मूगडाळीचे लाडू

Submitted by स्वाती लाड on 12 November, 2021 - 00:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मूगडाळ ½ किलो, बारीक किसलेला गूळ ½ किलो, तूप, वेलची पावडर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, बेदाणे आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

प्रथम मूगडाळ धूऊन चाळणीत निथळत ठेवावी. मूगडाळ एक ते दीड तास निथळल्यानंतर मिडियम गॅस वर 20 ते 25 मिनिटे भाजून घ्यावी. डाळीचा रंग गुलाबी होईपर्यंत एकसारखे परतत राहावे. डाळ भाजून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक रव्यासारखे पीठ करून घ्यावे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून हे पीठ चांगले भाजून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास अजून 1 ते 2 चमचे तूप टाकावे. डाळीचे पीठ भाजून झाल्यावर थोड कोमट करावे. काजू, बदाम, पिस्त्याचे काप व चारोळी थोडे परतून घ्यावे. नंतर मूगडाळीच्या पिठात गूळ मिक्स करावे. गूळ एकसारखे मिक्स होण्याकरता एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पावडर, बेदाणे, काजू, चारोळी, बदाम, पिस्त्याचे काप टाकून मिक्स करावे. लाडू वळण्यासाठी मिश्रणात 2 ते 3 चमचे तूप टाकून लाडू वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
अर्धा किलो मुगडाळीचे मिडीयम साइज चे 20 लाडू होतात.
अधिक टिपा: 

मूगडाळ निथळल्यानंतर लगेच भाजावी वाळवण्याची गरज नाही. संध्याकाळी भुकेच्या वेळी खायला हे लाडू चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
यूटुब
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाडू सुंदर दिसत आहेत.

मला एक शंका आहे एकंदरीतच अशा तुपात भाजून केलेल्या लाडवांविषयी. ह्यात तुपावर भाजलेले कच्चे पिठच आपण खात असतो. म्हणजे न शिजलेले. तर ते पोटाला कसे काय चालते?
पाकातल्या लाडूबाबत म्हणायचं तर गरम पाकात घातल्यावर ते शिजतात आणि मग मऊ होतात तसं इथं होत नाही ना.

मूगडाळ पचायला तशी हलकीच असते. ती भिजवून, निथळून, भाजल्यावर त्याची पूड करून पुन्हा तुपात खमंग भाजल्यामुळे त्यातील कच्चेपण संपत असावं अन ते पोटाला त्रासदायक होत नसावं असा माझा कयास.

डाळ भाजलीय की चांगली.

पंढरपुरी डाळ्याचं कूट करून न भाजताच त्याचे लाडू करतात.

भरत. ते पंढरपुरी डाळ्याचे लाडु कसे करतात सांगा ना प्लीज. दिवाळीच्या चिवड्यासाठी आईने मला ५० ग्रॅम पंढरपुरी डाळं आणायला सांगितलं अन मी चुकून ५०० ग्रॅम आणलं Uhoh तुम्ही लाडु कसे बनवतात ते सांगितलं तर माझ्या नावाचा उद्धार थांबेल.

मेधावि-मुगडाळ आधी आपण 20-25 मिनिटे मिडीयम गॅस वर भाजून घेतली. त्यानंतर मिक्सर मध्ये पीठ करून घेतल्यानंतर ते पुन्हा तुपावर भाजून घेतले. त्यामुळे लाडू छान खमंग लागतात. अजिबात कच्चे लागत नाहीत.

छान आहे हीपण पाककृती!
पापा मम्मी किचनच्या यूट्यूब चॅनलवर आहेत मूगडाळीचे लाडू. पण कृती जरा वेगळी आहे.

ह्यात तुपावर भाजलेले कच्चे पिठच आपण खात असतो. म्हणजे न शिजलेले. तर ते पोटाला कसे काय चालते?>>>>> चणे शेंगदाणे भाजल्यावर खातात की सारे.भाजल्यामुळे शिजले जाते.
आमच्याकडे बारीक रव्याचेही विनापाकाचे लाडू करतात.तेही बाधत नाहीत.

छान आहे पाककृती..
आमच्याकडे बारीक रव्याचेही विनापाकाचे लाडू करतात. <<
मला हे लाडू खुप आवडतात पाकातल्या लाडवापेक्षा .