प्रतिशोध..!! (भाग-२)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 4 February, 2022 - 07:23

प्रतिशोध ..!! ( भाग-२)
______________________________________

https://www.maayboli.com/node/81002#new

तिच्याकडे पाहताच माझ्या लक्षात आलं होतं की, वैशूचं आज नक्कीच काहीतरी बिनसलंय्, पण तिला काही विचारायचे धाडस मला होत नव्हते.

" काय झालं वैशू..?? अशी भरदुपारी परत आलीस..??" आत्याने काळजीने विचारले.

" तुला दारात आल्या - आल्या नको त्या चौकश्या करायची काय गरज आहे गं..??" सरळ उत्तर न देता वैशू आपल्या आईवरचं भडकली.

" काय नुसतं पाणी घेऊन आलीस तू..?? डोंबल्यावरल्या पंख्याचा स्पीड वाढव आधी ..!!"

तिच्यासाठी थंड पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या पार्वती मावशींवरसुद्धा ती विनाकारण उखडली.

आत्या आणि मी एकमेकींकडे काळजीने पाहू लागलो.

" तो हरामखोर नायर, माझ्यावर वाकडी नजर ठेवतो काय..?? थोबाड फोडले त्याचे सगळ्यांसमोर... आणि लाथ मारली त्या दिड- दमडीच्या नोकरीला...! जहागीरदाराची मुलगी आहे मी.. मला गरज नाही त्या फडतूस नोकरीची..!" हे बोलत असताना वैशूच्या चेहऱ्यावर चमत्कारिक, तिरसट हसू पसरले.

वैशूच्या तोंडातली असभ्य भाषा आणि तिच्या चेहर्‍यावरचे हसू पाहून आत्या मनोमन चरकली असावी, हे माझ्या ध्यानात आलं.

त्या दिवसापासून वैशू नोकरी न करता घरीच राहू लागली.

काही दिवसांनी तिची कंपनीतली सहकारी मैत्रिण रचना मला रस्त्यात भेटली. कुतूहलाने मी तिला कंपनीत वैशूसोबत काय घडले म्हणून विचारले असता , तिने जे काही सांगितलं ते ऐकून मला पुढे काय बोलावे ते सुचलेच नाही.

" मधू अगं, वैशूचं वागणं खूपच हेकटपणाचे होत चाललंय् हल्ली..! वडिलांच्या वयाच्या एका सज्जन माणसावर बिनबोभाट आरोप केलाय् तिने.. नसत्या गैरसमजातून नायर सरांची सारी इज्जत, प्रतिष्ठा क्षणात मातीमोल केली वैशूने..!" रचना भावूक होत म्हणाली.

वैशूच्या आक्रस्ताळी आणि अहंकारी स्वभावाची मला पहिल्यापासून ओळख होती. तिच्या ताळतंत्र नसलेल्या क्षोभाला मी नेहमीच बळी पडत असल्याने कंपनीत काय घडले असावे , याची मला थोडक्यात कल्पना आली.

काळ पुढे सरकत होता. रजूआत्याने आता मध्यस्थांमार्फत वैशूसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. वाड्यात बघण्याचे कार्यक्रम आखले जाऊ लागले. बघण्याच्या कार्यक्रमानंतर कधी वैशू समोरच्या मुलाला नकार देई, तर कधी मुलाकडून तिला नकार मिळे.

वैशूला मिळणाऱ्या सततच्या नकाराने रजूआत्या चिंतित झाली होती. त्याच दरम्यान मध्यस्थांनी मुंबईचे एक स्थळ वैशूसाठी सुचवलं. मुलगा आणि मुलीने एकमेकांचे फोटो पाहिल्यावर घरच्यांनी पुढचा कार्यक्रम ठरवला. वैशू ह्या स्थळाबाबत खूप उत्साहीत होती.

जेव्हा कधी वाड्यात वैशूला बघण्याचा कार्यक्रम असे, तेव्हा मी शक्यतो तिथे उपस्थित राहत नसे.. आत्याने थांबण्याचा कितीही आग्रह केला तरीही..!!

मी जर तिथे उपस्थित राहिले आणि जर नेमका त्या स्थळाकडून वैशूला नकार मिळाला, तर त्याचा सगळा रोष माझ्यावर निघू नये म्हणून एवढी काळजी मी घेत असे.

__ पण ह्या वेळेस थोडासा घोळ झाला. मुंबईची पाहुणे मंडळी नियोजित वेळेच्या आधीच वाड्यात आली. नेमके त्याचवेळी मी घराच्या आवारात फुलझाडांना पाणी घालत होते. माझी पंचाईत झाली. मला वाड्यातून बाहेर पडता आले नाही. मला त्यांना सामोरे जावे लागले. आत्याने माझीही ओळख मुंबईच्या पाहुण्यांना करून दिली.

__ जितका वेळ ती पाहुणे मंडळी घरात होती, तितका वेळ मी त्यांच्यासमोर जाण्याचे टाळले. वैशूला मुलगा पसंत पडला. तिने तसं आत्याला बोलूनसुद्धा दाखवलं.

दोन दिवसांत कळवतो असं सांगून गेलेले मुंबईचे पाहुणे, बरेच दिवस झाले तरी काहीच निरोप धाडीत नव्हते.

शेवटी आत्याने मध्यस्थांकडे चौकशी केली, तर त्यांनी दिलेल्या उत्तराने आत्याचा चेहरा झरकन् उतरला.

त्यांनी जे कळवलं ते ऐकून मलाही धक्का बसला. वैशूला पाहायला आलेल्या मुलाने वैशूला पसंत न करता मलाच पसंत केलेले. .!!

जी मुलगी मुलाला आवडलीय्; त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना हे नातं पुढे जोडायचं असेल , तर मुलाकडची मंडळी पुढची बोलणी करण्यास तयार आहेत असा त्यांचा निरोप होता.

__ आणि हे सगळं मध्यस्थांनी आम्हां तिघींसमोरच सांगितलं.

मला तर आश्चर्याच्या धक्क्यासोबत आता पुढे घरात काय घडेल ह्याचीच जास्त भीती वाटू लागली.

मी भित्र्या सश्यागत वैशूकडे पाहिलं , तर ती आपली शांत बसलेली.. . तिची नजर थंड होती... अगदी भावनाहीन..!!

मी हुश्श केलं. मला जरा सुटल्यासारखं वाटलं.

मध्यस्थांनी निरोप घेतला.

__आणि त्यांच्यापाठी पिसाळलेल्या वाघिणीसारखी वैशू माझ्यावर चाल करून आली.

" नटवी ....काय चेटूक करतेस गं सगळ्यांवर..?? काय आहे तुझ्या ह्या थोबाडात जे सगळे भाळतात तुझ्यावर..?? ... माझ्या आयुष्याचं मातेरं करायला आलीस ना तू इथे वाड्यात...??".

चेहर्‍यावर पाण्याचे सपासप सपकारे मारावेत आणि मग आपला श्वास कोंडला जावा, तशी माझी अवस्था वैशूच्या शाब्दीक हल्ल्याने झाली.

तिच्या ह्या टोकदार शाब्दिक बाणांनी मी अक्षरशः घायाळ झाले, तरीही मी शांत बसले. वैशूचा टिपेला पोहचलेला आवाज ऐकून दाराबाहेर गेलेली आत्या धावत - पळत आत आली.

" वैशू अगं, मधूचा काय दोष त्यात...?? दोष असेल तर तो आपल्या दैवाचा आहे.. गेल्या जन्मी खंडीभर पापं केली होती ना मी , देव त्याची शिक्षा देतोयं गं आपल्याला...!!" आत्या अक्षरशः घायकुतीला आली.

"ते काही सांगू नकोस मला तू, लहानपणापासूनची हिची सगळी सोंगं-ढोंग माहित आहेत मला..! तू डोक्यावर बसवून ठेवलंय् ना हिला... एक दिवस स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करेल ना ही तेव्हा समजेल तुला...!!"

मी तोंड शिवून गप्प बसले होते. काही बोलून फायदा तर होणार नव्हता, पण वाईटपणा मात्र पदरात आला असता. मी वैशूला कसं समजावू हेच मला कळत नव्हतं. इतकी जर तिला समज असती तर इथपर्यंत परिस्थिती आली असती कशाला..!!

लहानपणापासून तिच्याशी प्रेमाने वागण्याचा वेडा प्रयत्न केला होता, पण वैशूने मुळी मला झिडकारून टाकलं होतं.. मग रागाने, दुःखाने मी तो प्रयत्नच सोडून दिला.

आम्हां दोघींनाही शांत बसलेले पाहून ती अधिकच संतापली.

" हो, आता कशाला बोलशील तू .. सगळीकडून चांगुलपणा पाहिजे असतो ना तुला..?? नटवी, कुत्री मेली... चालती हो इथून..!" तिच्या जीवाचा नुसता तडफडाट होत होता.

" तुम्ही दोघी माझ्या खऱ्या दुश्मन आहेत. कधी - कधी वाटते , हे घर सोडून निघून जावं कुठेतरी... नाहीतर मरण तरी पत्करावं...!" तिचा थयथयाट थांबेचना.

" आवर स्वतःला वैशू, पूरे झाला हा तमाशा...!" आत्याच्या डोळ्यांतली भीती माझ्या नजरेने टिपली.

पण वैशू खूपच चेकाळली होती. ती काही ऐकायला तयार नव्हती. माझ्या अंगावर धावून यायला तिने पुढे पाऊल टाकलं खरं , पण अचानक ती मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.

तिची ही अशी अवस्था मला पाहवली जात नव्हती. धाडस करून मी तिच्याजवळ जाण्यासाठी उठले, तेवढ्यात आत्याने माझा हात धरून मला पुढे जाण्यास रोखले. त्या रात्री माझा डोळ्याला डोळा लागला नाही.

" आत्या, माझं इथे राहणं आता ठीक नाही. वैशू मला तिची जन्माची दावेदारीण समजते गं ..मी माझी राहाण्याची दुसरीकडे सोय करते.. !" आवंढा गिळत दुसऱ्या दिवशी मी आत्याला म्हणाले.

मी असं भावनावेगात येऊन म्हटलं खरं, पण तसं पाहायला गेलं तर रजूआत्या शिवाय मला तरी दुसरं कोण होतं...??

माझा दहावीचा निकाल लागला आणि बाबा गेले. दोन वर्षापूर्वी अचानक दम्याने आई गेली. मला रक्ताची अशी आता फक्त रजूआत्याच उरली होती.

" मधू अगं, तुझा भक्कम आधार वाटतो बघ मला. अशी अर्धवट साथ सोडून जाऊ नकोस ..!" आत्याने पाणावल्या डोळ्यांनी म्हटले.

खरं तर आत्याचा विश्वास मोडायला मन तयार नव्हतं, पण घरातलं वातावरण इतकं गढूळलं होतं की, ते निवळणं आता अशक्य वाटत होतं.

ह्या घडल्या प्रसंगानंतर मात्र वैशू अचानक शांत - शांत राहू लागली. स्वतःला तिने एकटेपणाच्या कोषात विणून घेतलं. त्यानंतर तिने कुठल्याही स्थळाला दारापर्यतसुद्धा येऊ दिले नाही. लग्नाचा विचार करणचं तिने सोडून दिलं.

तिचं बदलत जाणारं वागणं पाहून मला काही उलगडा होत नव्हता. अचानक कधीतरी ती माझ्याशी प्रेमाने बोलू लागे.
मला तर तिच्या वागण्याचं आश्चर्यच् वाटू लागलं होतं.

एके दिवशी तर मला ती नदीकिनारी सोबतीने फिरायला जायचा आग्रह करु लागली. मला तर तिच्या ह्या आग्रहावर विश्वासाच् बसेना. मग तिचा आग्रह न मोडता मी शांतपणे तिच्यासोबत निघाले. तिच्यासोबत निघाले तर खरे, पण माझ्या मनावर अनामिक दडपण आलेले..!

सरत्या चैत्रातली ती एक मलूल संध्याकाळ होती. सूर्य रेंगाळत पश्चिमेला निघालेला, वातावरणात उदासिनता भरून राहिलेली... झाडांच्या सावल्या उगीचच लांबट झाल्यासारख्या भासत होत्या.

आम्ही नदीच्या डोहाजवळ आलो.

बालपणापासून आम्ही दोघी एकाच घरात , एकाच मायेच्या छत्राखाली एकत्र वाढल्या होतो, पण मायेचे असे बंध दोघींत कधी निर्माण झालेच नाहीत. एकमेकींमध्ये चुकूनही प्रेमाने सुख-संवाद असा कधी घडला नव्हताच्.

"शांत का आहेस ... वैशू?? आज मौनव्रत आहे का तुझं..??" शांततेचा भंग करत मी वैशूला म्हटल्याबरोबर अचानक ती माझ्यावर पिसाळली.

" काय करायला हवं मग..?? नाचावं की उड्या मारायला हव्यात आनंदाने..??"

" तसं नाही गं..!" मला तिचं हे उत्तर अपेक्षित नव्हतं.

" तुला खूप आनंद होत असेल ना, माझं आयुष्य सरळ मार्गाला लागलेलं नाही म्हणून...??"

तिच्या ह्या प्रश्नांवर मात्र मी गप्प बसले नाही.

" असं का म्हणतेस वैशू..?? माझ्याशी गोड बोलून तू इथे भांडण करायला घेऊन आली आहेस का तुझ्या सोबतीला...??"

" हो, तसंच समज. घरी आत्याबाई धावत भाचीची पाठराखण करायला येतात ना म्हणून...!!" तिच्या मनात आत्या आणि माझ्या नात्याबद्दल किती टोकाची द्वेषभावना होती, ते मला कळत होतं.

" तुम्ही दोघींनी माझ्या आयुष्याची पुरती वाट लावली आहे. तुम्ही दोघी खूप वाईट आहेत..!" वेडे-वाकडे हातवारे करत वैशू मला आणि आपल्याच आईला बोल लावू लागली.

"वैशू अगं, असं नको बोलू गं.. हे डोक्यात कसलं खूळ भरलंय् गं तुझ्या..??" मी तिचा हात धरत म्हटल्याबरोबर__

माझा हात झिडकारत, मनात येईल ते ती बोलू लागली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती बेभान झाली. तावा- तावाने वेडेवाकडे हातवारे करत माझ्याशी भांडू लागली. आणि काही कळायच्या आत अचानक___

" वै ss शू...!!" मी जोराने किंचाळत खाली कोसळले. पुढे काय घडलं ते मला आठवतंच् नव्हते.

क्रमशः

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

_________________ XXX________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्सुकता चांगलीच वाढलीय. काही वेळेस स्वतः विषयी व खानदाना विषयी असलेल्या अवास्तव कल्पनेने पुढे जाऊन भ्रम निरास होतो. वैशुचे तसेच झाले असावे.

रश्मीजी - धन्यवाद... !
तुम्ही लिहिलयं तसं घडतं बऱ्याच वेळा आजूबाजूला..! अंतिम भागात लिहिते वास्तव काय आहे ते... उद्या टाकते अंतिम भाग..!

जाई - धन्यवाद..!

गलती से मिस्टेक कर दी.... !

धन्यवाद धनुडी, तुम्ही अंतिम भागाची लिंक शेअर केल्याबद्दल..!