पांढरं फरवालं स्वेटर

Submitted by बिपिनसांगळे on 12 January, 2022 - 13:27

पांढरं फरवालं स्वेटर
-------------------------
खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी !
रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं .
नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली .
तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत .
मोकळा , मोठा रस्ता . त्यात शेजाराला नदी. पाण्याने आणि गार वाऱ्याने थंडी तिथे अगदीच जोमात आलेली . रस्त्यावरचे दिवेही काही बंद काही चालू . त्यांचा प्रकाशही त्यांच्यापर्यंत नीटसा पोचत नव्हता . तो तरी काय अपवाद म्हणा , त्यांचं आयुष्य...
त्यात राणीही होती . आठ - नऊ वर्षांची . तिच्या अंगावर एक बिनबाह्यांचा फ्रॉक काय तो होता . खालून वरून वारं आत पोचवणारा . तिला खूप थंडी वाजत होती अन जीव नकोसा होत होता . पण करणार काय ? सांगणार कोणाला ?
आजीने शेकोटी पेटवलेली होती . पण तिची आच कमी अन धूरच जास्त होता ... डोळ्यांत पाणी आणणारा . आयुष्यासारखा ...
तिच्या शेजारी वंदी बसलेली होती . तिच्यापेक्षा थोडी मोठी .
तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली . ते पाहताच वंदी पुढे पळाली . त्या माणसाने एक मोठी पिशवी तिच्या हातात दिली . त्यामध्ये उबदार कपडे होते . तऱ्हेतऱ्हेचे . कानटोपी , स्वेटर्स , जॅकेट्स अन काही काही . वंदीनं पिशवी उचकायची सुरुवात केली . राणीलाही त्या गंमतीत उत्सुकता वाटत होती ; पण तिला कुडकुडत असताना , पायांना मारलेली हातांची घट्ट मिठी सोडून जायचाही कंटाळा आला होता . तो माणूस गेला .
वंदीला एक स्वेटर सापडलं . पांढरंशुभ्र, फरवालं स्वेटर . तिनं ते घातलं अन ती आनंदाने नाचायला लागली.
अंधाराच्या पार्श्वभूमीवर, त्या स्वेटरमध्ये ती नाचणाऱ्या पांढऱ्या सशासारखी भासत होती .
नाचण्यामुळे अन स्वेटरमुळे तिला थंडी वाजत नव्हती आता .
राणी तिच्याकडे मजेने पाहत होती . अन असूयेने ! कारण लोक असं काही काही देतच असत . मग ते सगळ्यांना वाटून मिळतच असे . तिलाही ते स्वेटर आवडलं होतं . पण - आता हे स्वेटर वंदीनं आधी घेतल्यामुळे तिला मिळणार नव्हतं...
वंदी नाचत नाचत इकडे तिकडे पळू लागली . ती रस्त्यावर गेली .
एक बुलेटवाला जोरात येत होता . त्याला अंधारात ती दिसली नाही पटकन . ते पांढरं स्वेटर त्याच्या लक्षात यायच्या आत त्याने तिला उडवलं .
तो पळून गेला.
वंदी मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली . ते पांढरंशुभ्र फरवालं स्वेटर ,लालभडक रक्तात माखलं .
शेकोटी विझली . एकच गलका उठला .
विझलेल्या शेकोटीने की ते दृश्य पाहून , कोणास ठाऊक ; पण राणी आणखी थरथरा कापू लागली .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह...

ओह! Sad

वरील सर्व
अन इतर वाचक
सगळ्यांचा आभारी आहे

कथा दुःखद आहे
पण लोकांना फुका गंभीर करणे हा लेखनाचा हेतू नाही
पण वास्तव अन मनातील खळबळ मांडायचा प्रयत्न केला आहे
आभार
कळावे

Sad सॅड..

आजीने शेकोटी पेटवलेली होती . पण तिची आच कमी अन धूरच जास्त होता ... डोळ्यांत पाणी आणणारा . आयुष्यासारखा ...>> हे असं तुम्हीच लिहू शकता बिपिनजी..!!
अगदी हृदयस्पर्शी..!!

कथा दुःखद आहे
पण लोकांना फुका गंभीर करणे हा लेखनाचा हेतू नाही
पण वास्तव अन मनातील खळबळ मांडायचा प्रयत्न केला आहे
>>>>

मी काल वाचलेली. पण मला नेमका हेतू न कळल्याने पटकन काय प्रतिसाद द्यावा समजले नव्हते. निव्वळ सॅड फेस प्रतिसादात टाकणेही उचित वाटले नाही ते दुखद बातमी वरचा प्रतिसाद वाटतो. पण हि कथा होती.

पण प्रत्येक कथेमागे कथाबीज वा हेतू असावाच असे नसते. तुम्ही म्हटले तसे मनातील खळबळ शांत करायलाही लिहिले जाते..

कथा नेहमीप्रमाणेच छान लिहिली आहे Happy

Sad .