वाचनानंद - २

Submitted by shabdamitra on 4 February, 2022 - 22:08
library

वाचनानंद - १

The Joy of Reading पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने, त्यातील लेखकांविषयी थोडक्यात लिहिले आहेच पण त्यांच्या महत्वाच्या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये, त्यात मांडलेली मते, वैचारिक मुद्दे ,उत्तम मजकूर, कवितेच्या अर्थपूर्ण,भावरम्य ओळी , काही आठवणी, प्रसंग दिले आहेतच पण त्यातील हा भाग नाही वाचला तरी चालेल, हे वाचल्याशिवाय राहू नका अशा मोलाच्या सूचनाही दिल्या आहेत. किंवा या लेखकाचे हे पुस्तक अगोदर वाचा आणि नंतर त्याची ही दुसरी वाचा असा सल्लाही देतो.

पुस्तकाच्या अखेरीस त्याने या पुस्तकातील महत्वाच्या व्यक्तीं आणि त्यांची निवडक पुस्तके वाचण्याचा दहा वर्षांचे वेळापत्रक दिले आहे !

सावकाश वाचा, त्यावर्षात त्याने प्रथम दिलेल्या लेखका ऐवजी दुसऱ्या लेखका पासून सुरवात केली तरी चालेल; घाईघाईत दडपण घेऊन वाचू नका. दहा वर्षांच्या ऐवजी वीस वर्षे लागली तरी हरकत नाही ( इथे तो म्हणतो, “माझ्याजवळ आता वेळ कमी आहे .” हे वाचल्यावर मात्र थोडे वाईट वाटते ! ). वाचताना या पुस्तकातील त्याचे समालोचन आणि भाष्य सोबतीला असेलच. त्यामधून “मीही तुमच्याबरोबर ती वाचणार आहे.” हा आधारही देतो. जर वाचकांचा गट असेल तर एक पुस्तक सर्वांनी वाचावे. त्यावर चर्चा करावी, “मला बोलावल्यास मीही आनंदाने येईन ” असे सांगतो. ( हे छान होईल; पण मानधन किती घेतील कुणास ठाऊक !)

चार्ल्स व्हान डॉरेनने प्रस्तावनेत स्वतःविषयी लिहिले आहे ते वाचण्यासारखे आहे. त्याच्या तोंडून ते ऐकू या :
“वाचन ही माझी अत्यंत आवडती गोष्ट आहे. मी दहा वर्षाचा असताना इतर मुलांप्रमाणे मलाही लवकर झोपायला लावत. पण मी डोक्यावर पांघरूण ओढून बॅटरीच्या प्रकाशात पुस्तक वाचत असे. मला वाटे की आईवडलांना हे माहीत नाही. पण वडील एकदोनदा इतकेच म्हणाले,”असे वाचत जाऊ नकोस. डोळे लवकरच बिघडतील.” तरीही रात्री रजईखाली बॅटरीच्या प्रकाशात वाचणे मी काही सोडले नाही. वडलांचे म्हणणे खोटे ठरले. आज सत्तरी उलटल्यानंतरही अजून मला चष्मा लागला नाही !” ( लेखकाचे वडीलही कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांना Pulitzer Prize मिळालेले आहे)
” मला पुष्कळ चांगले शिक्षक मिळाले. प्रत्येकाकडून मी काहीतरी मोलाचे शिकलो. हे पुस्तक म्हणजे त्या सर्वांचे अंशत: तरी ऋण फेडण्यासाठीच आणि फेडण्यासारखे आहे ! ”
“वाचनातली पहिली गुरु म्हणजे माझी आई. आम्ही खेडेगाव म्हणावे अशा लहान गावात रहात होतो. मी शाळेत जात नव्हतो. शाळा नसावी तिथे किंवा दूर शेजारच्या गावी असेल.मी आणि आई दोघेही अभ्यासाचे धडे गिरवायचो. मी वाचलेले पहिले पुस्तक The Little Fur Tree.जंगलातील एका फरच्या झाडाची गोष्ट त्यात आहे. नाताळच्या सणासाठी एका लहान मुलाच्या आणि मुलीच्या घरात ‘खिसमस ट्री ‘ साठी ते तोडले जाते. आपल्यामुळे त्या दोन लहान मुलांना ख्रिसमसचा आनंद होणार ह्या विचाराने, तोडले जात असताही त्या झाडाला खूप समाधान वाटते. ह्या पुस्तकाने माझा पुस्तकाच्या जगात प्रवेश झाला.”

” मी जेव्हा हायस्कुलमध्ये गेलो तोपर्यंत माझे खूपच वाचन झाले होते. माझ्या बरोबरीच्या मुलांपेक्षाही माझे वाचन त्यांना ‘अफाट’ वाटावे असेच होते! माझ्या वडलांनी माझी वाचनाची आवड जोपासली. वाढवली. तरीही ते मला बरेच वेळा बाहेर खेळायला जात जा असे सांगत असत. हे वाच, तेहि वाचून काढ एकदा असे म्हणत. ख्रिसमसला आणि माझ्या वाढदिवसाला ते मला पुस्तकेच देत. तीही निरनिराळ्या विषयांवरची. हे वाच ते वाच सांगत तरी मला त्यांनी “मग वाचलेस का ते ?” असे कधीही विचारले नाही.”

“निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे मला पुढे कधीही अशी विविध तऱ्हेचीं पुस्तके वाचण्याची भीती, धसका बसला नाही. माझे वडील हयात होते तोपर्यंत ते मला पुस्तके देत असत. त्यांनी दिलेल्या पुस्तकांपैकी आजही अनेक पुस्तके माझ्याजवळ आहेत. विशेषतः दुसऱ्या महायुध्दात मी हवाई दलात असताना त्यावेळी त्यांनी पाठवलेली पुस्तके आजही माझ्याजवळ आहेत. युद्धाच्या वेळी माझ्या खिशात त्यांनी पाठवलेले Palgrave चे Golden Treasury हे जाड कव्हरचे पुस्तक मी माझ्या पुढच्या खिशात नेहमी बाळगत असे. मंतरलेल्या ताईताप्रमाणे ते पुस्तक माझ्या छातीत गोळी घुसू देणार नाही असे मला वाटायचे. त्या पुस्तकाने मला युद्धात वाचवले असेलही. हे मात्र खरे की युध्दात माझ्यावर कोणी गोळी झाडलीही नाही.”

लेखकाने त्याच्या वाचनाची आवड. ती वडिलांनी कशी वाढवली, जोपासली, ते पुस्तके सुचवत, पुस्तके आणत हा भाग वाचल्यावर मला, आणि अर्थात माझ्या भावंडांनाही, माझ्या वडिलांची आठवण झाली. तुम्ही म्हणाल हे मी, माझे, मीपणा ‘बीचमें मेरा चांदभाई ‘ च्या चालीवर घुसवतात. तसे नाही. मलाच काय अनेक वाचकांना आपल्या वडीलांची किंवा ज्यांनी वाचनाची आवड लावली त्यांची,त्यांचे वाचन आणि वाचनाचे प्रेम ह्या गोष्टी नक्की आठवतील. असे जर वाटले तर ते त्या लेखकाचे आणि त्याच्या पुस्तकाचे मोठेपण आहे.

” कॉलेजात तुला प्लेटो, होमर सोफोकल्स यांची पुस्तके वाचायला लागतील” असे वडील म्हणाले, तेव्हा मी हायस्कुलच्या शेवटच्या वर्षात असतानाच त्यातील काही पुस्तके वाचायला सुरवात केली. त्यावेळी माझा एक मित्र कॉलेजात होता. त्याला मी प्लेटोचे ‘Apology ‘ वाचले म्हणल्यावर तो म्हणाला, ” हुं: ते काय , समजायला सोपे आहे !” मी हिरमुसला झालो. पण त्यावेळी माझे जे मत होते ते आजही कायम आहे. ते वाचायला कंटाळा येत नाही. प्लेटोच्या इतर पुस्तकांपेक्षा ते रंजकही आहे, आणि वाचायला सोपे आहे. पण समजायला… मोठमोठे विद्वान प्लेटोच्या पुस्तकांचा अर्थ लावताना आजही अडखळतात. ते असू दे. प्लेटोची पुस्तके आजच्या संदर्भात विशेष महत्वाची नाहीत हे खरे आहे. पण प्लेटोने सॉक्रेटिसची जी चौकशी झाली त्या खटल्याची आणि त्याच्या अखेरच्या दिवसांचे, त्याच्या मृत्यूचे वर्णन लिहिले आहे ते आणि प्लेटोने त्यातून माणूस, माणुसकी, स्वभाव, आणि मानवी जीवनाविषयी जे सांगितले आहे ते आजही अत्यंत मौल्यवान आहे. ”

लेखक डॅारेन यांनी त्यांच्याविषयी आणखी काही माहिती दिली ती वाचून पुस्तके वाचण्याच्या आनंदाचा समारोप करू या. ते सांगतात :
” मी काही काळ कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. तिथे थोडी वर्षे काम करून मी Encyclopaedia Britannica मध्ये काम करू लागलो. तिथे मला थोर विद्वानांच्या बरोबर काम करता आले. त्यांचे वाचन किती प्रचंड आणि सखोल होते,ते मी सांगू शकणार नाही. त्यांपैकी Mortimer J. Adler हे तत्वज्ञानी, ह्यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध आला. आम्ही दोघांनी मिळून काही पुस्तके लिहिली, काही संपादित केली. त्यावेळेस आणि आजही, कोणत्याही पुस्तकात कोणता महत्वाचा प्रश्न किंवा विषय आहे, लेखकाला काय म्हणायचे आहे हे ऍडलर यांच्या काही क्षणात लक्षात येत असे, याचे आश्चर्य वाटे. ते दहा वर्षांपूर्वी वारले. पण मला ते आजही जिवंत आहेत असेच वाटते.”या दोघांनी मिळून How to Read Like A Professor हे पुस्तकही लिहिले आहे.

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users