दैवी उपासनांमुळे समस्या सुटतात का?

Submitted by केअशु on 22 November, 2021 - 11:10

अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.
फलज्योतिष हे भारतात विकसित झाले असले तरी त्याचे मूळ भारतीय नाही. इजिप्त,बॅबिलोनिया या प्रदेशात जन्मलेली ही विद्या आहे.हिचा संबंध आकाशस्थ ग्रह, उपग्रह, छायाग्रह आणि नक्षत्रे यांच्याशी आहे. म्हणजे निर्जीव ,भटक्या आकाशस्थ वस्तूंशी फलज्योतिषविद्येचा संबंध आहे. हे सर्व ग्रह, उपग्रह, नक्षत्रे, छायाग्रह हे मानव पृथ्वीवर निर्माण होण्याआधीपासून आकाशात आहेत. याचाच अर्थ असा की विशिष्ट ग्रह, तारे यांचा पृथ्वीवरील देवी देवतांशी काहीच संबंध नाहीये. माणसाने तो ओढूनताणून लावला आहे. म्हणजे आकाशस्थ ग्रह,तारे मानवावर करत असलेले परिणाम सततच्या निरीक्षणाने तपासून पाहिले तर ग्रह, तारे बर्‍याच प्रमाणात मानवावर परिणाम करत असावेत,त्याच्या स्वभावाशी ग्रह,तार्‍यांचा संबंध असावा असे म्हणता येऊ शकते. पण मानवाला सतत सुख, पैसा, आरामदायी , आनंदी जीवन हवे असते. त्यामुळे हे मिळण्यात अडथळे फार येऊ लागले आणि बरेच प्रयत्न करुनही त्या हव्याशा गोष्टी मिळणे अवघड झाले की तो फलज्योतिषविद्या जाणणार्‍या अभ्यासकाची मदत घेऊन त्या गोष्टी मिळवू पाहतो. सगळेच नव्हे पण बरेच फलज्योतिषी जातकाला काही धार्मिक विधी,दैवी उपासना , अध्याय वाचन इ. सुचवतात आणि इच्छित पूर्ण होण्याची आशा दाखवतात.

वर सांगितल्याप्रमाणे ग्रह , तारे यांचे नियंत्रण पृथ्वीवरील कोणत्याच देवाकडे, देवीकडे नाही. ते माणसाने ओढूनताणून जोडले आहे. मग असे असताना या धार्मिक विधी, उपासनांचा निव्वळ जातकाचे मनोबल वाढणे यासाठीच फारच थोडा उपयोग होतो (ते सुद्धा जातक आस्तिक असेल तरच) पण मूळ समस्या तशीच राहते. विशिष्ट समस्येसाठी विशिष्ट धार्मिक विधी किंवा विशिष्ट उपासना केली तर ती विशिष्ट समस्या सुटलेली आहे असे किमान १०० जातकही मिळायचे नाहीत. केवळ आशावाद!

मग प्रश्न असा पडतो की फलज्योतिषाला जोडून ठेवलेल्या या धार्मिक विधी, उपासनांचा उपयोग काय? कारण जातकाची वैयक्तिक समस्या सुटणे किंवा ती बरीच सौम्य होणे , कुवतीपेक्षा जास्तीच्या अपेक्षा पूर्ण होणे यातले काहीच धार्मिक विधी, उपासनांमुळे बदलू शकत नसेल तर त्या फलज्योतिषविद्येशी जोडणे साफ चुकीचे आहे. फलज्योतिषविद्येत अचूकता आणण्याच्या प्रयत्नांमधली धोंड आहे असे वाटते.

याला जोडून उपप्रश्न: माझा रत्ने आणि वास्तुशास्त्र यांचा अजिबात अभ्यास नाही. पण वरील प्रकार हातात धारण करायच्या रत्नांबाबतसुद्धा लागू होतो का? विशिष्ट रत्न धारण केलं तर विशिष्ट असं चांगलं फलित मिळेल यात काही अर्थ असावा का? वास्तुरचनेत काही बदल केले तर हवे तसे चांगले परिणाम दरवेळी मिळतात का? तुमचे अनुभव काय आहेत?

Group content visibility: 
Use group defaults

शीर्षक आणि लेखाचा रोख वेगळे वाटते. दैवी उपासना ही ज्योतिषावर विश्वास न ठेवणारे काही लोकही करतात. पण तुमचा प्रश्न दैवी उपासनेबद्दल नाही, फलज्योतिषाशी जोडल्या गेलेल्या धार्मिक विधी आणि उपासनांबद्दल आहे. मुळात हे एकात एक गुंतलेले आणि तरीही वेगवेगळे विचार करता येतील असे प्रश्न आहेत.
१. फलज्योतिषाने समस्या सुटू शकतात का?
२. दैवी उपासनेने समस्या सुटू शकतात का?
३. फलज्योतिष आणि दैवी उपासना ह्यांचा काही संबंध असू शकतो का? - तुमचा प्रश्न हाच आहे आणि तुम्हीच लेखात ह्याचं उत्तर 'नाही' असं दिलं आहे.
४. ठराविक रत्नांची निवड केल्यास समस्या सुटू शकतात का?
५. वास्तुशास्त्राने समस्या सुटू शकतात का?
६. फलज्योतिष आणि रत्ने ह्यांचा काही संबंध असू शकतो का? - तुमचा उपप्रश्न
७. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र ह्यांचा काही संबंध असू शकतो का? - तुमचा उपप्रश्न

घ्या! ७ वेगळे धागे काढू शकाल यातून.

अ‍ॅडमिन टीमने ११ शुक्रवार ११ जणींना पुरणपोळी करून खाऊ घातली तर मायबोलीचा स्पीड नक्की वाढेल.

(माझा ज्योतिषाचा अभ्यास नाही की वेबसाईटस बनवण्याचा अभ्यास नाही... पण सगळे अ‍ॅडमिनला काही ना काही सल्ला देत आहेत. मला एकदम 'फोमो' झाला. म्हणून इथे समस्या सुटतात का धाग्यावर सल्ला दिला. ते करतील हा केवळ आशावाद हो... )

११ जणींना पुरणपोळी करून खाऊ घातली तर मायबोलीचा स्पीड नक्की वाढेल.>>> ११ जणांनी काय पाप केलयं? केवळ ११ जणींनाच लिहलयं म्हणून म्हटले! Wink

आता मोजावी इतकी थोडकी आहेत का ती पापं...... Wink पण ११ पुरणपोळ्या दिल्या तर सांगूही काय पाप केलं Lol
असो, हो म्हणाले अ‍ॅडमिन तर पुरणपोळीसाठी 'हाजिर सो वजिर' करू या म्हणजे उगा भांडाभांडी नको. वाटून खावं.... स्पीड केलिए ये भी करेंगे...

पण ११ पुरणपोळ्या दिल्या तर सांगूही काय पाप केलं Lol>>> Lol ह्याला म्हणतात दोन्ही थडीवर हात ठेवणे! कोण देणार अश्या पुपो पापं ऐकून घ्यायला!! Wink

अ‍ॅडमिन, आणा हो पुपो वाढेल हो स्पीड माबोचा. पुरणपोळ्याचा उतारा परिणामकारक होईल बघा! Wink

फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय?
केवळ तशी परिस्थिती नाहीये. सुखासुखी ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसांचे प्रमाण फारच कमी. काही ज्योतिषी लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेतात. प्रथम मानसिक खच्चीकरण करून, भीती निर्माण करून त्यानंतर ग्रहशांती, जपजाप्य, नारायण नागबळी सारखे विधी सांगून दक्षिणा घ्यायची व मानसिक समाधान वा आधार द्यायचा. हा कुठला आधार? ग्रहांचे खडे घातल्याने अनिष्ट ग्रहांच्या प्रभाव लहरी थोपवल्या जातात असा समज पसरवून धंदा करणारे ही ज्योतिषी भरपूर आहेत. बोलका पत्थरवाले पटवर्धन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विधीपूर्वक पूजा करून श्रद्धेने तोडगे केल्यास फायदा होतो. समजा नाही झाला तर तुमची श्रद्धा कमी पडली किंवा तुमच्या कडून विधी पाळले गेले नसतील ही पळवाट आहेच. विवाह जुळवताना पत्रिका बघताना सुद्धा आयुष्यातला महत्वाचा निर्णय हा ज्योतिषांवर सोपवला जातो. गुणमेलन, मंगळ, एकनाड या सारख्या गोष्टींना भीतीपोटी महत्व दिले जाते. विषाची परिक्षा कशाला घ्या? वैवाहिक जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचा संबंध मंगळाशी पत्रिकेशी जोडला जातो. वैधव्याचा योग आहे, आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट आहे, कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला धोका आहे. वगैरे भीती घालून व्यावहारीक दृष्टया सुयोग्य अशी स्थळं सुद्धा नाकारली जातात. व्यावसायिक, सट्टेबाज, राजकारणी हे लोक फलज्योतिषाचा आधार घेताना दिसतात कारण त्यांच्या जीवनात चढ-उतार सतत असतात. जिथे अनिश्चितता आहे त्या ठिकाणी माणसाला आधाराची गरज निर्माण होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक विवंचना असतात त्यावेळी रंजल्या गांजल्यांचा आधार म्हणून फलज्योतिषाकडे बघितले जाते. मग काही लोक विचारतात जर फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय? दारू, गांजा, अफू यामुळे माणूस आपली दु:खं काही काळ का होईना विसरतो म्हणून त्याने व्यसनात बुडून जाणे हा काय त्यांच्या दु:खावरचा ईलाज झाला का? आमच्या परिचयात एक गृहस्थ आहेत. त्यांना एका ज्योतिषाने मृत्यूचे भाकीत सांगून हादरवून टाकले. त्यानंतर त्यांनी अनेक ज्योतिषांकडे हा फीडबॅक घेवून चकरा टाकल्या. सर्वांचे खिसे भरले. काहींनी त्यांना चारसहा महिने काहींनी वर्ष दोनवर्ष मुदतवाढ दिली. अत्यंत मानसिक तणावात त्यांनी काही वर्ष काढली. त्यातील फोलपणा आम्ही समजावून द्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी सुद्धा काही वर्ष जावी लागली. सात आठ वर्ष उलटून गेली तरी त्यांना काही झाले नाही. मग मागे वळून पहाताना आता त्यांना वाटतं उगीच आपण हा काळ तणावात घालवला. मनुष्य अमर थोडाच आहे?
उठसूट ज्योतिषाकडे जाउ नये असे काही जेष्ठ ज्योतिषांनीच सांगितले आहे. कमकुवत मनाला सतत आधाराची गरज लागत असते. 'बुडत्याला काडीचा आधार` या म्हणीतच एक प्रश्न लपलेला आहे. बुडणाऱ्या माणसाला आधारासाठी काडी पुरेल का? माणसाचं मन कमकुवत झालं की त्याला कशाचाही आधार पुरतो. बहिणाबाईंच्या 'मन वढाय वढाय` कवितेत मनाच सुंदर वर्णन आहे. मनाला तार्किक, बुद्वीप्रामाण्य कसोटया लावता येत नाही. मन खंबीर करण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना केली तर सतत उठसूट ज्योतिषाचा आधार लागण्याची मानसिकता निर्माण होणार नाही. लहान मूल सुद्धा स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक तेवढाच आईचा आधार घेतं. नंतर आईचा हात सोडूनच चालायला शिकतं ना? खाचखळग्याच्या रस्त्यावर, अवघड ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा काठीचा, दोराचा आधार घेतातच ना! पण तो तेवढयापुरताच. आधार घ्यावा लागणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हा आधार विवेकपूर्ण असावा.
( उधृत- अस्मादिकांचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद. पूर्ण पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी http://mr.upakram.org/node/1065 )