तीन बेटांची कहाणी (रेफ्युजी मालिकेतला पुढचा लेख)

Submitted by ललिता-प्रीति on 20 January, 2022 - 06:12
Refugee Boat

You have to understand,
That no one puts their children in a boat
Unless the water is safer than the land...

- वारसन शायर, ब्रिटिश कवयित्री

१.

ऑक्टोबर २०१३, एका संध्याकाळी उशीरा उत्तर आफ्रिकेतल्या लिबियाच्या किनार्‍यावरून एक बोट निघाली. बोटीत सिरियातले जवळपास ५०० निर्वासित होते. बोट भूमध्यसमुद्रातून निघाली. पुढे सर्वात जवळचा देश म्हणजे इटली. ती रात्र आणि पुढचा संपूर्ण दिवस बोट पाणी कापत चालली होती. त्या वाटेवर इटलीच्या मुख्य भूमीच्या बरंच आधी लाम्पेदूसा हे इटलीच्याच अखत्यारीतलं बेट येतं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या बेटाच्या थोडं अलिकडे असताना बोट उलटली. लाम्पेदूसा बेटाच्या पूर्वेकडे माल्टा हा लहानसा देश आहे. इटली आणि माल्टाच्या जहाजांनी काही निर्वासितांना वाचवलं; पण त्यादिवशी जवळपास २७० जणांना (त्यांत ५०-६० लहान मुलंही होती) आपले प्राण गमवावे लागले.

जीवाच्या भीतीने सगळे निघालेले; त्यांना आशा होती, की एकदा लाम्पेदूसाला पोहोचलो की झालं; मग आपण दुसर्‍या जगात असू; तिथे सगळं आलबेल असतं असं म्हणतात. मधला हा एक समुद्र तेवढा पार करायचा. त्याच्यावरच आता त्यांची भिस्त होती. त्या पाण्याच्या अलिकडे दुर्दैव होतं; तर पलिकडच्या जगात नशीब पालटण्याची ताकद होती... नशीब पालटायचं असेल तर आधी बोटीत चढणं गरजेचं होतं. मानवी तस्करांना अवाच्या सवा पैसे देऊन ते त्यांनी केलं होतं. आता पुढचं काम ते पाणीच करणार होतं, त्यांना ते युरोपमध्ये नेऊन सोडणार होतं. मग त्यांना काम मिळणार होतं, पैसे मिळणार होते, पोटाला खायला मिळणार होतं... पण त्या पाण्याने त्यांचाच घास घेतला.

असं काही होऊ शकेल याची शक्यता त्यांनी गृहित धरलीच नसेल का? पण सुरुवातीला म्हटलं तसं जमिनीचा आधारच सुटत चाललेला दिसल्यावर त्यांना पाण्याच्या आसर्‍याला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
भूमध्यसमुद्राच्या भर मध्यातलं हे ठिपक्याएवढं लाम्पेदूसा बेट तोपर्यंत पर्यटनासाठी प्रसिद्ध होतं. तिथल्या एका बीचला हौशी पर्यटकांनी जगातला सर्वोत्कृष्ट बीच म्हणून बिरुदही बहाल केलेलं. २०११ नंतर ट्युनिशिया, लिबिया, एरिट्रिया, नायजेरिया, सोमालिया, सिरिया, येमेन या देशांचे निर्वासित बेटावर येऊन धडकायला लागले. त्यांच्या दृष्टीने ते बेट म्हणजे युरोपचा दरवाजा होता. पण हा अगतिक मानवी ओघ झेलण्याची त्या बेटाची ताकदच नव्हती. एका आकडेवारीनुसार नवीन सहस्त्रकाच्या सुरुवातीपासून पाच लाखांहून अधिक लोकांनी उत्तर आफ्रिकेच्या किनार्‍यावरून लाम्पेदूसा गाठण्याचा आटापिटा केला आणि त्यांपैकी १५ ते २० हजार लोकांनी जीव गमावला. ‘गेट-वे टू युरोप’ म्हणवलं जाणारं हे बेट कधी ‘ग्रेव्हयार्ड ऑफ युरोप’ बनलं हे कुणाला कळलंच नाही.

लाम्पेदूसा बेटाच्या अशा स्थित्यंतराचे एक साक्षीदार होते, डॉ. पिएत्रो बार्तोलो. डॉ. बार्तोलो त्याच बेटावर लहानाचे मोठे झाले. ९०च्या दशकापासून पुढची २५-३० वर्षं त्यांनी बेटावर येणार्‍या अडीच ते तीन लाख निर्वासितांना या ना त्या प्रकारे वैद्यकीय मदत केली आहे, त्यांच्यावर उपचार केले आहेत.
त्यांची सर्वात जुनी आठवण आहे १९९१ सालची. त्यावर्षी एक दिवस बेटावर एक बोट येऊन पोहोचली, त्यात तीन निर्वासित होते. डॉ. बार्तोलो मागचापुढचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावले. तेव्हापासून ते अहोरात्र काम करत आलेले आहेत. अनन्वित शारीरिक हाल झालेल्या निर्वासितांना बेटावर पोहोचताच लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आहे. कित्येक निराधार, पोरक्या मुलांना त्यांनी आधार दिला आहे... त्यांना ओळखणार्‍या काहीजणांच्या म्हणण्यानुसार निर्वासितांचे सर्वाधिक मृतदेह देखील त्यांनीच तपासले आहेत.

निर्वासितांनी भरलेली बोट किनार्‍यानजिक येते किंवा उलटते तेव्हा बचावकार्य करणार्‍यांना पाण्यातल्या जास्तीत जास्त माणसांना किनार्‍यावर आणायचं असतं. त्यांना काहीएक योजना आखायला, विचार करायला फारसा अवधी नसतो. जवळच्या तुटपुंज्या साधनांसहित त्यांना काम करायचं असतं. मग पाण्यातल्या जिवंत माणसांना बाहेर काढून वैद्यकीय मदत करणार्‍याच्या स्वाधीन करायचं आणि मृतदेह किनार्‍यावर आणून काळ्या बॅगांमध्ये चेन लावून बंद करून टाकायचे, ही त्यांची दोन प्रमुख कामं. अशा काळ्या बॅगा उघडून आतल्या मृतदेहांची तपासणी करून ती माणसं खरंच मृत्यू पावलेली आहेत याची खात्री करणं ही जबाबदारी डॉ. बार्तोलो यांची.
२०१३ सालीच कधीतरी अशाच एक बॅगेची चेन उघडून त्यांनी त्या मृतदेहाची (ती एक तरुण मुलगी होती) नाडी पाहिली आणि त्यांना किंचित, अगदी सूक्ष्म एक-दोन ठोके जाणवले. पुन्हा पुढचं मिनिटभर तो ‘मृतदेह’ निपचित होता, पण डॉ. बार्तोलो थांबले. आणि मिनिटभराने त्यांना पुन्हा सूक्ष्म ठोके जाणवले. तत्क्षणी त्यांची खात्री पटली, की त्या मुलीच्या शरीरात अजूनही धुगधुगी होती. त्यांनी आरडाओरडा करून मदत मागवली आणि त्या तरुणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पुढे तिचा जीव वाचला. आज ती मुलगी स्वीडनमध्ये राहत आहे.
२०१९ साली डॉ. बार्तोलो युरोपियन पार्लमेंटमध्ये निवडून गेले. इटलीच्या एका स्वयंसेवी संस्थेतर्फे भूमध्यसमुद्रात संकटात सापडलेल्या निर्वासितांची डॉ. बार्तोलोंशी पुन्हा गाठ घालून देण्याच्या एका कार्यक्रमात ती मुलगीही आली होती. त्यांना पाहताच तिला रडू आवरलं नाही. डॉ. बार्तोलोंनी असे अनेक सुखांत, त्याहून कित्येक दुःखांत पाहिलेले आहेत. त्यांनी ‘लाम्पेदूसा गेट-वे टू युरोप’ या आपल्या पुस्तकात हे सगळे अनुभव लिहिले आहेत. ‘फायर अ‍ॅट सी’ या लघुपटातही डॉ. बार्तोलोंच्या कामावर प्रकाश टाकला गेला आहे. या लघुपटाला २०१६ साली ऑस्कर नामांकन मिळालं होतं.

सुरुवातीला सांगितलेल्या २०१३ सालच्या घटनेने प्रसारमाध्यमांमध्ये बराच गदारोळ झाला. त्याचा परिणाम म्हणून इटलीच्या नौदलातर्फे ‘मारे नोस्त्रुम’ नावाची मोहिम सुरू करण्यात आली. (‘मारे नोस्त्रुम’ हे भूमध्यसमुद्राचं लॅटिन भाषेतलं प्राचीन नाव आहे. त्याचा अर्थ-आपला समुद्र) त्याअंतर्गत पुढच्या वर्षभरात भूमध्यसमुद्रात संकटात सापडलेल्या जवळपास दीड लाख लोकांची सुटका केली गेली. शेकडो मानवी तस्करांनाही त्यादरम्यान पकडण्यात आलं. अनेक मानवतावादी संघटनांनी या मोहिमेचं स्वागत केलं. त्याचवेळी काही देशांच्या अशाही प्रतिक्रिया आल्या, की यामुळे निर्वासितांना युरोपमध्ये येण्यासाठीचं अधिक आकर्षण वाटेल आणि त्यांचा ओघ आणखीनच वाढेल. इटलीने एकट्याच्या बळावर एक वर्षभर ही मोहिम चालवली. मात्र त्यांच्या अंदाजापेक्षा निर्वासितांचा ओघ खूपच जास्त होता. त्या सर्वांची सोय करण्याइतका निधी त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ऑक्टोबर, २०१४ मध्ये ही मोहिम गुंडाळली गेली. त्याजागी युरोपीय महासंघाच्या सीमा सुरक्षा संस्थेच्या पुढाकाराने ‘ऑपरेशन ट्रायटन’ नावाची मोहिम सुरू झाली. यात समुद्रामार्गे जाणार्‍या निर्वासितांच्या बचावकामापेक्षाही सीमासुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. नोव्हेंबर, २०१४ ते फेब्रुवारी, २०१८ यादरम्यान ही मोहिम सुरू होती. २०१८ मध्ये त्याजागी ‘ऑपरेशन थेमिस’ची सुरुवात झाली. आता या मोहिमेत इतर डझनावारी युरोपीय देशही सहभागी झाले. आता समुद्रात संकटात सापडलेल्यांना वाचवण्यापेक्षाही मुळात आफ्रिकेच्या किनार्‍यावरून अशा बोटी निघूच नयेत याकडे अधिक लक्ष पुरवलं जातं. पण मायदेश सोडून पळावं लागलेल्यांनी जायचं कुठे याचं उत्तर कुणाकडेही नाही.

लाम्पेदूसा बेटावर निर्वासितांचे लोंढे येऊच द्यायचे नाहीत असा एक मतप्रवाह इटलीत आजही आहे. ‘आपल्याच देशाने हे का सहन करायचं’ असा त्यांचा प्रश्न आहे. त्या मुद्द्यावरून तिथे स्थानिक निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. डॉ. बार्तोलोंना हे मान्य नाही. अशा मतप्रवाहाचा सामना करण्यासाठीच त्यांनी युरोपियन पार्लमेंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण राजकीय मुत्सद्देगिरी वगैरे सगळं सोडावं आणि आपल्या बेटावर पुन्हा निर्वासितांची सेवा करायला जावं असं कधीकधी वाटतं असं ते म्हणतात.
लाम्पेदूसा बेटाचं युरोपचा भाग असणं, तरी बेटाचं युरोपपेक्षा आफ्रिकेच्या नजीक असणं, ते अंतर काटण्यासाठी मानवी तस्करांकडे थातुरमातूर बोटी असणं, बोटींच्या तुलनेत ते पाणी पार करू इच्छिणार्‍यांचा आकडा प्रचंड असणं आणि जमिनीचा आधार सुटल्याने त्यांना पाण्याकडे धाव घेण्याशिवाय इलाज नसणं अशा सगळ्या असण्या-नसण्याच्या कात्रीत लाम्पेदूसा बेट अडकलेलं आहे. त्यात अनेक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय ताणेबाणे आहेत. प्रत्येक पक्ष समोरच्यावर कुरघोडी करू पाहतो आहे. त्याचा शेवट कधी आणि कसा होणार कुणालाच माहिती नाही. दरम्यान बेटाच्या आसपासच्या पाण्यात गेली अडीच दशकं जीवन-मरणाचा खेळ सुरू आहे.

२.

नोव्हेंबर, २०२०. त्रिनिदाद बेटावरून २९ व्हेनेझुएली निर्वासितांना (१३ प्रौढ, १६ मुलं) परत पाठवण्याचा निर्णय झाला. एका रविवारी त्यांना दोन बोटींमध्ये बसवून व्हेनेझुएलाच्या दिशेने पिटाळण्यात आलं. त्यांच्यापैकी एक होतं फेलिक्स मारकानोचं कुटुंब. फेलिक्स व्हेनेझुएलातून कामाच्या शोधार्थ त्रिनिदादला आला. त्याच्या देशात अराजक माजलं होतं. कित्येकांवर आर्थिक चणचण ओढवली होती. शेजारच्या कोलंबियात जाता आलं नव्हतं. म्हणून मग फेलिक्सने जवळच्या त्रिनिदाद बेटावर जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्याची बायको औषधपाण्याच्या शोधार्थ अशीच त्रिनिदादला आली. त्यांची मुलं आजारी होती, पण त्यांच्या देशात त्यांना औषधं मिळत नव्हती. तिला मुलांसोबत त्रिनिदादमध्ये अवैधरीत्या प्रवेश करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पण ती आणि तिच्याबरोबरच्या इतर निर्वासितांना त्रिनिदाद पोलिसांनी हटकलं, तटरक्षक दलाकडे सोपवलं आणि त्या रविवारी त्यांना परत पाठवायचं ठरवलं.
त्या दोन बोटींनी त्रिनिदादचा किनारा सोडला. दरम्यान त्रिनिदादमधल्या एका न्यायाधीशांनी त्यांना परत आणण्याचे आदेश दिले. आता दोन्ही किनार्‍यांवर त्यांची प्रतिक्षा सुरू झाली. व्हेनेझुएलाच्या किनार्‍यावरून त्यांना परत पाठवायचं होतं; तर त्रिनिदादच्या किनार्‍यावर त्यांना उतरवून घ्यायचं होतं. सोमवारी दोन्ही बोटी व्हेनेझुएलाच्या किनार्‍यावर पोहोचतील अशी अपेक्षा होती. पण बोटी आल्याच नाहीत. सगळे सचिंत झाले. अखेर दोन दिवस समुद्रावर घालवून बुधवारी त्या बोटी परत त्रिनिदादला आल्या. बोटीतल्या उतारूंचे अन्नपाण्याविना दोन दिवस हालहाल झाले होते.
निर्वासितांची अशी टोलवाटोलवी त्या प्रदेशात नवी राहिलेली नाही.

व्हेनेझुएला, दक्षिण अमेरिका खंडाच्या सर्वात उत्तरेकडचा, एकेकाळचा संपन्न देश. जगातले सर्वाधिक तेलसाठे त्या देशात होते. मात्र गेल्या काही वर्षांत देशातली राजकीय दडपशाही, भ्रष्टाचार, अन्नाची भयंकर टंचाई, वैद्यकीय सेवांचा दुष्काळ आणि एकंदर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे देशातली ९०% जनता गरिबीच्या खाईत ढकलली गेली. जवळपास तीस-चाळीस लाख व्हेनेझुएली नागरिकांनी देश सोडला. आणि जगाचं त्यांच्या समस्येकडे लक्ष गेलं.

व्हेनेझुएली निर्वासितांचा प्रश्न कसकसा आकार घेतो हे अभ्यासणार्‍यांचं प्रमुख लक्ष व्हेनेझुएला आणि त्याच्या शेजारच्या कोलंबिया, ब्राझिल इत्यादी मोठ्या देशांकडे लागलेलं आहे. मात्र व्हेनेझुएलापासून अवघ्या १५ किमी अंतरावरचं त्रिनिदाद बेटदेखील या प्रश्नाचा जाच झेलत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पाहायचं तर त्रिनिदादमधल्या व्हेनेझुएली निर्वासितांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. मॅन्युएल रोमेरो हा तिथला व्हेनेझुएली निर्वासित म्हणतो, ‘समुद्रात भरकटलेल्या लाकडाच्या ओंडक्यासारखं वाटतं, पाणी जिकडे नेईल, तिकडे फरफटत जायचं. पण आमच्या देशातही राहणं शक्य नव्हतं. तिथे अशी परिस्थिती होती, की तुम्हाला भूक लागली तर चूल पेटवण्यासाठी घरातली एखादी लाकडी वस्तू जळण म्हणून वापरावी लागेल, कारण गॅसचा पुरवठा आटलेला... माझा मुलगा आजारी होता, पण त्याच्यासाठी औषधंच मिळत नव्हती; आमच्या डॉक्टरनी त्याला जनावरांच्या डॉक्टरकडे पाठवलं आणि कुत्र्यासाठीचं औषध घ्यायला सांगितलं.’ आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी रोमेरो त्रिनिदादमध्ये आला. तिथे तो मिळेल ती लहान-मोठी कामं करतो.

त्रिनिदाद हा तसा चिमुकला बेट-देश. अचानक आलेला असा निर्वासितांचा ओघ पेलायची त्यांची ताकद नाही. २०१४ साली त्यांच्या सरकारने स्थलांतरितांसाठी एक धोरण जाहीर केलं. पण सद्य परिस्थितीत ते पुरेसं नाही. निर्वासितांना सामावून घेऊ शकेल अशी स्थानिक कायदेशीर तरतूद त्यांच्याकडे नाही. परिणामी त्रिनिदादमधल्या स्थानिकांमध्ये आगंतुकांबद्दलची भीती, तिरस्कार, राग अधिक आहे. इतर लॅटिन अमेरिकन देशांनी त्यांच्याकडच्या निर्वासित व्हेनेझुएलींसाठी काही ना काही मदत आणि तात्पुरतं नागरिकत्व दिलेलं आहे. त्रिनिदादमध्ये ते झालेलं नाही. तिथे व्हेनेझुएली नागरिकांना जास्तीत जास्त एक वर्ष काम करता येतं. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. अवघ्या १५ किमी अंतराच्या पाण्याने तिथेही अनेकांचे घास घेतले आहेत. तरी व्हेनेझुएलाचे कैक विस्थापित लोक आजही त्रिनिदादला जाणारी बोट पकडता यावी यासाठी आटापिटा करतात. कारण... जमिनीचा आधारच सुटत चालल्यामुळे त्यांना पाण्याच्या आसर्‍याला जाण्यावाचून पर्याय उरलेला नाही...

३.

"२००१ साली २० अफगाण निर्वासित आमच्या बेटावर आले. ती त्या वर्षाची सर्वात मोठी बातमी होती. आता परिस्थिती बदलली आहे... जगाला दिसायला हवं इथे काय चालू आहे!” - ग्रीक तटरक्षक दलाच्या कॅप्टन पापादोपुलोसचे हे उद्गार. कॅप्टन पापादोपुलोस ग्रीसच्या लेस्बोस या बेटावर काम करायचा. बेटाच्या आसपासच्या समुद्रात गस्त घालायची, पाण्यावर साधारण लक्ष ठेवायचं इतकंच तिथल्या तटरक्षक दलाचं काम. अरब स्प्रिंगनंतर हे चित्र बघताबघता बदललं.
लेस्बोस बेट ग्रीसच्या अखत्यारीतलं, पण ते पूर्वेकडच्या तुर्कस्तानच्याच अधिक जवळ आहे. दोन्ही किनार्‍यांमध्ये अवघं चार मैलांचं अंतर आहे. सिरिया, येमेन, अफगाणिस्तान इथून येणार्‍या निर्वासितांना त्या चार मैलांचा कोण आधार! ते अंतर पार करून लेस्बोसला यायचं, की तुम्ही युरोपमध्ये प्रवेशता. तिथून पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल अशी आशा. त्या आशेपायी लाम्पेदूसाप्रमाणेच लेस्बोस बेटामार्गे युरोपला जाण्याचा एक मार्ग बनला... आणि ते चार मैलांचं ‘एजियन सी’चं पाणी म्हणजे मृत्यूचा सापळा!

लेस्बोसवरच्या तटरक्षक दलाकडे अचानक फोन-कॉल्स यायला लागले. अमुक बोट उलटली आहे, तमुक ठिकाणी पाण्यात माणसं दिसत आहेत, ताबडतोब त्यांची सुटका करा. तटरक्षक दलाकडे अशा कामासाठीची साधनसामुग्री नव्हती. तरीही त्यांचे सैनिक जवळ असलेल्या बोटी घेऊन धावायचे. दररोज अशा कित्येक बोटी, हजारो निर्वासित; बाया-माणसं, लहान मुलं, त्यांना एक-एक करून पाण्यातून बाहेर काढायचं; कुणाच्या नाकातोंडात पाणी गेलेलं, कुणी बेशुद्ध पडलेलं, त्यांच्यावर जमेल तसे प्रथमोपचार करायचे; कुणी एकाकी लहान मूल, त्याच्यासोबत मोठं कुणीच नाही; कुणी आई-बाप आपल्या लहानग्याला शोधताहेत, पण ते मूल कुठेच दिसत नाही; कुणी भकास चेहर्‍याने बसलेलं, तर कुणी धाय मोकलून रडतंय; कुणालाच एकमेकांची भाषा समजत नाही...
काहींची पाण्यातून सुटका करून त्यांना किनार्‍यावर आणावं तोपर्यंत पुढचा कॉल यायचा; पुन्हा कॅप्टन आणि त्याची माणसं धावायची. २०१५-१६ साली तर अशी परिस्थिती होती, की दिवस दिवस सतत हेच एक काम करावं लागायचं. त्यांच्याकडच्या बोटी छोट्या, इतर साधनं हे संकट झेलण्यासाठी तोकडी, पण मदतीची हाक आल्यावर तिकडे धावायला तर हवंच. निर्लेप राहण्याचा कितीही निश्चय केला तरी भल्याभल्यांना विदीर्ण करणारी दृश्यं, विस्कटून टाकणारे अनुभव. कॅप्टन पापादोपुलोसचे काही सहकारी दिवस बुडता बुडता अक्षरशः ढसाढसा रडायचे... हेच सारं जगाला कळायला हवं असं त्याला वाटायचं.
तीन-एक वर्षांपूर्वी कॅप्टन पापादोपुलोस हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. त्या झटक्यामागचं कारण सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नव्हती...!

मेलिंडा मॅकरॉस्टी, मूळची ऑस्ट्रेलियाची, पण तिच्या आधीच्या तीन-चार पिढ्या लेस्बोसमध्येच राहत आलेल्या, त्यामुळे ती तिथल्या समाजात पुरती सामावून गेलेली. लेस्बोस बेटाच्या निसर्गरम्य समुद्रकिनार्‍यावर मेलिंडाचं एक हॉटेल आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या पर्यटकांचीच काय ती तिथे गजबज. काही वर्षांपूर्वी हे चित्र बघताबघता बदललं. समुद्रातून बोटी भरभरून माणसं यायला लागली. कोण कुठली ती माणसं, अगतिक, देशोधडीला लागलेली, मेलिंडाला काहीच कळेना. त्यांना जमेल ती मदत करायला हवी एवढं मात्र तिला कळत होतं. त्यांना प्यायला पाणी द्यायचं, हॉटेलमधल्या अन्नाची पाकीटं करून द्यायची अशी मदत ती करायला लागली. मदत करू तितकी कमीच होती. मेलिंडा कधी त्या मदतकार्यात ओढली गेली तिलाही कळलं नाही.
बेटावर निर्वासितांचं होणारं ‘आगतस्वागत’ बेटावरच्याच काही नागरिकांना खुपत होतं. त्यांनी मेलिंडाला विरोध केला, ताकीद देऊन पाहिली; तरी ती बधेना म्हणताना तिच्या अनुपस्थितीत तिच्या घराची मोडतोड केली. घरावर लाल रंग ओतला. ती रक्तपाताची धमकी होती. पण मेलिंडा मागे हटली नाही. आज तिची ‘स्टारफिश फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था लेस्बोस बेटावरच्या मोरिया छावणीतल्या निर्वासितांसाठी काम करते आहे.

refugee-boat-3.jpg

वारसन शायर लिहिते :

No one leaves home unless home is the mouth of a shark
You only run for the border when you see the whole city running as well

आयुष्यात समुद्राचं तोंडही न पाहिलेल्या माणसांना याच शार्कला घाबरून त्याच समुद्रावर विश्वास टाकावा लागत आहे; कारण त्यांचं आख्खं शहरच समुद्रात झोकून द्यायला निघालं आहे. माणसांनीच आखलेल्या सीमारेषांनी पाण्याच्या आरपारचे दोन भूभाग दोन पूर्णपणे वेगवेगळी प्राक्तनं वागवत आहेत... आणि त्या पाण्यातल्या कोळ्यांच्या जाळ्यात माशांऐवजी मानवी मृतदेह लागत आहेत.

-----

अनुभव - एप्रिल २०२१ अंकात प्रकाशित झालेला लेख. (फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप धन्यवाद! वाचूनच काटा येतो अंगावर.
निर्वासितांचा प्रश्न जगभरात वाढतो आहे पण प्रश्नाचा आवाका एवढा मोठा आहे की सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत एक एक पैलू समजावून देणे जरूरी. तू व्यावसायिक पत्रकार आहेस का माहिती नाही पण या कार्यासाठी पत्रकारांना देतात तसा जनजागृती पुरस्कार तुला द्यायला हवा. कधीतरी हा विषय तुला का घ्यावासा वाटला त्याबद्दलही लिही.

उत्तम लेख.
निर्वासितांचे प्रश्न मोठे आहेत. दुर्दैवाने ते कसे हाताळावेत ह्याबद्दल जगाचे एकमत होणे काही शक्य दिसत नाही.

तुझे निर्वासितांवरचे लेख उत्तमच असतात. पण जे लिहिलेले असते ते आवडते असेही म्हणता येत नाही.
काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. जगात कोणावरही विस्थापित व्ह्यायची वेळ येऊ नये असे मात्र दरवेळी वाटते.

रच्याकने - वरती मथळ्यामधले रेफ्युजी बदलून निर्वासित करणार का.

उत्तम लेख ..चांगली ओळख करून दिलीस.
निर्वासित म्हणून जिणे फार वाईट. इतक्या भल्या मोठ्या पृथ्वीवर एक तुकडा जमीनीचा मिळवयला केवढे कष्ट! Sad

लेख वाचून हल्लीच कॅनडातून अमेरिका बॉर्डर पार करायचा प्रयत्न करण्याऱ्या आणि त्या पायी जीव गमावुन बसलेल्या पटेल कुटुंबियांची आठवण झाली. अर्थात दोन्ही परिस्थितीत जमीन अस्मानचा फरक आहे