अंतरीची खूण

Submitted by सामो on 13 January, 2022 - 19:01

दिसायला ठिकाठाक आहे, खरं तर सौम्यच आहे. म्हणजे आपल्याला पत्ता लागला नसता हिच्या अंगच्या एकाहून एक अर्क गुणांचा, पण महा छिनाल आहे ही कवटाळिण. दामाजीच्या धनाची अभिलाषा म्हणु नका की महाराचे सोंग धारण केलेली कंगालवृत्ती पाहू नका. नरहरी सोनार तर त्याच्या सोन्याकरताही वेडावली ही आणि शंकर बनली.
आणि दॄष्टी पहा अगदी नाकासमोर. गरीब तर अशी जसा जसा बगळाच जणू माशाच्या प्रतीक्षेत बसतो तशी ही. पण आहे लंपट. हिला एवढी अगदी हुटहुटीने (अँक्शिअसली) लंपटवृत्ती कशाची म्हणुन काय विचारता अहो भक्तीकरता काय वाटेल त्या थराला जाईल ही. हृदयात हात घालून भक्तांचे सुकर्म चोरुन घेउन जाते ही. छिनाल, भक्तांचे सुकृत उरु देइल तर नावाची पुंडलिकाची आराध्य स्वामिनी नाही म्हणवणार ही बया.

पहा दामाजीचें दायधन । गटकन गिळिलें अभिलाषून ।
कंगालवृत्ती सोंग धरुन । देव महार झाला असे ॥ ७ ॥
नरहरि सबळ सुवर्णकर्म । तयाच्या विषयीं वरिला काम ।
भांडावें तों जन्मोजन्म । शिवमौळी राहातसे ॥ ८ ॥

कुब्जा इतकी सतरा ठिकाणि वाकडीतिकडी ही तिचाही दादुला व्हायला या धटिंगणीने कमी केले नाही.

कुब्जादादुला वांकुडातिकुडा ।
नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ।

बरं सोळाहजार बायकांची दादला तर झालीच पण तेही कमी पडले काय म्हणुन शेवटी ब्रह्मस्थिती वरली हिने. काय म्हणावं हिच्या लोभाला अंतच नाही जे जे काही डोळा देखे ते निर्लज्जपणे मागते. मग सुदामाचे कोरडे पोहेसुद्धा त्यातून ना सुटले ना द्रोपदी ची शाक भाजी. दुष्काळातून आल्यासारखी भुकेली झाडपाला मिटक्या मारत खाउन, ढेकर देते. काय म्हणावे या बाईला. चोख्याचा पदार्थ म्हणु नका, नाम्याचा नैवेद्य म्हणु नका हिने तर शबरीची उष्टी बोरेही सोडली नाहीत. नाम्याला बाळाला ठकवुन त्याचा नैवेद्य ओरपते. किती दुर्गुण म्हणुन वर्णावे हिचे.

आणि काय सांगू ......माझेही चित्त चोरलेन हिने !!!

अहाहा!! काय सुंदर वर्णन केलेले आहे ना धुंडीसुत नरहरी मालू यांनी. हे आहे नवनाथ भक्तीसारातील चवथ्या अध्यायातील विठ्ठलाचे वर्णन. किती ती ईश्वरावरती श्रद्धा आणि किती ते प्रेमाने, टाकून बोलणे. किती मनोरंजक आहे प्रेमाची ही अभिव्यक्ती.

कोणी म्हणेल गरीबावाण । चांगुलपण मिरवीतसे ॥ ४ ॥
परी ही अंतरीची खुण । नरहरि मालू एकचि जाणे ।

------------------------------
ही अशी अंतरीची खूण पटलेले संतही और आणि त्यांचा भावही और. यांची भक्ती, भक्तीची अभिव्यक्ती किती किती सुंदर! अशी खूण पटायला केवढं सुकृत असावे लागत असेल.
------------------------
वरील वर्णन वाचताना मला बंगाली कवि 'रामप्रसाद सेन' लिखित विनोदी कविताही आठवते .
कवि म्हणतो - मला वडीलोपार्जित संपत्ती मिळेल याची सुतराम आशा राहीलेली नाही. बापाने त्याचे सर्वस्व परक्यास , अर्थात स्वतःच्या मित्रास - कुबेरास दान करुन टाकले आहे. (इथे हे लक्षात घ्या की शंकरास कुबेरमित्र म्हटले जाते) बाप आता नुसता घरी बसून असतो. बरं मग मला आईचे (कालीमातेचे) चरण तरी मिळतील तर ते ही नाही, ते भाग्य तरी कुठलं; बापाने ते पाय कोणी चोरुन नेऊ नयेत म्हणून स्वतःच्या छातीशी घट्ट धरुन ठेवले आहेत. बरं बाप मरेल आणि मग मला आईचे चरण मिळतील तर ते ही नाही, बाप आहे मृत्युंजय , मृत्युवर विजय मिळवुन बसलेला. मरायचाही नाही.
--------------------------
हे असं साहीत्य वाचलं की अंगावर रोमांच उठतात. किती प्रेम ते देवावरती. किती भावुक आणि ताकदीचे कवित्व!
-------------------
रामदासस्वामींचा हा अभंग.

होते वैंकुंठीचे कोणी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥१||

जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।
ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥२||

मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥३||

जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।
वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥४||

जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥५||

पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।
मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥६||

चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥७||

सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।
तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥८||

रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।
तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥९||

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥१०||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख...!!
तुझ्या अफाट वाचनाचे नेहमीच कौतुक वाटते...

सी धन्यवाद.
शर्मिला अभ्यासपूर्ण काही नाही . कधी कधी वाटते ' जे जे आपणांसी ठावे....' जास्त गांभिर्याने घेते मी Happy पण काहीही उत्तम वाचले की ते शेअर करण्याची उर्मी दाटून येते.
रुपाली अफाट नाही गं. हे तर पोथी वगैरेचे वाचन आहे. चतुरस्र काहीही नाही यात Happy

पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ।।

बहु खेचरीचं रान । बघ हे वेडे होय मन ।।

जाऊ नका कोणी । जे गेले, नाही आले परतोनी

तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला

अनंतयात्री, स्वेन, पुरंदरे - धन्यवाद
पुरंदरे होय. हा अभंगही पूर्वी वाचला होता.
>>>>>जाऊ नका कोणी । जे गेले, नाही आले परतोनी
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला
वाह वाह!! मस्त.