पफ आणि कस्टर्ड ड्रॅगन

Submitted by सामो on 13 January, 2022 - 03:20

अन्यत्र पूर्वप्रकाशित -

पफ द मॅजिक ड्रॅगन नावाचे लहान मुलांचे धमाल सुश्राव्य गाणे मध्यंतरी ऐकले. गाणे खूप आवडले. लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी चाल आणि शब्द आहेत. या गाण्यात पफ नावाचा अक्राळ-विक्राळ ड्रॅगन आहे ज्याचे हृदय मात्र लोण्याहूनही मऊ आहे :). मैत्रीमधील निष्ठा आणि कोमल हृदय हे गुण या शक्तीशाली ड्रॅगनमध्ये आहेत. ज्याला मोठे मोठे राजे महाराजे वाकून कुर्नीसात करतात, ज्याच्या गगनभेदी गर्जनेपुढे , थरथर कापून खुद्द समुद्री चाचे आपल्या जहाजाचा झेंडा उतरवतात अशा या ड्रॅगनचा एक लहान मुलगा जिगरी दोस्त आहे. त्याचे नाव "जॅकी पेपर". पफचे, जॅकीवर खूप प्रेम आहे. इतके की जॅकीला आपल्या शेपटीवर बसवून बोटीतून तो सफर करवून आणतो. पण एका दुर्दैवी दिवशी गेलेला जॅकी परत येतच नाही. मग या बलाढ्य पण मनाने संवेदनशील ड्रॅगनची त्या विरहात काय अवस्था होते ते हे गाणे.
https://www.youtube.com/watch?v=Y7lmAc3LKWM
----------------
काही वर्षापूर्वी मनाने कोमल दुसर्‍या एका ड्रॅगनची अशीच एक सुरेख कविता वाचली होती. मुलीकरता लगेच ते पुस्तक विकत घेतले होते. ऑगडेन नॅश यांची ही कविता आहे - "कस्टर्ड द ड्रॅगन". कस्टर्ड नावाचा हा ड्रॅगनही मनाने मऊ आहे पण छटा थोडी वेगळी आहे, हा जरा मुलखाचा भित्रा ड्रॅगन आहे. Happy त्याचे मित्र कोण तर ऊंदीर आणि कुत्रा हेसुद्धा त्याला चिडवून चिडवून हैराण करतात. त्याची थट्टा करून करून त्याला नको जीव करून सोडतात. पण तीक्ष्ण सुळे, खवले, नखे यांनी समृद्ध असा कस्टर्ड घाबरणे काही सोडत नाही. जो तो त्याच्यापुढे शहाणपणा दाखवतो. मात्र एके दिवशी खरोखर समुद्री चाचा येतो तेव्हा प्रत्येकाचा मूळ स्वभाव बाहेर पडतो आणि कस्टर्ड काय कमाल करतो ती वाचनीय आहे. कविता पुढे दिली आहे -
https://www.poemhunter.com/poem/the-tale-of-custard-the-dragon/comments/
अनुवाद - https://www.maayboli.com/node/71686
---------------------------
किंचीत अवांतर -

वरील कवितांवरून दुर्गा सप्तशतीमधील एक माझा सर्वात आवडता श्लोक आठवतो -

चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्ट्वा,
त्वय्येव देवी वरदे भुवनत्रयेपि||

म्हणजे रणांगणावर अतिशय (समरनिष्ठुर) अशी तु भासायमान होत असलीस तरी तुझ्या हृदयी केवळ कृपा आहे - हे वरदे, अशी विरोधाभास असलेली जगात तू एकमेव आहेस.
अर्थात देवी हे जाणून होती की तिच्या हस्ते , तिच्या शत्रास्त्रांनी जे राक्षस मरतील त्यांना मुक्तीच मिळेल पण तरीही त्यांचे कल्याणच व्हावे या आंतरीक अतीव कृपामय हेतूने तिने तरीही शस्त्र उचलले.

वरील दोन्ही कवितांमध्ये मला २ गोष्टी अतिशय आकर्षक वाटतात - बलाढ्यता आणि आंतरीक कोमलता यांचा संगम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पफ द मॅजिक ड्रॅगन माझ सुद्धा आवडते गाणे. फार छान गाणे. Loss of innocence वर आहे. मायबोली वरच्या हार्ड रॉक कॅफे धाग्यावर पहिल्यांदा या गाण्याबद्दल वाचले होते.

छान
बलाढ्यता आणि आंतरीक कोमलता यांचा संगम>>+१

>>>>>> Loss of innocence वर आहे.
अरेच्च्या हे माहीत नव्हते.
कुणकुण ही होती की 'ड्रग्ज' च्या पफस संदर्भात आहे.
------------
कुमार. शर्मिला आणि नाबुआबुनमा अभिप्रायाबद्दल आभार.