27 जानेवारी 20222 रोजी तिसरी भारत-मध्य आशिया परिषद (India-Central Asia Summit) पार पडली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मध्य आशियातील पाचही देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते. पण या काळातच भारतासह अन्य देशांमध्ये वाढलेल्या Omicron संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्या नेत्यांचा भारत दौरा रद्द करावा लागला होता. त्यामुळे आधी नवी दिल्लीमध्ये पार पडणार असलेली ही परिषद व्हिडिओ काँफरंसिंगद्वारे आयोजित करण्यात आली.
तिसरी भारत-मध्य आशिया परिषद
भारत आणि मध्य आशियाई देशांदरम्यान राजनयिक संबंध स्थापित होऊन 30 वर्षे होत असतानाच यंदाची भारत-मध्य आशिया परिषद आयोजित होत होती. यंदाच्या परिषदेत या दोन्ही बाजूंच्यामध्ये संपर्क साधनांचा विकास करण्यावर प्रामुख्याने भर दिला गेला. तो संपर्क स्थापन करण्यासाठी इराणमधील चाबहार बंदराचा वापर वाढवण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे. त्यासाठी भारत आणि मध्य आशियाई देशांनी एक संयुक्त कृतिगट स्थापन स्थापन केला आहे. या परिषदेचे आयोजन येथून पुढे दर दोन वर्षांनी करण्यावर दोन्ही बाजूंदरम्यान एकमत झाले. त्याचबरोबर दोन्ही बाजूंचे परराष्ट्र मंत्री, व्यापार मंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्याबरोबरच सुरक्षा मंडळांच्या सचिवांच्या नियमित बैठका आयोजित होतील आणि त्यामध्ये पुढील शिखर परिषदेची रुपरेषा निश्चित केली जाईल असाही निर्णय घेतला गेला आहे.
अफगाणिस्तान हा दोन्ही बाजूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असल्यामुळे तेथे शांतता, सुरक्षा, स्थैर्य राहावे आणि जनतेचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे सर्वसमावेशक सरकार तेथे असावे यासाठी या परिषदेत सर्व नेत्यांनी पाठिंबा व्यक्त केला. भारत अफगाणी जनतेला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करत राहील, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.
ऊर्जा सुरक्षा
भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील संबंधांमध्ये ऊर्जा सुरक्षेला अतिशय महत्वाचे स्थान आहे. भारत आणि मध्य आशिया यांच्यातील सामरिक संबंधांचा हा एक महत्वाचा आधार ठरला आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील संबंधांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 मधील मध्य आशिया दौऱ्यात महत्वाचे करार झाले होते. कझाखस्तानात नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचेही मोठे साठे उपलब्ध आहेत. याबाबी विचारात घेऊन भारताने तेथील ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने मध्य आशियातील आणखी एक महत्वाचा देश म्हणजे तुर्कमेनिस्तान. मात्र तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (तापी/TAPI) वायूवाहिनी उभारण्याची योजना प्रलंबित आहे.
संरक्षण आणि सुरक्षा संबंध
भारताच्या सामरिक सुरक्षेमध्ये मध्य आशियाई क्षेत्राला महत्वाचे स्थान आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने मध्य आशियातील सर्व देशांबरोबर संरक्षण आणि सुरक्षाविषयक करार केलेले आहेत. सीमेपलीकडून चालवला जाणारा दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील भारतविरोधी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताला मध्य आशियाई देशांबरोबरचे लष्करी सहकार्य वाढवणे आवश्यक वाटत आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिका आणि नाटोच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर ही गरज आणखी वाढलेली आहे. लष्करी प्रशिक्षण, संयुक्त युद्धसराव या माध्यामातून भारत मध्य आशियाई देशांबरोबरचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक मजबूत करत आहे. संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या शांततारक्षक मोहिमांसाठी (UN Peacekeeping Missions) आवश्यक असलेले प्रशिक्षणही भारताकडून मध्य आशियाई देशांच्या लष्करांना दिले जात आहे.
दहशतवादविरोधी सहकार्य
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे मुख्य केंद्र आणि आश्रयदाते भारत आणि मध्य आशिया यांच्यादरम्यानच्या प्रदेशात वसलेले आहेत. त्याचा परिणाम मध्य आणि दक्षिण आशिया तसेच त्याच्याही पलीकडच्या क्षेत्रांवर होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत आणि मध्य आशियाई देश दहशतवादविरोधी संयुक्त कार्यकारी गट स्थापन करणार आहेत.
आर्थिक सहकार्य आणि गुंतवणूक
जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवरही भारत आणि उझबेकिस्तान यांचा आर्थिक विकासाचा दर चांगला राहिलेला मागील काळात दिसून आले होते. त्यामुळे या देशांदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवले जात आहे. त्यासाठी व्यापारी समुदाय आणि व्यावसायिकांमध्ये संपर्क वाढवला जात आहे.
भारत आणि मध्य आशियाई देशांमधील व्यावसायिकांमध्ये थेट संवाद होण्यासाठी संयुक्त व्यापार परिषदेचीही स्थापना झालेली आहे. भारताने 2019 मध्ये मध्य आशियाई देशांमधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरचे line of credit जाहीर केलेले आहे. आज भारत आणि मध्य आशियाई देशांदरम्यान 2 अब्ज अमेरिकन डॉलरचा व्यापार होत आहे. त्यामध्ये वाढ होण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
संपर्क साधनांचा विकास
भारत आणि मध्य आशियामध्ये व्यापाराच्या अनेक संधी असल्या तरी त्या देशांमधील दळणवळण साधनांचा अपुरा विकास प्रमुख अडथळा ठरत आहे. भारत आणि रशिया, युरोप यांच्यातील व्यापार अधिक किफायतशीर आणि जलद करण्याच्या हेतूने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिकेशी मध्य आशियाई देशांना जोडण्यासाठी भारत सहकार्य करत आहे. कझाखस्तानमध्ये लोहमार्गांचा विकास करण्यासाठी भारतीय रेल्वे आणि कझाख रेल्वे यांच्यात करार करण्यात आलेला आहे.
विज्ञान तंत्रज्ञान
भारतातील प्रतिष्ठीत रुग्णालयांशी मध्य आशियातील रुग्णालयांचा संपर्क स्थापन करून तेथे आरोग्यविषयक सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे पहिले भारत-मध्य आशिया टेलिमेडिसीन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. मध्य आशियातील देशांचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होण्याची शक्यता विचारात घेऊन भारताने या देशांबरोबर सायबर सुरक्षेसाठीही सहकार्य सुरू केले आहे.
क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये सहकार्य
मध्य आशियाई देश पूर्वी सोव्हिएट संघाचा भाग होते. त्या काळात रुजलेल्या क्रीडा संस्कृतीचा या देशांना आजही लाभ होत आहे. ऑलिंपिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांबरोबरच अन्य स्पर्धांमध्येही या देशांचे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसतात. त्यामुळे या देशांशी क्रीडा प्रशिक्षणासंबंधी सहकार्य वाढवले जात आहे. भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संबंधांमधील हे नवे क्षेत्र आहे. भारत आणि मध्य आशिया यांच्यातील समान सांस्कृतिक धाग्यांमुळे परस्परांच्या नागरिकांमधील देवाणघेवाण वाढावी यासाठी दोन्ही बाजूंदरम्यान पर्यटनाला चालना दिली जात आहे.
सांस्कृतिक सहकार्य
भारत आणि मध्य आशियाई देशांदरम्यान प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे या प्रदेशातील देशांशी संबंध अधिक भक्कम करण्यासाठी सांस्कृतिक संबंधाना प्रोत्साहन देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. भारत आणि कझाखस्तान यांच्यातील समान ऐतिहासिक वारशाबाबत अभ्यासाला चालना देण्याचा आणि परस्परांच्या देशांमधील पर्यटनस्थळांच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देण्याचा विचार दोन्ही देश करत आहेत.
Link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/01/blog-post_30.html
भारत सरकारचे परराष्ट्र संबध
भारत सरकारचे परराष्ट्र संबध अधिक दृढ होत चालले आहेत हे दिसत आहेत फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वगळता .
पण उत्तम परकीय संबंधाचा भारतातील सामान्य जनतेच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतात का ? हा एक वादाचा मुद्दा आहे .