पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३८. मेरा साया (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 10 December, 2021 - 11:53


mera1.jpg

जेवण झाल्यावर रात्री उगाच चॅनेल सर्फिंग करत बसले होते. बघण्यासारखं काही दिसेल असं वाटत नव्हतं तरी. Hflicks2 चॅनेलवर तुरुंगातला अमिताभ आणि बाहेरून त्याच्याशी बोलणारी राखी दिसले. ह्या चॅनेलवर चित्रपटाचं नाव दाखवायची तसदी घेत नाहीत. चित्रपट दाखवतात हेच आपल्यावर उपकार. पण पुढल्या फ्रेममध्ये विनोद मेहरा दिसल्यावर 'ये कश्मीर है' फेम "बेमिसाल" असणार हे ताडलं. चित्रपट काही मिनिटातच संपला. 'बघू या तरी' पुढला कुठला लागतोय म्हणून थांबले. तर नाव आलं 'मेरा साया'. आता आली का पंचाईत. चित्रपट तर पाहायचाय. पण ह्या चॅनेलवर इतक्या जाहिराती दाखवतात की आपण कुठला चित्रपट पाहात होतो तेच माणूस विसरून जातो. पण म्हटलं 'हिम्मत-ए-मर्दा तो मदद-ए खुदा', "कल करे सो आज कर' वगैरे वगैरे वगैरे. पण सोशल डिस्टंन्सीन्गच्या ह्या काळात एकट्याने चित्रपट पाहून कंटाळा आलाय हो. येताय माझ्यासोबत? आधी तो मास्क लावा बघू तोंडाला. हां आता कसं. चला तर मग "मेरा साया" बघू यात.

तर चित्रपटाच्या सुरुवातीला मोठ्या बंगल्यासमोर, किंवा वाड्यासमोर म्हणा हवं तर, एक गाडी येऊन थांबते. त्यातून दोन लोक उतरतात. घाईघाईने आत शिरतात. बऱ्याच पायऱ्या चढून वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत शिरतात. तिथे पलंगाच्या उश्याशी एक वयस्कर बाई बसलेली असते तर पलंगावर एक तरुण स्त्री झोपलेली असते. त्या दोन लोकांतला एक डॉक्टर असतो. त्याला पाहून ती वयस्कर बाई, म्हणजे राधामावशी, म्हणते 'डॉक्टर काय झालंय बघा ना माझ्या गीताला'. डॉक्टर तपासतो आणि तिच्यावर डाफरतो 'एव्हढा ताप होता आणि मला आत्ता कळवताय? आधी का कळवलं नाहीत? ठाकूरसाहेब विलायतेला जाताना घराची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेले होते. आता काय झालं तर मी त्यांना काय उत्तर देणार.' ती स्त्री कळवळून म्हणते की एकदम आजार एव्हढा बळावेल असं वाटलं नव्हतं. मग डॉक्टर वड्याचं तेल वांग्यावर काढत दुसऱ्या माणसावर, जो मुन्शी असतो, डाफरत ठाकूरसाहेबांना केबल करायला सांगतो आणि स्वतः हॉस्पिटलला फोन करून ऑक्सिजन मागवतो. पुढच्याच शॉटमध्ये उदयपूर एयरपोर्टवर एक विमान उतरतं. प्रवाश्याच्या गर्दीतून एक तरुण झपाझप चालत जातो. बंगल्यात पोचून त्या खोलीत तो शिरतो. गीताजवळ जातो. ती काही बोलायचा प्रयत्न करते पण खूप उशीर झालेला असतो. त्याच्यासमोरच ती अखेरचा श्वास घेते. गीताच्या अकाली जाण्याने सगळं घर दु:खी होतंच पण आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूचा त्या तरुणाला, ठाकूर राकेश सिंगला, जबरदस्त धक्का बसतो. तिची आठवण कायम राहावी म्हणून तो वाड्यात 'गीता स्मृती' ह्या नावाने तिची समाधी बांधतो आणि तहान-भूक विसरून तिच्या फोटोचे आल्बम बघत, तिची गाणी ऐकत दिवसचे दिवस तिथे बसू लागतो. ते पाहून राधामावशीला त्याची काळजी वाटायला लागते.


mera1.jpg

आणि तश्यात एक दिवस राकेशला भेटायला इन्स्पेकटर दलजीत येतो. आधी तर राधामावशी त्याला तो भेटणार नाही असंच सांगते. पण दलजीत फारच महत्त्वाचं काम आहे असं म्हणतो म्हणून ती त्याला राकेशकडे घेऊन जाते. राकेशची स्थिती पाहून दलजीतही हबकतो. पण ज्या कामासाठी तो आलेला असतो त्याबद्दल राकेशला सांगणं त्याला भाग असतं. काही दिवसांपूर्वी पोलिसांची डाकूंच्या एका टोळीशी चकमक झालेली असते. त्यात २ डाकू मारले जातात, उरलेले पळून जातात. पण ह्या झटापटीत एक स्त्री त्यांच्या हाती लागते. जेव्हा ते आसपासच्या गावात डाकूंची ओळख पटवतात तेव्हा ह्या स्त्रीविषयी गावकऱ्याकडे चौकशी करतात. आधी तर तिला कोणीच ओळखत नाही. पण मग गावचा मुखिया सांगतो की ही रैना आहे. मागच्या वर्षीच्या उत्सवात मंदिरासमोर तिनेच नौटंकी केली होती. गावकऱ्यांना त्यात गुंतवून तिच्या डाकू साथीदारांनी सराफांच्या दुकानावर हल्ला केला होता आणि तिने मुखियाच्या हातावर खंजीराने वार केला होता. जेव्हा ती स्त्री हे ऐकते तेव्हा ती निक्षून सांगते की मी हे असलं काहीही केलेलं नाही कारण मी ठाकूर राकेशसिंगची पत्नी गीता आहे.दलजीतकडून ही हकीकत ऐकून राकेशला हसावं की रडावं हेच कळत नाही. पण दलजीत त्याला घरातल्या माणसाना घेऊन दुसऱ्या दिवशी ओळख परेडसाठी पोलीस स्टेशनवर यायची विनंती करतो. राकेश ती मान्यही करतो.

पोलीसस्टेशनमध्ये मात्र घरचे सगळेच - राधामावशी, मुन्शी, नोकर बांके, राधामावशीच्या हाताखाली काम करणारी सरगम - त्या रैनाला पाहून अवाक होतात. ती हुबेहूब गीतासारखी दिसत असते. इतकंच काय तर तिची बसण्याची ढबही गीतासारखीच असते. ओळखपरेड मध्ये ठाकूर म्हणून आधी २-३ वेगळ्याच पुरुषांना तिच्यासमोर आणलं जातं. प्रत्येक वेळी ती हा माझा नवरा नाही म्हणते. जेव्हा राकेश येतो तेव्हा मात्र ती त्याला बरोबर ओळखते. तो तिला अजिबात ओळख दाखवत नाही. पण ती परोपरीने त्याला सांगत राहाते की मी तुझी पत्नी गीता आहे.तर तो म्हणत राहतो की माझ्या पत्नीचा मृत्यू झालाय. तू माझी गीता असूच शकत नाहीस. पत्नीच्या मृत्यूने सैरभैर झालेल्या राकेशची ह्या नव्या पेचामुळे झालेली अवस्था राधामावशीला सहन होत नाही. ती दलजीतला सांगते की तुम्ही पुन्हापुन्हा त्याला इथे बोलावून त्याच्या दु:खावरची खपली काढू नका. अश्याने तो ह्या दु:खातून कधीच सावरू शकणार नाही. राकेशबद्दल सहानुभूती असल्याने दलजीतही ह्याला संमती देतो.

तर इथे रैनाला पोलिसांनी पकडून नेलंय म्हटल्यावर फरार झालेले डाकू अस्वस्थ होतात. त्यांचा सरदार बाकीच्यांना सांगतो की काहीही करून आपल्याला तिच्यापर्यंत पोचायला हवं. त्याप्रमाणे एक म्हातारी बाई मुद्दाम पोलीस स्टेशनसमोर कोणाचा तरी खिसा कापायचा प्रयत्न करते. तिला रैनाच्याच कोठडीत ठेवलं जातं. तेव्हा ती रैनाच्या हातात एक चिठ्ठी देते. ती वाचून रैना हबकते. तिला काही कळायच्या आत ती म्हातारी तिच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेते आणि गिळून टाकते.

गावातल्या हल्ल्यात मदत केली आणि मुखियावर हल्ला केला म्हणून रैनावर गुन्हा दाखल होतो. आणि यथावकाश कोर्टात केस उभी राहते. तिथेही प्रॉसिक्युशनच्या वकिलाला रैना सांगत राहते की मी राकेशसिंगची पत्नी गीता आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. जेव्हा न्यायाधीश तिला तुझा कोणी वकील आहे का असं विचारतात तेव्हा ती म्हणते की माझा नवरा राकेश सिंग प्रसिद्ध वकील आहे. तोच माझी वकिली करायला हवा आहे. अर्थात राकेश प्रॉसिक्युशनच्या बाजूने साक्षीदार असल्याने कोर्ट ह्याची परवानगी देत नाही. रैना आणखी कोणालाही वकील म्हणून स्वीकारायला नकार देते आणि स्वतःचा बचाव स्वतःच करायचा ठरवून पहिला साक्षीदार म्हणून चक्क राकेशलाच बोलावते. प्रॉसिक्युशनच्या वकिलाची खात्री असते की राकेशसारख्या कसलेल्या वकिलासमोर रैनाचा अजिबात टिकाव लागणार नाही.

राकेश जेव्हा कोर्टात येतो तेव्हा तर तो रैनाचं काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीतच नसतो. त्याचां म्हणणं एकच - माझी पत्नी माझ्यासमोर गेली. मी माझ्या हातांनी तिला अग्नी दिला त्यामुळे ही गीता असूच शकत नाही. ह्याला साक्षीपुराव्याची गरजच काय? पण न्यायाधीश तिला आपली बाजू मांडायचा हक्क आहे ह्याची त्याला जाणीव करून देतात. तेव्हा गीताने प्रश्न विचारावेत आणि राकेशने उत्तर द्यावीत असं ठरतं. रैना त्याला ३ वर्षांपूर्वी आपलं लग्न झालं होतं असं सांगून बरोबर तारीख सांगते. तू प्रेमाने कधीकधी मला 'गीते' म्हणायचास ह्याची आठवण करून देते. तो म्हणतो हे सगळं बरोबर आहे पण हे तर सगळयांनाच माहित आहे. न्यायाधीश रैनाला सल्ला देतात की फक्त राकेश आणि गीतालाच माहीत असतील अश्या गोष्टींबद्दल विचार. ती लग्न झाल्यावर गाडीत बसताना तो काय म्हणाला होता हे अचूक सांगते. पण राकेश म्हणतो की तेव्हा गाडीत ड्राइव्हर होता त्याच्याकडून तुला ही माहिती मिळाली असेल किंवा माझं 'सुषमा' नावाचं पुस्तक आहे त्यात सुध्दा ह्याबद्दल लिहिलंय. मग ती त्याला आपल्याला बाळ व्हावं ह्यासाठी नवस करायला मंदिरात जायला मी तुला कसं राजी केलं त्याबद्दल सांगते. तर तो म्हणतो की ह्याबद्दलही सगळयांना माहीत आहे. शेवटी ती त्याला सांगते - "तुझा शर्ट काढ". क्षणभर सगळेच अवाक होतात. राकेश तर आधी नकारच देतो. तेव्हा रैना सांगते की तुझ्या पाठीवर उजव्या बाजूला तीळ आहे. जेव्हा न्यायाधीश राकेशला शर्ट काढायला सांगतात तेव्हा त्याच्या पाठीवर उजव्या बाजूला तीळ बघून कोर्टात खळबळ माजते. प्रॉसिक्युशनचे वकिल तर खाजगीत म्हणतातही की माझा भुताखेतांवर विश्वास नाही म्हणून बरं नाही तर मी म्हटलं असतं की ही बाई भूत आहे. राकेशही घरी जाऊन राधामावशीला विचारतो की मी परदेशात असताना तुम्ही कोणी नवा नोकर ठेवला होता का? ती तर नाही म्हणते पण मुन्शी म्हणतो की तेव्हा घरात चोरी झाली होती पण चोरीला काहीच गेलं नाही. ह्या अतरंगी बोलण्याकडे राकेश अजिबात लक्ष देत नाही.

रैना न्यायालयात सांगते की तिला राकेशशी एकट्याशी बोलायचं आहे. तिला कोर्टाकडून तशी परवानगीही मिळते. तिच्याशी बोलून झाल्यावर हैराण झालेला राकेश न्यायाधीशाना सांगतो की "रैनाने मला अश्या काही गोष्टी सांगितल्या ज्या फक्त माझी बायकोच सांगू शकते. पण हे सगळं अतर्क्य आहे कारण माझी बायको माझ्या डोळ्यांदेखत गेली. मी तिच्या चितेला माझ्या हातांनी अग्नी दिलाय". ह्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो रैनाची उलटतपासणी घ्यायची परवानगी मागतो. पण राकेश रैनाच्या बाजूने साक्षीदार असल्याने ते शक्य नसतं. शेवटी ही एक विचित्र केस आहे म्हणून प्रॉसीक्युशनच्या बाजूने वकील म्हणून रैनाची उलटतपासणी घ्यायची परवानगी त्याला न्यायाधीश देतात.

उलटतपासणीच्या वेळी राकेश तिला विचारतो की तू आपल्या कोणा नातेवाईकाला तुझ्या बाजूने साक्ष द्यायला का बोलावलं नाहीस? ती म्हणते की तुला माहीत आहे तुझ्या बायकोला कोणी बहीणभाऊ, नातेवाईक नव्हते. मग राकेश विचारतो की तू माझी बायको आहेस तर त्या डोंगरावरच्या जंगली भागात तुला पोलिसांनी अटक केली तिथे तू काय करायला गेली होतीस? ती म्हणते मला डाकुंनी उचलून नेलं होतं. ह्यावर तो विचारतो की कुठून नेलं. ती म्हणते मी रात्री घराबाहेर पडले होते. ह्यावर राकेशचा रोकडा सवाल म्हणजे तू गायब झाल्यावर घरातल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार का नाही केली? ती म्हणते तू तर परदेशात होतास हे तुलाही माहीत आहे. तो म्हणतो की माझी बायको आजारी होती. २ डाकू पोलिसांबरोबरच्या चकमकीत मारले गेले, त्यांचा सरदार फरार आहे. तू जे सांगते आहेस त्याला काय पुरावा आहे? ह्यावर रैना निरुत्तर होते.

आणि मग राकेश एक गुगली टाकतो. तो रैनाला विचारतो की तुझं मंगळसूत्र कुठे आहे? तुला डाकू उचलून घेऊन गेले तेव्हा तुझ्याकडे होतं का? ती म्हणते नव्हतं. तो विचारतो का नव्हतं. ती म्हणते मी बाहेर जाण्याआधी काढून ठेवलं होतं. तो म्हणतो गीताने असं कधीच केलं नसतं. मग तो खिशातून मंगळसूत्र काढून दाखवत तिला म्हणतो की ते तुझ्याकडे असूच शकत नाही कारण माझ्या बायकोचं मंगळसूत्र माझ्याकडे आहे. तिला अग्नी देण्याआधी तिची आठवण म्हणून मी काढून घेतलं होतं. ह्यावर रैनाचा चेहेरा उजळतो. ती त्याला आठवण करून देते की तो परदेशात जायच्या दिवशी ते मंगळसूत्र कसं वाढवलं होतं, अपशकुन म्हणून तो जायचं रद्द करणार होता पण तिने त्याला समजावून ते सोनाराकडून ठीक करून आणवलं होतं. हे ऐकून राकेश पुन्हा चक्रावतो. हे हिला कसं माहीत? मग त्याला आठवतं की गीताला डायरी लिहायची सवय होती. तो घरी जाऊन डायरी शोध शोध शोधतो पण ती गायब झालेली असते. मग तो कोर्टात रैनाला विचारतो की तू गीता आहेस तर तू डायरी लिहायचीस ती आत्ता तुझ्याकडे आहे का? ती म्हणते घरी असेल. तो म्हणतो मला मिळाली नाही. कुठे ठेवली आहेस ते सांग. ती भांबावते. आठवत नाही म्हणते. त्यावर भयानक चिडलेला राकेश तू माझी बायको नाहीस, दुसरीच कोणीतरी आहेस असा आरोप पुन्हा करतो तेव्हा मात्र रैनाच्या वागण्यात अचानक बदल होतो. आपण डाकूंच्या टोळीत होतो आणि हे सगळं नाटक करत होतो असं ती कबूल करते पण तिचं मानसिक संतुलन ढळल्याचं पाहून न्यायाधीश तिची रवानगी तात्पुरती एका मानसिक रुग्णांच्या इस्पितळात करतात.पण तिथेही तिची एकच विनंती असते - मला फाशी देण्याआधी एकदा माझ्या नवऱ्याला भेटू द्या.

कोण असते ही स्त्री? राकेशची बायको गीता? का डाकूंच्या टोळीतली रैना? ही गीता असते तर जिला राकेशने अग्नी दिलेला असतो ती कोण असते? आणि ही रैना असते तर गीता असल्याचं भासवण्यात तिचा काय उद्देश असतो? डाकू तिच्यापर्यन्त पोचायचा प्रयत्न का करत असतात?


mera1.jpg

चित्रपटातल्या गाण्यांना मदनमोहनचं संगीत आहे एव्हढं सांगितलं तरी पुरे. खरं तर हेही सांगायची गरज नाही कारण गोल्डन एरातल्या चित्रपटसंगीताच्या चाहत्यांना ह्यातली सगळी गाणी तोंडपाठ असतीलच. लता मंगेशकरने गायलेलं टायटल सॉंग 'तू जहाँ जहाँ चलेगा' दोन वेळा चित्रपटात येतं. 'नैनोमे बदरा छाये' ह्या राग भीमपलासी वर आधारलेलया गाण्यासाठी मदनमोहनला 'सूर सिंगार' हे अ‍ॅवोर्ड मिळाल्याची माहिती विकीवर मिळते. वर्तमानकाळात राकेशला ते आठवतं तेव्हा गाण्याचे स्वर दुरून आल्याचा भास होतो. भूतकाळात गीता जेव्हा हे गीत गात असते तेव्हा स्वर नॉर्मल होतात. आणि भूतकाळातून त्याचं मन पुन्हा वर्तमानकाळात येतं तेव्हा पुन्हा स्वरात दुरून आल्याचा भास होतो. 'तू जहाँ जहाँ चलेगा' पेक्षाही 'नैनोमे बदरा छाये' आणि 'आपके पहलूमे आकर रो दिये' मला कांकणभर जास्त सरस वाटतात. त्यामानाने 'झुमका गिरा रे' आणि 'नैनोवालीने हाय मेरा दिल लुटा' मला फारशी आवडत नाहीत. आणि हो, गाण्यांचे शब्द राजा मेहंदी अली खान ह्यांचे.


mera1.jpg

चित्रपटाच्या कास्टबद्दल म्हणाल तर ठाकूर राकेश सिंगच्या भूमिकेत सुनील दत्त म्हणजे अगदी पर्फ़ेक्ट नवरा मटेरिअल आहे. एव्हढा हॅण्डसम नवरा, तोही सालस, श्रीमंत आणि घरी सासू-दीर-जावा-नणंदा वगैरे गोतावळा नाही म्हणजे तर अनुरूप स्थळ (दिवा घ्या!) पत्नीच्या प्रेमात आकंठ बुडालेला मिश्किल राकेश त्याने अचूक वठवला आहे. पत्नीला स्वतः:च्या हातांनी अग्नी दिला असताना तिच्यासारखीच हुबेहूब दिसणारी स्त्री समोर येऊन ठाकली तर एखाद्याचं काय होईल तेही त्याने यथास्थित व्यक्त केलंय. पण रैना गीता नाहीये हे सिद्ध करता न आलेला, तिच्या अचूक उत्तरं देण्यामुळे चिडलेला राकेश उभा करण्यात तो कमी पडलेला आहे असं मला वाटलं. त्यामानाने साधनाने पतीच्या प्रेमात, संसारात रमलेली गीता आणि कोर्टात स्वतःला गीता सिद्ध करू पाहणारी रैना ही दोन्ही रुपं समजून-उमजून साकारली आहेत. रैनाच्या भूमिकेत तर ती विदाऊट मेकअप आहे की काय अशी शंका यावी इतकी साधी दिसते. अर्थात हे रुप त्या व्यक्तिरेखेला साजेसंच आहे. नाहीतर १९६६ सालीच आलेल्या 'दो बदन' नावाच्या चित्रपटाच्या शेवटी 'लो आ गयी उनकी याद' ह्या गाण्यात पार्टीला चाललेय की काय असं वाटावं असा मेकअप करून आशा पारेख मरणासन्न होऊन बिछान्यावर पडलेली दिसते Happy

प्रॉसिक्युशनच्या अनुभवी वकिलाच्या भूमिकेत के. एन. सिंग दिसतात. प्रेम चोप्राच्या वाट्याला डाकूंच्या सरदाराची भूमिका आलेली आहे. बाकी कलाकार म्हणजे रत्नमाला (राधामावशी), अन्वर हुसेन (इन्स्पेक्टर दलजीत), धुमाळ (बांके), मुक्री (मुन्शी), शिवराज (फॅमिली डॉक्टर) आणि मनमोहन (मानसिक रुग्णांच्या इस्पितळातला डॉक्टर).

१९६६ साली आलेला हा चित्रपट 'पाठलाग' ह्या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे हे मला माहीत नव्हतं. असो. तर डोकं बाजूला ठेवून बघायचं म्हटलं तरी काही प्रश्न डोक्यात येतातच. अशी चित्रपटातली मला जाणवलेली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे राकेश बाकी काहीही घोळ न घालता रैनाला एकच प्रश्न का विचारत नाही - तू जर गीता आहेस तर माझ्या डोळ्यांसमोर गेली ती कोण होती? मामला तिथेच खतम झाला असता ना. अर्थात मग इंटर्व्हललाच चित्रपटाचा 'द एंड' झाला असता म्हणा. बरं रैनाला कोणत्या गुन्ह्यासाठी फाशी द्यायची मागणी होत असते तेही कळलं नाही. तिचा गुन्हा म्हणजे डाकूंना गावात डाका घालण्यासाठी तिने मदत केलेली असते आणि मुखियाला चाकू मारलेला असतो. मुखिया तर हातीपायी धड दाखवलाय मग फाशी कश्यासाठी? राधामावशी राकेशची मावशी असते का घरात असलेली एखादी वडीलधारी स्त्री? डाकूंकडून ती म्हातारी बाई चिठ्ठी घेऊन येते त्यात काय लिहिलेलं असतं? घरातून काही चोरीला गेलं नाही तर चोरी झाली होती असं मुन्शी का म्हणतो? घरातली मोलकरीण सरगम रोज रात्री कुठे जात असते? ह्या सर्व प्रश्नांचा उलगडा होत नाही. आणखीही काही प्रश्न पडतात पण ते रहस्यभेद करतील म्हणून लेखाच्या शेवटी लिहिते.

चित्रपटात बाकीही काही गंमतीजंमती आहेत. उदा. गीताला ताप आलाय म्हटल्यावर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये फोन करून थेट ऑक्सिजन मागवतो. कोर्टात गीता राकेशला शर्ट काढायला सांगते तेव्हा राकेश अवाक होतो. ह्यावर खुद्द न्यायाधीशच त्याला म्हणतात की देवाचे आभार मान फक्त शर्टच काढायला सांगितलंय. ह्यावर पब्लिक हसतं आणि न्यायाधीश महोदय 'ऑर्डर ऑर्डर' म्हणतात. रैनाला मानसिक रुग्णांच्या हॉस्पिटलात ठेवल्यावर तिथल्या डॉक्टरला म्हणजे मनमोहनला दुसरा डॉक्टर अगदी गंभीर चेहेरा करून सांगतो की मला असं वाटतं की हिला शॉक द्यायला हवा. जणू काय मानसिक आजारावर शॉक देणं हीच एक ट्रीटमेन्ट आहे. खरं तर त्या डॉक्टरलाच शॉक द्यायची गरज आहे असं वाटतं.

चला, गाण्यांबद्दल लिहिलं, कास्टबद्दल लिहिलं. बाकी उरलं काय? हं, ते रहस्य काय आहे ते लिहायचं राहिलंय. चित्रपट पहाणार असाल तर मात्र ही लक्ष्मणरेषा ओलांडू नका Happy

तुम्हाला वाटतं तसंच गीताला एक जुळी बहीण असते - निशा. पण ती त्यांच्या आईसारखीच ‘आवारा'(ह्याचा काय अर्थ घ्यायचा ते प्रेक्षकांनी ठरवायचं) असते. त्यांच्या आईला गीतालाही त्याच मार्गाला लावायचं असतं म्हणून ती कंटाळून जीव द्यायला निघते तेव्हा तिच्या आयुष्यात राकेश येतो. अर्थात चित्रपटात एके ठिकाणी राधामावशीने सांगितलं म्हणून गीताशी लग्न केलं असा उल्लेख येतो. त्यामुळे हा प्रेमविवाह का कांदेपोहे हे समजत नाही. असो. तर राकेशच्या घराण्याच्या इभ्रतीला डाग लागू नये म्हणून गीता जगात आपलं कोणीच नसल्याची थाप मारते. पण राकेश परदेशात जातो तेव्हा एके रात्री निशा आजारी अवस्थेत तिच्या घरी येते. ती सरळ वरच्या मजल्यावरच्या गीताच्या बेडरूममध्ये बाल्कनीतून कशी येते हा संशोधनाचा विषय ठरावा. पुन्हा एकदा असो. तर निशा तिला एक रात्र मला तुझ्याकडे ठेवून घे, सकाळी मी निघून जाईन असं म्हणते. रात्रभर गीता तिच्या उशाशी बसून राहते. सकाळी कोणीतरी वरती येईल आणि आपलं भांडं फुटेल ह्या भयाने ती सकाळी राधामावशीला सांगते की मी आज राकेशसाठी उपास करणार आहे आणि दिवसभर गीता वाचणार आहे तर कोणी मला डिस्टर्ब् करू नका. त्या रात्रीही निशाचा ताप उतरत नाही तेव्हा गीता तिच्यासाठी औषध आणायला बाहेर पडते. जाताना आपली एक साडी तिला नेसवून आणि आपलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून जाते. जेणेकरून कोणी खोलीत आलंच तर गीता झोपली आहे असं वाटावं.

पण गीताला हे माहित नसतं की निशाचं लग्न डाकूंचा सरदार रणजित सिंगशी झालेलं असतं. त्याने हे सगळं सोडून द्यावं म्हणून निशा त्याच्याशी भांडत असते. तो ऐकत नाही तेव्हा ती त्याला सोडून पळून जाते आणि गीताकडे येते. तिच्या शोधात असलेला रणजित सिंग निशा समजून गीताला उचलून नेतो. गीताला बोलायची संधीही मिळत नाही. आपली चूक लक्षात आल्यावर तो तिला राकेशकडे परत सोडायचा प्रयत्न करतो पण त्यांची पोलिसांशी चकमक होते आणि त्याला पळून जावं लागतं. हॉस्पिटलमधून पळून आलेली गीता हे राकेशला सांगत असते तेव्हा रणजितसिंग तिथे येतो पण राकेशच्या घरावर नजर ठेवून असलेले पोलीस त्याला गोळी घालतात. मरायच्या आधी तो गीता खरं बोलतेय हे सांगतो. इथेही मला अनेक प्रश्न पडले. केस कोर्टात उभी राहते तेव्हा आपली बहिण ह्या जगात नाही हे गीताला कळलेलं असतं मग ती आपली बहिण होती हे ती का सांगून टाकत नाही? लग्नच मोडतंय म्हटल्यावर नवऱ्यावर प्रेम करणारी कोणतीही स्त्री असंच म्हणेल ना की घराण्याची इभ्रत वगैरे जाऊ दे खड्ड्यात. काय आहे ते मी स्वच्छ सांगून मोकळी होते.

काय मग? कसा वाटला पिक्चर? ह्या रहस्यात फारसं काही रहस्य नाहीये हे मान्य. त्यामुळे गरिबीत वाढलेला, आजारी आई असलेला हिरो आणि श्रीमंत बापाची एकुलती एक लाडावलेली लेक असलेली हिरोईन असा साचेबध्द फॉर्म्युला नसलेला, डोक्याला फारसा त्रास न देणारा, माफक रहस्य असलेला चित्रपट पाहायचा असेल किंवा साधना अथवा सुनील दत्तचे पंखे असाल तर पहा बुवा. न पाहाल तरी काय वांदो नथी Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. मला आवडतो हा चित्रपट. गाणी तर सगळी सुंदरच आहेत. 'पाठलाग' वर हा आधारित आहे हे माहिती आहे. पाठलाग बघितला नाहीये पण.

माझा आवडलेला पिक्चर आहे. पाठलाग मात्र पहायचा राहिलाय.

नैनो में बदरा छाये हे माझे अगदी आवडते गाणे आहे.

एक रिक्षा: https://songstuk.blogspot.com/2015/07/naino-mein-badara-chhaye.html

छान लिहिलं आहे. साधना अतिशय आवडती अभिनेत्री त्यामुळे हा चित्रपट आवडलेला. पाठलागही बघितला होता पण मेरा साया जास्त आवडला.
'नैनो मे बदरा छाये' विषयी खूप लिहिलं जातं पण मला स्वतःला 'आपके पेहलू मे आके' आणि 'नैनोवालीने हाय मेरा दिल लूटा" जास्त आवडतात. विशेषतः 'नैनोवाली' मधे कडव्यांच्या मधले शेर (रफी वा सुनील दत्तच्या आवाजात) आणि मग साधना वा लताच्या आवाजातील अवखळ प्रत्युत्तर मस्त जमले आहे. 'आपके पेहलू' मधलीही उदासी जाणवून जाते.
मेरा सायाच्या वेळीच साधनाचा थायरोईड विकार बळावायला सुरवात झाली होती त्यामुळे चित्रपटातही तिचा बदललेला चेहरा दिसतो. 'झुमका गिरा रे' मधली साधना आणि 'नैनोमे बदरा छाये' मधील साधना वेगळ्या वाटतात.

वेल्कम बॅक स्वप्ना! Happy
लेख छान झालाय. मी पाठलाग पाहिलाय पण हा नाही पाहिला. आता मेरा साया बघते. अर्थात कंपॅरिझन करायची असेल तर पाठलाग पण परत पहावा लागेल कारण तो जरा जरा विसरायला झालंय.

गाणी चांगली होती सिनेमाची.
पिक्चर मध्ये जिथे जिथे जुळी भावंडं असतात आणि जिथे जिथे थोड्या वेळासाठी अदलाबदल होते तिथे गोंधळ हा झालाच पाहिजे

तुझा गुमनाम चा लेख वाचून मुलीला तो दाखवला होता, तर तिला खूप आवडला.आता हा पण एकदा दाखवते.

छान लिहिलं आहेस स्वप्ना.

पाठलाग सिनेमाची मूळ कथा माझ्या सासर्यांनी लिहिली होती. त्यांचं नाव ज. ग. देवकुळे. कथेचं नाव 'आशा परत येते'

स्वप्ना, छान लिहले आहेस. आणि धन्यवाद बर का. ज्या चित्रपटांची गाणी माहित आहेत पण चित्रपट पहिला नाही आणि आता बघण्याचे पेशन्स आणि वेळ सुद्धा नाहीये अशा चित्रपटांच्या तुझ्या या मालिकेतून ओळख होतेय त्यामुळे धन्यवाद.
पूर्वी चित्रपटांच्या स्टोरीचे पुस्तक मिळत असे अगदी संवादही असत त्यात. मी राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचा मेहबूबा असाच वाचला होता. पण कधी वाटतच नाही की मी तो चित्रपट पाहिला नाही. तसेच तुझ्या या मालिकेतून न पाहिलेले चित्रपट पाहिले गेलेत.

स्वप्ना, बर्याच दिवसानी आलीस आणि तेही माझा आवडता चित्रपट घेउन..

खुपच छान लिहिले आहेस.... मी दुरदर्शनवर हा चित्रपट पाहिलाय. मुळ पाठलाग पण पाहिलाय. श्रेयनामावलीत मुळ लेखकाला श्रेय दिलेले आहे त्यात.

त्या वेळची सामाजिक स्थिती व मुल्ये आता बदललेली आहेत. मला तेव्हाही ही बया सान्गुन का टाकत नाही हा प्रश्न पडलेला. नवरा बायको कोर्टात एका खोलीत जाऊन गुप्त सन्वाद करतात निदान तेव्हा तरी बापड्या नवर्याला सान्गावे, तो बाय्को मेली ह्या दु:खातुन तरी बाहेर पडेल. (तो गुप्त सन्वाद प्रेक्षकाना दाखबला नाही म्हणुन माझी तेव्हा निराशा झाली होती Happy )

नैनोवाली ने हाय मेरा दिल लुटा त्यातल्या सन्वादासकट आवडते. बाकी लता व मदन मोहन एकत्र आले की मग बोलायला नकोच. नुसते ऐकायचे....

स्वप्ना, छानच. खुप दिवसांनी लिहिलंस.
आता बिना लॉजिक कथा वाटली तरी जेव्हा पाहिला तेव्हा भारी वाटलेला. गाणी तर लाजवाब.
नैनोमे बदरा अतिशय आवडतं गाणं.

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स. खूप दिवसांनी लिहिलं. माझं स्वतःचं मत हे की हा लेख जमला नाही. पण अजून थांबले असते आणि तेव्हढ्यात आणखी एखादा पिक्चर बघून झाला असता तर बॅकलॉग होत राहिला असता म्हणून पांढर्‍यावर काळं करून टाकलं इतकंच. गोड मानून घेतलंत त्याबद्दल मंडळ आभारी आहे Happy नताशा तुमच्या सासर्‍यांनी पाठलागची मूळ कथा लिहिली आहे हे भारीच. मराठी पिक्चर पहायला सुरुवात करेन तेव्हा तो नक्की पाहेन.

नैनोमे बदरा छाये च्या दुसर्या कडव्याच्या आधी व्हायलीनची सुरावट् आणि पुढे लताचा आलाप... किती वेळा ऐकले तरी गोडवा कमी होतच नाही.

चांगला झालाय लेख.
चित्रपट पाहिलाय. खूप वर्ष झाली तरी लेखात लिहिलेले डिटेल्स आठवले. कोर्ट सीनमध्ये साधनाने तडफड चांगली दाखवली आहे.

मला "झुमका गिरा रे " आवडतं. आशाच्या गाण्यातला अभिनयासाठी विशेष.

मला तेव्हाही ही बया सान्गुन का टाकत नाही हा प्रश्न पडलेला. नवरा बायको कोर्टात एका खोलीत जाऊन गुप्त सन्वाद करतात निदान तेव्हा तरी बापड्या नवर्याला सान्गावे, तो बाय्को मेली ह्या दु:खातुन तरी बाहेर पडेल. (तो गुप्त सन्वाद प्रेक्षकाना दाखबला नाही म्हणुन माझी तेव्हा निराशा झाली होती Happy ) >>>>> साधनाताई +10000 (कंसासकट Wink )
पण तरीही चित्रपट खिळवून ठेवतो हे खरं .

छान लिहीले आहे. पाठलागवरून घेतला आहे इतके वाचले होते आणि साधारण स्टोरी माहीत होती पण इतके डिटेल्स माहीत नव्हते.

टायटल साँग आवडते आहेच पण नैनोंमे बदरा छाये हे फारच सुंदर गाणे आहे. आवाज, चाल, संगीत सगळेच.

यातच एक सीन आहे बहुधा ज्यात सुनील दत्त मागून येउन साधनाचे डोळे झाकतो- "ओळख पाहू कोण?" म्हंटल्यासारखे. ठाकूर की हवेली सेट अप मधे खुद ठाकूर सोडून दुसरे कोण येणार आहे इतकी जुर्रत करायला? Happy

>>यातच एक सीन आहे बहुधा ज्यात सुनील दत्त मागून येउन साधनाचे डोळे झाकतो- "ओळख पाहू कोण?" म्हंटल्यासारखे. ठाकूर की हवेली सेट अप मधे खुद ठाकूर सोडून दुसरे कोण येणार आहे इतकी जुर्रत करायला?

एका गाण्यात मीनाकुमारी लग्नाच्या रात्री खोलीत येते तेव्हा नवरा राजकुमारही तिचे डोळे झाकतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय Proud तेव्हा तिने तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराचं नाव घेऊन राकुचा पचका करायला हवा होता असं मला प्रकर्षाने वाटलं होतं. बाकी तो प्रियकर दुसरा राकु उर्फ राजेन्द्रकुमार असतो. राजकुमार आणि राजेन्द्रकुमार म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहिर तश्यातला प्रकार.

नताशा

छान

अजून कुठल्या कथा लिहिल्या त्यांनी ?

नेहमीप्रमाणे छान लेख .
माझा आवडता चित्रपट आहे हा. गाणीही आवडतात.
लहानपणी पाहिलेला. जुळी बहीण असल्याचे इतके काय लपवायचे असे त्या वेळीही वाटल्याचे आठवते.

जुळी बहीण असल्याचे इतके कसे गुप्त राहील ?
लहानपणापासून दोघी आहेत हे शेजारीपाजारी माहीत असेलच की

लोक लग्नात नवर्यासमोर विचारतील देखील , अरे 'तेरी जुडवा बहन किधर है ?

Happy
नाहीतर काय.
आम्हाला साधी अमेझॉन डिलीव्हरी आली तर शेजारी पाजारी विचारतात काय मागवलं.
आख्खी बहीण लपवायची (आणि धूम ३ मध्ये आख्खा भाऊ लपवायचा) म्हणजे चेष्टा नाही.

Lol
छान लिहिले आहे.
नैनोमें बदरा छाये या गाण्यात आवाज घुमतो ते फार आवडते. साधना सुंदर दिसलीये पण सुनील दत्त :बदाम:

पाठलाग सिनेमाची मूळ कथा माझ्या सासर्यांनी लिहिली होती. त्यांचं नाव ज. ग. देवकुळे. कथेचं नाव 'आशा परत येते' >> वा मस्तच नताशा! मी परवाच विकीवर वाचले त्याबद्दल. फार मस्त वाटले की एका कथेवर आधारीत मराठी पिक्चर आला आणि मग त्याचा हिंदी रिमेक झाला.

" ठाकूर की हवेली सेट अप मधे खुद ठाकूर सोडून दुसरे कोण येणार आहे इतकी जुर्रत करायला?" - Lol

"राजकुमार आणि राजेन्द्रकुमार म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहिर तश्यातला प्रकार." - Lol - मला तर हल्ली अशी शंका येते की आपण जसं मागच्या पिढीने कुणालाही डोक्यावर घेतलं म्हणून हसतो, तसंच अजूनही हीरोची कामं करणारे पन्नाशीतले हीरो बघून आत्ता लहान असलेली मुलं आपल्यावर हसतील. Happy

पाठलाग सिनेमाची मूळ कथा माझ्या सासर्यांनी लिहिली होती >>> मस्तच की!

काल पाहिला हा पिक्चर आणि हे सगळं लपवायचं कशाला हा प्रश्न मलाही पडला. शिवाय शेवटी प्रेमचोप्रा कुठल्याश्या निशा बद्दल बोलत असतो. ती कोण? दुसर्‍या साधनाचं नाव तर रैना असतं ना?

पाठलाग सिनेमाची मूळ कथा माझ्या सासर्यांनी लिहिली होती. त्यांचं नाव ज. ग. देवकुळे. कथेचं नाव 'आशा परत येते' >> हे सही! आधी लिहायचे राहिले याबद्दल. मूळ कथेपेक्षा दोन्ही पिक्चर्स मधे काही मेजर बदलले वगैरे असे काही केले आहे का? जस्ट उत्सुकता म्हणून. मला पाठलाग आणि हा चित्रपट यात काही फरक आहे का हे ही माहीत नाही.

आख्खी बहीण लपवायची (आणि धूम ३ मध्ये आख्खा भाऊ लपवायचा) म्हणजे चेष्टा नाही. >>> Lol

एका गाण्यात मीनाकुमारी लग्नाच्या रात्री खोलीत येते तेव्हा नवरा राजकुमारही तिचे डोळे झाकतो >>> Lol
राजकुमार आणि राजेन्द्रकुमार म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहिर तश्यातला प्रकार. >>> हो ना. उगाच नाही तिला ट्रॅजिडी क्वीन म्हणत.

Pages