Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 December, 2021 - 22:10
सरणाऱ्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींची नोंद करा, आनंद असो व दुःख वाटून घ्या..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमा, मी सध्या फक्त niche,
अमा, मी सध्या फक्त niche, artisanal, indie परफ्युम्स वापरतो. ते भारतात अधिकृतरीत्या फार कमी मिळतात. फार मोठा विषय आहे आणि इथे अवांतर होईल. आता हापिसात चाललो असल्याने तुमच्यासाठी आजचा सेंट ऑफ द डे टाकतोय - OJ rose gold

जिद्दु, बराच व्यासंग दिसतोय.
जिद्दु, बराच व्यासंग दिसतोय. याबद्दल लेख लिहा.
जिद्दु, बराच व्यासंग दिसतोय.
जिद्दु, बराच व्यासंग दिसतोय. याबद्दल लेख लिहा. >>+१ from another fraghead!
या वर्षी व्यक्तीगत आयुष्यात
या वर्षी व्यक्तीगत आयुष्यात विशेष असे चांगले अथवा वाईट काही घडले नाही. काही वाईट घडले नाही यासाठी परमेश्वराचे आभार! मात्र मित्र परिवार आणि आप्तेष्ट यांच्यापैकी काहींच्या आयुष्यात घडलेल्या दुःखद प्रसंगामुळे एकूण वर्ष हे सुखद नाही असेच वाटते.
लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर जरा आयुष्य पूर्वी सारखे होऊ लागले आहे याचा आनंद आहे. कोरोनाने अनेक चांगल्या गोष्टींची बीजे रोवण्यास मदत केली विशेषतः आरोग्याच्या बाबतीत. त्या चांगल्या सवयी आयुष्यभर कायम रहाव्यात अशी इच्छा आहे.
अमा, किती छान लिहीलं आहे! या नव्या फेजमध्ये सारे तुमच्या मनासारखे घडो!
शरद, बाप रे! आता यापुढील वर्षे उत्तम आरोग्याची जावोत यासाठी शुभेच्छा!
पहिल्याच प्रतिसादात लग्न झाले
पहिल्याच प्रतिसादात लग्न झाले याला चांगली गोष्ट म्हटलेले पाहून टचकन डोळ्यात... आई ग्ग
काही वर्षांपूर्वी माझाही बालविवाह झाला तेव्हा मलाही अगदी अस्सेच.. नको ग्ग ..
जोक्स द अपार्ट,
मला २०२० जसे गेले तसेच २०२१ गेले..
किंबहुना त्याही पेक्षा जास्त चांगले..
एकतर काही वाईट घडले नाही. या महामारीत कोणी जवळचे गमावले नाही. काही काका-मामा पिढीतले नातेवाईक गेले, पण जीवन मृत्युचा फेरा कोणाला चुकलाय. त्यातले कोणी अकाली गेले नाही हे महत्वाचे. सारे बुजुर्ग लोकं आपापली नातवंडे बघून गेले.
असो, या वर्षातीलही चांगली गोष्ट म्हणजे वर्क फ्रोंम होम. कधीही उठा, कधीही झोपा, कधीही आपल्या मनाला वाटेल तसे काम करा, फॅमिली चोवीस तास सोबत, त्यांना वाटेल तेव्हा वेळ देता येतो. आपल्या छंदांनाही हवा तितका वेळ देता येतो. जेवणानंतर सुस्ती आली की डुलकी घेता येते. झोप आली की सरळ झोपता येते. कोण बघतेय याचे प्रेशर नाही. हवे तेव्हा नेट सर्फिंग करता येते. रोज आंघोळही करायची गरज नाही. उद्या ऑफिसला कपडे काय घालायचे याचे टेंशन नाही. डोक्यावरचे केस हवे तेव्हा हवे तितके वाढवता आले. अजून बरेच काही लिहिता येईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे आयुष्य जगणे हे तर माझे ड्रिमच होते
२०२१ हे नवीन घरातले पहिलेच वर्ष. त्यामुळे या वर्षात येणारा प्रत्येक सण, प्रत्येक स्पेशल ओकेजन आणखी स्पेशल झाला. काही ना काही तरी नवीन या घरात आणि आयुष्यात येतच राहिले. बोअर व्हायला संधीच मिळाली नाही. उलट जगायला वेळ कमी पडतोय. कित्येक धागे केवळ वेळेअभावी काढता आले नाहीत. त्यामुळे दिवसाचे सव्वीस तास, आठवड्याचे आठ दिवस, महिन्याचे तेरा महिने झाले तर छान होईल असे वाटते बरेचदा. त्यासाठी पृथ्वीचा स्वतःभोवती आणि सुर्याभोवती फिरायचा स्पीड कसा कमी करता येईल हा विचार करतोय सध्या.. कोणाला काही आयड्या?
ऋन्मेष, डोंट वरी.. आपण काहीही
ऋन्मेष, डोंट वरी.. आपण काहीही प्रयत्न न करता तसं होतच आहे!
https://www.actionnews5.com/2021/09/19/breakdown-why-earths-rotation-is-...
२०१९ आणि २०२० ही दोन्ही वर्षे
२०१९ आणि २०२० ही दोन्ही वर्षे माझ्यासाठी खुप वाईट गेली... या दोन वर्षात आई चा अपघाती मॄत्यु आणि त्या धक्यामुळे पाठोपाठ आजोबा आणि आजी मला सोडुन गेले.. एकदम पोरके पणाची भावना आणि अचानक मोठं झाल्यासारखं झालं...
त्या धक्यातुन सावरायला २०२१ ने मदत केली असे म्हणेन...
खरतर या वर्षात सुद्धा कोवीड च्या दुसर्या लाटेत अनेक आप्त आणि ओळखीचे लोक गेले.
पाठोपाठ घडण्यार्या या घटनांमुळे आता वर्षाचा हिशोब मांडायचाच नाही तर येणारा दिवस कसा जातो आहे याचा त्या त्या रात्री लेखाजोखा मांडायचा इतकंच सध्या ठरवलं आहे... उद्या काय घडेल कोणी पाहिलंय ? हाच विचार २०२१ ने दिला असं मी म्हणेन...
छोट्यातल्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला या वर्षानं शिकवलं.
समोरच्या माणसाचा कितीही राग आला तरी त्याला मनातल्या मनात लगेच माफ करायला शिकवलं.
आजचा आनंद/विचार उद्यावर ढकलायचा नाही ( उदा नवीन ड्रेस घालण्यासाठी पुढच्या सणाची वाट बघणे, पेस्ट्री खाण्यासाठी वीकेंड ची वाट बघणे ..हे न करता ज्या वेळी जे वाटतंय ते लगेच करुन मोकळं व्हायचं असं करायला सुरु केलंय सध्या )
२०२१ , २०२० पेक्शा त्रासाचे
२०२१ , २०२० पेक्शा त्रासाचे होते असे म्हणेन .
आम्ही सगळे आजारी होतो . रिकव्हरीला वेळ लागला, पण जीवावर बेतलं नाही . नात्यातले जवळ जवळ सगळेच या वेळी आजारी होते .
दूसर्या लाटेत काही जवळची माणसे गेली , ओळखीचीपण काही तरूण मंडळी जाणे फार धक्कादायक होते .
ऑफिसच्या कामामुळे पण स्ट्रेस खूप होता , - नविन प्रॉजेक्ट , नविन मॅनेजमेन्ट , टीम मेम्बरस पण ह्याच प्रोफेशनल आणि पर्सनल स्ट्रेस्स मधून जात होते - त्यामुळे आमचा स्ट्रेस वाढला .
पण कंपनीने कुठलीही कपात केली नाही , बरेच प्रमोश्न्स झाले . काही ना काही कारणानी monetary incentives दिले . लोकानी कुटुम्बासोबत वेळ घालवावा म्हणून काही विशेष दिवस सुट्ट्या, काही monetary reimbursement पण देउ केले .
छोट्यातल्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला या वर्षानं शिकवलं.
आजचा आनंद/विचार उद्यावर ढकलायचा नाही >>> + १००००
२०२० मध्ये लॉकडाउन मुळे , मुळातच आपल्या गरजा किती कमी आहेत याही जाणीव झाली होती . उगाचची शॉपिन्ग , वारंवार बाहेरच खाणं वगैरे मिथ्थ्या वाटायला लागल होतं .
२०२१ मध्ये , दूसर्या लाटेनंतर , जीवन किती क्षणभंगूर आहे याची जाणीव परत एकदा झाली .
घरात काही गोष्टी नविन घ्यायच्या होत्या , आहेत त्या गोष्टीवर काम भागवणं चालू होतं. पण गेल्या काही महिन्यात बरीच खरेदी केली घरासाठी .आपला काही भरवसा नाही , आता या गोष्टीत पैसा खर्च केला नाही, आपण चांगल्या गोष्टीन्चा उपभोग घेतला नाही , तर नंतर काय उपयोग ? हा विचार बळावला.
काही लोकांच्या अचानक जाण्याने आम्ही खूप हळवे झाले होतो .
" हे तुला माहीत असायला हवं" , ईथे सगळ लिहून ठेवलय , या फाईल्समध्ये सगळी कागदपत्र आहेत " असे संवाद माझ्या आणि नवर्यात , माझ्या आणि बाबांमध्ये वारंवार घडू लागले .
कधीही काहीही होउ शकतं आणि आपणं तयार राहीलं पाहीजे , पुढची तजवीज काय केली आहे - हे विषय सहज गप्पांमध्ये येउ लागले . ( एरवी, काय उगाचच नको ते , म्हणून टाळले असते ) .
सगळा मानसिक ताण , आजारपण , आजूबाजूची परिस्थीती यामुळे २०२१ ने आणखी कणखर व्हायला मदत केली . "I can survive this bad phase" असा विश्वास दिला . ईतर बर्याच लोकांची दुख: आपल्यापेक्षा मोठी आहेत , त्यांची परिस्थिती बिकट आहे - आपण तर यातून नक्की तरून जाउ अशी उमेद दिली .
स्मिता, स्वस्ति, बिग हग.
स्मिता, स्वस्ति, बिग हग.
2022 किमान सर्व जगासाठी चांगले असू दे.
अनु +१
अनु +१
स्मिता माझ्या तर्फे
स्मिता माझ्या तर्फे कंडोलन्सेस व प्रेयर्स.
स्वस्ती उत्तम पोस्ट ही वर पिन करून ठेवा किंवा लेखात घ्या अजिंक्यराव. अहो गेले कुठे?
वर्ष संपता संपता अखेरच्या
वर्ष संपता संपता अखेरच्या महिन्यात एक नवीन फॅमिली मेंबर आला घरात.
थोडक्यात नवीन वाहन आले घरात
ते सुद्धा प्रदूषणरहित हे विशेष
स्मिता माझ्या तर्फे
स्मिता माझ्या तर्फे कंडोलन्सेस व प्रेयर्स.....+१.
स्वस्ति,प्रतिसाद सुरेखच.
ऋन्मेष,अभिनंदन!
मी_अनु, अमा, देवकी खुप आभारी
मी_अनु, अमा, देवकी खुप आभारी आहे तुमची
कधीही काहीही होउ शकतं आणि आपणं तयार राहीलं पाहीजे , पुढची तजवीज काय केली आहे - हे विषय सहज गप्पांमध्ये येउ लागले . ( एरवी, काय उगाचच नको ते , म्हणून टाळले असते ) . >> +१
२०२१ मधे आम्ही याच कारणासाठी काही मोठे आर्थिक निर्णय घेतले... घराचं लोन बंद करणे हा त्यापैकी एक . त्यामुळे या वर्षी "आमचं घर" खर्या अर्थाने "आमचं" झालं ही एक चांगली गोष्ट या निमित्ताने आठवली
>>>>>>>उत्तम आरोग्य असणे घबाड
>>>>>>>उत्तम आरोग्य असणे घबाड आहे
१००%
अगदी बरोबर सी.
ह्या वर्षी आमचं स्वतः च घर
ह्या वर्षी आमचं स्वतः च घर झालं , ते मनाप्रमाणे सजवता आल
आणि वर्क फ्रॉम होम असल्याने नवऱ्याला आणि मला चोवीस तास एकत्र राहता आल , सहवासाने नातं आणखी दृढ झालं
सर्वांचे आभार..
सर्वांचे आभार..
सर्व दुःख, संकटे पार करून आपण उभे आहोत हीच मोठी achievement समजायला हवी खरंतर.
अमा, एकल पालकत्व स्वीकारून, पूर्णपणे पार पाडून तुम्ही तुमच्या लेकीला उज्ज्वल आयुष्य दिलंत हे खरंच अभिमानास्पद आहे. अभिनंदन!
शरद, २००७ साली आमचे मामा कॅन्सरने गेले. त्यावेळी एकट्या मामाला नाही तर आमच्या सगळ्या कुटुंबालाच तो जीवघेणा आजार झाला होता अशी फिलिंग आलेली (आणि इथेच खरी चूक होते). Positivity आणि मनाची तयारी असेल तर कॅन्सरसोबतचे जगणे देखील शक्य आहे याची मला पुरेपूर खात्री आहे. आणि हो, व्यक्त व्हा, बोलून टाकल्याने मनावरचा ताण हलका होतो, उभारी मिळते. शुभेच्छा..
जिज्ञासा, दुःखद प्रसंग कुणाला
जिज्ञासा, दुःखद प्रसंग कुणाला चुकलेत.. दुःखाची तीव्रता हळूहळू कमी होत जाणं, त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणं आणि जगण्यासाठी, लढण्यासाठी पुन्हा तयार होणं महत्वाचं.
स्वस्ति, तुम्ही बऱ्या झालात हे वाचून छान वाटलं. आप्तेष्टांच्या जाण्यातुनही तुम्ही सावरत आहात. एकेका दिवसाचा हिशोब करता करता वर्ष निघून जातील.
अजिंक्यराव, अभिनंदन!
अजिंक्यराव, अभिनंदन!
अमा, शरद, स्वस्ति, स्मिता तुमच्या पोस्ट्स ग्रेट!!
माझ्यासाठी २०२० ची सुरूवातच वाईट होती. जानेवारीत माझ्या मोठ्या ताईचा अपघात झाला. सुदैवाने जिवावरचं उजव्या खांद्यावर निभावलं. मोठं ऑपरेशन करून खांद्यात प्लेट बसवावी लागली. आई-बाबा रत्नागिरीहून लगेच तिच्याकडे कोल्हापूर्ला गेले होते. मीपण मधल्या ताईबरोबर पुण्यातून एक दिवस तरी जाऊन ताईला भेटून आले. माहिती नव्हतं की त्या वेळी बाबा भेटले ती शेवटची भेट ठरेल. मग लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागायच्या आधी आम्ही आमच्याच खालच्या मजल्यावरचा फ्लॅट घ्यायचं ठरवलं होतं ते लॉकडाऊन् मुळे रखडलं होतं. माझं कामाचं काँट्रॅक्ट रिन्यू न झाल्यामुळे २०२० जूनपासून मी घरीच होते. पण खूप काम करून लिहिलेला पहिलावहिला पेपर एका ऑनलाईन जरनलमधे छापूनही आला तेव्हा.
घराचं रखडलेलं काम पूर्ण केलं, पण ज्या दिवशी बँकेत लोन डिसबर्समेंट होती त्याच दिवशी नवर्याचा १५ वर्ष जुन्या प्रोजेक्टमधे शेवटचा दिवस होता, त्याच पहाटे फोन आल्यामुळे आम्ही कोल्हापूरला निघालो आणि अर्ध्या वाटेतच बाबा गेल्याचा मेसेज आला होता. बाबा कोविडने गेले. आई कोव्ड होऊन बरी झाली, पण खचलीच. आईला भेटून परत आले आणि म्ग पुन्हा जायची तयारी करत होते. मग त्याच आठवड्यात नवीन अपॉईंटमेंट मिळून बँकेत सह्या करून आलो. विमा, पॉलिसी वगैरे भानगडी ऐकताना अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू वगैरे ऐकून हातपाय थंडगार पडून बधीर होत होते ते आजही आठवतं.
नवीन घरात मी आधी जाऊन क्वारंटाईन राहिले कारण ५ दिवस कोल्हापूरला राहून आले होते. उगीच घरी माझ्या लहान मुलीला आणि ७० वयाच्या साबा-साबुना त्रास नको म्हणुन. मग दसर्याला गृहप्रवेश केला. अगदी साध्या पद्धतीनेच. ४-५ महिन्यात जरा रुळतोय तोवर दुसर्या लाटेत साबा, साबु आणि नवरा तिघे एकामागून एक पॉझिटिव. ते सगळे जुन्या घरात क्वारंटाईन. मी आणि माऊ खालच्या घरात. पुन्हा एकदा सगळं टेंशन. साबा-साबु विथ कोमॉर्बिड कंडीशन्स. रोज तारांबळ. एकूणच लॉकडाऊन, शाळा नाही, एक आजोबा कोविडने गेले, पुण्याचे आजी-आजोबा आणि बाबासुद्धा कोविडने आजारी या सगळ्याचा माझ्या माऊला खूप मानसिक त्रास झाला. तिचं पोट जे बिघडलं ते ४-५ महिने अनेक उपचारांनी बरं झालं. मधल्या काळात दीड वर्ष कामाला एकही मावशी नव्हत्या. घरकाम, माऊची शाळा, आजारपणं, मग माऊ आणि मी एकामागून एक वायरल इन्फेक्शनने आजारी म्हणुन सतत क्वारंटाईन. शेवटी मी म्हटलं आता कोणालाही काहीही झालं तरी क्वारंटाईन व्हायचं नाही. मी नवीन घरात सगळ्यात जास्त क्वारंटाईन होऊन निराश झाले होते.
आता चांगल्या गोष्टी. मधल्या काळात नवर्याने जॉब बदलला, चांगलं झालं सगळं. नर्सरीचं काम वाढलं आणि त्यात दमणूक झाली पण आर्थिक फायदाही झाला. मी अजूनही घरीच आहे, पण नवीन उद्योग लावून घेतलाय आता. नवीन कोर्सला सुरूवात झाली आजच. जरा स्थिरावलं सगळं की लिहीन त्याबद्दल.
मला काय मिळालं या वर्षात? खूप कणखरपणा. बाबांच्या दु:खातून बाहेर आलो तरी ते अनेक चांगल्या प्रसंगात आता ते नाहीत म्हणून डोळे भरून येतात, पण ते वरून नक्की आशीर्वाद देतायत ही भावना खूप खूप प्रबळ आहेच. डोळस श्रद्धा कशी असावी हे ते सांगत, ते आता उमजतंय.
पुढचा जास्त विचार न करता आज जे आहे ते सर्वोत्तम करायचं हे नक्की झालंय. थोडक्यात, इतकी वर्षं जे नुसतं कळत होतं, ते आता "वळतंय". हे जास्त आनंदाचं आहे. अपेक्षा नक्की कधी असाव्यात, कोणाकडून असाव्यात हे समज्तंय. कदाचित यामुळेच की काय, कधीतरी कुठल्या ना कुठल्या नात्यात बसलेल्या लहान-मोठ्या गाठी सैल होतायत. एकूणच, वरकरणी वजाबाकीच्या वर्षाने मानसिक बळ दिलंय आणि बेरीज कशी करायची ते समजलंय. फार फिलॉसॉफी झाडली का? असूदेत पण.
पुढचं वर्षं सगळ्यांनाच सुखाचं आणि चांगलं, आरोग्यदायी जावो यासाठी शुभेच्छा!
प्रज्ञा९, तुला एक जादु की
प्रज्ञा९, तुला एक जादु की झप्पी...
खुप छान प्रतिसाद.
बाबांच्या दु:खातून बाहेर आलो तरी ते अनेक चांगल्या प्रसंगात आता ते नाहीत म्हणून डोळे भरून येतात, पण ते वरून नक्की आशीर्वाद देतायत ही भावना खूप खूप प्रबळ आहेच >> अगदी खरं... आई वडीलांचा आशीर्वादाचा हात नेहेमी डोक्यावर असतोच.
कदाचित यामुळेच की काय, कधीतरी कुठल्या ना कुठल्या नात्यात बसलेल्या लहान-मोठ्या गाठी सैल होतायत >> +१११
प्रज्ञा९ खूप सुरेख लिहीलं आहे
प्रज्ञा९ खूप सुरेख लिहीलं आहे. दु:ख कुणालाच चुकलेलं नाही. पण त्या कठीण प्रसंगात माया, सचोटी, व धीराने वागणे फार कौतुकास्पद आहे. माऊला, तुम्हाला नि सर्व कुटूंबियांना खूप खूप शुभेच्छा.
प्रज्ञा __/\__
प्रज्ञा __/\__
प्रज्ञा, खरंच कठीण काळ.सर्व
प्रज्ञा, खरंच कठीण काळ.सर्व लवकर व्यवस्थित होऊदे जगात.
प्रज्ञा
प्रज्ञा
नवीन वर्षात सगळं चांगलं होईल ही शुभेच्छा.
सगळेच _/\_
सगळेच _/\_
या दोन वर्षांत एक गोष्ट कळाली. ती म्हणजे आपला आनंद आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये असतो. मग ते लोकं म्हणजे तुमचे कुटुंब, जवळचे नातेवाईक, मित्रपरीवार, कलीग, तुम्ही राहता ती सोसायटी, ते शहर, तो समाज.. ज्यांच्याशी तुमचा रोज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क येतो ते सारे सुखात, आनंदात, सुस्थितीत असतील तरच तुमच्या आयुष्यात घडणार्या चांगल्या गोष्टींना अर्थ आहे, अन्यथा त्या तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच कोरोनाची लाट कमी होताना बघणे, मार्केटमध्ये, गार्डनमध्ये पुन्हा गर्दी दिसणे, शाळा-कॉलेज ऑफिसेस चालू होणे. जनजीवन हळूहळू सुरळीत होणे यासारखा दुसरा आनंद नाही.
दिड दोन महिन्यापूर्वी दिवाळीच्या थोडेसे आधी आईचा हात फ्रॅक्चर झाला तर बायकोच्या माहेरच्या एकूण एक सदस्यांना एकाच वेळी कोरोना झाला. (हो, याचमुळे यंदा दिवाळीत दोन्ही घरात फराळ नाही झाला
) तिच्या बहीणी घरी होम क्वारंटाईन, भाऊ खालच्या घरात नजरकैदेत, तर आईवडील हॉस्पिटलला अॅडमिट. त्यांचे वय जास्त असल्याने आणि काही हेल्थ इश्यूमुळे त्यांनी वॅक्सिनही न घेतल्याने चिंतेचे कारण होते म्हणू शकतो. पण आम्हा कोणाला टेंशन असे आले नाही. आता कोरोनाचा विषाणू तितका जीवघेणा राहीला नाही वा आता मृत्युदर घटला आहे याची कल्पना असल्याने असावे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आजूबाजुच्या बदलत्या वातावरणाला पाहता आता हळूहळू मनात एक सकारात्मकता भरू लागलीय. आयुष्याची किंमत कळतानाच मृत्युचे भयही कमी झाले आहे. जे होईल ते बघून घेऊया असा विचार आपसूकच मन करू लागलेय.
हे सगळ्यांशीच झाले असावे असे नाही. प्रत्येकाचे या काळातले अनुभवही वेगळे आहेत. आणि त्या त्या नुसार प्रत्येकाची नव्याने जड्णघडण होत आहे.
सगळेच _/\_
सगळेच _/\_
चढ उतार पाहिले ह्या वर्षात खूप!
घरात मंगल कार्य झालं.
माझी good news डिसेंबर मध्ये समजली होती.
नंतर जीवघेणी उन्हाळ्यातली करोना लाट आली.
बाबा झगडून मृत्यूला टक्कर देऊन परत आले.
नवराही छान recover झाला.
.
पण मी माझी वहिनी आणि पिल्ल्याने त्याची आई गमावली.
हा धक्का अजून पचवतोय.
.
ओम जन्मला ऑगस्ट मध्ये
आणि आता घराचं possession सुद्धा मिळालं.
.
नवीन वर्ष छान जावो सर्वांनाच
निरामय आयुष्य लाभो हीच प्रार्थना
सर्वांनाच सदिच्छा.
सर्वांनाच सदिच्छा.
किल्ली, हे खरंच अनफेअर आहे
पण त्यातल्या त्यात बाकी सर्व पॉझिटिव्ह घटनांसाठी शुभेच्छा.
Pages