वाचनानंद - १

Submitted by shabdamitra on 28 January, 2022 - 02:30
Library

वाचनानंद - २

वाचनाच्या आनंदावरचे एक चांगले पुस्तक माझ्या वाचनात आले. नाव आहे ” The Joy of Reading. नावाप्रमाणेच पुस्तकाच्या वाचनाने आनंदही झाला.

पुस्तकाचा लेखक चार्लस व्हॅन डॉरेन हा केवळ इंग्रजीचा नामवंत प्राध्यापक नसून तो ‘ Humanaities”चा उत्तम scholar आहे. त्याचे पुस्तक वाचल्यावर, मी बरीच पुस्तके वाचली हा माझा समज फक्त गैरसमज आहे याची खात्री पटली. आणि ती मी ‘वाचली ‘ हाही साक्षात भ्रम आहे हे मनोमन जाणवते. तो अतिशय उत्तम वाचक-लेखक आहे. हे पुस्तक वाचल्यावर माझे ” वाचन ” म्हणजे पानावरील ओळीने रांगेत बसलेले शब्दांचे थवे पाहात पाने उलटणे एव्हढेच ! फक्त एव्हढेच!

लेखकाने आपल्यासाठी इतकी अनेक पुस्तके,आणि ग्रंथ, तेही निरनिराळ्या विषयांवरचे, साहित्य प्रकाराचे, विज्ञानाचे, तत्वज्ञानाचे वाचले आहेत की आपण थक्क होतो. आपल्याला वाचायचे त्याने काही शिल्लक ठेवले नाही असे वाटू लागते !

त्याने कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काही वर्षे काढली. पण त्यानंतर त्याने बरीच वर्षे Encyclopaedia Brittanica मध्ये काम केले. तिथे अनेक विषयातील तज्ञ मंडळी काम करत असतात. त्यांचा सहवास हेही त्याच्या बहुश्रुतते मागील कारण असावे. कारण त्याने फक्त पुस्तके वाचली नाहीत. प्रत्येक पुस्तकात मुख्य विषय, मुद्दा, प्रश्न काय आहे हे त्याला नेमके माहित असते. याचे श्रेय तो त्याचे उत्तम आणि तज्ञ शिक्षक आणि नंतर त्याचे सहलेखक असलेले, मॉर्टिमर जे. ऍडलर यांना देतो.

एडलर विषयी त्याने म्हटले आहे की, “I never ceased to be astonished by his ability to arrive at the central question a book asks (आणि हे पुढचे जास्त महत्वाचे आहे :- ) or that it requires a reader to ask.” आणि हे पुस्तक वाचल्यावर आपण चार्ल्स व्हान डॉरेनविषयीही हेच म्हणतो.

पुस्तकाची माहिती होण्यासाठी त्याचे स्वरूप थोडक्यात सांगतो. पुस्तकात पंधरा प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात एका पेक्षा जास्त, आठ ते दहा-बारा लेखकांची आणि त्याच्या महत्वाच्या पुस्तकांची वैशिष्ठ्यासह चर्चा केली आहे. प्रकरणे आणि त्यातील लेखक कालानुक्रमानुसार आहेत. सुरवात पाश्चात्य वाङ्मयातील सुवर्णकाळाने होते. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाचा हा काळ. ग्रीक (अथेन्स ) संस्कृतीच्या उत्कर्षाचा हा काळ होता. याच काळात आपल्याला थोडेफार ऐकून माहीत असलेले होमर आणि त्याचे महाकाव्य The Iliad ( पण होमर हा या अगोदर दोन-तीनशे वर्षे आधी होऊन गेला.) आणि The Odyssey , तसेच एशिलस व त्याचे The Oresteia, सोफोकल्स व त्याची नाटके Oedipus Rex, Oedipus at Colonus, आणि सर्वांना माहित असलेला आपला प्रिय इसाप यांच्या बरोबर आणखीही काहीजणांचा परिचय आहे. काव्यातील किंवा नाटकातील ठळक भाग, विचार, लेखकांची वैशिष्ठ्ये, मोजकी वाक्ये आणि स्वतः:चे भाष्य यातून वाचकाच्या डोळ्यासमोर आणली आहेत.या लेखकांच्या पुस्तकातील नेमके काय वाचावे हे सुध्दा तो सुचवतो. प्रत्येक प्रकरणाविषयी आणि त्यातील लेखक व पुस्तके यांच्या बाबतीत हे लागू आहे.

मग क्रमाने, अथेन्सचा पाडाव झाल्यानंतरच्या काळातील प्लेटो,ॲरिस्टोटल, गणिती युक्लिड येतात. काळानुसार आपल्या माहितीचे मध्ययुगातील श्रेष्ठ कवी डांटे,Canterbury Tales मुळे गाजलेला चॉसर समोर येतात. त्यांनतर कोपर्निकस, गॅलिलिओ पाठोपाठ फ्रेंच नाटककार मोलीये , Paradise Lost या सर्वांना माहीत असलेल्या काव्याचा जनक मिल्टन, आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन,व्हॉल्टेअर ,जेन ऑस्टिन, गटे तर आहेतच. त्याशिवाय आपण ओळखत असलेले, वाचलेले, शेक्सपिअर, टॉल्स्टॉय, बर्नार्ड शॉ, The Hobbit , The Lord of the Rings लिहिणारा जे. आर. आर. टोल्किनला वगळून कसे चालेल? हे नेहमीचे यशस्वी लेखकही आहेत.

ही यादी संपणारी नाही.पण केवळ इतिहासकाळातीलच नव्हे तर विसाव्या शतकातील काही लोकप्रिय लेखकही आहेत. हेमिंग्वे, काफ्का, बेकेट, आर्थर मिलर, अल्बेर केम्यू, असणारच पण आर्थर जे. क्लार्क, जॉर्ज ऑरवेल, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोकप्रियतेचे आणि वाचकप्रियतेचे उच्चांक मोडणारी हॅरी पॉटरवाली जे. के. रोलिंगही आहे !

आपल्याला ऐकूनही माहित नसलेली इतिहासकालीन आणि वर्तमानकालीन लेखकही बरेच आहेत. त्यांनीही फार उत्तम लिहिले आहे असे हे पुस्तक वाचल्यावर वाटते. त्यापैकी काहींची आणि त्यांच्या पुस्तकांची नावे देतो.

जे. एम. सिंज( १८७१-१९०९) हा आयरिश लेखक नाटककार आणि त्याचे नाटक, The Playboy of the Western world; त्याने आपल्या इतर पुस्तकात नाटककार इब्सेन आणि झोला यांच्यावर टीका केली आहे. कारण ते वास्तवातील फक्त नीरसता, नैराश्य आणि वैफल्य यांचेच चित्रण करीत होते आणि तेही तितक्याच रसहीन शब्दात असे त्याचे म्हणणे होते. बेट्रीक्स पॉटर ( १८६६-१९४३ ). एक लहान मुलगा आजारी होता. त्याला ही लेखिका स्वत: काढलेल्या चित्रासहित गोष्टी पत्रातून पाठवत असे. कधी साध्या कार्डावरही ! त्याचेच पुढे The Tale of Peter Rabbit हे पुस्तक झाले. ते जगातल्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी एक आहे. तिने आणखीही दहा बारा पुस्तके लिहिली आहेत. तीही लोकांना आवडली. तिच्या पुस्तकाच्या लक्षावधी प्रति खपल्या आहेत ! आपल्याला हे माहित होते का ? मला तरी माहित नव्हते.

Seven Gothic Tales हे पुस्तकही वाचनीय आहे. याचा लेखक आयझॅक डिन्सन. हा आपल्याला कुठे माहित होता ? तसेच होझे सेरामॅगो ( १९२२ –). ह्याचे एक तसे किरकोळ वैशिष्ट्य सांगताना लेखक म्हणतो,” सेरामॅगोला कुत्र्यांची फार आवड. त्याच्या आठही कादंबऱ्यात कुत्रा काही ना काही भूमिका वठवतो !” डोरेनने हे वैशिष्ठ्य सांगितल्यावर त्याच्या Blindness मध्येही कुत्रा आहे हे लक्षात आले. त्याच्या Blindness कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कै.प्रा.डॉ.भा.ल.भोळे यांनी त्याचे सुंदर भाषांतर केले आहे.

मार्क हेल्प्रिन १९४७ साली जन्मला. हा अजून हयात आहे. विद्यार्थिदशेपासून तो कथा लिहायचा. न्यूयॉर्कर सारख्या प्रख्यात मासिकात त्या प्रसिद्धही झाल्या. त्याचे Winter’sTale हे पहिले पुस्तक अप्रतिम आहे असे अनेकांचे मत असल्याचे लेखक आपल्याला सांगतो. थरारक, उत्कंठा वाढवणारे, चांगले लेखन करणारे Michael Dibdin, Henning Mankell आणि Donna Leon यांचा उल्लेख आहे. हे सर्व हयात आहेत.

पुस्तकात १८९ लेखकांचा आणि त्यांच्या निवडक महत्वाच्या पुस्तकांचे थोडक्यात रसग्रहण आहे. तत्वज्ञानी, कवी-महाकवी, नाटककार, कथाकार, गणिती, वैज्ञानिक, विज्ञान कथालेखक अशा विद्वान, आणि प्रतिभावंत लेखकांचा समावेश आहे. प्रस्तावनेच्या अखेरीस आपण निवड केलेल्या ग्रंथांसंबंधी लिहिताना तो राल्फ वाल्डो इमर्सनचे प्रतिरोधक किंवा बजावून सांगणारे वचन देतो : “Read no book that is not hundred years old.” पण याचे पालन करणे व्यवहारात कोणत्याही वाचकाला अवघड आहे. आणि तसेच चार्ल्स डॉरेनचे झाले. ते साहजिक आहे. काळाच्या बरणीत मुरलेली कलाकृती सोने असण्याची शक्यता जास्त असेल. पण प्रत्येक पुस्तक चित्र, तसे बावनकशी असेलच हेही सांगणे कठीण आहे. शिवाय प्रत्येकाची आवड हा फार मोठा भाग आहेच.

कालच्या,आजच्या आणि उद्याच्या वाचकांची बदलणारी आवड, ज्ञानाच्या विस्तारात जात असलेल्या कक्षा, एकूण परिस्थितीत होणारे बदल व त्यांचा अपरिहार्य परिणाम यावरही दर शंभर वर्षांनी कोणती पुस्तके काळाच्या कसोटीत टिकून राहतील हे कोण सांगू शकेल? तसे सांगणे केव्हाही सोपे नसते. सांगितले तरी ते अखेर वैयक्तिक किंवा फार तर काहीजणांचे मिळून झालेले मत असेल. आज वाचली जाणारी लोकप्रिय आणि दर्दी जाणकार वाचकांना आवडलेली पुस्तके उद्या कोणी वाचेल का हा प्रश्न या रोज झपाट्याने बदलणाऱ्या काळात तर कायमचा आहे.

मला हे पुस्तक वाचताना वाटायचे, अरे, आपल्याला आनंद देणाऱ्या, कादंबऱ्या, नाटके, विनोदी पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचा यात समावेश कसा नाही? त्या त्या वयात आवडलेले,नावाजलेले बरेच लेखक यात नाहीत. कादंबरीकार,कथाकार सॉमरसेट मॉम, ग्रॅहम ग्रीन, ए. जे. क्रोनिन, विनोदी लेखक पी.जी. वूडहाऊस, निबंधकार स्ट्रॅची, बिरबॉम, गॉल्सवर्दी क्रोनिन कसे नाहीत? कवी वर्डस्वर्थ येऊ शकतो मग टेनिसन का नको ? जेन ऑस्टिन येते तर एमिली ब्रॉन्टेचा समावेश का नाही? टॉल्स्टॉय, डोस्टोयव्हस्की इतकेच काय टार्जिनोव्ह यांना समाविष्ट केले आहे मग मॅक्सिम गॉर्की का वर्ज्य व्हावा? Little women ची निर्माती Merry Alkot नाही ? बर्नार्ड शॉ येतो तर बुद्धिमत्तेची कल्पनातीत चमक, प्रतिभेचे तेज यामुळे श्रेष्ठ असलेला, एक दोन वाक्यात जीवनाचे सत्य विशद करणारा, त्याबरोबरच हसवणारा ऑस्कर वाईल्ड नसावा? विज्ञान कथा आपल्या वैज्ञानिक ज्ञानाने आणि प्रतिभेच्या जोरावर लोकप्रिय करणारा आर्थर जे. क्लार्क आहे. हे योग्यच झाले.पण मग आपल्याला तितकाच आवडणारा असिमॉव्ह कसा नाही,असे प्रश्न मनात येतात.

इतर अनेक वाचकानाही त्यांच्या आवडीचे लेखक असायला पाहिजे होते असे वाटणार. पण इलाज नाही, अंत नाही. म्हणून लेखकाने केलेली निवड मान्य व्हावी. कारण त्याने लेखक आणि त्यांची पुस्तके यांचे महत्व,सौंदर्य,मर्म आणि मोठेपण कशात आहे याचे मोठ्या रंजक भाषेत,अत्यंत सखोल अभ्यास आणि विचारांती केले आहे, ते महत्वाचे आहे.

प्राचीन काळापासून ते आधुनिक काळातील अनेक थोर आणि प्रतिभाशाली तत्वज्ञानी, महाकवी, नाटककार, वैज्ञानिक, गणिती अशा कालातीत व्यक्तींचा आणि त्यांच्या ग्रंथांचा, पाचशे अकरा पानात लेखकाने आपल्याला रसपूर्ण, सॊप्या भाषेत, ओळख करून दिली आहे. कुठेही बोजडपणा, रुक्ष आणि रटाळ वाटत नाही. वाचताना लेखकाची केवळ साहित्य आणि वाङ्मयातीलच नव्हे तर इतर विषयातलीही उत्तम गती आणि ज्ञान यांचे दर्शन होते. सुसंस्कृततेतून आलेला त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोनही त्यातून जाणवतो. त्याने ज्ञानकोशात काम केले त्याची ही परिणिती असावी.

लेखकाविषयी आणखी काही सांगायचे तर ते त्याच्याच शब्दातून ऐकू या : ”हे पुस्तक म्हणजे माझे आयुष्यभर पुस्तकांशी चालू असलेल्या प्रेमप्रकरणाचे मधुर फळ आहे. वाचन, माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. मला आठवते तेव्हापासून पुस्तके आणि मी एकमेकांपासून कधीच वेगळे झालो नाहीत हेच आठवते. आजही मी कुठे असलो आणि तिथे एखादे पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र किंवा कागदाचा एखादा चिटोराही वाचायला नसेल तर मी सारखा अस्वस्थ असतो. पुस्तकांशिवाय आयुष्य माझ्यासाठी एक अति भयानक पोकळी होईल ! ”

चार्ल्स व्हान डॉरेन यांचा हा ग्रंथही, त्याच्या नावाप्रमाणेच, आपल्याला वाचनाचा भरपूर आनंद देतो.

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला पुस्तक परिचय लिहिला आहे. ललित लेखन ऐवजी हे वाचू आनंदे मध्ये लिहिता येईल.

या धाग्यावर एकही प्रतिसाद नाही अशी परिस्थिती आहे.

बाकी मायबोलीवर आल्यावर वेड्यांच्या इस्पितळात आल्याचा भासही होतो. सिनेमात जी मेंटल हॉस्पिटल बघितली आहेत ती अशीच असतात. राजकारणावर गलिच्छ शिवीगाळ रोज नव्या आयडीने किंवा आयडी वाचवून सभ्य भाषेत शक्य तितकं नकारात्मक आणि एकांगी रोज तेच लिहिणे. एक सुपरआयडी आणि त्याच्या चाहत्या व विरोधकांमध्ये रोज तीच चर्चा. रोज तेच लिहणारी वहिनी भाऊजीची जोडी. बाकी दारू ज्योतिष मीमीमी.

या सगळ्या गोंधळात कोणी काही चांगलं आणि नॉर्मल लिहिण्याचा प्रयत्न करणं हेच विशेष.

छान आहे हा लेख. हलकं फुलकं वाचायला आवडतच पण असे लेख ही आवडतात. ज्यांना वाचनाची आवड आहे ते " Joy of Reading" वाचतीलच, पण ज्यांना विशेष वाचनाची आवड नाही किंवावाचायला वेळ नाहीअशांसाठी पण हा लेख उपयुक्त आहे. असाच परिचय जुन्या मराठीपुस्तकांचा करून देता आला तर बघावा.
आपण वाचतो वाचतो म्हणतो पण आपला आवाका किती छोटा आहे हे कळतं.
Thanks

उत्तम लेख.

"आपण वाचतो वाचतो म्हणतो पण आपला आवाका किती छोटा आहे हे कळतं." - अगदी सहमत.

उत्तम लेख आणि पुस्तक परिचय.

असे साक्षेपी समीक्षण प्रमुख भारतीय भाषांमधील साहित्याचे झाले तर एक जबरदस्त काम होईल.

अनेक लेखकांची नावे परिचित वाटली आणि थोडी कॉलर टाईट झाली. पण सहज उपलब्धता असूनही स्वतःचे वाचन आणि वाचनविषय अगदीच 'हे' आहेत याची कल्पना हा लेख वाचून येतेय Happy

@अनिंद्य , @हीरा, @जिज्ञासा, @स्मिता कुलकर्णी आणि @व्हाईटहीट तु्म्ही सर्वांनी ‘वाचनानंद ‘ घेतला ह्याचा मला आनंद झाला. आपल्या अभिप्रायांबद्दल मनापासून आभार मानतो.

लेख आवडला. आपलं किती काय काय वाचायचं राहून गेलंय आणि त्याची आपल्याला माहितीही नाहीये असं वाटलं. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद!