भाड्याच्या घरात राहतानाचे अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 November, 2021 - 17:07

आयुष्यात भाड्याच्या घरात न राहिलेला माणूस विरळाच. कोणाचा जन्मच भाड्याच्या घरात झाला असेल, कोणी विद्यार्थीदशेत वा कामानिमित्त अनोळखी शहरात पेईंगगेस्ट म्हणून बस्तान मांडले असेल, किंवा लग्नानंतर स्वतःचे मालकीचे घर घ्यायची ऐपत येण्याआधी भाड्याच्या घरातच संसार थाटला असेल. गेला बाजार शाहरूखसारखे सुपर्रस्टारही त्यांच्या स्ट्रगल काळात या मायानगरीत भाड्याच्या घरातच राहिले असतील.

बस्स हाच धाग्याचा विषय आहे. भाडेकरू म्हणून राहताना तुम्हाला तेथील शेजार्‍यापाजार्‍यांचे आलेले चांगलेवाईट अनुभव ईथे लिहायचे आहेत.

कैक अनुभव माझेही आहेत. ते प्रतिसादांतच लिहितो. तरी धाग्याला बोहनी म्हणून थोडी सुरुवात करतो...

मी अगदी गेल्या वर्षभरापर्यंत भाड्याच्या घरात राहत होतो. तब्बल चार वर्षे. त्या आधी वडिलांच्या घरात राहत होतो. बालपण दक्षिण मुंबईतल्या चाळीत गेले जिथे भाडेकरू नावाचा प्रकारच नव्हता. असले तरी कळायचे नाही. सगळ्यांनाच मिळून मिसळून राहायची सवय. एकमेकांच्या घरात आयुष्यात डोकावायची सवय. तीच सवय घेऊन पुढे आपल्याच मालकीच्या घरात गगनचुंबी टॉवरमध्ये गेलो. तिथेही आमच्या घराचे दरवाजे दिवसरात्र सताड उघडे... अश्यातच आमच्या समोरच्या घरात भाडेकरू राहायला आले. ते नेमके मुस्लिम कुटुंब Happy

अर्थात ईथे नेमके मुसलमान हे मुद्दाम सांगितले कारण आधीच्या आमच्या चाळीत एकही मुस्लिम कुटुंब नव्हते. त्यामुळे मुस्लिम मित्र बरेचसे असले तरी शेजारीपाजारी मुस्लिम बिर्‍हाड असल्याचा अनुभव नव्हता. पण आमच्या मुळच्या स्वभानुसार आणि वर उल्लेखलेल्या सवयीनुसार सुरुवातीपासूनच त्या कुटुंबासोबत मिसळलो. आमच्या फ्लोअरवरचे दुसरे शेजारी आमच्याच जुन्या बिल्डींगमधील असल्याने त्यांनीही त्यांना आपल्यात सामावून घेतले. नुकतीच मला मुलगी झाली होती. त्यांना दोन मोठी शाळा-कॉलेजला जाणारी मुले होती. नियमानुसार ते तिचे ताई-दादा झाले. रक्षाबंधन भाऊबीज प्रथा सुरू झाल्या. त्यांच्या ईदच्या ईफ्तारपार्टीचे पहिले ताट आमच्या घरी येऊ लागले. सार्वजनिक गणपती दर्शनाला आम्ही त्यांनाही सोबत नेऊ लागलो..

पुढे दोनेक वर्षांनी त्यांना घर बदलावे लागले. पण तिथूनही ते दर विकेंडला भेटायला न चुकता यायचे. पुढे आम्हीच नवी मुंबईला शिफ्ट झालो. तरीही रक्षाबंधनाचे निमित्त साधून आमच्या नव्या घरी येणे होत राहिले. तर आम्ही कधी जुन्या घरी गेलो तर एक गेटटूगेदर हमखास ठरलेले.

हे सगळे सांगायचा हेतू म्हणजे सुरुवातीपासूनच कधी असे मनात आले नाही की अरे हे तर भाडेकरू आहेत. आज ना उद्या जाणारच, कश्याला यांच्याशी जास्त संबंध वाढवा.

गंमत म्हणजे जेव्हा ते लोकं गेले आणि समोरचे घर काही काळासाठी रिकामे होते तेव्हा तिथे एक आसामचे जोडपे राहायला आलेले. ते मोजून पंधरा दिवसांसाठीच राहणार होते. कारण मुंबईत औषधोपचारासाठी आले होते. तरीही या पंधरा दिवसात असे काही घट्ट नाते बनले की पुढे सहा महिन्यांनी ते पुन्हा मुंबईत चार दिवसांसाठी आपल्या मुलाला मुंबई दाखवायला घेऊन आले तेव्हा ते चार दिवस आमच्याच घरी हक्काने राहिले. माझी बायको अजूनही याची आठवण काढते आणि म्हणते तुझे आईबाप ग्रेट आहेत बाबा Happy

त्या आमच्या समोरच्या घरात राहायला येणार्‍या एकेका भाडेकरूंचे अजूनही कैक किस्से आहेत. पण जेव्हा आम्ही नवी मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीची काही वर्षे आमची भाडेकरू म्हणून राहायची वेळ आली तेव्हा मात्र आम्हाला एकेक नितांतसुंदर धक्के बसू लागले.

पहिलाच धक्का दुसर्‍याच दिवशी. शेजार्‍यांशी ओळख व्हावी म्हणून सकाळीच मिठाईचा पुडा हातात घेत त्यांचा दरवाजा ठोठावला. आजीबाईंनी उघडला. पण आतलाच. बाहेरचे सेफ्टी डोअर तसेच. घरात कोणी नाही सांगून आम्हाला ऊंबरठ्याबाहेरूनच परत पाठवले.

पण आम्हीही चिवट. शेजारचे का असेना, अनोळखी लोकांना घरात न घेता आजीबाईंनी योग्यच केले म्हणत संध्याकाळी पुन्हा गेलो. आता त्यांची मुले कामावरून आली होती. आता घरात स्वागत झाले. ईकडच्या तिकडच्या औपचारीक गप्पा. सोबत चहाही दिला. गप्पांच्या ओघात आपल्याच फ्लोअरवर समोर कोण राहते विचारले. तर दोघे नवराबायको नाव आठवू लागले. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी नाव विचारले. त्या मुलांनी समोरच्या मुलांची नावे सांगितली. पण आडनाव कोणाला माहीत नाही. लाल दिव्याची गाडी येते म्हणून सरकारी अधिकारी आहेत ईतकीच माहिती मिळाली. शेजारच्यांबद्दल ईतकी कमी माहिती कशी याचेही ऊत्तर त्यांनीच दिले. म्हणे ते ईथले मूळचे रहिवाशी नसून भाडेकरू आहेत. बर्र छान, पण कधीपासून आहेत. तर तब्बल तीन वर्षे..

पण त्याचवेळी त्यांनी समोरच्या दुसर्‍या फ्लॅटमधील आजीबाईंबद्दल त्यांच्या अमेरीकेतल्या नातवंडांच्या नावापासून ते वापरत असलेल्या डायपरच्या ब्रांडबद्दल सगळी माहिती दिली. कारण त्या ईथल्याच होत्या.
थोडक्यात आता ते आम्हा भाडेकरूंशीही कसे संबंध ठेवणार हे आम्हाला पहिल्याच भेटीत समजले.

पण धक्का ईथेच संपला नाही. जेव्हा आम्ही समोरच्यांच्या घराची बेल वाजवायला गेलो तेव्हा त्यांच्या दारावर धूळ खात पडलेली नावाची पाटी दिसली. ईतक्या वर्षात ती वाचायची साधी तसदीही शेजारच्यांना घ्यावीशी वाटली नाही हे बघून धन्य झालो.

पण समोरच्यांना मात्र आमच्या शेजारच्यांचे आडनाव माहीत होते हे बघून छान वाटले. ईतके छान वाटले की या व्यतिरीक्त त्यांनाही यांच्याबद्दल काहीच माहीत नाही याचे जराही वाईट नाही वाटले. पुढच्या चार वर्षात आमची त्यांच्याशी ईतकी छान ट्युनिंग जुळली की आम्हालाही त्यांच्याबद्दल तेवढेच माहीत झाले. समोरच्या घरात कोरोनाने शिरकाव केला हे देखील आम्हाला तिसर्‍यांकडूनच समजले. जेव्हा त्यांनी ही बातमी भाडेकरू नसलेल्या व्हॉटसपग्रूपवर टाकली. तेव्हा ती वाचून कोणीतरी आम्हाला फोन करून सांगितली.

अर्थात मुलीने मात्र हळूहळू आपले मित्रमंडळ जमवले. त्या निमित्ताने त्यांच्या पालकांशी आमच्याही जुजबी ओळखी झाल्या. तिच्या खास मित्राच्या पालकांशी आमचेही खास जुळले. त्यामुळे आम्ही ते घर सोडताना पुर्ण सोसायटीमध्ये कोणालातरी वाईट वाटले. तिथले कोणीतरी आमचे नवीन घर बघायला आले. एवढेच काय ते समाधान Happy

आता या नवीन बिल्डींगमध्ये बालगोपाळांची संख्या पन्नासच्याही वर आहे. आणि पोरगी जगतमित्र असल्याने सर्वांमध्ये रमते. पण तरीही तिच्या दोन तीन बेस्ट मैत्रीणींपैकी एक भाडेकरूच आहे, जी दोन वर्षांनी घर सोडणार आहे. जेव्हा तिची आई म्हणते, आप के परी के वजह से मेरी बेटी यहा घुलमिल गयी, नही तो रेंट पे रेहने वालोंको कौन पुछता है.. तेव्हा आपण आपल्याला मिळालेला वारसा पुढे नेतोय याचे समाधान लाभते.

असो, तुर्तास मुंबई आणि नवी मुंबई दोन्हीकडे मालकीची घरे असल्याने आणि मला ही शहरे सोडायची ईच्छाच नसल्याने भाडेकरू फेज आयुष्यात पुन्हा येईल असे वाटत नाही.. पण प्रतिसादात आठवेल तशी एकेक किस्स्यांची भर टाकत राहीन Happy

धागा सर्व भाडेकरूंसाठी खुला आहे.. पावती फाडायला घेऊ शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिक अनुभव असलेला दुर्मिळ धागा. चांगला विषय.
मायबोलीवर सुद्धा भाडेकरू आणि पर्मनंट असे दोन प्रकारचे आयडी आहेत.

आता भाड्याचे घर सोडणार, स्वतःचे मिळाले, पण अजून बारीक बारीक कामे सुरू आहेत

जुन्या घरात स्वयंपाक केला , इथे खाल्ला

काम सुरू आहे
SAVE_20211128_141244.jpeg

आता भाड्याचे घर सोडणार, स्वतःचे मिळाले, पण अजून बारीक बारीक कामे सुरू आहेत

जुन्या घरात स्वयंपाक केला , इथे खाल्ला
SAVE_20211128_141557.jpeg

काम सुरू आहे
SAVE_20211128_141244.jpeg

प्रामाणिक अनुभव असलेला दुर्मिळ धागा. चांगला विषय.>>>>शांत माणूस धन्यवाद

ब्लॅक कॅट अभिनंदन

भाड्याच्या घरापेक्षा स्वत:चे मालकीचे घर छोटे असले तरी त्याची वेगळीच मजा असते. ती समजायला आधी भाड्याच्या घरात काही काळ राहणे गरजेचेच..

मी जवळपास ९ एक वर्षे तरी भाड्याच्याच घरात राहीले आहे..अजूनही भाड्यानेच राहत आहे..इतक्या वर्षांत बरेच चांगले आणि वाईट अनुभव आले पण एक अनुभव लक्षात राहणारा..
२०१२ मधे आमचं वड्याळाचं घर रिडेवलपमेंट मधे गेलं आणि ठाण्याचं घर मिळायलाही काही महिने लागणार होते तेव्हा आम्ही वर्ष भरासाठी सायनला भाड्याने घर घेतलेलं.. सासू सासरे त्यापूर्वी कधीच भाड्याने कुठे राहीले नव्हते त्यामुळे फार काही आनंदी नव्हतेच.. अशात एके दिवशी मी ॲाफिसवरून घरी येताना बिंल्डीगच्या लिफ्टपाशी उभे होते.. नेहमीप्रमाणेच हेडफोन्स लाऊन गाणे ऐकण्यात मग्न..त्यामुळे शेजारी कोण उभं आहे ह्याकडे लक्ष नव्हतंच.. मग त्या व्यक्तीनेच हातवारे करून संवाद साधायला सुरूवात केली..आपल्याला कोणीतरी हाय बोलतंय कळल्यावर हेडफोन्स काढून मी ही हाय बोलले.. तसं पुढून प्रश्न आला, तुम्ही नवीन आलात का? मी म्हटलं हो, दोन आठवडे झाले, ८ व्या मजल्यावरच्या अमुकअमुक घरात राहायला आलोय.. पुढे ती व्यक्ती म्हणाली, अरे वा, म्हणजे आमच्याच खाली राहाताय तुम्ही.. माझं नाव नवाथे.. परवा विकेंडला फ्री असाल तर घरी या चहासाठी .. तुम्ही सगळेच या.. मीही हो म्हटलं .. आता समोरून कोणी बोलवत असेल तर नाही कसं म्हणणार.. मग त्यांचा फोन नंबर घ्यायला सुरूवात केली.. सेव्ह करताना पुन्हा एकदा नाव विचारलं तर त्यांनी ह्या वेळेस संपूर्ण नाव सांगितले “हर्षवर्धन नवाथे” .. नाव ऐकताच माझेही तेच झाले जे कोणत्याही सेलेब्रिटीला बघून इतरांचे होते.. मग सॅारी, आधी ओळखलंच नाही म्हणत रविवारी भेटू म्हणून सांगितलं.. घरी जाऊन सासूला बातमी दिली .. सासू एकदम खूष.. त्यानंतर ठरल्याप्रमाणे नवाथ्यांच्या घरी गेलो.. तीथे गेल्यावर कळालं की त्यांची बायको कोण तर सारिका निलटकर.. नुसते एकावर एक धक्केच बसत होते .. दोघेही नवरा बायको फारच वेलकमिंग .. मग बराच वेळ गप्पा झाल्या , आमची वेवलेंथ मस्त जुळली आणि त्यानंतर वरचेवर एकमेकांकडे येणे जाणे सुरूच राहीले.

जन्मापासून ३१ वर्षांपर्यँत भाड्याच्या घरांमध्ये गेली.
सगळे घरमालक एवढे चांगले भेटले की तक्रार करायला काही स्कोप नाही. त्यातील दोन जवळच रहात असल्याने खूप घरोबा होता.
शेजाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत पण त्यात भाडेकरू म्हणुन वेगळा असा एकही अनुभव नाही.

शेजाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत पण त्यात भाडेकरू म्हणुन वेगळा असा एकही अनुभव नाही.>>>>मला पण.
वाईट अनुभव एकही आठवत नाही. चांगले अनुभव बरेच आहेत.
भाडेकरू म्हणून कुणी वेगळे ट्रिट केल्याचाही अनुभव नाही.

भाडेकरू म्हणून कुणी वेगळे ट्रिट केल्याचाही अनुभव नाही>>> ते भांडताना किंवा भांडण झाल्यावर भाडेकरू आहेत याची जाणीव करून देतात.

अभिनंदन BLACKCAT

पीजी मध्ये राहिलेय पण भाड्याने राहण्याचा योग्य केव्हा आला नाही.
भाड्याचे असो अथवा स्वतःचे, घर ते घरचं, आणि राहतं घर आपल्याला नेहमीच आपलंस करत.
आपुलकीची किंवा परकेपणाची वागणूक देतात ती आजूबाजूची माणसे.

आमचे बाबा कृषी विद्यापिठात असल्याने सतत क्वार्टरला राहीलो. मोठाले क्वार्टर्स ... मागे पुढे मोठे अंगण मिळत होते. धुळ्याच्या शेतकी कॉलेजला १९८२ ते १९८८ पर्यन्त होतो. मग बाबांनी प्लॉट घेउन दोन मजली दोन घरे बांधली. १९९३ला पुण्याच्या अ‍ॅग्री.कॉलेजला बदली झाली. रहायला क्वार्टर्स स्पायसर रोडला माळी ट्रेनिंग सेंटर इथे देण्यात आले.
इथेच बाबा १९९५ला रिटायर्ड झाले. अन जवळच भाड्याचे घर घेउया म्हणुन जुन्या सांगवीत मधुबन मधे दोन खोल्यांच्या घरात रहायला आलो. घरमालक वरती रहाय्चे. बंगला होता. आजुबाजुला जागा सोडुन बाग केली होती. खाली पार्किग एरियात दोन रुम कसले... एकच रुम मधे प्लाय पार्टिशन टाकुन वन रुम किचन केलेले. भाउ-बहिण शिकत होते म्हणुन बाबांना मोठे घर परवडणारे नव्हते.
घरमालक, सॅन्डविकएशिया मधुन व्हि आर एस घेउन घरी बसलेले.... जरा विचित्र स्वभावाचे. त्यांना तिन मुली. एकीचे लग्न झाले होते. बाकी दोघी आमच्या बरोबरीच्या.. त्यामुळे छान मैत्रीणी झालेल्या. बाकी सगळे ठिक होतं.पण मालक दारु पिउन बायकोशी सतत भांडायचे. अन मग सामानाची फेकाफेकी. वरती डायनिंग टेबलच्या खुर्च्या सरकवण्याचा आवाज येउ लागला की खाली माझ्या आईला धडकी भराय्ची. त्या काकु तश्या स्वभावाने छान होत्या. आईचे अन त्यांचे छान जमायचे... कधी कधी दुपारी एकत्र जेवायच्या दोघी.
कधी कधी मालक बायकोला हकलुन द्यायचे घरातुन. त्या काकु बिचार्या रात्रभर जिन्यात बसलेल्या असायच्या. मालकाचे म्हातारे वडीलही होते. रोज सकाळी सकाळी जिना झाडतांना दिसायचे बाबा. त्यांनाही एकदा मालकाने ढकलुन दिले होते. एकदा भांडणात बायकोच्या सोन्याच्या बांगड्या त्यांनी खिडकीतुन मागच्या ओपन प्लॉटमधे फेकुन दिल्या. नंतर त्यांच्या पोरींनी जाउन त्या आणलया.
माझे नुकतेच लग्न झाले होते तेव्हा. नवरा अन मी एका दिवाळीत आलो. दारापुढे पॅशन फ्रुटचा वेल लावुन त्याचा मांडव घातलेला होता मालकांनी. आम्ही दोघे दुपारी बाहेर निघालो होतो. तेव्हा वरच्या खिडकीतुन मालकाने असेच काही भांडणात हजार -दोन हजाराच्या शंभरच्यानोटा फेकल्या. आम्ही दारातुन बाहेर निघण्याचा घात अन काही नोटा आमच्या अंगावर तर काही त्या मांडवावर. भर दुपारी नोटांचा पाउस पडल्यासारखे वाटले. Biggrin
मालक एरवी हेल्पफुल असाय्चे. माझे डोजे त्यांच्या टेरेसवर झाले. तेव्हाही खुप मदत केलेली. नंतर मुलाचे बारसेही बाहेर नेमका पाउस होता म्हणुन त्यांच्या हॉलमधे केले. गल्लितले लोक ही चांगले होते.
पुढे दोन वर्षांनी बाबांनी स्वतःचा प्लॉट घेउन घर बांधले अन रहाय्ला गेले. नंतर त्या मालकांनीही रहाता बंगला विकला अन भोसरीकडे रहायला गेले.

मालक एरवी हेल्पफुल असाय्चे. >>> दारू पिऊन बदलतात माणसे. आतला जनावर बाहेर येतो वा मूळ तापट स्वभावाला अनुसरून वागतो ज्यावर ईतरवेळी सदसदविवेकबुद्धीने कंट्रोल केला असतो.

ते भांडताना किंवा भांडण झाल्यावर भाडेकरू आहेत याची जाणीव करून देतात.
+७८६
या वाक्याला रुमाल.. आमच्याईथे एक कचकचीत भांडण झालेले जेव्हा अशी जाणीव करून देण्यात आली आणि अचानक बिल्डींगमध्ये जणू दोन गट पडले..
नंतर लिहितो हा किस्सा सविस्तर

भांडण झाले की काही लोक काय मनातले बाहेर काढतील सांगता येत नाही. त्यासाठी त्यांना दारू प्यावी लागत नाही.
भाडेकरू नसेल तर अजून काहीतरी मिळते. फुलं तोडू नका म्हटलं तर इंजिनियर आहे / डॉक्टर आहे / कार घेतली म्हणुन / परदेशात जाऊन आला म्हणुन / पोरगं /पोरगी शाळेत पहिलं/ पहिली आलं/आली म्हणुन / स्त्री असेल तर नोकरी करते ... . म्हणून माज आलाय का म्हणत भांडणारेही लोक असतात Lol
या सगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे धागे काढा कुणीतरी.

ऋनमेष खरी स्थिती मांडत नाही सर्व लोकांस पडेल असेच लीहती ..
भाड्या नी राहण्याचा प्रसंग खूप लोकांवर येतो
जो भाड्याने घर देतो त्याला फक्त भाड्या शी मतलब असतो.
पण बाकी सभासद स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा,सोसायटी ची परंपरा ह्याचा विचार करतात.
सिंगल लोकांस ह्या मुळेच भाड्या नी रूम देण्यास विरोध असतो
सिंगल व्यक्ती बंधनात नसतो आणि तो बाकी लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो.
स्त्री पुरुष दोन्ही
भाड्या नी राहण्यास येणाऱ्या कुटुंबाची परंपरा वेगळी असेल तर त्यांना accept केले जात नाही.

कोण भाड्या? आणि तुम्ही त्याच्या घरात रहाता मग तो कुठे रहातो अशी फाको नाही का केली कुणी Light 1
कधी भाड्याच्या घरात राहिले नसल्याने काही लिहु शकत नाही.

मी_आर्या मला वाटतंय त्या घरातच वास्तुदोष असेल Wink दिवा घ्या. बाकी मी पण सध्या भाड्याच्या घरात राहतोय. मी राहतो ते चाळ टाईप घर आहे. तीन घरं एकमेकांना जोडून. प्रत्येक घरात दोन खोल्या एक किचन. शेवटच्या घरात मी राहतो आणि उरलेल्या दोन घरात मालक.सुरवात वाईट अनुभवांपासून करतो. शेवट गोड करावा अशी आपल्यात प्रथा आहे.
सगळ्यात वाईट अनुभव म्हणजे कोरोना काळात मालकाच्या घरातील सगळ्या सदस्यांना कोरोना झाला होता. ती गोष्ट त्यांनी लपवून ठेवली. अगदी शेजाऱ्यापाजार्यांनाही समजलं होत यांना कोरोना झालाय. तरीसुद्धा ते इतरांच्या संपर्कात येत होते. आमच्याजवळ येऊन बोलायचे. अगदी आमच्या लहान मुलीलाही जवळ घ्यायचे. आम्ही शक्य तेव्हडी काळजी घ्यायचो पण शेजारी राहताहेत म्हणजे संपर्क पूर्ण टाळू पण शकत न्हवतो. सुदैवाने आम्हाला कोणालाही कोरोना झाला नाही. याच काळात मालकाने आम्हाला खीर दिली. बायको काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत होती घ्यायला हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना राग आला. शेवटी नाईलाजाने ती घ्यायला लागली. सुनेचा किस्सा तुम्हाला माहीत असेलच त्यावर धागा पण काढला होता.
आता चांगल्या गोष्टी म्हणजे मालक खूपच मनमिळाऊ आणि हेल्पफुल आहेत. माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस गावी साजरा झाला तेव्हा ते खास वाढदिवसाला सहा सात तासांची ड्रायव्हिंग करून आले होते. संध्याकाळी त्याच्या घरासोमरील ओटीवर बसून कितीतरी गप्पांचे फड रंगवलेत. कधी वाडीला गेले की आवर्जून बासुंदी आणणार. घरी कुठला कार्यक्रम झाला की अगदी घरच्यांसारखी वागणूक देणार. असे माणसाचे विविध पैलू दिसले की मी गोंधळून जातो नक्की माणसाचा स्वभाव कसा असतो? मग कुठेतरी वाचलेलं की माणूस बरोबर असतो परिस्थिती बदलते हे खरं वाटायला लागतं.

@ मानव
भांडण झाले की काही लोक काय मनातले बाहेर काढतील सांगता येत नाही. त्यासाठी त्यांना दारू प्यावी लागत नाही.
>>>>

त्यांच्या पोस्टमध्ये दारूचा उल्लेख होता.
बाकी सगळे ठिक होतं.पण मालक दारु पिउन बायकोशी सतत भांडायचे.

मी ज्या भाडे भरून रहाववयाच्या घरात रहायला नव्हतो तिथे भुताटकी होती की नाही हे लक्षात आले नाही त्यामुळे कसलाही सांगण्यासारखा अनुभव आलाच नाही.
स्वतःच्या घरात आला असता तरी हा धागा त्यासाठी नाही हे लक्षात घेऊन विषयांतर होईल या भीतीने त्याबद्दल लिहिले नाही.

भाड्याच्या घरात पिठले छान लागते आणि स्वतःच्या घरात बिर्याणी असे असते का यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

मीही ते दारूचा विषय आला आहे म्हणुन सहज "त्यासाठी दारू प्यावी लागत नाही" असे लिहिले. दोन्हीचा संबंध नाही.

भाडेकरू लोकांची सर्वात जास्त धास्ती शेजारी राहणाऱ्या लोकांना असते.
कुटुंबाची सुरक्षा भाडे करू मुळे धोक्यात येवून नये ही भीती असतेच.
त्या मुळे भाडेकरू ना संशयाच्या नजरेने बघितले जाते.
दुसरा विचार मूळ रहिवासी भाडेकरू कुटुंबात टार्गेट आहे का ह्याचा विचार करतात.
खरे तर पुरुष.
हा धोका दोन्ही बाजूला असतो.

भाड्या नी कधी राहिलो नाही .
पण माझ्या इमारती मध्ये कोणी भाडे करू ठेवणार असेल तर ..
सर्व सावध असतात.
शेवटी सुरक्षेशी संबंध असतो.