युनेस्कोला काय वाटेल..! ऐका ना अहोss.
भारी
थरथर...बाकबूक...आवडलं
थरथर...बाकबूक...आवडलं
मराठीतलं हिंदी मजा आली...
भैय्या काल पातेलं घास्या फिर भी दूध नास्या...असं आजी सकाळी दारावर दूध घालायला आलेल्या भय्याला सांगते...
कारुण्य..>>>माझ्या वाटणीचं दु:ख सोसायला असा स्पष्ट नकार का बरं देताय तुम्ही ? हे असं बरं नाही..! युनेस्कोला काय वाटेल..! ऐका ना अहोss.>>>>
सुरुवात थोडी कंटाळवाणी वाटली...
मस्त!
मस्त!
)
(त्या कट्ट्यांवर बसलेले लोक बघितले आहेत. त्यामुळे लगेच डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला!
जाई, दत्तात्रय साळुंखे
जाई, दत्तात्रय साळुंखे
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
वावे,
त्या कट्ट्यांवर बसलेले लोक बघितले आहेत.>>
सगळे टाईमपासला बसलेले असतात..! त्यासाठी उत्तम जागा है ती..
मी 'रिकामटेकडे' हा शब्द लिहून
मी 'रिकामटेकडे' हा शब्द लिहून खोडला!
(No subject)
छान
छान
रिकामटेकडे लोकांवर खरे तर जळतो आपण. आपल्याला त्यांचे जगाची पर्वा आणि स्वत:च्या आयुष्याची चिंता न करता निवांत आणि निश्चिंत बसलेले बघवत नाही.
बाहेरचेच कश्याला.. साधे घरीही बायकोला असे बसलेले बघितले की मला ते बघवत नाही आणि काहीतरी खुसपट काढून मी भांडण सुरू करतो..
ॲण्ड ऑफकोर्स, व्हायसे व्हर्सा!
हुमायून नेचरच आहे ते
थरथर