अंतरीची खूण

Submitted by सामो on 13 January, 2022 - 19:01

दिसायला ठिकाठाक आहे, खरं तर सौम्यच आहे. म्हणजे आपल्याला पत्ता लागला नसता हिच्या अंगच्या एकाहून एक अर्क गुणांचा, पण महा छिनाल आहे ही कवटाळिण. दामाजीच्या धनाची अभिलाषा म्हणु नका की महाराचे सोंग धारण केलेली कंगालवृत्ती पाहू नका. नरहरी सोनार तर त्याच्या सोन्याकरताही वेडावली ही आणि शंकर बनली.
आणि दॄष्टी पहा अगदी नाकासमोर. गरीब तर अशी जसा जसा बगळाच जणू माशाच्या प्रतीक्षेत बसतो तशी ही. पण आहे लंपट. हिला एवढी अगदी हुटहुटीने (अँक्शिअसली) लंपटवृत्ती कशाची म्हणुन काय विचारता अहो भक्तीकरता काय वाटेल त्या थराला जाईल ही. हृदयात हात घालून भक्तांचे सुकर्म चोरुन घेउन जाते ही. छिनाल, भक्तांचे सुकृत उरु देइल तर नावाची पुंडलिकाची आराध्य स्वामिनी नाही म्हणवणार ही बया.

पहा दामाजीचें दायधन । गटकन गिळिलें अभिलाषून ।
कंगालवृत्ती सोंग धरुन । देव महार झाला असे ॥ ७ ॥
नरहरि सबळ सुवर्णकर्म । तयाच्या विषयीं वरिला काम ।
भांडावें तों जन्मोजन्म । शिवमौळी राहातसे ॥ ८ ॥

कुब्जा इतकी सतरा ठिकाणि वाकडीतिकडी ही तिचाही दादुला व्हायला या धटिंगणीने कमी केले नाही.

कुब्जादादुला वांकुडातिकुडा ।
नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ।

बरं सोळाहजार बायकांची दादला तर झालीच पण तेही कमी पडले काय म्हणुन शेवटी ब्रह्मस्थिती वरली हिने. काय म्हणावं हिच्या लोभाला अंतच नाही जे जे काही डोळा देखे ते निर्लज्जपणे मागते. मग सुदामाचे कोरडे पोहेसुद्धा त्यातून ना सुटले ना द्रोपदी ची शाक भाजी. दुष्काळातून आल्यासारखी भुकेली झाडपाला मिटक्या मारत खाउन, ढेकर देते. काय म्हणावे या बाईला. चोख्याचा पदार्थ म्हणु नका, नाम्याचा नैवेद्य म्हणु नका हिने तर शबरीची उष्टी बोरेही सोडली नाहीत. नाम्याला बाळाला ठकवुन त्याचा नैवेद्य ओरपते. किती दुर्गुण म्हणुन वर्णावे हिचे.

आणि काय सांगू ......माझेही चित्त चोरलेन हिने !!!

अहाहा!! काय सुंदर वर्णन केलेले आहे ना धुंडीसुत नरहरी मालू यांनी. हे आहे नवनाथ भक्तीसारातील चवथ्या अध्यायातील विठ्ठलाचे वर्णन. किती ती ईश्वरावरती श्रद्धा आणि किती ते प्रेमाने, टाकून बोलणे. किती मनोरंजक आहे प्रेमाची ही अभिव्यक्ती.

कोणी म्हणेल गरीबावाण । चांगुलपण मिरवीतसे ॥ ४ ॥
परी ही अंतरीची खुण । नरहरि मालू एकचि जाणे ।

------------------------------
ही अशी अंतरीची खूण पटलेले संतही और आणि त्यांचा भावही और. यांची भक्ती, भक्तीची अभिव्यक्ती किती किती सुंदर! अशी खूण पटायला केवढं सुकृत असावे लागत असेल.
------------------------
वरील वर्णन वाचताना मला बंगाली कवि 'रामप्रसाद सेन' लिखित विनोदी कविताही आठवते .
कवि म्हणतो - मला वडीलोपार्जित संपत्ती मिळेल याची सुतराम आशा राहीलेली नाही. बापाने त्याचे सर्वस्व परक्यास , अर्थात स्वतःच्या मित्रास - कुबेरास दान करुन टाकले आहे. (इथे हे लक्षात घ्या की शंकरास कुबेरमित्र म्हटले जाते) बाप आता नुसता घरी बसून असतो. बरं मग मला आईचे (कालीमातेचे) चरण तरी मिळतील तर ते ही नाही, ते भाग्य तरी कुठलं; बापाने ते पाय कोणी चोरुन नेऊ नयेत म्हणून स्वतःच्या छातीशी घट्ट धरुन ठेवले आहेत. बरं बाप मरेल आणि मग मला आईचे चरण मिळतील तर ते ही नाही, बाप आहे मृत्युंजय , मृत्युवर विजय मिळवुन बसलेला. मरायचाही नाही.
--------------------------
हे असं साहीत्य वाचलं की अंगावर रोमांच उठतात. किती प्रेम ते देवावरती. किती भावुक आणि ताकदीचे कवित्व!
-------------------
रामदासस्वामींचा हा अभंग.

होते वैंकुंठीचे कोणी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥१||

जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।
ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥२||

मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥३||

जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।
वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥४||

जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥५||

पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।
मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥६||

चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥७||

सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।
तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥८||

रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।
तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥९||

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥१०||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख...!!
तुझ्या अफाट वाचनाचे नेहमीच कौतुक वाटते...

सी धन्यवाद.
शर्मिला अभ्यासपूर्ण काही नाही . कधी कधी वाटते ' जे जे आपणांसी ठावे....' जास्त गांभिर्याने घेते मी Happy पण काहीही उत्तम वाचले की ते शेअर करण्याची उर्मी दाटून येते.
रुपाली अफाट नाही गं. हे तर पोथी वगैरेचे वाचन आहे. चतुरस्र काहीही नाही यात Happy

पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ।।

बहु खेचरीचं रान । बघ हे वेडे होय मन ।।

जाऊ नका कोणी । जे गेले, नाही आले परतोनी

तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला

अनंतयात्री, स्वेन, पुरंदरे - धन्यवाद
पुरंदरे होय. हा अभंगही पूर्वी वाचला होता.
>>>>>जाऊ नका कोणी । जे गेले, नाही आले परतोनी
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला
वाह वाह!! मस्त.

आज नवनाथ पोथी वाचताना, परत भावुक झाले. कोणी उकिरड्यात, कुणी यज्ञाच्या राखेत, कोणी असे सापडले कोणी तसे पण हीच मुले नराची, नारायण झाली. जन्म महत्वाचा नाही , कर्म महत्वाचे. फार उत्तम संदेश आहे या कथांतून. गोरक्षनाथांनी गुरुला वडे द्यावे म्हणुन स्वतःचा, डोळा काढून दिला, हे वाचताना तर थरकाप उडतो. किती लहान ते मूल. १२ वर्षिय फक्त. त्याच्या आयुष्यात गुरु हाच सर्वेसर्वा. कशी वाढली असतील ही मुले, कशी तपस्या केली असेल.
नवनाथांची सामाजिक शिकवण व तेव्हाची सामाजिक उतरंड, सामाजिक परिस्थिती वाचण्याकरता बरेच शोधावे लागते आहे. पण खूप आवडते. फार कमी साहित्य आहे जालावरती. त्यांची शिकवण सुंदर आहे.

षांये भीं मरिये अणषांये भी मरिये। गोरष कहै पूता संजंमि हीं तरिये।
मधि निरंतर कीजै बास। निहचल मनुवा थिर होइ सास॥ 

अर्थ - न एकदम दाएँ चलो न एकदम बाएँ संयम से तरो

छान आहे
विशेषत: शेवटाकडचे लिखाण अधिक आवडले.

https://www.santsahitya.in/sants/
अप्रतिम साईट आहे. function at() { [native code] }इशयअभ्यासपूर्ण, माहीतीप्रद. त्या साईटवरुनच हा ज्ञानेश्वर माउलींचा उभंग व त्याचा अर्थ -

निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी ।
चिंतामणी अंगणी पेरियेला ॥
कैसा हा माव करुं गोविला संसारु ।
कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥
हिरियाची खाणी दिव्य तेज मणी ।
सांपडला अंगणी सये मज ॥
सूर्यकर रश्मी चंद्र बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळामस्मि ।
प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥
कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु ।
मना माझी हरिखु देखियेला ॥
ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं ।
फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥
अर्थ:-
निळ्या मोत्यांच्या पाटातुन अंगणात पेरलेल्या चिंतामणीला पाणी दिले. त्या संसाराच्या मायेतुन आम्ही त्या कृष्णकृपेने तरलो. तो हिऱ्याच्या खाणीतील दिव्य मणी मनाच्या अंगणात सांपडला. चंद्र व सूर्य ह्यातुन प्रगट झालेल्या रश्मी त्याच्या पासुनच तयार झाल्या आहेत. कल्पतरु व चिंतामणी समान असलेला तो पाहिला की मला आनंद वाटत आहे. विद्युलतेच्या कडकडाटात होणाऱ्या वृष्टीमुळे फळ व फुले खुप येतात तसाच आनंद श्रीकृष्ण दर्शनाने होतो असे माऊली सांगतात.

सामो खूप धन्यवाद....
पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ।।

बहु खेचरीचं रान । बघ हे वेडे होय मन ।।

जाऊ नका कोणी । जे गेले, नाही आले परतोनी

तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला+१११

मायबोलीवरील साहित्य आणि श्लील अश्लीलतेच्या मर्यादा या धाग्यातील एक प्रतिसाद आवडल्याने, खाली संकलित केलेला आहे. -

Submitted by रैना on 27 October, 2009 - 05:01
सदगुरुमाय कुंटीण झाली माझी या रचनेचा अर्थ मी आज पुपुवर विचारला होता. पहिल्यांदा मलाही वाटलं की ऐकण्यात चुक झाली. अमृतगाथा या कार्यक्रमात चंद्रकांत काळेंनी गायलं आहे. संगीत आनंद मोडक.

फ नी दिलेलं हे उत्तर:

रैने, एकनाथांच्या 'कुंटीण' भारुडातला हा एक चरण आहे. या भारुडामध्ये एकनाथांनी मुमुक्षू शिष्य व त्याला मोक्षमार्गाची वाट दाखवणारा गुरू यांना वेश्या-कुंटिणीच्या जोडीचे उपमान योजून आत्मबोधाची लक्षणे सांगितली आहेत.
(रच्याकने, शंका राहू नये, म्हणून शब्दार्थ नोंदवतो : कुंटीण = कुंटणखान्याची प्रमुख बाई)

pha | 27 October, 2009 - 04:50
अश्विनी, रैना : या भारुडात मुमुक्षू शिष्याला प्रथम भोळ्या असणार्‍या, पण पुढे व्यभिचारिणी बनलेल्या बाईची, मोक्षमार्गाची वाट दाखवणार्‍या गुरूला कुंटिणीची व परतत्त्वाला (= सत्) परपुरुषाची उपमा योजली आहे.
एकनाथांच्या निवेदनाचा भावार्थ असा : सद्गुरूरूपी कुंटिणीने मला अद्वैताचा शेला पांघरवला (= मी आणि सर्व चराचर सृष्टी यांच्यात अभेद असल्याचे बिंबवून माझ्या मनाला आश्वस्त केले). मला कळू न देता परपुरुषाकडे मला नेण्याच्या हेतूने मला एकांतात घेऊन गेली ( = मला एकांतात, निर्जनात रमण्यास शिकवले). पदररूपी भौतिकाच्या भ्रम फेडला. (पुढे सद्गुरूरूपी कुंटिणीच्या मदतीने त्या परतत्त्वरूपी पुरुषाने) माझी वासनारूपी चोळी सोडवली व मायारूपी कुच कुस्करले (=> हा क्रमही महत्त्वाचा वाटतो - सगे-सोयरे, आप-पर इत्यादी भौतिकाचा भ्रम पहिल्यांदा फेडला, म्हणजे पदर फेडला. या भ्रमाचं मूळ असणारी वासना म्हणजे पदराखालील चोळी. पण वासना मनातला भावनिक आविष्कार झाला. त्याखाली दडलेली माया, ज्यांना एकनाथ स्तनांची उपमा देतात, हे या सर्वांचे कारण. परत्त्वरूपी पुरुषाने अंग कुस्करले, म्हणजे ती माया मर्दली.). पुढे जिवाशिवाचे तादात्म्य झाले, परतत्त्वरूपी पुरुषाने मला देहातीत भोग, अर्थात आत्मबोधाचा साक्षात्कार, दिला.

(टीप : हा भावार्थ किंवा हे भारूड आंबटशौक मनी धरून वाचल्यास, एखाद्याला हे भारूड व वरील निवेदनाची भाषा आक्षेपार्ह वाटू शकेल. पण धुवट संकेत क्षणभर बाजूला ठेवून उपमान-उपमेयांची योजना व त्यामागील भावार्थ सांगायचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.)
----------- https://www.transliteral.org/pages/z70610204112/view -------------

सद्‌गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥
अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥
परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥
भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥
वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥
जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥
अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥
एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥

तुम्ही गो नी दांडेकर यांची कृष्णवेध कादंबरी अद्याप वाचली नसेल तर वाचून पाहा .. त्यात राधा कृष्ण यांचा नेहमीचा रोमँटिक अँगल सोडून माता - पुत्र - वात्सलभाव या वेगळ्या अँगलने लिहिलं आहे . तोच नेहमीसाठी स्वीकारायला हवा असं काही नाही , एक आर्टीस्टिक लिबर्टी घेऊन बनवलेली कलाकृती म्हणून वाचायला छान आहे . त्याच्याही पेक्षा कुब्जा हा भाग भयंकर सुंदर आहे -

“अगे, पाहत्येस काय वेंधळ्यासारखी? देवकीचा पुत्र तुझ्या घरीं येत आहे-”

तों त्यांना दिसलें, कीं दारीं श्रीरंग उभा आहे!

आपल्या कमललोचनांद्वारें अमृताची वृष्टि करीत त्यानें मूदु हास्य हंसून
कुब्जेकडे बघितलें. मग तो म्हणाला,

“मी आलों आहें!”

आवेग कुब्जेला असह्य झाला. कशीबशी ती उभी राहिली. पण तोल
जातोसा वाटून तिनें वरच्या खुंटीला हात दिला. तिच्या दुर्बळ शरिरानें तो हर्षभार सोसणें नाकारले.

दारीं दाटलेल्या गर्दीमधून एकटा श्रीरंग आंत आला. कुब्जेच्या सहाणेजवळ

उभें राहून त्यानें विचारलें,

“काय करीत होतीस?”

अतिशय यत्नपूर्वक कुब्जेनें स्वत:ला सांवरलें. एका बाजूला सरत ती
पुटपुटली,

“काय करूं? बसायला देण्याजोगेंहि कांही नाहीं!”

“मला सगळें पावलें, कुब्जे! गंध कुणासाठी उगाळीत होतीस? माझ्यासाठी?”

हळू स्वरांत कुब्जेनें उत्तर दिलें,

“ऊं हूं! "

“मग कुणासाठी?”

कुब्जेच्या नेत्रांतून जणूं अश्रूंचा पूर लोटला. तो पुशीत ती म्हणाली,

“श्रीरंगा, तूं आपलीं सुकुमार चरणकमलें मार्गावरून उठवीत जाशील. मार्ग
त्या खुणांना मस्तकीं वाहतील! मी त्या खुणांचीच या चंदनानें पूजा करीन! तुझ्या मस्तकीं हें चंदन लावावें, असें पुण्य या पापिणीनें जोडलेलें नाहीं!”

श्रीरंग पुढें झाला. सहाणेवरील चन्दन त्यानें बोटांना पुसून उचललें. तो
हंसून म्हणाला,

“आतां हें कुठें लावूं? एवढें सगळें वय गाई चारतां-चारतां गेलें. चन्दन
लावण्याजोगी वेळा कधीं उगवलीच नाहीं! आतां लावीन म्हणतों-”

कुब्जा पुटपुटली,

“चन्दन-मस्तकी माखायचें असतें-*

“म्हणजे कुठें? केशभारांत?'” आपली विश्वमोहिनी दृष्टि कुब्जेच्या मुद्रेवर
स्थिर करीत श्रीरंग म्हणाला, “-सांग ना! आईच्या हातून चन्दन माखायची वेळ
कधीं आलीच नाहीं!”

-आणि शेवटीं कुब्जा हंसली. संकोच विरला. दूरत्वाच्या शृंखला गळून
पडल्या. परकेपणाचें सांवट मावळलें. लटकें रागेजून ती म्हणाली,

“किती, रे, छळतोस? मी लंगडी! तीन ठिकाणीं वांकडी! तुझ्या मस्तकापर्यंत
माझा हात पोंचेल कसा?"

“मी तुझ्याजोगा होईन-ठेंगणा!”

श्रीहरि सहाणेच्या ओट्यावर बसला. गहिंवरलेली कुब्जा एकीकडे आसवें
पुशीत राहिली. एकीकडे श्रीरंगाच्या अंगीं चन्दनाचा लेप करीत राहिली.

असें सर्वांगी गंध माखल्यावर ती क्षणभर थांबली, आणि तिनें एकदम
अत्यंत उत्कटतेनें श्रीहरीच्या भाळावर आपले ओठ टेकले. पुटपुटली,

“या जर्जर शरिरांत येऊन जेवढें मिळायचें, तेवढें सारें मिळालें आहे! आतां
कुण्याही क्षणीं याचा लय झाला, तरी चालेल. सहन करवेना झालें आहे हें
ओझें!”

श्रीहरि उठला. तो म्हणाला,

“थोडी थांबशील?””

“किती?”

“अन्यायाचें माप उलंडलें, असें ऐकेपर्यंत?”

“तुझी आज्ञा! तोपर्यंत मी इथेंच वाट पाहीन!”

“किती जन्मवेरीं वाटचाल करावी लागली!

“कसा कंटाळवाणा अथक प्रवास!

'कुठें सांवली नाहीं. कुणी सोबती नाहीं. संगी साथी नाहीं. कुठें थांबूं म्हटलें,
तर तें शक्‍य नाहीं. चाललें पाहिजे. पाऊल उचललें पाहिजे !

“जन्ममरणांचे दारवंटे ओलांडले पाहिजेत. संवत्सरांचीं पानें उलटलीं पाहिजेत.
क्रतुचक्राच्या भोंवंडींतून गरगरां फिरलें पाहिजे. मास आणि पक्षांची आवर्तने
उलगडलीं पाहिजेत.

'कामक्रोधांचे चपेटे सोसले पाहिजेत. लोभ-ममतांच्या दरडी ओलांडल्या
पाहिजेत. अहंकार-दंभांचे मुखवटे ल्याले पाहिजेत. मायाप्रवाहांत भिजून ओलें
झालें पाहिजे. गर्भकोशांत राहायच्या यातना साहिल्या पाहिजेत. मरणकाळींच्या वेदना वाहिल्या पाहिजेत. स्नेहसंबंधांचे पाश पसरले पाहिजेत. अपमानांचे भार विसरले पाहिजेत!

'अरे, हें सगळें करावें लागलें, श्रीहरि! यांतला एकही वसौटा चुकला नाहीं.
या हिशेबांतला प्रत्येक दाम वळता करून घेतलास. तूं असा कृपण, कीं कांहींच सूट दिली नाहींस!

“शेवटीं शरीर दिलेंस, तें तीन ठिकाणीं वांकडें ! काय तुझ्याजवळ शरिरांचा
दुष्काळ पडला होता?

“पण तू आपंलें तें खरें केलेंस! भला तू कवडीचुंबक! पुरतें घेतल्याशिवाय
दिलें नाहींस!

“सारा जन्म छळून घेतलेंस, आणि आतां लाडीगोडी लावायला आलास!

“पण मी सावध झाल्यें आहे! संहजगत्या फंसायची नाहीं!

“तूं पक्का खेळिया. नाना खेळ खेळण्यांत प्रवीण.

“पण मी भुलायची नाहीं.

“हातीं सांपडलास, आतां. सोडायची नाहीं.

“शरिराचें काय कौतुक? अशीं लक्ष शरिरें तुजवरून ओंवाळून टाकावींत! हें
सगळ्यांनी घृणा केलेलं, निंदिलेलें, हेटाळलेलें, चेष्टा केलेलें शरीर-हें मला नको!

“मला हवें आनंदमय शरीर! चैतन्यरूप देह हवा आहे मला!

“तो मी तुजकडून हट्ट करून मागून घेईन!

“आणि मग साती स्वर्गाची दारें उघडून पैल चालून जाईन:

“जिथें जरा नाहीं. मरण नाहीं. बंध नाहीं. कर्म नाहीं. अकर्म नाहीं-

“अशा त्यां सत्स्वरूपांत मी विहरत राहीन-

“मानससरोवरीं हंस विहरतात, तशी!

“महासागरांत मीन क्रीडा करतात, तशी!

गगनमंडलीं. गरुड झेंपावतात, तशी!

“हें तीन ठिकाणी वांकडें शरीर इथेंच टाकून आतां अशी मी गगनाकार होईन!

'श्रीरंगा, खूप घेतलें आहेस! आत्तां त्याचा मोबदला म्हणून एवढें हें दिलेंच
पाहिजेस! त्याशिवाय तुला दुसरी गति नाहीं, रे, श्रीहरि!”

एक हात वरच्या खुंटीला देऊन कुब्जा वाट बघत होती. हा. जीर्ण झालेला
पिंजरा सोडून तिचे प्रांण उडूं पाहत होते. पण तिनें मोठ्या प्रयत्नांनी त्यांना
सांवरून धंरलें होतें

श्रीहरीच्या. हातावर हात दिला आहे-

त्याचा संदेश येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे!

राधानिशा आपल्या प्रोत्साहन देणार्‍या प्रतिसादाबद्दल, आभार.

>>>>>>तुम्ही गो नी दांडेकर यांची कृष्णवेध कादंबरी अद्याप वाचली नसेल तर वाचून पाहा .. त्यात राधा कृष्ण यांचा नेहमीचा रोमँटिक अँगल सोडून माता - पुत्र - वात्सलभाव या वेगळ्या अँगलने लिहिलं आहे.................... एक आर्टीस्टिक लिबर्टी घेऊन बनवलेली कलाकृती म्हणून वाचायला छान आहे .

नक्कीच!! मधुराभक्तीचा अतिरेक चालू असतेवेळी ज्ञानेश्वरांनी तर विठ्ठलास, 'माऊली' म्हणुन संबोधिले. ईश्वराप्रति, 'वात्सल्यभाव' नितांत सुंदर आहेच.

थोडा कुब्जा भाग इथे दिल्याबद्दल आभार. खूप सुंदर आहे.