शब्द - निःशब्द

Submitted by पुरंदरे शशांक on 21 November, 2021 - 11:42

शब्द -निःशब्द

मूर्त अमूर्ताची वेस
शब्द ठाकले नेमक
अरुपासी रुप देत
शब्दी आगळे कौतुक

वस्तू सांगावी दुजिया
नाव ठेविती एखादे
वस्तु हाताशी ती येता
नाम हारपे सहजे

हाक मारीता शब्देचि
येते ओळख व्यक्तीला
नाम नसता कुठले
व्यवहार तो थांबला

भाव बहु थोर खरा
शब्दांनीच होय व्यक्त
दूरदेशी कोणी असे
शब्दातून प्रगटत

भाव, विचार, वस्तुशी
शब्दामुळे ती ओळख
ध्यानी येताच ते सारे
शब्द बाजूला सरत

मूर्त अमूर्ताच्या काठी
आले कसे ओठंगून
शब्द वर्णवेना झाले
जसे सगुण निर्गुण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

' अरूपाचे रूप ' .. पार माऊलीपर्यंत पोचवलंत की.
शब्दांवाचूनी कळले सारे शब्दांच्या पलीकडले.. शब्दांत पकडता येत नाही असं काही गवसलं की शब्द निरुपयोगीच ठरतात.
' शब्द वर्णवेना झाले जसे सगुण निर्गुण '..
अगदी तरल भाव...आत्मसुखाचा कल्लोळ.
अतिशय सुंदर.

मूर्त अमूर्ताच्या काठी
आले कसे ओठंगून
शब्द वर्णवेना झाले
जसे सगुण निर्गुण

वाह... अप्रतिम....