विपश्यना आणि रॅन्डम मी

Submitted by पाचपाटील on 20 November, 2021 - 01:24

१. साधनेच्या ह्या मार्गावर घोडदौड करण्यामध्ये एका विशिष्ट साधिकेचा मला अडथळा होतोय, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.
सदर साधिकेला समजा ह्या वस्तुस्थितीची बिलकुल
खबरबात नसली तरी काही हरकत नाही.
सुरुवातीला अशी सुस्पष्ट खबरबात कुणालाच नसते.
ती हळूहळू होते.
त्याची एक भाषा असते. त्याचा एक रस्ता असतो.
ह्यामध्ये संयम आवश्यक. समतोल आवश्यक.
ते सगळं इथं शिकवतील बहुतेक.
तेवढं आत्मसात केलं की काही अडचण नाही.
कोर्स संपल्यानंतर ताबडतोब एखादं वादळी
प्रेमप्रकरण करून बघायला हरकत नाही.
म्हणजे मग आपल्यात कितपत साक्षीभाव आलाय ते
समजेल. आणि शिवाय हवापण गुलाबी गुलाबी
पडायला लागली आहे. ह्या हवेचापण मान राखला
पाहिजे.

बहुदा ह्या शतकातल्या एका महान आणि अद्भुत अशा
प्रेमकथेची बीजं, ह्या तपोभूमीत माझ्याकडून रोवली जाणार आहेत. कालिदासानं मेघदूत लिहिलं. टॉलस्टॉयनं ॲना कॅरेनिना लिहिलं. आपल्या हातूनही त्याच दर्जाचं काहीतरी कांड होणार आहे असं दिसतंय..!
स्पष्ट लक्षणंच दिसतायत तशी..! आता काही अडचण नाही. काही सवालच नाही. सगळीकडे आपलाच डंका.‌‌.! हार तुरे सत्कार वगैरे काही नको म्हणून सांगायला पाहिजे..
आपल्याला नै आवडत ते..
पै पाहुणे सहकारी वरिष्ठ परिचित वगैरे सगळे समजा आता
आपल्याशी इज्जतीत बोलतील.. पण आपण जुने हिशेब
विसरायचं नाय भौ.. आपण काय अगदीच महात्मा गांधी
नाय भौ..!
बापका, दादाका, भाईका, सबका बदला लेगा रेsss
तेरा फैजल..!
डोळे बंद करून, आत हे असलं चाललंय.

पुढून गुरूजी खूणेनं जवळ बोलावतायत.
"आप आंख क्यूँ खोलते हो बीच बीच में.. और मनभी
बहुत चंचल लग रहा है... पांच मिनट भी टिक नही
पाते है आप एक पोझिशनमें.. मैं ऑब्झर्वेशन करताय सबका"

२. सामुहिक ध्यानासाठी धम्मसेवक प्रत्येक दारापुढे घंटी
वाजवून सूचना देतात. परंतु जेवण्यासाठी,
ब्रेकफास्टसाठी असं कुणाला आवर्जून
बोलवावं लागत नाही..!
भूकेच्या बाबतीत सगळे एकाच पद्धतीने विचार करतात.
प्रोफेशन, वय, धर्म, लिंग, देश, आर्थिक क्षमता
वगैरे काही मॅटर करत नाही. ठरलेल्या वेळेत सगळे आपोआप बिनचूकपणे भोजनालयापुढे हजर..!
(आपोआप निरंजन सोई..!)

बाकी मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि लंच उत्तम.
रोज वेगळा मेन्यू. साधं. सात्विक.
कमी मसाले, कमी तेल. तरीही चव विसरता
विसरत नाही. अत्यंत रूचकर आणि स्वादिष्ट.
दोष काढायला काहीच वाव नाही..!
शिवाय मोबाईल/टीव्ही /पेपर/ गप्पा वगैरे नसल्यामुळे समग्र लक्ष फक्त जेवणात.‌‌.! त्यामुळे चवीचवीने
एकेक घास खाल्ला जातो. अन्यथा बऱ्याचदा आपण सवयीने ढकलत असतो.

संध्याकाळी चहा/लिंबूपाणी आणि प्रत्येकी एक फळ. शिवाय चुरमुऱ्यांचा चिवडा असतो.. तो खाऊन खाऊन किती खाल? कितीही खा..! पोट रिकामंच..!

रात्री जेवण नाही. पहिल्या दोन रात्री भूकेची
जाणीव असते. पण तिसऱ्या दिवसापासून काही वाटत नाही.
उलट एकच वेळचं जेवण स्कीप केल्यामुळे शरीर
एकदम तल्लख आणि हलकं राहतं.
लखलखीत धारदार पात्यासारखं शरीर...!
सकाळी उठल्यावर जडपणा नाही. बधिरता नाही.
गुंगी नाही. ॲसिडिटी नाही. गॅसेस नाही. काही नाही.
चारी ठाव दाबून खाल्ल्यावर कसली विपश्यना होणार आणि कसलं आनापान..!
आणि शिवाय तिथे काही कामच नसल्याने
शरीरातली ऊर्जा काहीच खर्च होत नाही.
त्यामुळे इव्हिनिंग ब्रेकफास्टही नको वाटतो नंतर नंतर.
संध्याकाळी फक्त लिंबू पाणीच पुरेसं.

३. उदाहरणार्थ समजा आपण शून्यागारामध्ये ध्यानाला
बसलोय. शेजारच्या किंवा वरच्या कुठल्यातरी
शून्यागारातून खोकण्याचा, खाकरण्याचा आवाज येतोय. मग हळूहळू सगळ्यांनाच घसा खाकरून, आपापल्या घशांमध्ये सगळं व्यवस्थित आहे का ते चेक करून
पहायचा मोह होतोय.
मग आलटून पालटून खोकण्याच्या लाटा 'पॅगोडा'भर
घुमतायत.
ह्या मनुष्यांच्या घशांतून टोचणी, खवखव, खरखर वगैरे
दु:खद संवेदना 'संखारांच्या' रूपात बाहेर पडू इच्छितायत.
त्यांना वाट खुली करून दिल्याशिवाय राहवत नाही.
संखारांची एक संसर्गजन्य लाटच आलेली दिसतेय.

(रात्रीच्या वेळी समजा पुणे वगैरे शहरातल्या एखाद्या
गल्लीतलं एक कुत्रं उगाचच सहज टाईमपास म्हणून भुंकतं..‌ मग त्याला एकटं वाटू नये म्हणून लगेच संपूर्ण पुण्यातल्या कानाकोपऱ्यातून सगळी कुत्री एकसाथ भुंकायला लागतात, हे आपण ऐकलं असेल कधीतरी.
माणसांमध्येही तसंच असतं काय?)

४. चौथ्या दिवशी गोयंका गुरुजी विपश्यना शिकवतात.
शरीराच्या या जागेवर या क्षणी काय होतं आहे याचं अवधान. असा टाळूपासून पायाच्या बोटांपर्यंतचा सजग प्रवास. With respect to time. With respect to space.
संवेदना जाणवली, तिला रिॲक्शन नाही दिली, संवेदना
बदलतेय हे चेक केलं आणि या सर्ववेळी चित्त समबुद्धीत आहे की नाही ते चेक केलं. अशी प्रोसेस.

यामागची फिलॉसॉफी अशी की शरीरावर सुखद संवेदना जाणवल्या तर आपल्या आसक्तीच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात.
शरीरावर दु:खद संवेदना जाणवल्या तर आपल्या
व्याकुळतेच्या 'संखारा' सरफेसवरती आलेल्या असतात.
दोन्ही प्रकारातल्या संवेदनांचा पॅटर्न सेमच आहे.
उत्पन्न होणे, वाढत जाणे, एका बिंदूनंतर कमी कमी
होत जाणे, शेवटी नष्ट होणे...!
ह्या सगळ्याचा फर्स्ट हॅंड अनुभव घेऊन पाहणं
म्हणजे 'विपश्यना'..!
शारीर वेदनेला किंवा बोअरडमला फेस करताना
चीडचीड संताप दु:ख चिंता व्याकुळता ठसठस
बाहेर येते.. नकोसं होतं. मन फारच भरकटायला लागतं...
विपश्यनेपेक्षा आनापान सोपं आहे. पण गोयंका गुरूजी
म्हणतात की आनापान ही फक्त पूर्वतयारी आहे. प्रज्ञेच्या
क्षेत्रात पाऊल टाकायचं असेल तर विपश्यनेकडं जावंच लागेल.

५. डिअर गोयंका गुरुजी, तुम्ही साक्षीभावाने, समता बुद्धीने
संवेदनांकडे बघा म्हणता. पण तीच तर मुख्य गोम आहे.
साक्षीभाव एका रात्रीत तर पैदा होणार नाही.
तो डेव्हलप व्हायला वेळ लागणार. सराव लागणार.
विपश्यनेची प्रॅक्टिस असल्याशिवाय साक्षीभाव
येणार नाही आणि संवेदनांकडे साक्षीभावाने पाहिल्याशिवाय विपश्यना करू शकणार नाही,
असा चक्राकार प्रॉब्लेम आहे..!
आणि वेदनांचा ठणका मेंदूपर्यंत जायला लागतो
तेव्हा बोंबलायचं कळत नाही..!
कधी पटकन पोझ बदलून रिकामे होतो,
कळतही नाही.
कुठला साक्षीभाव आणि काय घेऊन बसलाय..!
अशा वेळी आपला नेहमीचा 'भोक्ताभावच' बरा..!

६. पुढे अशाच एका सिटींगला जरा 'अधिष्ठान' मनावर घेतलं..
ठरवूनच बसलो की आता एकतास बिलकुल हालचाल
करायची नाही. काय व्हायचं ते होऊदे ***

मग एका अशाच क्षणी अवघडलेल्या मांडीतल्या घनीभूत ठणकत्या वेदनेला हळूहळू डीझॉल्व होत जाताना पाहिलं
तेव्हा मलाच आश्चर्याचा धक्का बसला की साला हे
असं पण होऊ शकतं..! आपल्याला हे जमू शकतं !
म्हणजे हे सांगतायत ते काही थापा मारत नाहीयेत..!
आणि एवढं आनंददायी असतं हे असं शारीर
वेदनेपासून स्वतःचं विलग होणं.‌.! आणि कुठून
हा असा थुईथुई नाचऱ्या आनंदाचा कारंजा
उसळायला लागलाय..! तोही असा अचानकच.!
कुठे लपला होता एवढे दिवस..! किती दशकं झाली
आपल्याला असा विनाकारण आनंद होऊन..!!

तर एखाद्या मिनिटाभरासाठीही अशा स्वरूपाचा
वैयक्तिक क्षण तुम्हाला मिळाला तरी तुमचा पूर्ण
दिवस त्याच धुंद आनंदात जातो. तो एक मिनिट सुद्धा एवढा ताकदवान असतो की संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकतो !! पण हे काही नेहमी नेहमी होत नाही..आणि शिवाय हे ही टेंपररी असतं‌, 'अनिच्चा' असतं. हे एक आहेच.

७. बाकी इथे कुणी दिव्य अनुभूतीच्या शोधात वगैरे
येऊ नये. ही टेक्निक शिकावी. पटली,आवडली
तर पुढे आपापला सराव चालू ठेवावा.
आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासून
पाहण्यासाठी काही फूटपट्ट्या सांगतात गुरुजी.
त्याप्रमाणे पहावे स्वतःस आजमावून.
अचानक 'सडन एनलाईटमेंट'चा हा मार्ग नाही.
किंवा ते युजी कृष्णमूर्ती सांगतात तशी कलॅमिटी
वगैरे काही होणार नाही यात..
किंवा रजनीशांसारखा हसत खेळत करायचाही
प्रकार नाही.
ह्या दहा दिवसांत आपल्या आत काही रॅडिकल चेंजेस
होऊन आपण डायरेक्ट बुद्ध होऊनच गेटच्या बाहेर पडणार, असलंही काही होणार नाहीये...
जे काही आहे ते फ्लॅशेसमध्येच..!

अर्थात, आपल्याला ते मुक्ती मोक्ष सतोरी किंवा निर्वाण वगैरे काही नकोच आहे.
शांत वाटत राहिलं तरी पुरे. गोष्टींकडे नीटपणे बघता आलं तर बरं...! शिवाय थोडंसं सर्व्हिसिंग. थोडंसं धार लावणं स्वतःला. थोडंसं आयसोलेशन.
मन ज्यांना लटकतं ते बाहेरचे सगळे आधार, सगळ्या खुंट्या काढून टाकणं आणि मनाला आत वळण्याशिवाय मार्गच
शिल्लक न ठेवणं. किमान थोडा काळ तरी..!

८. प्रतिक्षण सजग.
शरीराबद्दल अवेअरनेस वाढत चाललाय. विचारांचा
गोंगाट कमी होत चालल्याने शारीर हालचालींतली घाई कमी होत जातेय.. सगळ्या कृती शांत संथपणे होतायत.. त्यात एक ठेहराव आहे... उठणं, बसणं, खाणं, आंघोळ, कॅंपसमध्ये फिरणं ह्या साध्या साध्या कृतीही फिलॉसॉफीकल वाटतायत..

९. ह्या कोर्सच्या गुरूजींचं हिंदी मुंब्बैय्या आहे. काही
साधकांना जवळ बसवून सांगण्याची त्यांची पद्धत आहे.

"आप चुळबुळ बहोत करते हो. वैसा नय करने का. संवेदना, संखारा, धाराप्रवाह, अनिच्चबोध कुछ समझा
की नय आपको?.. गोयंका गुरूजीने क्या बोला
कल के प्रवचन में? अपनेको भीतरकी गांठें
खोलने का हय.. नई गांठें नही बांधने का हय
अपनेको... गांठें धीरे धीरे कमती होना मंगता हैं..
साक्षीभाव धीरे धीरे बढना मंगता हय..."

१०. एक साधक बहुदा महाबोअर होऊन एका ठराविक
झाडाखाली बसलेला मला दिसायचा. त्याला मी
मनातल्या मनात सल्ला दिला.
"अरे, तुम ऐसे खुले में पेड के नीचे मत बैठा करो.
तुमारा फोटू निकालके बादमें टीव्ही पे दिखाते की
ये आदमी येडा हो गया करके.. जाव.. जाके रूममें बैठो"

११. नॉर्मल रूटीनमध्ये मनाला वेगाची चटक लागलेली असते. मनावर पुटं/गंज चढलेला असल्यामुळे इथं कॅंपसमधला सर्व काळ साचून राहिल्यासारखा वाटतो.

सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग ब्रेकफास्ट आणि
संध्याकाळी गुरूजींचे प्रवचन ह्या चार पिलर्सवर पूर्ण
दिवस तोललेला आहे. सकाळचा वेळ पटकन जातो.
संध्याकाळीही ब्रेकफास्ट, प्रवचन वगैरे मध्ये वेळ जातो.. पण दुपार सरता सरत नाही. बहुदा या कॅंपसमध्ये दुपारी बारा ते पाच या वेळेत पृथ्वी फार हळूहळू फिरते. सूर्याच्याही बहुदा ते लक्षात येत नाही. कारण तो स्वतःच पेंगत असतो.

१२. कधीतरी सगळी निगेटिव्हीटी अंगावर चाल
करून येतेय. मनातला खाली बसलेला सगळा
गाळ ढवळून वर आलाय.
जुने अपमान. चुका. जुन्या काही प्रसंगातलं आपलं शरमनाक वागणं. निष्कारण लोकांना शब्दांनी बोचकारलेलं.
मुजोरी. गैरसमज. बालिशपणा.
ह्या सगळ्याच्या थपडा बसतायत. नव्हे, ठोसे बसतायत.
ह्यातलं ९०% भूतकाळातलं आहे.
वरचा उथळ स्तर खरवडून काढला की खाली
सगळी बोंबाबोंबच आहे ***.
अमुक गोष्टी करायला नको होत्या, तमुक गोष्टी आता कधीच
जमणार नाहीत. गेला तुझा चान्स. आता बस बोंबलत.

सातव्या-आठव्या दिवशी हे असे प्रचंड स्विंग होणारे मूड्स.
चांगले आणि वाईट मूड्स. .
दिवसातून तीन वेगवेगळ्या वेळी सहा-सात वेगवेगळे
मूड्स.
कोणता चांगला कोणता वाईट तेही ठरवणं मुश्किल.
झकोळ..!

मागच्या आठ दिवसांत डोक्यात नवीन काहीच कचरा
शिरलेला नसल्याने ह्या खूप प्राचीन आठवणी येतायत.
अगदी लहानपणापासूनच्या ज्या गोष्टी, घटना आपण
बिलकुल विसरून गेलेलो होतो, त्याही वरती येतायत.
आश्चर्य आहे.

चित्त पूर्ण बहिर्मुख. दोन मिनिटं सुद्धा एका
जागी टिकत नाही.
साधनेतले दोष काढणारं मन..
साला ह्या 'संखारांना' माझी पाठ आणि मांड्याच
फार आवडतायत की काय?
तिथेच नेमक्या संखारा कशा काय प्रकट होतात.

आठवा दिवस रद्द करून नऊच दिवसांचाच हवा
होता हा कोर्स, असं म्हणणारं मन..!

किंवा मग प्लॅनिंग करणारं मन..! इथून अकराव्या
दिवशी कसं कसं जायचं.. काय काय अडचणी येतील... त्या अडचणी कशा कशा सोडवायच्या... काय काय करायचं..!
मनाला प्लॅनिंग करायला किती आवडतं..!
मग ते प्लॅनिंग उद्याचं असू द्या, तासाभरानंतरचं
असू द्या किंवा लॉंग टर्मचं असू द्या.

१३. गुरुजींची प्रवचनं एकदम सही आहेत.
त्यांची सांगण्याची, एक्सप्लेन करण्याची शैली
खरोखरच सुंदर आहे.. अतिशय बुद्धिवादी तरीही
करूणेनं ओतप्रोत.
तर्ककठोर, कट्टर नास्तिक माणसालासुद्धा हे सहज कन्विन्स करतील.
दिवसभर प्रॅक्टिस आणि संध्याकाळी त्या दिवसभरात
केलेल्या प्रॅक्टिसची सैद्धांतिक थेरी प्रवचनातून असते.
मी त्यांची प्रवचनं फार पूर्वी यू-ट्यूबवर ऐकली होती.
पण कोर्समध्ये एकेक दिवस संपल्यानंतर संध्याकाळी
त्या त्या त्या दिवसाचं प्रवचन ऐकलं की मग लक्षात
येतं ह्यांच्या बोलण्यात किती मज्जा आहे ते..!
किती खाचाखोचा आहेत ते..!
बाकी गोयंकांकडे उच्च दर्जाचा सेन्स ऑफ ह्युमर आहे, ह्यात काही वादच नाही.
समोरचे ऐकणारे लोक कसा कसा विचार करत
असतील ह्याबद्दल त्यांनी आधीच फार खोलात
जाऊन विचार केलाय.

ही रेकॉर्डेड प्रवचनं जुनी आहेत. त्या वेळच्या साधकांपुढे
दिलेली.
पण आपलं मनंही डिट्टो तसंच जुनं आहे, त्यामुळे
आपल्यालाही हे लागू पडतं.

एका प्रवचनात ते म्हणतात,
"व्याकुळतेच्या लहरी येतच राहतील आयुष्यात.
त्यांच्यासोबत जे काही जुनं इंधन असेल तोपर्यंत त्या
जळत राहतील. तुम्ही त्यात स्वतःचं पेट्रोल ओतू नका.
हे सगळं वरवर बुद्धीला पटेल.. पण कायमस्वरूपी
खोलवर आत घुसणार नाही.. व्याकुळता आली की
तुम्ही पेट्रोलपंपाचे सगळे पाईप्स खोलून ठेवणार..!"

१४. दहाव्या दिवशी सकाळी मंगलमैत्री.
जन जन मंगल, जन जन मंगल,
जन जन मंगल होय रे !!!
ह्यांच्या आवाजातून कशी कणव झरत असते..!
आपल्याला ती कळते कारण आपल्यातूनही
ती झरत असते.
नऊ दिवसांतील घावांवर मलमपट्टी कशी होत असते,
हे शेवटच्या दिवशीच्या मंगलमैत्रीतून एकदा
अनुभवूनच पहायला पाहिजे..
सांगून ते कळण्यास मर्यादा आहेत.

मग मौन खुलं झालं.
जेव्हा बोलायला लागलो तेव्हा सुरूवातीला
पाच-दहा वाक्यं सलग बोलताना टाळूमध्ये
आणि घशात स्वरयंत्रामध्ये मजेशीर गुदगुल्या
होत होत्या, हे एक आठवतंय.
आपल्याला बोलून व्यक्त होता येतं ही किती
आश्चर्याची गोष्ट आहे, हे समजायला
नऊ दिवस मौन..!

दहाव्या दिवशी मोबाईल आणि बाकी गोष्टी रिटर्न.
मोबाईल सुरू केल्यानंतर स्क्रीनवर शे-पाचशे
नोटीफिकेशन्स बदाबद कोसळणं..
बाकी आपण नाहीसे झालो तरी जग आपापल्या
गतीने चालूच राहिलेलं असतं.

बाकी ह्या दहा दिवसांत खर्च काही नाही. शेवटच्या
दिवशी डोनेशनचं काउंटर असतं, दानपेटी असते.
काही कंपल्शन असं नाही.

अकराव्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता
सेंटरच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर आपण
जणू कोमातून किंवा गाढ निद्रेतून ह्या वेगळ्याच
जगात प्रवेश करत आहोत, असं एक जादूई फिलींग..! आणि सोबतच ह्या दहा दिवसांत कमावलेल्या काही इनसाईट्स
दुनियादारीत फार काळ टिकवून ठेवता
येणार नाहीत, ही धाकधूकही..!

डिस्क्लेमर : सदर लिखाणाकडे मनोरंजन म्हणूनच
पहावे, ही विनंती. व्यक्तीनुसार अनुभव/मतं वेगवेगळी असतात. शिवाय लिहिण्याची, अनुभवांची माझी मर्यादा आहे आणि त्यात दोष असणारच.
त्यामुळे विपश्यना हा प्रकार एकदा ट्राय
करून पाहिला आणि मग काही मत बनवले,
तर बरं होईल.
प्रत्यक्ष अनुभवाशिवाय इतर काहीही मार्ग नाही.

मंगल हो _/\_

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले लिखाण.
इतके तपशीलवार लिहिले आहे ते आठवणीवर विसंबून की रोजनिशी लिहीत होतात शिबीराच्या कालावधीत.

मी असं ऐकलंय की विपश्यनामध्ये इतर कुठलाही ऍक्टिव्हिटी जसे की व्यायाम, योगा वगैरे करण्यास मनाई आहे. हे खरंय का?

धन्यवाद पाचपाटील..!! इतकं व्यवस्थित आणि डोळ्यांसमोर अनुभव विश्व प्रकट करणारं लिखाण आहे तुमचं. विपश्यना बाबतची मनातील सर्व उत्सुकता तुमच्या लिखाणाने शमली असली तरी हा अनुभव घ्यावासा वाटू लागले आहे.

फारच सुंदर. गंभीर विषयावर इतकं नितळ प्रांजळ, इतकं हलकं फुलकं, कोणताही आवेश, अभिनिवेश नसलेलं लिखाण क्वचित् वाचायला मिळतं.
जग दुष्ट आहे, (म्हणून तुच्छ आहे, मी त्यावर थुंकतो किंवा मी त्याला भीक घालणार नाही, मला गरज नाही) असा ठोकरवादी आविर्भावही नाही.
फारच आवडलं. Happy

छान लिहिलंय! पुन्हा जावसं वाटतं का? तुमचा अनुभव वाचून वाटलं की पहिल्या वेळी फक्त catharsis होत असावा. पुन्हा गेलो तर मग खऱ्या अर्थाने प्रवचनांचा अर्थ उमगायला सुरूवात होत असेल.

>> फारच सुंदर. गंभीर विषयावर इतकं नितळ प्रांजळ, इतकं हलकं फुलकं, कोणताही आवेश, अभिनिवेश नसलेलं लिखाण क्वचित् वाचायला मिळतं.

+111

सुंदर लिहिलंय. मलाही थोडाफार असाच अनुभव आला आहे.
शिवाय हे ही टेंपररी असतं‌, 'अनिच्चा' असतं. हे 'अनिच्चा' असतं कि अनित्यं असतं.

@हर्पेन
अकराव्या दिवशी रिटर्न जर्नीमध्ये ट्रेनमध्ये, निसटून जाईल असं वाटणाऱ्या काही गोष्टी/अनुभव मोबाईलमध्ये लिहून ठेवले. बाकी मग नंतर आठवणींचा विस्तार. Happy
रोजनिशी/पुस्तकं/पेन/डिजीटल गोष्टी वगैरेचा काही स्कोप नाही तिथे. जमा कराव्या लागतात.

@ मानव पृथ्वीकर
दोन्ही सायमलटेनियसली करू नका अशा सूचना देतात ते. वेगवेगळ्या वेळी केलं तर हरकत नाही.
म्हणजे पहाटे किंवा इतर सोयीच्या सेपेरेट वेळी रूममध्ये प्राणायाम/योगा/व्यायाम वगैरे.
आणि नंतर मग आनापान/विपश्यना जे काही असेल ते.
परंतु धम्महॉलमध्ये बसून एकाच वेळी कपालभाती किंवा भ्रस्रिकाही चाललंय, त्याच वेळी श्वासाचं नाकपुड्यांमधलं आलंबनही बघणं चाललंय आणि त्याच वेळी शरीरावरच्या संवेदनांचंही निरीक्षण चाललंय, असं बहुदा चालत नाही.
(बाकी आनापानमध्ये नैसर्गिक श्वास जसा आहे तसा बघण्यावर फोकस आहे.. त्यात जाणूनबुजून बदल करायचा नाही.
प्राणायाममध्ये आपण तसा बदल करतो.
बहुदा हा फरक हे एक कारण असावे. पण नक्की माहिती नाही.)

@ लंपन, व्यत्यय, भरत, सुनिती धन्यवाद

@ हीरा
तुमचा प्रतिसाद सुंदर आहे नेहमीसारखाच. आवडला.
कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद. Happy _/\_

@ जिज्ञासा
कॅथर्सिस/पर्जींग तर आहेच. आणि कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांनाच होत असणार. बाकी कुणाच्या आत कळत नकळत किती काय काय साठलंय त्यावरही असेल..
पण ते काही 'तेवढंच' नाही. इतरही बरंच काही आहे.
शिवाय सातव्या आठव्या दिवशीचं 'वादळ' ओसरल्यावर नवव्या दिवशी भरपूर रिलॅक्स, हलकं वाटलं, हेही आहेच.

परत १० दिवसांच्या कोर्सला लवकर जाणं होणार नाही. वर्षं-दोन वर्षांचा गॅप पडला की मग कदाचित पुन्हा गरज वाटायला लागेल.. मुख्य प्रश्न एवढ्या मोठ्या सुट्टीचाच असतो.. बाकी आता एक/दोन/तीन दिवसांचे कोर्सेस अटेंड करण्यासाठी एलिजीबल झालोय.. ते जमून जातं.. अधूनमधून आपली बॅटरी डाउन झाली की अशा शॉर्ट कोर्समध्ये चार्ज होऊन जाते. Lol

@ Dj..
खूप धन्यवाद. आणि जरूर जाऊन या. तुम्हाला शुभेच्छा.

@ सोनाली,
अनिच्च=अनित्य
पालीमध्ये अनिच्च
मराठीमध्ये अनित्य

ग्रुप सिटींगच्या शेवटी सगळे जण गोयंकांच्या उद्घोषणा करणाऱ्या आवाजाचीच व्याकुळपणे वाट पाहत असतात .. की कधी एकदा "अनिच्चा ss वत संखारा sss उप्पादवय धम्मिनो,"
हे ऐकू येतंय आणि कधी आपण पाय मोकळे करतोय..!
Happy

छान अनुभवकथन, जे आहे ते असे आहे टाईप... जिज्ञासाचा प्रश्न मलाही पडला होता व उत्तरही मिळाले. कुठल्या हेतुने जायचे ठरवले होते तो हेतू पूर्ण झाला का ?!

माझे कठोर बुद्धीवादी मित्र व शास्त्रज्ञ श्री प्रभाकर नानावटी यांचा धानधारणा या प्रकारावर आलेले लेख खाली देत आहे. ते व त्यावरील चर्चा ही नक्कीच वाचनीय आह.
ध्यानम् सरणम् गच्छामी (पूर्वार्ध)
https://aisiakshare.com/node/1619

ध्यानम् सरणम् गच्छामी (उत्तरार्ध)
https://aisiakshare.com/node/1631

पाचपाटील, मस्त.

मागे एकदा धाग्यावर विपश्यनेवर चर्चा झाली होती, तेंव्हा एकदा जायला पाहिजे असे मनात ठरवले होते. पण निग्रहाने सलग दहा दिवस बाजूला काढणे झाले नाही (किंवा केले नाही). हे वाचून पुन्हा ते करायला हवे असे वाटू लागले.

@ सस्मित, वंदना, मामी.. धन्यवाद
@ प्रकाश घाटपांडे,
धाग्यांबद्दल धन्यवाद.
@अस्मिता,
काही हेतू हा वरती लिहिले होते सातव्या पॉईंटमध्ये शेवटी..
बाकी आधीच्या आणि नंतरच्या मी मध्ये फरक तर‌ नक्कीच जाणवतोय, काही वादच नाही.. पण अर्थात मला हा कोर्स करून फार काळ झाला नाही, त्यामुळे पुढे भविष्यात हे सगळं कितपत टिकेल सांगता येत नाही.. शेवटी आपण ते रोजच्या रूटीनमध्ये किती मेंटेन करू शकतोय त्यावरच सगळा खेळ आहे...
बाकी आतल्या आत धुमसणं कमी झालंय, हे एक जरा त्यातल्या त्यात जास्तच जाणवतंय
'ते' पूर्ण गेलंय असं नाही, जाणारही नाही, पण सध्या तरी 'ते' जरा चालू झालं की लगेचच 'होश' येतोय, हे बरंय.
पुढे बघूया आता कसं कसं जमतं ते .. Happy

@ रेव्यु,
नाही, असं काही नाही.. ह्यांच्या तशा काहीच सूचना/अटी नाहीत.. इतर कोणत्या कोर्सेसमध्ये तशा सूचना असतील तर माहित नाही Happy

बाकी आतल्या आत धुमसणं कमी झालंय, हे एक जरा त्यातल्या त्यात जास्तच जाणवतंय
'ते' पूर्ण गेलंय असं नाही, जाणारही नाही, पण सध्या तरी 'ते' जरा चालू झालं की लगेचच 'होश' येतोय, हे बरंय.
पुढे बघूया आता कसं कसं जमतं ते .
>>> समजलं व पोचलं , धन्यवाद Happy

हा भाग जास्त आवडला!
तुमचे रॅन्डम/ स्फुट लेख फारच आवडतात. पुलेशु.....

छान लिहिलंय.
गेल्या किंवा त्याच्या आदल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात कुमार सप्तर्षींचा विपश्यनेवर लेख होता. तोही खूप छान होता.

छान अनुभवकथन.

माझ्या भावाने काही वर्षांपूर्वी इगतपुरीला केलेली विपश्यना. त्याला फार positive वाटलेले.

खुप छान, सोपे आणि सहज लिहिले आहे. मी अनेक वर्ष १० दिवस सलग सुट्टी कशी मिळेल हे बघत घालवलेत आणि अजूनही जाणे झालेच नाहिए. पण जाणार एकदा हे नक्की.
अजून अनुभव वाचायला आवडतील.

आप चुळबुळ बहोत करते हो >>> या वाक्याला फस्सकन हसू आलं Happy
पण नितांतसुंदर आणि प्रामणिक झाला आहे लेख. उगाच खूप काही ग्रेट केलंय किंवा अमूलाग्र बदल घडलाय वगैरे अँगल न येता जे वाटलं जसं वाटलं तसं व्यक्त झालंय सर्व. खूप छान वाटलं वाचायला. रादर हे वाचून एकदा तरी विपश्यना करून पहायला हवी असं वाटलं.

तुम्ही परत आल्यावर सोमि वर पूर्वीसारखे रमू शकलात का? स्पेशली व्हॉट्सअ‍ॅप वर? आणि त्याला किती वेळ लागला?