दक्षिण चीन सागरातील संघर्ष

Submitted by पराग१२२६३ on 14 December, 2021 - 23:59

“हिंद-प्रशांत क्षेत्र सुरक्षित, मुक्त आणि खुले ठेवण्यासाठी अमेरिका तिच्या सहकार्यांसोबत कार्य करत राहील”, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन.

गेल्या काही वर्षांपासून चीन दक्षिण चीन सागराच्या बहुतांश भागावर दावा सांगत आला आहे. त्याने या प्रदेशाबाबत अतिशय आक्रमक धोरण स्वीकारत तेथे आपली लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. नैसर्गिक साधनसामग्रीने परिपूर्ण अशा दक्षिण चीन सागराचे सामरिकदृष्ट्या महत्व आहे. चीनच्या या प्रदेशातील वाढत्या आक्रमकतेचा जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहितांना धोका निर्माण झालेला आहे. दक्षिण चीन सागरावरील सार्वभौम हक्काच्या मुद्द्यावरून चीनचे या सागराच्या किनाऱ्यावरील ब्रुनेई, मलेशिया, फिलिपीन्स, तैवान आणि व्हिएतनाम यांच्याशी तंटे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ब्लिंकन यांनी आपल्या आग्नेय आशियाच्या दौऱ्यात वरील मत व्यक्त केले आहे.

चीनचा दावा नामंजूर

12 जुलै 2016 रोजी दक्षिण चीन सागरावरील चीनचा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर या क्षेत्रात सर्वच देशांच्या लष्करी हालचाली वाढल्या. त्या काळात अमेरिकेच्या ड्रोन पाणबुडी चीनने पकडली होती. त्यानंतर चीनने लिआओनिंग या आपल्या विमानवाहू जहाजाच्या चाचण्या या परिसरात घेतल्या. त्याआधी चीनने रशियाबरोबर येथे मोठे संयुक्त नाविक युद्धसराव केले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण चीन सागरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामला अमेरिकेकडून संरक्षणाची हमी दिली होती.

सध्या दक्षिण चीन सागर हा भाग जगातील सर्वात तणावग्रस्त भागांपैकी एक झाला आहे. हिंदी आणि प्रशांत महासागरांना जोडणाऱ्या या भागाचे जगाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. ही बाब तसेच या सागरतळाशी असलेली नैसर्गिक संपत्ती विचारात घेऊनच चीनकडून या सागरावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत; पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदाय चीनच्या त्या प्रयत्नांना विरोध करत आहे. भारताचीही या क्षेत्रात सामरिक हितं गुंतलेली आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील देशांबरोबर सामरिक सहकार्य वाढवण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच भारतीय युद्धनौका वरचेवर आग्नेय आशियाई देशांना भेटी देत आहेत. भारत दक्षिण चीन सागरातील दळणवळणविषयक स्वातंत्र्याचे समर्थन करत आला आहे. त्या प्रदेशातील वादावर तोडगा काढण्यासाठी धमकी आणि शक्तीचा वापर केल्यास तेथील शांतता आणि स्थैर्यावर विपरित परिणाम होईल, असे नवी दिल्लीचे मत आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/blog-post_15.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< 12 जुलै 2016 रोजी दक्षिण चीन सागरावरील चीनचा दावा फेटाळून लावला होता. >>
----- हा दावा कुणी फेटाळला? मला कळाले नाही, काही भाग/ वाक्य गळाले आहे का?

या विषयावर अधिक वाचायला आवडेल.