समय्याच्या लेकीचं काय?

Submitted by अरिष्टनेमि on 15 January, 2022 - 09:25
समय्याच्या लेकीचं काय?

समय्या मदनय्या गोरा, हे नाव तुम्ही ऐकलंय का? नसेलच. पुढंही ऐकण्याची आता शक्यता नाही. कारण समय्या मरण पावला. गडचिरोलीतल्या सिरोंचासारख्या गावात राहून रोजंदारीवर जेमतेम उदरनिर्वाह करणारा समय्या एक सामान्य माणूस. शेती-भाती काही नाही. हातावर पोट.

अलीकडं समय्या वन विभागात रोजंदारीवर चौकीदार म्हणून काम करत होता. आता त्याला दरमहा जे काही उत्पन्न मिळायचं, त्यात पत्नी मधुनक्का आणि दहावीत असणारी मुलगी अनुषा यांचं जेमतेम भागत होतं.

गडचिरोलीतलं सागवान म्हणजे २४ कॅरेट सोनं. तस्करांची नजर यावर न पडली तर नवलच. निबिड काळोखात रातोरात सागाची उभी झाडं कापून तस्कर गाडी भरून नेत. हे रोखण्यासाठी वनविभागानं ठिकठिकाणी चौक्या लावल्या. तरी तस्करांनी एक थेट तेलंगणाला जाणारा मार्ग शोधूनच काढला. वनविभागानं तिथंही नाका लावला. तस्करांचा शेवटचा मार्ग बंद झाला.

विश्वासू आणि कष्टाळू म्हणून या नाक्यावर समय्याला दिलं. जोडीला २-३ लोक. अशीच एक गर्द काळोखानं भरलेली रानातली रात्र. अशा रात्रीला चिरत एक गाडी आली. समय्या ड्युटीवर होता. समय्याला समजलं काय प्रकार आहे. तीन-चारशे रुपये रोजीनं काम करणारा हा साधा रोजंदारी मजूर. मिळतोय तो पैसा बिनबोभाट घेतला असता तर रात्रीच्या काळोखात या हाताचं त्या हाताला कळालं नसतं. गाडी निघून गेली असती. आठ-दहा दिवस कष्ट करून जी मिळकत होईल, ती एका क्षणात समय्याची झाली असती.

समय्या गरीब होता पण विकला जाईल इतका स्वस्त नव्हता. समय्यानं गाडी रोखली. जाऊ दिली नाही. समय्या त्यांना बधला नाही. खाल्ल्या मीठाला जागला. त्याचे जोडीदारही प्रामाणिक. तस्करांनी गाडीसकट पळ काढला. समय्या आणि जोडीदार आता तस्करीचा धंदा चालू देणार नाहीत. तेलंगणात जाणारा शेवटचा मार्ग आता त्यांनी रोखून धरला होता. तस्करांनी माघार घेतली, पण काहीतरी ठरवूनच. जातीचे गुन्हेगारच ते! योजना ठरली.

दिवाळीच्या मागेपुढे, ........म्हणजे बघा नेमकी गोष्ट ६ नोव्हेंबरची. आपण दिवाळी साजरी करत होतो. लाडू-करंज्या, चकल्या-कडबोळी खात होतो. भाऊबीजेच्या दिवशी गोडा-धोडाचा स्वयंपाक जेवून आपण घरी झोपलो असतानाची, ६ नोव्हेंबरची गोष्ट.

मध्यान रात उलटून गेलेली. रात्रीचा एक वाजला असावा. आपण आपल्या घरी गाढ झोपेत होतो. समय्याला कुठली आली दिवाळी? ज्या दिवशी कामावर जाईल, त्या दिवशी रोजी मिळेल. तो घरची भाजी-भाकर खाऊन नाक्यावर बसला होता. आळीपाळीने बाहेर थांबू अशा हिशोबानं जोडीदार नाक्याच्या आत. रान झोपलं होतं. इतक्यात चार व्यक्ती वाहनानं तिथं आल्या. समय्या बाहेरच होता. त्याच्यापाशी जाऊन विचारलं, “तू समय्या का?” समय्या हो म्हणाला. काही कळायच्या आत बोलणा-या व्यक्तीनं हातात लपवलेला सुरा समय्याच्या पोटात मुठीपर्यंत खुपसला. चालून आलेला काळ रात्री समय्याला समजला नाही. समय्या ओरडला, धडपडला. त्याच्या जोडीदारांना रात्रीच्या अंधारात काय घडतंय ते समजेपर्यंत तस्कर पळून गेले.

हे सारं घडलं काही क्षणातच. रक्तबंबाळ समय्या रात्रीच्या काळोखात स्वतःच्याच रक्ताच्या चिखलात विव्हळत पडला होता.
समय्याला दहावीतली लेक आठवली असेल. समय्याला त्याची वाट बघत बसलेली बायको आठवली असेल.

जोडीदारांनी तात्काळ धावपळ केली. वनविभागाच्या अधिका-यांनी अर्ध्या रात्री समय्याला दवाखान्यात नेलं. तिथून लगोलग हैद्राबादमधल्या उत्तम दवाखान्यात नेलं. पण समय्या राहिला नाही. समय्या गेला. ऐन दिवाळीत मधुनक्काचं कपाळ कोरं झालं.

जिथं लिहा-वाचायची बोंब, तिथं समय्याची लेक दहावी पास झाली. आता आता तिची सुरुवात होती. तिला नेटानं "शिक" म्हणणारा तिचा बाप आता राहिला नाही. मागं काही ठेवून गेला नाही. होतंच काय? कष्ट करून पोट भरणारे दोन हात. ते समय्याबरोबर गेले.

समय्या शासकीय सेवेत नव्हता. त्यामुळं त्याला शासन किती मदत करेल याला खूप मर्यादा आहेत.

समय्या मेला. वनरक्षणासाठी मेला. आपल्यासाठी मेला. एक निरक्षर पत्नी आणि सोळा वर्षाच्या नाजूक वयातली लेक बेवारस सोडून मेला. लाचखोरीनं बुजबुजलेल्या जगात प्रामाणिकपणाचं उदाहरण ठेवून गेला.

मधुनक्का आणि अनुषाला मदत मिळवण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेकडे काही हितचिंतक पोहोचले. संस्था मदतीसाठी समाजाला आवाहन करायला तयार आहे. पण मधुनक्का आणि अनुषानं ओक्साबोक्शी रडत कहाणी सांगावी त्याचा व्हिडीओ करून मदत मागणार अशी त्यांची अपेक्षा होती.
त्या बिचाऱ्या माऊलीच्या भावनांचा असा बाजार मांडणं कितपत योग्य आहे? त्यांचं दुःख विकून मदत मिळवणं हा क्रूरपणा आहे.

भाऊबीजेनं मधुनक्काचं सौभाग्य नेलं. अनुषाला बाप परत मिळणार नाही. तुम्ही-आम्ही वीर समय्याला परत आणू शकणार नाही. पण त्याची विधवा पत्नी आणि मुलीचं आयुष्य आपण सुखी आणि सुरक्षित करू शकतो का?

प्रश्न नुसता अनुषाचा नाही. बाप गेला, घरात मागं पुरुष नाही. पुढं काय? ती शिकेल न शिकेल. लग्न होऊन परक्याच्या घरी जाईल. मधुनक्काचा शेवटचा आधार समय्या होता. तो गेला. अनुषाच्या लग्नानंतर मधुनक्काचं काय? नुसतेच प्रश्न. उत्तर नाहीच.

मानद वन्यजीव रक्षक श्री. अजिंक्य भटकर आणि डॉ. सावन देशमुख यांनी आता त्या मायलेकीसाठी हे आव्हान स्वीकारलं आहे. अनुषा आणि मधुनक्काच्या नावानं काही गुंतवणूक करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हा गोवर्धन पर्वत आहे. त्याला अजून हात लागले तर उचलूच शकतील. आपण काय मदत करु शकतो?

काहीच होऊ शकलं नाही तर समय्याच्या लेकीचं काय?

https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/teakwood-smugglers-stab-...

श्री. अजिंक्य भटकर
9766491323
7498680719
WhatsApp Image 2021-12-06 at 14.49.09.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही घटना घडल्याचं मला गडचिरोलीतील काही परिचितांकडून समजलं. घटना जशी समजली तशी मी इथं दिली आहे.रोजंदारी मजूरासाठी शासनाचं काही धोरण नाही. सामान्य व्यक्ती म्हणून शासनाच्या मागं लागणं किंवा टीका करणं यातून निष्पन्न काहीच होणार नाही. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पण त्यातून आरोपी मिळतील, शिक्षाही होईल, न होईल. मूळ प्रश्न, मधुनक्का आणि अनुष्का यांचा आहे, तो सुटत नाही. त्यांच्यासाठी आर्थिक मदत हवी आहे. इथं हे असं मदत मागणं गैर नसावं अशी धारणा आहे. चुकत असल्यास क्षमस्व.

मदत करण्याची इच्छा आहे. कशाप्रकारे करता येईल याचे तपशील लेखात देता येतील का?
समय्याच्या मृत्यू विषयी तुम्ही लेख लिहिलात हे फार चांगले केलेत. नाहीतर दुर्दैवाने जंगल राखण्यासाठी कोणाला काय किंमत मोजावी लागते हे जगापुढे येत नाही. विशेषतः तिथल्या स्थानिकांना.

जिज्ञासा +१
काही फोन नं , बँक अकाऊंट नंबर आहे का ?
(अनुषाला 'नन्ही कली' या महिंद्रा फाऊंडेशनच्या संस्थेत मधे रजिस्टर करता येईल का.. ते मुलींच्या शिक्षणासाठी मदत करतात)
हे अतिशय दुःखद आहे, मनातून जातच नाहीये.

करूण कहाणी आहे पण मदतीचे रॅशनॅल समजले नाही. जे लोक जीव घेऊ शकतात त्यांना माय-लेकीच्या नावे गुंतवणूक आहे हे कळल्यावर गप्प बसतील का? समय्याला गेल्याने त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला नि प्रश्न संपला इतक्यावर विषय आटोपणारी मंडळी आहेत का? जिथे "सेंड अ मेसेज" माईंडसेट असतो तिथे सरधोपट विचार उपयोगी पडेल का?

दोघींना काही प्रशिक्षण देऊन पायावर उभे करणे जरूरी. प्रशिक्षणार्थ लागणारी मदत वार्षिक स्वरूपात जमा करता येईल का म्हणजे दोघींची प्रोग्रेस ट्रॅक होते.

समय्या _/\_

पण मधुनक्का आणि अनुषानं ओक्साबोक्शी रडत कहाणी सांगावी त्याचा व्हिडीओ करून मदत मागणार अशी त्यांची अपेक्षा होती.>> सगळ्याच संस्थाची कामाची पद्धत अशी असते असे नाही. अजून कोणत्या एनजीओ, संस्थेने यात लक्ष घातलेले आहे का? मदत करायची इच्छा आहे.

प्रतिसाद वाचून आशा पल्लवित झाल्या. खूप धन्यवाद. श्री. अजिंक्य भटकर यांच्या संपर्कासाठी मी त्यांचे क्रमांक देतो आहे. कृपया त्यांच्याशी बोललात तर चित्र स्पष्ट होईल.
श्री. अजिंक्य भटकर
9766491323
7498680719

मदतीसाठी माझ्याकडं आलेलं एक पोस्टर लेखात देतो आहे. इथंही देतो आहे.
WhatsApp Image 2021-12-06 at 14.49.09_0.jpeg

@इन्दुसुता
धन्यवाद. विपूवर प्रतिसाद दिला आहे.

@वावे
गुन्हेगार पकडले किंवा नाही याबद्दल सध्यातरी माहिती नाही. पण मला काही समजलं तर मी नक्की कळवीन.

मला वाचून वाईट वाटले.

एक त्रुटी दिसली. लेखा मधे हल्ला/ हत्या नोव्हेंबर मधे दिवाळीच्या काळात झाली आहे असा उल्लेख आहे, TOI ची लिंक November 12 ला अपडेट केली आहे सांगतो.
लेखाच्या शेवटी , इंग्रजी मधे kindly support या आवाहनात, ९ ऑक्टोबरला प्राण गेल्याची नोंद आहे.

दुर्दैवी घटना आहे ... पण दिवाळी आणि आपण हे खात होतो ..तेव्हा हे चालला होता ..वॆगरीए पटलं नाही ...तुलना .. उगाच कारुण्य आणल्या सारखा वाटलं ...असे अगणित आहेत ... मदत नक्कीच होईल... स्पष्ट लिहिला ...

Sad अत्यंत दुर्दैवी घटना. इथे लिहिल्याबद्दल आभार अरिष्टनेमि.

श्री. भाटकर यांना संपर्क केला आहे.

कै. समय्याच्या कुटुंबासाठीची मदत जानेवारीअखेरपर्यंत स्वीकारून फेब्रुवारीत द्यावयाची होती. पण पुरेसा निधी जमा न झाल्याने संबंधित लोक थांबले होते. अखेरीस आता सव्वा लाख रुपये झाल्यानंतर कै. समय्याच्या पत्नीला काल धनादेश देण्यात आला. आजच सकाळी ही माहिती मला समजली. सर्व मदतकर्त्यांना मनापासून धन्यवाद.

मला व्हॉट्सअपवर मिळालेली माहिती पुढे देत आहे. श्री. भटकर यांच्याशी बोलून हे खरे असल्याबाबत मी खात्री केलेली आहे.

"माणूसकी अजूनही जिवंत आहे"
समय्या मदन गोरा हा पुस्तकी ज्ञान नसणारा, आधुनिक जग न बघीतलेला पण निसर्ग संरक्षणासाठी कटिबद्ध असणारा, तुटपुंज्या रोजंदारीवर काम करणारा वनमजूर नव्हे तर" वनसैनिकच". 2021च्या ऐन दिवाळीच्या दिवसांत गडचिरोली जिल्ह्य़ातील सिरोंचा येथील सागवानी जंगलात वनतस्करी रोखणार्या वनचौकीवर गस्तीवर असतांनाच सागवान तस्करांना अटकाव करतांना हल्ल्यात शहीद झाला. वन्यजीव व वनसंरक्षण करतांना अनेक वनमजूर, वनकर्मचारी, अधिकारी तसेच स्वयंसेवी संघटनेतील कार्यकर्ते यांना अत्यंत खडतर आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागते. जंगल क्षेत्रासाठी अहोरात्र कार्य करणारे हे लोक उपेक्षितच आहेत कारण बहुसंख्य समाज घटकांना यांच्या कार्याची माहिती च नाही. अशा परीस्थितीत कर्तव्य बजावणारा समय्या मरण पावला मागे राहीली त्याची पत्नी व निरागस लेक अनुषा. समय्या च्या साहसाची माहिती लोकांन पर्यंत पोहोचून,समय्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान अजिंक्य भटकर यांनी सोशल मिडीयावर केले आणी अजूनही माणूसकी जिवंत आहे याचा प्रत्यय आला. देश विदेशातून आर्थिक मदत म्हणुन एकूण 1,25,000रु गोळा झाले. या कार्यात अमरावती विभागाचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख व त्यांची संघटना "कार्स" यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.
आज दि. 18एप्रील 2022 रोजी पूनम पाटे, उपवनसंरक्षक, सिरोंचा यांच्या उपस्थितीत अजिंक्य भटकर यांनी समय्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश समय्या च्या पत्नीला सुपुर्द केला. त्यावेळी सिरोंचा वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास काटकु, जीवन चौधरी व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
सम्मया गोरा बरोबर जे झाले ते अत्यंत वाईट झाले त्यांचे वन संरक्षणासाठी चे बलिदान सदैव स्मरणात राहील. वन विभागाने आपल्या स्तरावर शक्य ती मदत सम्मया च्या परिवाराला केली परंतु एक सामाजिक जबाबदारी म्हणुन आम्ही लोकांन पर्यंत त्यांच्या बलिदाना बद्दल सोशल मीडिया द्वारे कळविले आणि अनेक देशा विदेशातील लोकांनी त्यांच्या शौर्या बद्दल स्तुति केली, श्रध्दांजली दिली आणि त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत सुद्धा देऊ केली. माणुसकी अजून ही जिवंत आहे याचे हे उदाहरण आहे, या पुढे ही जेव्हा जेव्हा गरज असेल आम्ही आपल्या कडून शक्य होईल तसे वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी आपले योगदान देऊ.
- अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक, नागपूर
WhatsApp Image 2022-04-19 at 10.00.07 AM.jpeg

या लोकांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं का पुरवली जात नाही, ती फार गरजेची आहे.

जंगलातील लाकूड पळवणाऱ्या टोळ्या सर्व योजनाबद्ध रीतीने असे गुन्हे पार पाडतात, आणि जमेल तेवढ्या पद्धतीने मार्गात येणारे अडथळे दूर करतात त्यासाठी कोणत्याही थराला त्यांना जावे लागले तरी.

दुर्दैवी घटना ! खरच ह्या लोकांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं का लोकांना पाहीजे !