वाट पाहणार्‍या डोळ्यांचे...

Submitted by मुग्धमानसी on 15 November, 2021 - 05:02

काळामधल्या भेगांतून ही रांगत जातील राजस बाळे
विरून जातील गळून जातील वाट पाहण्याचे डोहाळे...

पांघरून सार्‍या मौनाला निजून जाईल निरभ्र अंतर
दरवळेल दोन्ही टोकांना अपूर्णतेचे अत्तर काळे!

कुणी अपेक्षा ठेवाव्या अन् कुणी करावी त्यांची पूर्ती?
हळूहळू बघ तुटून जाईल अल्लद हेही अमोघ जाळे!

उपभोगांच्या रुमालात ही वेचून घेऊ प्राक्तन पुष्पे
काय उद्याच्या बहरालाही येतील ऐसे गंध उमाळे?

वाट पाहणार्‍या डोळ्यांचे तपशील छापूनी घे चित्ताशी
तुझ्या रिक्त घरट्यात अखेरी रांगतील बघ त्यांचीच बाळे....!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Superb