टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज ची खरच गरज असते का?

Submitted by soha on 6 January, 2022 - 04:09

अनेक कंपन्यांमधे HR तर्फे आणि कधी टीम लीडर किंवा मॅनेजर कडून वेगवेगळ्या टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज organize केल्या जातात. करोना पूर्व काळात ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज साठी अनेक पर्याय उपलब्ध होते. कुठे तरी सहलीला जाणे/ एकत्र जेवायला जाणे इथपासून ते सगळ्यांनी मिळून काहीतरी हॉबी वर्कशॉप करणे इथपर्यंत मोठी रेंज होती पर्यायांची. पण वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून या अ‍ॅक्टीव्हीटीज वर बर्‍यापैकी मर्यादा आल्या आहेत. तरीही त्यातही HR किंवा टीम लीडर किंवा टीम लीडर बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे होतकरू लोक सतत नविन नविन टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज organize करत रहातात.
मुळात ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज गरज आहे का?
कामाव्यतिरिक्त इतर अ‍ॅक्टीव्हीटीज एकत्र केल्याने खरच कामाचा दर्जा आणि प्रत सुधारते का?
कामाची गती वाढते का?
टीम मधल्या लोकांना motivation मिळते का?
ह्या मुद्द्यांचा उहापोह करण्यासाठी हा धागा काढत आहे. Human Resource Management च्या कोर्स मधे शिकवली जाणारी थिअरी मांडू नये. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित चर्चा व्हावी.
माझे वैयक्तिक मतः ह्या अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज फारसा उपयोग होत नाही. अनेकदा त्यामुळे टीम मधे ग्रुपिझम आणि हेवेदावे वाढीस लागतात.
गेले २ वर्ष वर्क फ्रॉम होम करताना लक्षात आले की अनेक टीम मेटस्ना प्रत्यक्ष कधीही भेटले नसले, त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त काही विशेष संबंध ठेवले नसले तरीही माझे काम व्यवस्थित वेळेत पूर्ण झाले. कामाचा दर्जाही उत्तम होता. असे असताना उगाचच टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज मधे भाग का घ्यावा? केवळ विरंगूळा म्हणून ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज करायच्या असतील तर मग ऑफिसमधल्या लोकांबरोबर त्या का करायच्या? ऑफिसच्या बाहेर इतरही मित्रपरीवार आहे. त्यांच्याबरोबर अश्या अ‍ॅक्टीव्हीटीज करणे मला जास्त सोयीस्कर वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुटुंब म्हणून असे उपक्रम राबवावेत हे थिअरी सांगते. पण प्रत्येक ठिकाणी , विशेषतः जिथे एकमेकांत तीव्र स्पर्धा आहे तिथे याचा उपयोग फारसा होणार नाही. संबंध खूप तणावपूर्ण होऊ नयेत यादृष्टीने नक्की फायदा होईल. संशोधन संस्था, विद्यापीठे अशा ठिकाणी याचा उपयोग होतो.

जिथे कामापेक्षा चमकोगिरीला महत्व असते अशा ठिकाणी एखाद्या रविवारी साहेबाला मटण खायला बोलावणे. बंगाली साहेबाला मासे बनवून घेऊन नेऊन देणे हे उपक्रम जास्त इफेक्टीव्ह असतात असे माझे मत आहे.

टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज ची खरच गरज असते का?
==> हो.
Organization च्या करिता व personal comfort करिता सकारात्मक बदल टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज उपयोगी ठरत्तात...

मला तरी वैयक्तिकरीत्या कामाचा दर्जा सुधारण्यास फारसा फायदा जाणवला नाही.
फक्त या अ‍ॅक्टीव्हिटी मजेशीर असतात, धमाल करायला मिळते, ती सुद्धा कामाच्या वेळेत. गेल्या वर्षी तर आम्हाला एक दिवसासाठी डेल्ला रिसॉर्टला घेउन गेलेले या अ‍ॅक्टीव्हिटी करायला, ज्या कंपनीतल्या कंपनीतही करता आल्या असत्या. तरी तिथे नेऊन निसर्गरम्य वातावरणात दोन वेळचे जेवण, दोन वेळचा चहा नाश्ता चारला. अजून काय पाहिजे वर्कलाईफमध्ये Happy

बाकी धाग्याचा विषय अत्यंत आवडला आहे. माझ्याकडे चिक्कार धम्माल किस्से आहेत अश्या अ‍ॅक्टीव्हिटीजमध्ये घडलेले. पण ते या फायद्यातोट्याच्या चर्चेत लिहायचे का वेगळा धागा काढता त्यासाठी...

नीट चांगल्या आखून केल्या तर याने वातावरण सैल व्हायला खूप मदत होते.
आणि हे सर्व आखताना नेहमी बरोबर जेवत, टीम मध्ये, फिरत असलेल्या लोकांचे ग्रुप फोडून त्यांना वेगवेगळ्या टीम मध्ये केल्यास जास्त फायदा होतो.यातून बनणाऱ्या ओळखी पुढे उपयोगी पडतात.
हे सर्व 50-8० मध्ये ठीक
300-400 लोकांसाठी एकच ऍक्टिव्हिटी ठेवल्यास उपयोग होत नाही.

मला तरी वैयक्तिकरीत्या कामाचा दर्जा सुधारण्यास फारसा फायदा जाणवला नाही.>>> यालाच थोडेसे एलाबोरेट करायचे झाल्यास मी माणूसघाणा आहे. मला लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. पण अ‍ॅक्टीव्हिटी धमाल असेल तर मात्र मला त्यात उत्साहाने भाग घ्यायला आणि चमकायला, शायनिंग मारायला आवडते. पण ते तेवढ्यापुरतेच. त्या अ‍ॅक्टीव्हिटी, तो दिवस संपल्यानंतर मी भला माझे काम भले. मी पुन्हा कोणाच्यात मिसळायला जात नाही.

पण अ‍ॅक्टीव्हिटी धमाल असेल तर मात्र मला त्यात उत्साहाने भाग घ्यायला आणि चमकायला, शायनिंग मारायला आवडते.>> प्रत्यक्ष भेटून केलेल्या अ‍ॅक्टीव्हिटीज जास्त धमाल असतात. शिवाय वयानुसार किंवा आर्थिक-सामाजिक परिस्थितीनुसार धमाल कशात वाटते त्याचे चॉईसेस बदलत जातात.
आणि धमाल करायला इतर समवयस्क/ समविचारी ग्रुप्स असतील तर मुद्दाम ऑफिसमधल्या लोकांबरोबर का? हा प्रश्न उरतोच.

प्रत्यक्ष भेटून केलेल्या अ‍ॅक्टीव्हिटीज जास्त धमाल असतात. >>>> हो, प्रत्यक्ष भेटून केलेल्याचेच अनुभव आहेत माझे सारे. चार ठिकाणी काम केलेय त्या चारही ठिकाणचे अनुभव आहेत. हे वर्क फ्रॉम होममध्ये असे काही केलेच नाही कंपनीने. त्यात बोअर होईल फार.

तर मुद्दाम ऑफिसमधल्या लोकांबरोबर का? हा प्रश्न उरतोच. >>> ऑफिसच्याच वेळेत करायचे असल्यास आणि त्या वेळेचा पगारही मिळणार असल्यास व्हाई नॉट Happy किंबहुना खाण्यापिण्याचीही सोय असते या अ‍ॅक्टीव्हिटीमध्ये..

मुळात या अ‍ॅक्टीव्हिटी लोकांचे मन रमावे याचसाठी असतात असे मला वाटते.

कामाचा दर्जा:
बरेचदा हा आपण काम करत असलेल्या लोकांबरोबर आपल्या कम्फर्ट झोन वर असतो.तो कम्फर्ट असला तर सुरुवाती पासून जुळवून घेणे सोपे पडते(अचानक काही टास्क फोर्स निमित्ताने एकमेकांबरोबर काम करावं लागणारे वेगवेगळ्या टीम चे लोक.)
एकमेकांबरोबर मेमरीज असणे(समोरचा माणूस पूर्ण कोरं पुस्तक नसणे) याला सिनर्जी मध्ये मोठं महत्व आहे.हे नसतानाही कामं होतात, असलं तर लवकर होतात.

सर्व खेळ मेमरीज चा आहे.आताच्या पटापट ऑफर्स मिळणाऱ्या कल्चर मध्ये कामाच्या जागी चांगल्या मेमरीज, भावनिक गुंतवणूक, आनंद असणं हे लॉयल्टी ला थोडं तरी उपयोगी पडतं.

पण हे मॅनेज करणारी माणसं योग्य लागतात, कंपनी ची माणसं, काम थोडं ओळखणारे.बाहेरचे इव्हेंट मॅनेजर्स घेऊन लहान मुलांच्या बड्डे पार्टी चांगल्या होतात.

कामाच्या जागी चांगल्या मेमरीज, भावनिक गुंतवणूक, आनंद असणं हे लॉयल्टी ला थोडं तरी उपयोगी पडतं.>> केवळ टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज मुळे हे सगळं निर्माण होऊ शकतं?
उलट ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज न करताही नैसर्गिक रित्या ते होऊ शकतं असं मला वाटतं. गेले २ वर्ष कामानिमित्त रोज आमच्या बंगलोर ऑफिसमधल्या काही लोकांशी बोलते. त्या लोकांना मी त्या आधी कधीही भेटले नव्हते आणि गेल्या २ वर्षातही भेटले नाही. सुरवातीला आम्ही फक्त आणि फक्त कामाबद्दलच बोलायचो. हळूहळू कुटुंब, आवडी-निवडी, हवापाणी, छंद, राजकारण सगळे विषय आमच्या बोलण्यात यायला लागले. हे नैसर्गिक रित्या झालेलं टीम बिल्डींग आहे. ते काही अ‍ॅक्टीव्हीटीज मुळे २-४ दिवसात निर्माण होऊ शकेल का?

टिम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे मी टीम बिल्ड झालेली पण पाहिली आहे अन ढासळलेली देखील पाहिली आहे... तेही दोन्ही टीमचा मॅनेजर एकच असताना..!!

टीम मधील माणसांचे स्वभाव अन ही अ‍ॅक्टिव्हिटी घेणार्‍या लीडर/मॅनेजरचा हेतू काय असेल यावर सर्व अवलंबून असतं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी अशा अ‍ॅक्टिव्हिटी मधे हातचं राखून भाग घेतो... अगदीच कधी अशी अ‍ॅक्टिव्हिटी कंडक्ट कर म्हणुन सांगण्यात आलं तरी सर्वांना आंजारून गोंजारून अन कुठे वात पेटणार नाही याची खबरदारी घेऊन हा जुलमाचा रामराम एकदाचा पार पाडुन दिला की हायसं वाटतं..!!

छान धागा. मला तर एच आर चीच गरज वाटत नाही. सर्व कनेक्टेड बाबी आटोमे टेड आहेत. एक आयटी गाय असला की झाले त्या सिस्टिम साठी.

आमच्याकडे अगदी भयंकर प्रमाणा त टीम बि ल्डिन्ग चालत असे प्री कोविड काळात. अजूनही असते. जसे क्रिकेट मॅचेस, टीटी मॅचेस, पोस्टर काँपिटिशन. नवरात्रात प्रत्येक रंगा चे कपडे घालून सिंगल व गृप फोटो, हर सणाला तसले ड्रेस व फोटो. भावुक लोक हे फोटो डेस्क पाशी लावतात सुद्धा.

आमच्याकडे पन टीमा परदेशी देशी फिरायला न्याय्चे खूप आहे. एकदा ऐशी लोकांची टीम फुकेत ला नेलेली त्यात मी पण होते. व मला डिपार्‍ट मेंट्मधील सर्वात त्रास दे णारी ललना हिच्या बरोबर रूम शेअर करवली मुद्दाम चार दिवस. आता आपण इशू केला तर वाइट दिसेल म्हणून मी चार दिवस गप्प बसले. पण हा मुद्दाम मी कशी वागते बघायला केलेला खोडसाळ पणा होता हे नक्की.

प्लस काहीतरी भयानक साहसी अ‍ॅक्टिव्हि टी. ज्या मी करत नाही म्हणून सांगितले.

बाकी मजा होती मात्र. एक कपल बसने फिरा यला यायचे सोडून थापा मारुन रूम मध्येच राहिले!!! भलतेच बिल्डिन्ग झाले असावे.
संध्याकाळी बॉसने झोडपले.

रात्री डान्स पार्टी होती. मजा आली.

एका टीम बरोबर बँकॉक पटाया पण गेलेले. बाकी वुमेन्स डे ला गिफ्ट, गेट टुगेदर, मुकुट ह्याव अन तयव होते.

स्पेशल एक्सरसाइजेस पण होते पहिल्या वर्शी. माझे पोटेन्शैल बघायला . टीम ली ड र शिप वगैरे.
योगा एक्सरसाइजेस क्लासेस होते. क्राव मागा ट्रेनिन्ग दिलेले. आता ही उत्साही एच आर स्त्री सोडून गेली कोविद मध्ये.

मला तर एच आर चीच गरज वाटत नाही.
>>>>
मी रिलायन्सला होतो तेव्हा अगदी असेच वाटायचे आम्हाला. तिथे तर एक अख्खी विंग एकत्र बसायची एच आर लोकांची. तिथे कधीही जा ते लोकं हसत खिदळतच काम करताना दिसायचे. कामाचा लोड वा प्रेशर म्हणून जरा नाही. बहुतांश बायकाच होत्या. बहुतांश सुंदरच होत्या. त्यामुळे ते डिपार्टमेंट असावे असेही वाटायचे. रुक्ष अश्या ईंजिनीअरींग फिल्डमध्ये तेवढीच हिरवळ Happy

बहुतांश सुंदरच होत्या>> आमच्या इथे पण. आणि काय छान राहतात. नक्की काय काम असते. बरं आपण सेल्स मध्ये इथे तिथे लोकां शी जेन्युइन कनेक्ट होतो तसे त्यांचे नसते. कायम वर वर अल वर तलवर काम
टीम बिल्डिन्ग फेक असते.

आमच्याकडे अगदी भयंकर प्रमाणा त टीम बि ल्डिन्ग चालत असे प्री कोविड काळात. अजूनही असते. जसे क्रिकेट मॅचेस, टीटी मॅचेस, पोस्टर काँपिटिशन. नवरात्रात प्रत्येक रंगा चे कपडे घालून सिंगल व गृप फोटो, हर सणाला तसले ड्रेस व फोटो. भावुक लोक हे फोटो डेस्क पाशी लावतात सुद्धा.>> आमच्या ऑफिसमधे सुद्धा प्री कोविड काळात हे सगळं चालतं असे. पण त्या सगळ्यात भाग घेणारे भावुक लोकच आता त्या आठवणी काढून उसासे टाकतात आणि त्याच सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज ऑन्लाईन करायचे घाट घालतात. मॅनेजर लोक आणि एच आर त्यांना प्रोत्साहन देतात.
त्यामुळे अजूनच वैताग येतो.
हा जुलमाचा रामराम एकदाचा पार पाडुन दिला की हायसं वाटतं..!!>> हेच मला वाटतं. आणि मग वाटतं की टीम मधल्या ८०% लोकांना जर हा जुलमाचा रामराम वाट्तं असेल तर केवळ मॅनेजर लोक आणि एच आर ह्यांच्या समाधानासाठी असल्या निरर्थक अ‍ॅक्टिव्हिटीज वर सगळ्या टीमचा वेळ वाया का घालवायचा?

होय आमच्या क्षेत्रात असलं काही नाही
गेल्या 16 वर्षात कधीही असल्या गोष्टी नाही केल्या तरी आमची टीम मस्त होती, आणि त्या त्या कम्पन्या सोडून कित्येक वर्षे झाली तरी आजही चांगली मैत्री आहे सगळ्यांशी

खरे टीमबिल्डींग लंचटेबलवर, पॅंट्रीमध्ये कॉफी घेताघेता किंवा बिअर घेऊन बसल्यावरच होते..... त्यातून मॅनेजरला शिव्या द्यायच्या असतील तर भलेभले एक होऊन मोठी टीम तयार होते Wink
बाकी या टीमबिल्डींग ॲक्टिव्हिटीज म्हणजे टीपी असतो नुसता...... यंग मुले मुली मस्त एंजॉय करतात..... पस्तिशी उलटलेले पिझ्झा आणि कोक घेऊन हळूच सटकतात!!
बाकी लीडरशीप क्वॉलिटीज वगैरे आजमावयाला याचा फारसा उपयोग होत नाही..... कोण फक्त बोलबच्चन आहे आणि कोण खरोखर कामाचे आहे हे एखादा प्रोजेक्ट एकत्र केल्यावर बरोबर कळते Happy

मला जितकी झाली (प्रत्यक्ष आणि ऑनलाईन) ती आवडली.एरवी पण गप्पा टप्पा होतात आजूबाजूला बसणाऱ्या लोकांशी , पण या ऍक्टिव्हिटी पण आवडतात.लोक खूप कल्पक प्रकार करतात.एकदा भूत दिवस होता.एकदा ऑलिंपीक स्पोर्ट्स शी संबंधित.मी खूप कश्यात भाग घेत नसले (म्हणजे भाग घेतो आम्ही पण उत्साहाने, पण टेस्टिंग टिम्स इतकं डोकेबाज काहीतरी करतात की त्या जिंकतात. माझ्या मुख्य मेमरीज अश्या इव्हेंट शी जोडलेल्या आहेत.)

पण त्यात फार वेळ गेलेला आवडत नाही.एक दीड तासांचा क्विझ ठीक आहे.नाहीतर कामात आग लागलेली असते आणि मजल्यावर दिवसभर बाकी सगळे नाचत खेळत असतात ते बघून वैफल्य येतं.एकदा समर डे केला होता तेव्हा लोकांनी फोल्डिंग आरामखुर्ची आणली होती ऑफिसमध्ये.

मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जिथे हे सर्रास होत नाही तिथेही बहुधा दसऱ्याचे आयुध पूजन, गणपती, फाउंडेशन डे अश्या सर्व दिवशी लोक चांगले बॉण्ड होतात.

इतर क्षेत्रातले अनुभव वेगवेगळे असतात.>>इतर क्षेत्रातले अनुभव पण वाचायला आवडतील. इतर क्षेत्रात जसे की FMCG, Manufacturing, Education मधे असं काहीच होत नाही का?
भलेही त्याला "टीम बिल्डिंग" हे नाव नसेल. पण अश्या काही ॲक्टिव्हिटीज ऑफिस/ कंपनी तर्फे organize केल्या जात असतीलच.

आणि मजल्यावर दिवसभर बाकी सगळे नाचत खेळत असतात >> मग पटकन काय जे रंपा असेल ते टेबल वर घेऊन यावं आणि झोकात काम करावं. Wink
माझा सध्याचा कोविडजॉब आहे. जवळजवळ दोन वर्षे इथे काम करतोय तरी फार कमी लोकांना प्रत्यक्ष भेटलोय. टीम बिल्डिंग असं नाही, पण झूम हॉलिडे पार्टी छान ऑर्गनाईझ केलेली दोन्ही वर्षे. फॅमिली फ्युड्, पिक्शनरी, ट्रिविआ असे बरेच गेम्स टीम्स मध्ये ठेवलेले. त्यातुन टीम बिल्डिंग व्हावं ही त्यांची अपेक्षा नसावी, तसं काही झालं ही नाही पण लोकांबरोबर इंटरॅक्शनने मजा आली. सगळ्या फॅमिलीज बरोबर केलेलं, घरी खाणं पिणं पाठवलेलं. मजा आली.

यंग मुले मुली मस्त एंजॉय करतात..... पस्तिशी उलटलेले पिझ्झा आणि कोक घेऊन हळूच सटकतात!!
>>>>>

हाच प्रॉब्लेम आहे. कॉर्पोरेट फिल्डात पस्तिशीचे लोकं यंग क्राऊड मध्ये मोजले जात नाही. मग कसली डोंबल्याची टीम बिल्डींग होणार..
जर त्या अ‍ॅक्टीव्हिटी करतानाही सिनिअर ज्युनिअर डोक्यात असले की कसले डोंबल्याचे बाँन्डींग होणार..

पोकर अशाच ठिकाणी शिकायला मिळालेलं. क्वार्टरली वड्डे वड्डे लोकांची बोर्ड का कसली मिटिंग असली की आमच्याकडे पोकर नाईट असायची. त्यात सोम्या गोम्यांना इन्विटेशन असायच. तिकडे व्हिपीपासून सगळे एकमेकांना अपशब्द वापरत पोकर खेळायचे. सुरुवातीला एकदा सीटीओने पोकर १०१ क्लास पण घेतलेला.
अशा मजेदार गोष्टी असतील तर आवडतात मला.

इतर क्षेत्रातले अनुभव पण वाचायला आवडतील. >> माझे अनुभव असे आहेत.
संस्थेतर्फे नाही पण वरीष्ठांनी किंवा एखाद्या ज्युनिअर ने उत्साहाने पुढाकार घेऊन बाहेर जेवायला जाणे, सर्वांचे वाढदिवस साजरे करणे आणि वर्षातून एकदा जलविहार अशा अ‍ॅक्टिव्हिटीज स्वयंस्फूर्ततेने होत असत. व्यवस्थापनाने थंड हवेच्या ठिकाणी ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स आयोजित केले होते. त्यासाठी बसेसची, गेस्ट हाऊसची व्यवस्था केली होती. बोटीत राऊंड घेता घेता नव्या कल्पनांबद्दल चर्चा असे स्वरूप होते.

एका ठिकाणी क्वालिटी सर्कल मात्र खूप आवडले. व्यवस्थापनाने क्वालिटी सर्कलला परवानगी दिली. सेम इंटरेस्ट असलेल्यांनी कुठे सुधारणा होऊ शकतील याबाबत जिथे आवडेल तिथे जमायचे. सुरूवातीला खूपच सूचना आल्या. त्या सूचना करणार्‍यांनीच उपाय सुद्धा केले. पुढे त्यात काही बदल झाले. व्यवस्थापनाच्या डिमांड प्रमाणे ग्रुप्स बनवायची परवानगी मिळाली.

सॉलीडवर्क्स नवीन होते तेव्हां व्हिजनरी डिझाईनर्सने ते इंट्रोड्युस केले. खूप जणांनी उत्साहात शिकून घेतले. अशाच ग्रुप्सचे काम होते शिकायचे आणि शिकवायचे. ज्यांना ज्यांना शिकायचे आहे त्यांना उस्फूर्तपणे शिकवले गेले. एक सॉलीडवर्क्सची टीम बनली. याचा प्रचंड फायदा झाला. काही कंपन्यात कॅटिया कंपल्सरी आहे. अशा ठिकाणचे एक पथक तिथे वर्क कल्चर पहायला आले होते.

नेटवर्किंग वाल्यांचे सुद्धा असे ग्रुप्स आहेत. त्यांनी स्वतः बनवलेले सॉफ्टवेअर आज सर्वच शाखांमधे मोफत वापरले जाते. कोट्यवधी रूपयांची बचत झाली.

शॉप फ्लोअर वर असे काही करता येत नाही. जिथे लाईनचे प्रोडक्शन असते तिथे एका एका सेकंदाचा स्टडी झालेला असतो. प्रॉडक्शन कमी येऊन चालत नाही. कामगारांमधे यांत्रिकपणा आलेला असतो. तिथे दोन ब्रेक देण्यापलिकडे फारसे काही करता येत नाही. दुसर्‍या पाळीचा कामगार आला नाही तर पहिल्याला घरी जाता येत नाही. त्याला थकवा आला तर झोपायचीही व्यवस्था नसते. ते गृहीतच धरलेले नसते. बरेचदा स्पीड वाढवून सोळा तासाचे काम दहा तासात करून (आधी माहीत असते तेव्हां) सहा तास बाथरूममधे जाऊन झोपतात कामगार.

आउट डोअर टीम बिल्डिंगचे वेगवेगळे उद्देश असू शकतात. उदा
१. एखाद्या Inter disciplinary functional team मधे खरोखरच असलेले टीम वर्क बद्दल असलेले प्रश्न सोडवण्यात मदत करणे.
२. एखाद्या टीमला कामाव्यतिरिक्त ठिकाणी एकत्र आणून , कामाच्या दबाबा बाहेर मोकळ्या वातावरणात जाउन एकत्र येण्याची संधी. जिथे मजेबरोबर एखाद्या अत्यंत ज्वलंत व महत्वाच्या समस्येवरची/प्रश्नावरची चर्चा, दीर्घकालीन सामारिक व्यवस्थेची आखणी
३. वेगवेगळ्या दिकाणी असलेले पण एकमेकांच्या कामावर अवलंबून असलेले कर्फ्मचारी यांच्यात सुसंवाद वाढवण्यासाठी
४. कंपनीबद्दल आस्था वाढवून कर्मचारी सोडून जाण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न
५. कर्मचार्‍यांना एकप्रकारची सवलत म्हणून, म्हणजे टीम मधे काम नसले तरी फक्त मजा म्हणून
६. कंपनीचा ब्रँड, कंपनीला महत्वाची असणारे मूल्ये समजाउन सांगण्यासाठी
७. कंपनी मधे कर्मचार्‍यांमधे असणारी मानसिकता ९स्कारात्मक/ नकारात्मक) अजमावण्यासाठी
८. कर्मचार्‍यांची क्षमता अजमावण्यासाठी (लीडरशीप, मानसिक आरोग्य, स्थिरता, handling pressure, handling ambiguity engagement, attachment) वगैरे
९. Out door training and development (ODT)
10. समाजसेवेची सवय लावण्यासाठी

अशा व इतर अनेक गोष्टींचा आउट डोअर टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटी मधे समावेश असतो. आमच्या कंपनी मधे वरील पैकी प्रत्येक गोष्ट होण्यासाठी कधी ना कधी मी स्वतः वेगवेगळ्या वेळी यात भाग घेतला आहे.

एक उदाहरण सांगतो. खूप वर्षांपूर्वीचे आहे.
कंपनीचे प्रवर्तक, संचालक व सर्व विभागप्रमूख अशा सर्वांसाठी मिळून एक आउट डोअर ट्रेनिंग आमच्या कंपनीने आयोजीत केले होते.
एकादिवशी दुपारी चार वाजता आम्हाला शिवाजी नगर एसटी स्टँडवर जमायला सांगितले होते. आमच्या चार चार जणांच्या सहा टीम केल्या होत्या. (प्रवर्तक सोडून). प्रत्येक टीमला तुटपुंजी रक्कम दिली गेली आणि एक क्लू पुढील टिकाण शोधण्यासाठी. अशी प्रत्येकी चार ठिकाणे शोधायची होती. शेवटचे ठिकाण म्हणजे दुसर्‍या दिवशी सकाळी १० पर्यंत भीमाशंकर जवळील एका गेस्ट हाउस ला पोचायचे होते. मधे सगळा प्रवास रहाणे त्या तुटमुंज्या पैश्यावर मॅनेज करायचा होता.

या प्रवासात शाळेच्या आवारात रहाणे, स्टंडवर रहाणे, फुकट लिफ्ट मागणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टी करायल्या लागल्या. चहा वडापावावर रहाणे. खाण्यात पैसे घालवायचे की प्रवासावर हा प्रश्न. प्रवर्तक सोडून कुणालाही सूट नाही.
यात लोकांना नेहमीच्या ५ स्टार जीवनापेक्षा खूप वेगळे अनुभव आले. मग आम्ही गेस्ट हाउअस ला पोचल्यावर प्रत्येक टीमने आपले अनुभव कथन केले. ऐकायला सुद्धा मजा आली.
दुपारी भीमाशंकरहून निघून नाणे घाटाच्या पायथ्याशी पोचलो. तिथून नाणे घाट चढून कल्याण खिंडीच्या गुहेत मुक्काम.
मग सकाळी शिवनेरी वर स्वारी. दुपारी व संध्याकाळी कंपनीपुढे असलेल्या प्रश्नांवर चर्चा व आखणी. रात्री गावरान जेवण आणि गडावरच मुक्काम.
तिसर्‍या दिवशी सकाळी पुण्याला परत.
टीम बिल्डिंग नाही होणार तर काय होणार. Happy आमच्या बरोबर सर्व वेळ एक बाहेरचा मानस आणि सामारिक तज्ञ होता.
कंअनीने किती उद्देष्टे साध्य केली असतील तुम्हीच विचार करा. Happy

आम्ही पटायाला गेलो होतो. त्या टीमचा माझा रोजचा संबंध फारसा नाही म्हणजे कामा व्यतिरिक्त. त्यात सुपर बॉसने रेकमेंड केले म्हणून मी ( आजीबाई) व एक पोरगा आम्ही दोघे ह्यांच्यात घुसवलो ही तशी छोटी व क्लोज्ड ग्रूप अशी कंपनी त्यांचे आतले जोक्स व गृप्स ह्यात आम्ही जरा दूर दूर पडलो. पोरगा असल्याने तो लगेच मिक्स होउन गेला.

एक दोन बायका माझ्या त्यातल्यात्यात ओळखीच्या होत्या. पोहोचल्यावर एका ठिकाणी बोटीत बसून मग उतरायचे. तर मला ( ती साधी बोट
लाक डी व काचेचा तळ वाली. ह्यातून उतरून जायचे तर मला काही जमेना मग मी बोटीच्या काठाव्र उभे राहिले तर त्या टीमचा बॉस( हा आता स्वतंट्र बिझ नेस हेड आहे त्या युनिटचा व एक दोन बाप्यांनी मला बखोटीला धरून बोटीवरुन उतरुन जमिनीवर पाय ठेवायला मदत केली.

मला बाप्यांच्या मदतीची आजिबातच सवय राहिलेली नाही त्यामुळे एकदमच अवघडल्या सारखे व ग्रेटफुल वाटले. असे मदतीची गरज असलेले पब्लिक असते हे त्यांच्या साठी शिक्षण असावे.

ह्यांनी मात्र जबरी हॉटेल आणि सिंगल ऑक्यु पन्सी रूम दिलेली हे फार बेस्ट. एकटे राहायची सवय झाली की मिसळायची सवय पार पार जाते व टीम बिल्डिन्ग मध्ये जाम अवघडल्या सारखे होते.

ह्या तल्या तरुण मुली पण माझ्या चालण्यावरुन वजना वरुन जोक्स करत होत्या ते मी ऐकून न ऐकल्या सारखे केले.
पण ओव्हर ऑल अनुभव छान होता. फ्लेवर कंपनी आसल्याने थाई जेवण शिकायचे व फ्लेवर समजून घ्यायचे एक वर्क शॉप होते. ते फार भारी. त्यातल्या रेसीपी मी इथे लिहिल्या आहेत. एकदम प्रोफेशनल शेफ कडुन शिक्षण झाले होते.

शेवटी शेवटी टीम बरोबर डान्स करण्या इतपत आइस ब्रेक झाला.

लेखात ज्या ऍक्टिव्हीटिज म्हटल्या आहेत आणि बहुतेकांनी ज्या नमूद केल्या आहेत त्याला टिम बिल्डिंग ऍक्टिव्हीटिज ऐवजी टिम मेंटेनिंग ऍक्टिव्हीटिज म्हणावे का?
टिम बिल्डिंग एक कसब आहे. ती बिल्ड करत असतानाही अशा ऍक्टिव्हीटिजचा उपयोग होऊ शकतो, एकमेकांत मिसळणे भीड चेपणे यासाठी. पण या ऍक्टिव्हीटिज व्यतिरिक्त बरेच काही करावे लागते टिम बिल्ड करायची असल्यास.

या ऍक्टिव्हीटिज म्हणजेच टिम बिल्डिंग आहे असा गैरसमज नसावा.

आणि अर्थात फक्त या ऍक्टिव्हीटिज केल्याने टिम मेंटेन होते असेही नाही, तर करायला एक संधी मिळते.

Yes you need to support and educate members so that they achieve their best. Slowest person will decide the pace of growth. Eliahau goldratt book is very good in team building. You have to be firm but kind.

Pages