बाबांनी दिवा आणला तेव्हा...(भाषांतर)

Submitted by स्मिताके on 26 December, 2021 - 15:36

बाबांनी दिवा आणला तेव्हा....

पूर्वप्रसिद्धी - मिसळपाव दिवाळी अंक २०२१
------------------------------------------------------
फिनिश भाषेतील मूळ कथा - When Father Brought Home The Lamp by Juhani Aho (1883)
इंग्लिश भाषांतर - R. Nisbet Bain.

मूळ फिनिश कथेचे लेखक Juhani Aho (१८६१-१९२१) या टोपण नावाने लिहिणारे Johannes Brofeldt हे फिनिश भाषेतील एक प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार होते. त्यांच्या लिखाणात रोजच्या साध्या आयुष्यापासून राजकीय संदर्भापर्यंत विविध विषय येत. नोबेल पारितोषिकासाठी त्यांचं बारा वेळा नामांकन झालं होतं.

फिनलंडमधल्या एका छोट्याशा गावातली, सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची ही कथा Juhani Aho यांची सर्वप्रथम आणि सर्वात प्रसिद्ध कथा आहे. अगदी बालकथा म्हणता येईल इतकी साधी सोपी आहे ही मिश्कील कथा. तसंच बदलाला सामोरं जाणाऱ्या तत्कालीन सामाजिक स्तरांचं हे सुंदर चित्रणही आहे. फिनिश भाषेतलं या गोष्टीचं नाव (Siihen aikaan kun isä lampun osti ) आजही एखादं नवीन तंत्रज्ञान वापरात आणताना म्हणीसारखं वापरलं जातं.

(माहिती विकिपीडियावरून साभार. प्रताधिकारमुक्त कथा आणि छायाचित्रे आंतरजालावरून साभार. )
-------------------------------------------------------

बाबांनी दिवा आणला तेव्हा, किंवा कदाचित त्याच्या थोडं आधी असेल, ते आईला म्हणाले, "काय गं, आपण एखादा दिवा नको का आणायला?"
"दिवा? कसला दिवा?"
"आँ? म्हणजे तुला अजून ठाऊक नाही? बाजारगावी तो दुकानदार आहे ना, त्याने सेंट पीटर्सबर्गहून दिवे आणले आहेत. पाईनच्या दहा ढलप्यांपेक्षा भारी आहेत. आपल्या चर्चच्या फादरच्या घरीसुद्धा आहे तसला एक दिवा."
(फिनलँडमधल्या गरीब घरांमधून प्रकाशासाठी मेणबत्त्या किंवा पलित्यांऐवजी पाईनचे ढलपे वापरले जात.)

Flaming_wood.JPG

"हो, हो! म्हणजे खोलीच्या मध्यभागी तो चमकत असला, की अगदी ढळढळीत दिवस असल्यासारखं कोणत्याही कोपऱ्यात बसून वाचता येतं. तोच दिवा ना?"
"होय, तोच. त्यात तेल असतं ना, ते जळतं. हा दिवा संध्याकाळी लावला, की दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत जळत राहतो."
"पण तेल तर ओलं असतं ना हो? ते कसं जळेल?"
"काय प्रश्न तरी.. आता ब्रँडी कशी जळते म्हणून विचारशील."
"अहो, पण सगळं घर नाही का जळणार त्याच्यामुळे? ब्रँडी एकदा जळायला लागली की विझवता येत नाही काही. अगदी पाण्यानेसुद्धा नाही."
"अग, पण तेल आणि ज्योत दोन्ही काचेत बंद असतील, तर कसं जळेल घर?"
"काचेत? काचेत ज्योत कशी जळेल? तडकणार नाही का?"
"काय तडकायचंय?"
"काच म्हणते मी."
"तडकणार? छे! ती कधीच तडकत नाही. हां, तू जर आग फारच जोरात वर सरकवलीस तर नक्कीच तडकेल काच. पण तसं करायची सक्ती नाही केलेली कोणी तुला."
"आग वर सरकवायची? काहीतरीच काय! आग कशी वर सरकवणार?"
"नीट ऐक आता. स्क्रू उजवीकडे सरकवला की वात वर चढते. मेणबत्तीसारखी दिव्यालाही वात असते, आणि ज्योतही असते. आणि स्क्रू डावीकडे सरकवला की ज्योत छोटी होते. फुंकर मारली, की विझते."
"हो, म्हणे विझते. तुम्ही ढीग समजावलं असेल, पण मला काही एक समजलेलं नाहीये. हे त्या नवश्रीमंत लोकांचं काहीतरी थेर दिसतंय."
"थांब जरा. मी एखादा दिवा विकतच आणतो, मग नीट समजेल तुला."
"काय किंमत असते हो त्यांची?"
"साडेसात मार्क्स. आणि तेलाच्या डब्याचा एक मार्क निराळा.”
"साडेसात मार्क्स! आणि वर तेल! अहो, तेवढ्या किंमतीचे ढलपे आणले, तर कितीतरी दिवस पुरतील. पण तुम्ही..तुम्ही ढलप्यांसाठी पैसे मोजणार? आपला पेक्का लाकूड फोडून देतो, तेव्हा एक पेनीसुद्धा वाया जात नाही ना!"
"अग, पण दिवा आणल्यानेसुद्धा पैसे वाया जाणार नाहीत. ढलप्यांच्या लाकडालासुद्धा पैसे पडतात ना! आपल्या इथे सापडेनासं झालंय तसलं लाकूड हल्ली. रजा घेऊन ते शोधायला जावं लागतं, आणि मग कुठून कुठून दूरवरून ओढत इथे आपल्या या दलदलीत आणावं लागतं. आणलं रे आणलं की संपतंसुद्धा लगेच."

आईला चांगलंच ठाऊक होतं, की ते लाकूड तसं काही भसाभस संपत नाही. कारण आजपर्यंत कधीच त्याबद्दल कोणी चकार शब्द काढला नव्हता. तो दिवा आणायला जायचं, म्हणून बाबांची ही सबब. पण तिने शहाणपणाने मौन पाळलं. बाबा रागावले असते, तर मग दिवाबिवा कसा आला असता घरात? तो पाहायला मिळाला नसता ना मग? किंवा आमच्या आधी दुसऱ्या कोणीतरी आपल्या शेतावर एखादा दिवा आणून लावला असता. आणि मग सगळ्या गावात त्या शेताची चर्चा झाली असती. म्हणजे फादरच्या घरानंतरचा गावातला पहिला दिवा ना तो!

म्हणून मग आईने नीट विचार केला, आणि ती बाबांना म्हणाली, "तुमची इच्छा असेल तर आणा बरं का दिवा. ढलपा जाळला काय, किंवा दुसरं कुठलं तेल जाळलं काय. मला काय बापडीला, फक्त सूत कातण्यापुरतं दिसलं की झालं. कधी आणणार म्हणालात?"
"उद्याच निघेन म्हणतो. त्या दुकानदाराशी दुसरंही एक काम होतं माझं."
आठवड्याचा मधलाच वार होता. ते दुसरं काम शनिवारपर्यंत थांबलं तरी चाललं असतं, हे आईला ठाऊक होतं. याही वेळी ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात आलं, "शुभस्य शीघ्रम!"

संध्याकाळी बाबांनी आमच्या साठवणीच्या खोलीत जाऊन प्रवासाचा पेटारा आणला. आजोबा उलबोर्गहून इथे आले होते ना, तेव्हा त्यांनी या पेटाऱ्यात सामान भरून आणलं होतं. बाबांनी आईला त्या पेटाऱ्यात वाळकं गवत भरायला सांगितलं. त्याच्या मध्यभागी थोडा कापूसही घालायला सांगितलं. आम्ही मुलांनी विचारलं तिला, तुम्ही पेटाऱ्यात काही सामान तर घातलं नाही, मग नुसतं गवत आणि मध्यभागी थोडा कापूस कशाला, म्हणून. पण तिने आम्हांला तोंडं बंद ठेवायला सांगितलं. हो, आम्हां सर्व मुलांना. पण बाबा मात्र आनंदात होते. त्यांनी आम्हांला नीट समजावून सांगितलं, की ते दुकानदाराकडून दिवा आणणार होते. तो दिवा काचेचा होता. बाबा धडपडले असते, किंवा त्यांच्या घसरगाडीने बर्फावर हापट्या खाल्ल्या असत्या, तर दिवा फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले असते.

त्या संध्याकाळी आम्ही मुलं बऱ्याच उशिरापर्यंत न झोपता दिव्याचाच विचार करत राहिलो. पण आमचा जुना घरगडी, म्हणजे आम्हाला ढलपे फोडून देणारा तो पेक्का मात्र त्या संध्याकाळचा ढलपा विझवल्याबरोबर घोरायला लागला. आम्ही सतत दिव्याबद्दलच बोलत होतो, पण त्याने एकदासुद्धा विचारलं नाही, दिवा म्हणजे काय म्हणून.

lossy-page1-464px-Man_chopping_wood_LCCN2016888505.tif_.jpg

त्या प्रवासाला बाबांना एक पूर्ण दिवस लागला. तो दिवस आम्हां सर्वांना फार मोठा वाटत होता. आम्ही कोणी आवडीने जेवलोसुद्धा नाही. जेवणात दूध तांदळाची लापशी होती, तरीसुद्धा. पण पेक्क्याने मात्र आमच्या सगळ्यांचं मिळून होईल इतकं जेवण हादडलं. दिवसभर तो नुसता लाकूड फोडून ढलपे पाडत होता. अगदी पडवी भरून जाईपर्यंत. जवसाच्या धाग्याचं सूत कातण्याचं आईचं कामसुद्धा त्या दिवशी फारसं झालं नाही. कारण ती सारखी खिडकीशी जात होती, आणि बाहेरच्या बर्फावरून लांब नजर टाकून बाबांची वाट पाहत होती. अधूनमधून ती पेक्क्याला सांगतसुद्धा होती, "आता कदाचित इतके ढलपे लागणार नाहीत" म्हणून. पण पेक्क्याने ते फारसं मनावर घेतलं नसावं, कारण त्याने "का?" म्हणूनसुद्धा विचारलं नाही.
Spinning Wheel.jpg

रात्र पडल्यावर अंगणात घोड्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येऊ लागला. पावाचा चुरा माखलेली तोंडं घेऊन आम्ही मुलं बाहेर धावलो. पण बाबांनी आम्हांला परत आत पाठवलं. त्यांनी पेक्क्याला बोलावून घेतलं आणि पेटारा उचलायला मदत करायला सांगितलं. चुलीजवळच्या बाकावर पेक्का गाढ झोपला होता. तो तसाच पेंगत उठला आणि पेटारा घरात न्यायला मदत करू लागला. आणि.. आदळला पेटारा उंबरठ्यावर! पेक्का आता पूर्वीसारखा तरुण असता, तर बाबांनी त्याला बडवून काढला असता. पण आता त्याचं वय झालं होतं ना! बाबांनी आयुष्यात कधीच त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसाला मारलं नव्हतं. तरीसुद्धा, दिव्याचे तुकडे झाले असते ना, तर पेक्क्याला चांगलाच ओरडा ऐकावा लागला असता. पण सुदैवाने दिवा शाबूत होता.
"ए झोपाळू! चल नीघ, चुलीपाशी जा बघू." पेक्क्याकडे बघत बाबांनी गर्जना केली. पेक्का दबकत रांगत चुलीपाशी गेला.

बाबांनी पेटाऱ्यातून दिवा बाहेर काढला आणि एका हातात वर धरून तो खाली लोंबू दिला. "बघा! हा आपला दिवा! आहे की नाही मस्त? या काचेच्या आत तेल ओतायचं. आतमध्ये ते फितीचं टोक दिसतंय ना, ती वात आहे. अग, अग, तो ढलपा जरा लांब धर बघू!"
"आता लावायचा का दिवा?" आई मागे सरकून म्हणाली.
"काय वेडी आहेस का? तेलाशिवाय कसा लावणार दिवा?"
"बरं, मग तेल घालू या का?"
"तेल घालायचं? वाटलंच मला. ज्यांना या गोष्टी समजत नाहीत ना, ते असंच करतात. पण दुकानदाराने मला पुन्हा पुन्हा बजावलं आहे. ढलपा जळत असताना या दिव्यात अजिबात तेल घालायचं नाही. भसकन आग लागेल आणि सगळं घर जाळून खाक होईल."
"अहो, मग तेल घालणार तरी कधी?"
"दिवसा. काही कळतंय का? दिवस उजाडेपर्यंत थांबता येत नाही का तुला? इतकं काही मोठं नवल नाही दिवा म्हणजे."
"काय हो, दिवा जळताना प्रत्यक्ष पाहिलाय का तुम्ही?"
"अर्थात! पाहिलाय मी. काय प्रश्न तरी! बरेचदा मी दिवा जळताना पाहिलाय. फादरच्या घरात पाहिलाय, आणि दुकानदाराने हा दिवासुद्धा लावून दाखवलाय मला."
"म्हणजे हा दिवा लागला होता?"
"अर्थात! दुकानाच्या फळ्या लावल्या ना, तेव्हा जमिनीवरची सुईसुद्धा दिसली असती. इकडे बघ. ही इकडे एक कुपी आहे. काचेच्या आत ज्योत जळत असते ना, तेव्हा प्रकाश इथे वर येऊच शकत नाही. तिथे त्याची गरजही नसते. पण तो खालच्या बाजूला पसरतो. त्यामुळे जमिनीवरची सुई दिसते." आता आम्हांला सगळ्यांना जमिनीवरची सुई शोधायला फार म्हणजे फारच आवडलं असतं. पण बाबांनी दिवा छताला टांगला आणि जेवायला सुरुवात केली. "आज परत एकदा आपल्याला ढलप्यावर समाधान मानलं पाहिजे." ते जेवता जेवता म्हणाले. "पण उद्या आपल्या या घरात दिवा नक्की लागणार!"
"अहो, दिवसभर लाकूड फोडून त्या पेक्क्याने पडवी कशी भरून टाकली आहे बघा."
"असू दे गं. बरं झालं, हिवाळ्यात ऊब आणायला जाळता येईल हे लाकूड. दुसरा काही उपयोग नाही आता त्याचा."
"पण मग न्हाणीघर, गोठा? त्यांचं काय?"
"न्हाणीघरात दिवा लावू." बाबा म्हणाले.
त्या रात्री मला आदल्या रात्रीपेक्षाही कमी झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा दिवा लागलेला नाही असं पाहिल्यावर मला रडूच फुटत होतं. पण मग, दिवा संध्याकाळच्या आत लावायचा नाही हे आठवल्यावर जरासा लाजलो. बाबांनी रात्री दिव्यात तेल ओतलंय, आणि दिवसभर दिवा जळतोय, असं स्वप्न पडलं होतं मला.
पहाट झाल्याबरोबर बाबांनी त्यांच्या त्या दिव्य प्रवासी पेटाऱ्यातून एक मोठ्ठाली बाटली बाहेर काढली आणि त्यातलं काहीतरी एका छोट्या बाटलीत ओतलं. त्या बाटलीत काय होतं ते पाहायला आम्हाला फार म्हणजे फारच आवडलं असतं. पण आपली तर हिंमत नव्हती बुवा. बाबा इतके गंभीर दिसत होते, की आम्ही सगळे घाबरून गेलो होते. मग त्यांनी दिवा छतापासून थोडा खाली आणला, आणि खुडबुड करून तो उघडू लागले.
आता आईला राहवेना. तिने विचारलंच त्यांना, काय करता म्हणून.
"दिव्यात तेल ओततोय."
"अहो, पण तुम्ही तो उघडून त्याचे तुकडे तुकडे करताय चक्क! हे सगळं परत आपापल्या जागी कसं जोडणार आहात?"
बाबांनी काचेच्या आतून बाहेर काढलेल्या वस्तूला काय म्हणायचं, हे आईलाही ठाऊक नव्हतं, आणि आम्हांलाही. बाबा काहीच बोलले नाहीत. आम्हांला मात्र त्यांनी दूर हाकललं. मग त्यांनी त्या छोट्या बाटलीतलं काहीतरी त्या काचेच्या आत भरलं. हां.. म्हणजे त्या मोठ्या बाटलीतसुद्धा तेल होतं तर.. आम्ही अंदाज लावला. बाबांनी सुट्या केलेल्या सगळ्या वस्तू आपापल्या जागी लावल्या, आणि दिवा परत छताला टांगला.
"मग.. आता लावायचा ना दिवा?" आईने परत एकदा विचारलं.
"काय? आत्ता? दिवसा?"
"हो. बघू तरी कसा पेटतो तो."
"पेटेल ग. नीट पेटेल. संध्याकाळपर्यंत थांब बघू. जा आता, कटकट करू नकोस."

जेवणं झाली. पेक्का गडी ढलपे फोडण्यासाठी एक मोठ्ठाला ओंडका घेऊन आला. ते लाकूड थंडीने पार थिजलं होतं. पेक्क्याने ते आपल्या खांद्यावरून आणून धाडकन जमिनीवर टाकलं. सगळी खोली हादरली. दिवा हेलकावू लागला.
"जरा स्वस्थ राहा पाहू! एवढा गोंधळ कशाला घालतो आहेस?" बाबा ओरडले.
"हा ओंडका पार थिजलाय. काही केल्या ऊब येत नाही त्याच्यात. म्हणून घरात घेऊन आलो."
"एवढे कष्ट नाही केलेस तरी चालतील." बाबा म्हणाले, आणि त्यांनी आम्हांला डोळा घातला.
"पण मग जळणार कसं हे लाकूड?"
"मी म्हटलं ना, एव्हढे कष्ट नकोत करायला."
"म्हणजे? आता ढलपे फोडायला नकोत?"
"समज, मी तसं म्हटलं, तर?"
"ओह! साहेब, तुम्हांला नको तर नको. मी बापडा काय म्हणणार?"
"अरे पेक्का, पाहिलं नाहीस का? तिथे वर छतावर काय टांगलं आहे ते?" हा प्रश्न विचारताना बाबा मोठ्या अभिमानाने वर दिव्याकडे पाहत होते. मग त्यांनी कीवभरल्या नजरेने परत खाली पेक्क्याकडे पाहिलं. पेक्क्याने त्याचा ओंडका कोपऱ्यात नेऊन टाकला. आणि नंतर, हो हो, त्यानंतरच त्याने वर दिव्याकडे पाहिलं.
"अरे, दिवा आहे हा. दिवा जळू लागला ना, की ढलपे पेटवावे लागणार नाहीत आपल्याला." बाबा म्हणाले.
"ओह!" पेक्का म्हणाला. त्यानंतर एक शब्दही न बोलता तो गोठ्यामागे गेला. मग दिवसभर तो नेहमीप्रमाणे आपल्या उंचीची एक फांदी तोडून छोट्या छोट्या मोळ्या बनवत राहिला. त्याने तेवढं तरी केलं, पण आम्हांला सगळ्यांना काही सुचत नव्हतं. आई सूत कातल्यासारखं करत होती. पण शेवटी टकळी बाजूला ठेवून ती बाहेर गेली, तेव्हा जवसाचे धागे अर्ध्यानेसुद्धा संपले नव्हते.

बाबांनी कुऱ्हाडीचा दांडा तासायला सुरुवात केली होती. पण तासायची दिशा चुकली असावी. कारण त्यांनी काम तसंच अर्धवट टाकलं. आई बाहेर गेली, तसे तेसुद्धा बाहेर गेले. शहरात गेले की काय, मला कळलं नाही. कसं का असेना, त्यांनी आम्हाला बाहेर जायला सक्त मनाई केली. आणि दिव्याला बोटाचं टोक जरी लावलंत तरी फोडून काढीन, म्हणून बजावलं. आमची काय बिशाद! हे म्हणजे साक्षात चर्चमधल्या फादरच्या सोनेरी वेलबुट्टीच्या झग्याला हात लावण्यासारखं झालं! आम्हाला राहून राहून एकच भीती वाटत होती. दिवा नावाचं हे अद्भुत प्रकरण पेलून धरणारी दोरी तुटलीबिटली तर? आमच्यावरच दोष यायचा!

खोलीत बसल्याबसल्या आमचा वेळ काही केल्या जात नव्हता. काही सुचत नव्हतं. शेवटी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून टेकडीवर जायचं ठरवलं. नदीवरून पाणी आणण्यासाठीचा रस्ता आमच्या गावच्या अखत्यारीत होता. तो रस्ता एका छानशा टेकडीच्या पायथ्याशी संपायचा. त्या रस्त्यावरून आम्ही घसरगाडी खाली नेत असू, आणि मग तिथून दुसऱ्या बाजूच्या बर्फाच्या फटीतून वर काढत असू.

Parade_of_Sleighs.jpg

"आली रे आली, दिवाटेकडीवरची मुलं आली." गावातली मुलं आम्हाला बघून ओरडू लागली. त्याचा अर्थ आम्हांला नीटच कळला! पण आम्ही त्यांना मुळीच विचारलं नाही, कुठली ही दिवाटेकडी म्हणून. कारण आमच्या शेताचं नाव दिवाटेकडी नव्हतंच ना!
"ओ हो हो! कळलंय म्हटलं आम्हाला! तुमच्याकडे दिवा आणलाय ना? सगळं सगळं कळलंय आम्हाला!"
"अरे, पण इतक्यात कसं काय कळलं तुम्हाला?"
"तुमच्या आईने आमच्या आईला सांगितलंय म्हटलं! तुमच्या बाबांनी दुकानातून तो झगझगीत दिवा आणलाय.. जमिनीवरची सुई दिसते ना त्याने? म्हणजे निदान मॅजिस्ट्रेट साहेबांकडची मोलकरीण तसं म्हणाली बरं का!"
"फादरच्या ड्रॉईंग रूममध्ये आहे ना, तसलाच दिवा आहे तुमचा. तुमच्या बाबांनी आत्ताच सांगितलं आम्हांला. मी माझ्या कानांनी ऐकलंय." खानावळवाल्याचा मुलगा म्हणाला.
"म्हणजे खरंच तुम्ही तसला दिवा आणलाय का रे?" सगळी मुलं विचारू लागली.
"होय तर. खरंच! पण आता दिवसा काय बघायचंय त्याच्यात? आपण सगळे जण संध्याकाळी जाऊ ना दिवा बघायला." मग आम्ही आपले संध्याकाळपर्यंत घसरगाडी घेऊन टेकडीवरून वरखाली करत राहिलो. पण दर वेळी टेकडीच्या वरच्या टोकाला पोहोचलो की मात्र दिव्याबद्दलच बोलत होतो. यामुळे वेळ कसा भर्रकन गेला ते कळलंच नाही. मग शेवटच्या वेळी आम्ही टेकडीवरून खाली जोराने घसरत आलो ना, तेव्हा सगळे जण आमच्या घराकडे धावत सुटलो.
पेक्का त्याच्या लाकूड फोडण्याच्या जागी उभा होता. आम्ही एकसुराने त्याला हाक मारली, आणि दिवा बघायला बोलावलं. पण त्याने मानसुद्धा हलवली नाही. आम्ही सगळ्यांनी एकदम खोलीत मुसंडी मारली, आणि दारातच खिळून राहिलो. छताखाली दिव्याचा इतका झगझगीत प्रकाश पडला होता, की डोळे मिचकावल्याशिवाय त्याच्याकडे पाहता येत नव्हतं.

"दार बंद करा पाहू. थंडी किती पडली आहे." बाबा टेबलामागून ओरडले.
"पक्ष्यांसारखी वाऱ्यावर स्वार होऊन गोंधळ घालत येतात ही मुलं." शेगडीच्या उबेला बसलेली आई करवादली.
"मुलं हुरळली तर काय नवल? मला म्हातारीलासुद्धा त्याच्यावरून नजर काढवत नाही हो!" खानावळवाल्याची म्हातारी आई म्हणाली.
"आमच्या मोलकरणीला तर वेडच लागलंय या दिव्याचं." मॅजिस्ट्रेट साहेबांची सावत्र मुलगी म्हणाली.
प्रकाशाला डोळे सरावल्यावर आमच्या लक्षात आलं, की अर्धीअधिक खोली शेजाऱ्यांनी भरली होती.
"असे जवळ या रे मुलांनो, म्हणजे नीट दिसेल." बाबा मघापेक्षा खूपच मवाळ आवाजात म्हणाले.
"पायांवरचा बर्फ झाडून टाका पाहू, आणि इथे चुलीशी या. इथून छान दिसतो तो." आई म्हणाली.
उडया मारतच आम्ही आईजवळ गेलो, आणि ओळीने तिच्याजवळ बाकावर बसलो. तिच्या शेजारी बसल्यावर आम्हांला धीर आला आणि आम्ही दिव्याचं बारकाईने निरीक्षण करू लागलो. जळणारा दिवा कसा बरं दिसेल, हा विचार आम्ही आधी केलाच नव्हता. पण आता तो पाहताना आम्ही असा निष्कर्ष काढला, की दिवा जसा जळायला हवा, अगदी तस्साच तो जळतो आहे बरं का. बराच वेळ आम्ही त्याच्याकडे पाहत राहिलो. मग आम्हाला वाटायला लागलं, की अरे, आपल्याला वाटलं होतं तसाच आहे की हा दिवा. पण आम्हाला एक गोष्ट मात्र अजिबात समजली नाही. ती म्हणजे, काचेच्या आत आग कशी घातली असेल?
आम्ही आईला विचारलं. पण ती म्हणाली, "ते कसं करायचं ते आपण नंतर पाहू."

गावकऱ्यांच्यात दिव्याचं कौतुक करायची चढाओढ लागली. कोणी एक म्हणे, तर कोणी दुसरं.
खानावळवाल्याच्या म्हाताऱ्या आईचं आपलं एकच म्हणणं, "स्वर्गातल्या ताऱ्यांसारखा शांत आणि तेजस्वी प्रकाश आहे हो!"
मॅजिस्ट्रेट साहेबांना (उदास डोळेवाले) हा दिवा अगदी उत्तम वाटला, कारण त्याचा धूर होत नव्हता. म्हणजे दिवाणखान्यात मध्यभागी लावला, तर भिंती काळ्या पडल्या नसत्या. यावर बाबांनी उत्तर दिलं, की खरं म्हणजे तो दिवाणखान्यासाठीच आहे. पण माजघरातसुद्धा प्रकाश पडतो त्याचा. म्हणजे कोणाला ढलपे घेऊन इकडेतिकडे हिंडायला नको. एकाच दिव्याचा प्रकाश सर्वांना पुरेल, पुष्कळ दिवे लागणार नाहीत.

आईचं म्हणणं पडलं, की चर्चमधल्या छोट्या झुंबराचादेखील इतका प्रकाश पडत नाही. म्हणून मग बाबांनी मला माझं शाळेतलं पुस्तक आणायला सांगितलं आणि दाराजवळ जाऊन वाचता येते का पहा, म्हणाले. मी गेलो, आणि वाचायला सुरुवात केली, "अवर फादर." पण मग सगळेजण म्हणू लागले, "हे पाठांतर असेल पोराचं." मग आईने एक प्रार्थना पुस्तक माझ्या हातात ठेवलं, आणि मी "बाय द वॉटर्स ऑफ बॅबिलॉन" वाचू लागलो.

"होय तर, मस्तच आहे हा प्रकाश." सगळ्या गावकऱ्यांनी साक्ष दिली.
मग बाबा म्हणाले, "आता कोणाकडे एखादी सुई असली, तर ती जमिनीवर टाका. लग्गेच सापडते की नाही बघा."
मॅजिस्ट्रेट साहेबांच्या सावत्र मुलीजवळ, तिच्या कपड्यांत खोवलेली एक सुई होती. पण जमिनीवर टाकताक्षणी ती एका भेगेतून आत गेली. ती इतकी छोटी होती, की आम्हांला मुळीच सापडली नाही.

सगळे गावकरी निघून गेल्यानंतरच पेक्का आत आला. आधी काही वेळ त्या अनोख्या प्रकाशात त्याचे डोळे दिपून उघडमीट करत राहिले, पण मग शांतपणे तो आपलं जाकीट आणि बूट काढू लागला. त्याने मोजे वर टांगले, आणि शेवटी विचारलं, "छतावर काय लावलंय ते चमकणारं? एखादा आंधळा होईल त्या प्रकाशाने."
"ओळख पाहू!" आईकडे आणि आमच्याकडे पाहत बाबा म्हणाले.
"मला नाही येत ओळखता." म्हणत पेक्का दिव्याजवळ गेला.
"चर्चमधलं झुंबर आहे का रे?" बाबा विनोदाने म्हणाले.
"असेल." पेक्क्याने कबुली देऊन टाकली. पण त्याला खूप कुतूहल वाटत होतं. त्याने दिव्यावरून आपला अंगठा फिरवला.
"हां हां! त्याला बोटं लावायची काही गरज नाही." बाबा म्हणाले, "बघ त्याच्याकडे, पण हात लावू नकोस."
"बरं, बरं. नकोच मला ती भानगड." विरस झाल्यासारखा पेक्का म्हणाला, आणि दाराजवळच्या भिंतीशी जाऊन बाकावर बसला.
बिचाऱ्या पेक्क्याशी असं वागताना आईला पाप केल्यासारखं वाटलं असावं. ती त्याला समजावू लागली, "अरे, हे चर्चचं झुंबर नव्हे. दिवा दिवा म्हणतात ना, तो आहे हा. तेल घालून पेटवतात तो. म्हणूनच तर लोकांना आजकाल ढलपे लागत नाहीत."
पण हे सगळं ऐकून पेक्क्याच्या डोक्यात जरासुद्धा प्रकाश पडला नसावा. ताबडतोब त्याने काल खोलीत आणून टाकलेला ओंडका फोडायला सुरुवात केली.
मग बाबा म्हणाले, "तुला मी अगोदरच सांगितलंय ना रे, आता ढलपे फोडायला नकोत म्हणून."
"ओह! विसरलोच." पेक्का म्हणाला, "नको असले ढलपे, तर मग राहू देत की ते तसेच पडून." त्याने आपला ढलपे तासायचा सुरा भिंतीवरच्या भेगेत खुपसला.
"तसाच राहू दे तो तिकडे." बाबा म्हणाले.

पण पेक्का एक शब्दही बोलला नाही. थोड्या वेळाने त्याने आपल्या बुटांना ठिगळं लावायचं काम सुरू केलं. पायांची बोटं उंचावून त्याने हात वर ताणले, आणि छतावरून एक ढलपा खेचून घेतला. तो पेटवला, आणि फोडलेल्या लाकडांच्या एका मोळीत अडकवला. मग तो चुलीपाशी एका छोट्या तिवईवर बसला. बाबा त्याच्याकडे पाठ करून, कुऱ्हाडीचा दांडा तासत उभे होते. त्यामुळे पेक्क्याचा हा उद्योग त्यांच्याआधी आम्ही पाहिला. आम्ही कोणीच काही बोललो नाही. फक्त हसत, आपापसात कुजबुजत राहिलो. "बाबांनी पाहिलं तर? ते काय म्हणतील कोण जाणे."

मग बाबांनी जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा ते त्याच्या समोर येऊन दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले, आणि एकदम चिडकू आवाजात त्याला म्हणाले, "एवढं कसलं कलाकुसरीचं काम करणार आहेस? तुझ्या एकट्यासाठी दिवा हवा होय रे?"
"मी फक्त माझ्या बुटांना ठिगळं लावतोय साहेब." पेक्का म्हणाला.
"होय तर! बुटांना ठिगळं लावतो म्हणे. मला पुरतो तो दिवा तुला पुरत नाही ? तसं असेल तर चल उठ, उचल तुझा ढलपा. न्हाणीघरात जा नाहीतर त्याच्या मागे, कुठे हवं तिथे जा." पेक्का निघून गेला. काखेत बूट, एका हातात तिवई आणि दुसऱ्या हातात पेटता ढलपा घेऊन तो चालू लागला. दारातून तो हळूच दिवाणखान्यात आला, आणि तिथून बाहेर अंगणात गेला.

बाहेर ढलपा चांगला ढणढणून पेटला. जरा वेळ त्याच्या लालभडक प्रकाशाने पडव्या, कोठ्या, गोठे उजळून निघाले. आम्हां मुलांना खिडकीतून तो प्रकाश फार सुंदर भासला. पण मग पेक्का खाली वाकून न्हाणीघराच्या दारामागे जाऊ लागला, तेव्हा खिडक्यांच्या गडद तावदानांवर आम्हांला ढलप्याऐवजी फक्त दिव्याचं प्रतिबिंब दिसत राहिलं.

त्यानंतर आम्ही माजघरात एकसुद्धा ढलपा कधी जाळला नाही. आमचा दिवा छतावरून दिमाखाने प्रकाश फेकत असे. बरेचदा रविवारी संध्याकाळी गावकरी दिवा पाहायला आणि त्याचं कौतुक करायला येत. पंचक्रोशीत सगळीकडे झालं होतं, की फादरच्या घरानंतर दिवा वापरणारं आमचंच घर पहिलं! मग आम्ही उदाहरण घालून दिल्यानंतर मॅजिस्ट्रेट साहेबांनी आमच्या दिव्यासारखाच एक दिवा आणला होता. पण तो कसा पेटवायचा, ते त्यांना कधी जमलंच नाही. त्यामुळे त्यांनी खुशीने तो दिवा खानावळवाल्याला विकून टाकला. खानावळवाल्याजवळ तो अजूनही आहे.

गरीब शेतकऱ्यांना मात्र दिवे परवडत नव्हते. अजूनही ते ढलप्याच्या प्रकाशात संध्याकाळची कामं करत असत. दिवा आणून थोडे दिवस झाल्यावर बाबांनी माजघराच्या भिंती तासून चांगल्या गुळगुळीत केल्या आणि त्यांना पांढरा रंग लावला. मग त्या परत कधीच काळ्या पडल्या नाहीत. खासकरून जुनी धूर ओकणारी चूल काढल्यानंतर. तिला आपली जागा नव्या चुलीला द्यावी लागली. नव्या चुलीला फिरतं झाकण होतं, आणि तिचा धूर घराच्या बाहेर सोडला जायचा.

पेक्क्याने जुन्या शेगडीचे दगड वापरून न्हाणीघरात एक नवी शेगडी तयार केली होती. आता रातकिडे त्या दगडांमधून फिरू लागले. त्यामुळे आम्हाला माजघरात त्यांचा आवाज ऐकू येईनासा झाला. हिवाळ्यात लवकर काळोख पडायचा. रात्र मोठी व्हायची. बाबांना त्याचं काही वाटायचं नाही. पण आम्हां मुलांना अधूनमधून कातरवेळी त्या जुन्या दिवसांची एक अनामिक ओढ लागायची. मग पुष्कळदा आम्ही रातकिड्यांचा आवाज ऐकायला म्हणून न्हाणीघराकडे जायचो. पेक्का तिथे आपल्या ढलप्याच्या प्रकाशाच्या साथीने त्या मोठ्या रात्री घालवत बसलेला असायचा.

--------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख जमलंय! एक मुख्यचित्र लावा ही विनंती. जास्त लोकं क्लिक करतात वाचतात इ पेक्षा विषय काय आहे हे झटकन लक्षात येते.

कथेत अप्रतिम सहजता आहे...फक्त पात्रच नाही तर आजूबाजूचा परिसर अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. कुठलाही अनपेक्षित शेवट नसणारी साधी, सरळ चित्रदर्शी, मुलांचं सगळं भावविश्व समर्थपणे डोळ्यासमोर उभं करणारी कथा. ही सहजता मुंशीप्रेमचंद, रविंद्रनाथ यांच्या कथात मिळते.

सीमंतिनी, छान सूचना. मुख्य चित्र दिले आहे. आणखी काही चित्रे आहेत, तीही देण्याचा प्रयत्न करते आहे. धन्यवाद.

स्वाती२, दत्तात्रय साळुंके, निर्मल, बन्या, SharmilaR, किल्ली, मानव पृथ्वीवर, मनिम्याऊ, मामी, समाधानी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

aashu29, @गौरी, वावे - प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
वावे - आता चित्रं पुन्हा दिली आहेत. दिसताहेत का?

सर्वांना कथा आवडल्याचं वाचून खूप छान वाटलं.

आता सगळे चित्रं/फोटो दिसताहेत.
पेक्का, मागचे घर त्या काळाच्या मानाने चांगलेच पुढचे वाटतात, बर्फाचा मागमूसही नाहीय, त्यामुळे तो फोटो कथेला साजेसा वाटत नाहीय.

वाह... त्या त्या काळात त्या त्या वस्तूचा असा महत्व आणि जीवनमानातील बदल. त्यातुनही व्यक्तिसापेक्ष समाजमानातील बदल, त्यांना वाटणारे अप्रुप किती छान रेखाटलंय....

एका छान कथेचा छान अनुवाद, अजून कथा असतील अश्या विविध परदेशी भाषेतील तर जरूर अनुवाद करून पोस्ट करत जा, धन्यवाद!

आबा. , लावण्या, वंदना, देवभुबाबा, विकास83 प्रतिसादाबद्दल आभार.
विकास83 - हो, जरूर देईन Happy

दिवाळीपूर्व उपक्रम
विविध जुन्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेले माबोकरांचे निवडक साहित्य

खूप छान गोष्ट.
धन्यवाद साद हा धागा वर काढल्याबद्दल

अतिशय सुंदर..
साध्या साध्या गोष्टीत खरं तर किती आनंद भरुन राहिला असतो.