भिकारी (भाषांतर)

Submitted by स्मिताके on 26 January, 2022 - 12:20

"गरिबावर दया करा साहेब. तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब. रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कोपेक्सदेखील नाहीत हो. देवाशपथ सांगतो. पाच वर्षं गावाकडे मास्तर होतो. झारच्या या नव्या झेम्स्तवो सरकारच्या कारस्थानामुळे नोकरी गेली माझी. खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा. वर्ष झालं, मला राहायला घर नाही, साहेब."

सेंट पीटर्सबर्गमधले वकील स्क्वॉर्तसोव्ह त्याच्याकडे बघत उभे होते. त्याचा तो गडद निळा फाटका कोट, नशा केल्यासारखे धुंद डोळे, गालावरचे तांबडे डाग पाहून त्यांना वाटलं, आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे.

तो पुढे बोलत राहिला, "आणि आता मला त्यांनी कालुगा प्रांतात नोकरी दिली आहे. पण तिथवर प्रवास करायला तरी पैसे नकोत? मदत करा साहेब. शरम वाटते अशी भीक मागायला, पण काय करू साहेब.. परिस्थितीपुढे लाचार आहे मी."
वकीलसाहेबांची नजर त्याच्या बुटांवर गेली. एक बूट घोट्यापर्यंत आखूड, आणि दुसरा वर पोटऱ्यांपर्यंत चढलेला. ते पाहून त्यांना अचानक आठवलं.
"काय रे, परवाच ना मला त्या सदोव्हॉय रस्त्यावर भेटला होतास? आणि मास्तर नव्हे, शाळेत विद्यार्थी होतो, शाळेतून काढून टाकलं म्हणाला होतास. आठवलं का?"
"छे छे. कसं शक्य आहे?" तो गोंधळून पुटपुटला, "गावाकडला मास्तर आहे मी. हवं तर कागदपत्रं दाखवतो ना."
"चूप. थापा मारू नकोस. विद्यार्थी आहे म्हणाला होतास, आणि शाळेतून का काढलं तेही सांगितलं होतंस."
वकीलसाहेबांचा चेहरा तिरस्काराने लालबुंद झाला. त्या फाटक्या भिकाऱ्याकडे बघणं असह्य होऊन त्यांनी आपली नजर दुसऱ्या दिशेला वळवली.
"हरामखोर. ठग. हलकटा, थांब, पोलिसातच देतो तुला आता. असशील गरीब नि उपाशी, पण म्हणून काय असं निर्लज्जपणे खोटं बोलायचा हक्क मिळाला का तुला?"
त्या फाटक्या भिकाऱ्याने दाराची कडी घट्ट धरली. फासात अडकलेल्या पक्ष्यासारखी त्याची नजर वकीलसाहेबांच्या दिवाणखान्यात सर्वत्र भिरभिरू लागली.
"पण मी खोटं नाही बोललो. कागदपत्रं दाखवतो हवी तर.."
"तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल?" वकीलसाहेब अजून घुश्श्यात होते. "गावचे मास्तर आणि विद्यार्थी म्हटलं की आमच्यासारखे लोक पाघळतात ना, त्याचा गैरफायदा घेतो आहेस तू. नीच. नालायक. शी! किळस येते मला तुझी." संतापाच्या भरात वकीलसाहेबांनी त्या भिकाऱ्याला बराच दम दिला. त्याची बेदरकार थापेबाजी ऐकून त्यांना त्याच्याबद्दल घृणा वाटत होती. आपल्या मनात करुणा, दुःखितांविषयी सहानुभूती असल्याचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वतःवर अत्याचार झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या कनवाळूपणावर जणू थापेबाजीने कपटाने आघात केला होता. निरपेक्ष मनाने गरिबांना मदत करण्याच्या त्यांच्या वृत्तीची विटंबना झाली होती.

भिकाऱ्याने आधी थोडा वेळ माफी मागितली, आणाभाका घेऊन निषेध व्यक्त केला, पण शेवटी शरमेने त्याची मान खाली झुकली.
"हो, साहेब!" त्याने आपला हात हृदयाशी नेला. "मी खोटं बोललो. मी विद्यार्थीही नाही आणि गावचा मास्तरही नाही. त्या थापाच होत्या. मी रशियन गायकवृंदात होतो. दारूच्या व्यसनामुळे मला काढून टाकलं होतं. पण काय करू? देवाशपथ सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मला खोटं बोलावंच लागतं, कारण खरं सांगितलं तर मला कोणी मदत करणार नाही. खरं बोललो तर उपाशी मरेन.. रात्रीच्या आसऱ्याविना थंडीने कुडकुडून मरेन. तुम्ही म्हणता ते खरं आहे, साहेब.. समजतं मला. पण मी करू तरी काय?"
"काय करू म्हणून विचारतोस?" वकीलसाहेब त्याच्याजवळ जात म्हणाले, "काहीतरी काम कर, काम."
"हो.. काम करायला हवं.. ठाऊक आहे मला. पण माझ्यासारख्याला कुठे काम मिळणार?"
"मूर्खा! तरुण आहेस, चांगला धडधाकट, निरोगी आहेस. तुला हवं असेल तर नक्कीच काम मिळेल. पण तू आहेस आळशी, ऐदी.. दारुडा. तुलाही ठाऊक आहे ते. गुत्त्यावर येतो ना, तसा व्होडकाचा वास येतोय तुझ्या अंगाला. खोटारडेपणा तुझ्या हाडीमाशी भिनलाय. भीक मागणं.. थापा मारणं.. इतकीच लायकी उरली आहे तुझी. रुबाबात राहायचं असेल ना, तर एखाद्या ऑफिसात, किंवा गायकवृंदात, नाहीतर बिलियर्ड्स क्लबमध्ये नोकरी करावी लागेल. मग पगार मिळेल, आणि फार कष्ट उपसावे लागणार नाहीत. पण मला सांग, शारीरिक कष्टाची कामं जमतील तुला? हं..खात्रीने सांगतो, तुला हमाली जमणार नाही. तू कारखान्यात कामगारही होऊ शकणार नाहीस. तब्येत नाजूक दिसते तुझी."
"कसं बोललात साहेब." तो भिकारी कडवटपणे हसला. "कष्टाची कामं मिळणार कशी? दुकानदारी करायची वेळ निघून गेली. व्यापाराचं शिक्षण घ्यायचं तर लहानपणीच सुरुवात करायला हवी. हमाल म्हणून कोणी उभं करणार नाही मला, कारण मी त्या कामकरी वर्गातला नव्हे. कारखान्यात काम करायचं, तर काहीतरी कौशल्य हवं. माझ्याजवळ तेही नाही."
"मूर्खा! सतत सबबी कसल्या सांगतोस? बोल, लाकूड फोडशील?"
"नाही कसं म्हणेन साहेब? पण सध्या लाकूडतोड्यांना तरी कुठे कामं मिळताहेत?"
"हेच. असंच. सगळे रिकामटेकडे असाच वाद घालतात. कोणी काही काम देऊ केलं, की ताबडतोब धुडकावून लावतात. बोल, माझ्या घरची लाकडं फोडून देशील?"
"होय साहेब, देईन."
"ठीक आहे. उत्तम. पाहूच आता." असं म्हणून वकीलसाहेब जरासे हसले. त्यात छद्मीपणा नव्हता असं मात्र म्हणता येणार नाही. त्यांनी काहीशा उतावीळपणे दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर चोळले, आणि आपल्या स्वयंपाकिणीला बाहेर बोलावून म्हणाले, "ओल्गा, याला पडवीत ने आणि लाकूड फोडून घे."

भिकाऱ्याने कोड्यात पडल्यासारखे खांदे उडवले, आणि अनिच्छेने तो ओल्गाच्या मागून गेला. त्याच्या चालीतून स्पष्ट दिसत होतं, की तो काही भुकेपोटी किंवा पैसे मिळवण्यासाठी लाकूड कापायला तयार झाला नव्हता, तर शब्दांत पकडलं गेल्यामुळे वाटलेली शरम आणि दुखावलेला स्वाभिमान, यामुळे. शिवाय व्होडका पुरती न उतरल्यामुळे त्याची तब्येत ठीक दिसत नव्हती, आणि काम करण्याची इच्छा तर अजिबात दिसत नव्हती.

वकीलसाहेब भर्रकन डायनिंग रूममध्ये गेले. बाहेरच्या अंगणात उघडणाऱ्या खिडकीतून त्यांना पडवी दिसत होती, अंगणात काय चाललं आहे ते सगळं दिसत होतं. ओल्गा आणि तो भिकारी मागच्या दाराने अंगणात आले, आणि बर्फाळलेला चिखल तुडवत पडवीत गेले. ओल्गाने आपल्या सहकाऱ्यावर एक रागीट नजर टाकून त्याला जोखून घेतलं. कोपराला एक झटका देऊन तिने लाकडाची कोठी उघडली, आणि रागारागाने दार उघडून आपटलं.
"अरे बापरे! अगदी घुश्श्यात दिसतात ओल्गाबाई. नेमक्या हिच्या कॉफीच्या वेळेत आम्ही व्यत्यय आणला की काय?"
मग तो तोतया विद्यार्थी, नव्हे, तोतया मास्तर एका लाकडाच्या ओंडक्यावर बसलेला त्यांना दिसला. हाताच्या मुठींवर लालबुंद गाल टेकून तो चिचारात गढून गेला होता.
ओल्गाने एक कुऱ्हाड त्याच्या दिशेने भिरकावली, आणि ती संतापाने जमिनीवर थुंकली. तिच्या ओठांच्या हालचालीवरून वकीलसाहेबांना वाटलं, "आता हिने शिवीगाळ सुरु केली बहुतेक."

त्या भिकाऱ्याने बावचळून एक ओंडका जवळ ओढला, दोन्ही पायांमध्ये धरला, आणि कशीबशी त्यावर कुऱ्हाड चालवली. ओंडका निसटून खाली पडला. त्याने तो पुन्हा जवळ ओढला, थंडीने थिजलेल्या आपल्या हातांवर गरम श्वास सोडला, आणि पुन्हा एकदा त्या ओंडक्यावरून कुऱ्हाड चालवली. इतकी हळुवार, की जणू आपले बूट किंवा बोटं कापली जातील याची त्याला भीती वाटत असावी. पुन्हा ओंडका खाली पडला.

आता वकीलसाहेबांचा संताप ओसरून त्यांचं मन हळवं झालं होतं. एका आळशी, दारुड्या भिकाऱ्याला असं थंडीत कष्टाचं काम करायला लावल्याबद्दल त्यांना स्वतःची लाज वाटू लागली होती. कोण जाणे, कदाचित तो आजारीही असेल. पण मग डायनिंग रूममधून स्टडीत जाताजाता त्यांच्या मनात आलं, "असू दे. करू दे थोडं काम. मी हे त्याच्या भल्यासाठीच तर करतो आहे."

तासाभरानंतर ओल्गा स्टडीत आली, आणि तिने लाकूड फोडून झाल्याची वर्दी दिली.
"हं.. हा अर्धा रुबल दे त्याला. हवं तर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला येऊन लाकूड फोडून जाऊ दे त्याला. दर महिन्याला काम देऊ म्हणावं."

पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला तो आला. त्याला धड उभंसुद्धा राहता येत नव्हतं. पण त्याने अर्धा रुबल कमाई केली. त्या दिवसानंतर तो अधूनमधून येऊ लागला, आणि दरवेळी त्याला काम दिलं जाऊ लागलं. कधी तो वाटेतला बर्फ लोटून कडेला त्याचे ढिगारे रचून ठेवी, कधी पडवी साफसूफ करी, तर कधी रजया, गाद्या ठीकठाक करी. दरवेळी त्याची तीस चाळीस कोपेक्सची कमाई होत असे. एकदा एक जुनी पॅन्ट त्याला पाठवली गेली. वकीलसाहेब नव्या घरात राहायला गेले, तेव्हा त्याला सामान बांधायला, फर्निचर हलवायला मदतीला बोलवण्यात आलं. त्या दिवशी तो शांत, उदास दिसत होता. गप्पगप्पसा होता. त्याने फर्निचरला जरासुद्धा हात लावला नाही. डोकं खाली झुकवून तो सामान लादलेल्या ट्रकमागून चालत राहिला. कामाचं नाटक सुद्धा केलं नाही बेट्यानं! थंडीने कुडकुडत तो तसाच चालत राहिला. ट्रकवरचे कामगार त्याच्या आळशीपणाला, दुबळेपणाला हसत होते. एकेकाळी कोणा श्रीमंताच्या अंगावर चढलेल्या त्याच्या त्या फाटक्या कोटाला हसत होते.त्यांना हसताना पाहून तो पुरता गोंधळून गेला.

सामान हलवून झाल्यावर त्याला त्याला जवळ बोलावून वकीलसाहेब म्हणाले, "माझं बोलणं मनावर घेतलेलं दिसतंस."
त्यांनी त्याला एक रुबल दिला.
"हे तुझ्या कामाबद्दल. दारूपासून लांब राहिलेला दिसतोस. आणि आता काम करायची तयारी दिसते तुझी. नाव काय रे तुझं?"
"लुश्कोव्ह."
"तुला मी याहून चांगलं काम देऊ शकेन, लुश्कोव्ह. कमी मेहनतीचं. तुला लिहिता येतं का रे?"
"होय साहेब."
"तर मग उद्या ही चिठ्ठी घेऊन माझ्या सहकाऱ्याकडे जा. तो तुला प्रती लिहायचं काम देईल. काम कर. दारू पिऊ नकोस. आणि मी सांगितलं ते विसरू नकोस. जा आता." एका माणसाचं आयुष्य आपण मार्गी लावलं, या आनंदाने वकीलसाहेबांनी मायेने लुश्कोव्हच्या खांद्यावर थोपटलं, आणि निघून जाण्यापूर्वी त्याच्याशी हस्तांदोलनदेखील केलं.

लुश्कोव्ह चिठ्ठी घेऊन गेला, आणि त्यानंतर पुन्हा कधीच काम मागायला त्यांच्या आवारात आला नाही.

दोन वर्षं उलटली. एके दिवशी वकीलसाहेब एका थिएटरसमोर तिकीट काढण्यासाठी उभे होते. लोकरी कॉलरचा कोट आणि फाटकी टोपी घातलेला एक किरकोळ माणूस त्यांच्या शेजारी उभा होता. त्याने बुजऱ्या आवाजात गॅलरीचं एक तिकीट मागितलं, आणि काही कोपेक्स दिले.
"लुश्कोव्ह ना रे तू?" वकीलसाहेबांनी आपल्या जुन्या लाकूडतोड्याला ओळखलं. "काय करतोस सध्या? ठीक चाललं आहे ना?"
"चांगलं चाललं आहे, साहेब. आता मी एका नोटरीच्या ऑफिसात कामाला आहे. पस्तीस रुबल्स कमावतो मी."
"अरे वा! छान. देवाची कृपाच म्हणायची. हे ऐकून मला फार आनंद झाला, लुश्कोव्ह. एक प्रकारे तू माझा धर्मपुत्रच आहेस. मी तुला चांगल्या मार्गाला लावलं. किती भडकलो होतो मी तुझ्यावर, आठवतं? भूमी पोटात घेईल तर बरं, असं झालं होतं तुला त्यावेळी. माझे शब्द लक्षात ठेवलेस ना? त्याबद्दल तुझे आभारच मानायला हवेत, मित्रा."
"तुमचेही आभार मानायला हवेत." लुश्कोव्ह म्हणाला. "त्या दिवशी तुम्ही भेटला नसतात, तर कदाचित अजूनही मी विद्यार्थी नाहीतर मास्तर असल्याची बतावणी करत असतो. तुमच्या घरातच माझं आयुष्य सावरलं, आणि मी खाईतून बाहेर पडलो."
"फार आनंद झाला हे ऐकून."
"तुम्ही माझ्याशी इतक्या दयेने वागलात, बोललात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो, साहेब. तुमचे आणि ओल्गाचे फार उपकार झाले माझ्यावर. किती थोर, दयाळू आहे ओल्गा. देव तिचं भलं करो. साहेब, तुम्ही त्या दिवशी मला जे बोललात, ते किती योग्य होतं! तुमचा तर मी आजन्म तुमचा ऋणी आहेच, पण माझं आयुष्य खरोखर सावरलं, ते ओल्गाने."
"ते कसं काय?"
"त्याचं असं झालं: मी लाकूड फोडायला तुमच्या घरी यायचो, आणि ती मला शिव्या देऊ लागायची..'अरे दारूडया! देवानेही आशा सोडली तुझी. अजून मेला कसा नाहीस?'..माझ्या समोर बसून, माझ्याकडे पाहून तिला फार दुःख होत असे. ती अक्षरशः मोठ्याने रडत असे..'कसा रे तू दुर्दैवी! या जन्मी आनंद कसा तो नाही रे तुझ्या नशिबी. आणि पुढच्या जन्मी तर नरकातच जळणार आहेस तू. बेवड्या! किती रे हे दुःख तुझ्या आयुष्यात!'..आणि हे असंच नेहमी चालायचं, वकीलसाहेब. किती वेळा तिला असं दुःख झालं, आणि माझ्यासाठी तिने किती अश्रू ढाळले, ते सांगणं शक्य नाही, साहेब. पण माझ्यावर सर्वात मोठा परिणाम कशाचा झाला असेल, ठाऊक आहे? ती स्वतः मला लाकूड फोडून देई, त्याचा. तुम्हांला ठाऊक आहे का, साहेब, तुमच्या लाकडांतला एक ओंडकासुद्धा मी फोडला नाही. ते सगळं ओल्गाने केलं. तिने माझं आयुष्य कसं सावरलं, तिला पाहून मी कसा बदललो, दारू कशी सोडली, हे मला सांगता येणार नाही. मला इतकंच ठाऊक आहे, की तिच्या बोलण्यामुळे, थोर वागणुकीमुळे माझं अंतरंग पार बदलून गेलं. हे मी कधीच विसरणार नाही. पण चला साहेब, आता थेटरात गेलं पाहिजे. घंटा वाजायची वेळ झाली."

लुश्कोव्हने झुकून वकीलसाहेबांना अभिवादन केलं आणि तो गॅलरीच्या दिशेने चालू लागला.

--------------------------------------------------------------------------------------------

मूळ रशियन कथा : The Beggar - Anton Tchekhov
इंग्रजी भाषांतर : Constance Garnett
प्रताधिकारमुक्त कथा आंतरजालावरून साभार.
पूर्वप्रसिद्धी : मिसळपाव डॉट कॉम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कथा आणि अनुवाद...
ओल्गा परिस्थितीनं गरिब पण मनानं खूप श्रीमंत आहे...

rmd, आबा., धनि, मामी, दत्तात्रय साळुंके, मानव पृथ्वीकर, SharmilaR
प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे.