वेडिंगचा शिणेमा, शिणेमाची परीक्षा

Submitted by निमिष_सोनार on 8 November, 2021 - 00:59

"वेडिंग चा शिणेमा" हा 2019 साली रिलीज झालेला मराठी चित्रपट नुकताच माझ्या बघण्यात आला. चित्रपट विनोदी पद्धतीने पुढे सरकतो पण एक महत्त्वाचा प्रश्न हाताळताना नकळत केव्हा गंभीर होतो ते कळतही नाही आणि असं हे गंभीर होणं आपल्याला प्रेक्षक म्हणून आवडतं.

चित्रपट विनोदी असला तरीही अत्यंत गंभीर चित्रपटात शोभेल असा अतिशय सकस अभिनयाने युक्त असा प्रसंग (संवाद) यात आहे जो अश्विनी कळसेकर या अभिनेत्रीने अक्षरशः जिवंत केला आहे. इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका केवळ तीच करू शकते. (संजय दत्त च्या "ऑल द बेस्ट" मधली विनोदी "मेरी" आठवा)

सुरुवातीला वाटतं की "प्री वेडिंग शूट" या थीम वर आधारित हा सिनेमा "हम आपके हैं कौन' च्या वळणावर जातो की काय?
यातील भरपूर कलाकारांची फौज आणि त्यातही बहुतेक कलाकार नावाजलेले आहेत हे बघून असे वाटायला लागते की या सर्व कलाकारांना वाया तर नाही घालवले जाणार ना? प्रत्येक कलाकाराला न्याय देता येईल इतक्या व्यवस्थितपणे व्यक्तिरेखा लिहिलेल्या असतील का?

आपल्या या सर्व शंका खोट्या ठरवत हा चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला हलक्या फुलक्या प्रसंगातून खिळवून ठेवतो आणि निर्माण झालेल्या थोड्याफार गुंतागुंतीचे उत्तर हलक्या फुलक्या प्रसंगातून सोडवणूक करून देतो.

पण एक विनोदी चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट सुरुवातीला अनेक अपेक्षा निर्माण करतो जसे यात "प्री वेडिंग शूट" असल्याने नवरा नवरी दोन्हीकडच्या कुटुंबातील लोकांना नाचावे लागणार असते. जसे "दुल्हन हम ले जायेंगे" मध्ये "मुझसे शादी करोगी" या गाण्यात ओम पुरी, परेश रावल, अनुपम खेर या चरित्र अभिनेत्यांना नाचायला लावले आहे तसे यात "प्री वेडिंग शूट" मध्ये शिवाजी साटम, प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अलका कुबल, अश्विनी कळसेकर, भालचंद्र कदम यांना एकत्र नाचायला लावतील आणि एक धम्माल गाणे होईल असे वाटले होते पण तसे होतच नाही. (निदान शेवटी नावे येत असताना छोट्याश्या चौकोनात रिमिक्स गाणे दाखवतील असे वाटले पण तेही होत नाही). त्यापेक्षा शिवाजी साटम यांच्या गंभीर व्यक्तिमत्त्वाला विनोदाची योग्य तेवढी फोडणी "दे धक्का" मध्ये दिल्याने तो एक सुखद विनोदी धक्का त्या चित्रपटात होता.

अनिल कपूर च्या नायक मध्ये राणी मुखर्जी चे वडील शिवाजी साटम थोडे विनोदी होते. हापूस मध्येही बहुदा त्यांची भूमिका विनोदीच होती. आणखी एक अपेक्षा जसे सर्व सदस्य एकत्र येऊन काही खेळ खेळतील, हार जीत होईल वगैरे पण तसेही होत नाही.

पण असे असले तरीही चित्रपट खूप छान आहे यात शंका नाही. यातील एकही गाणे लक्षात राहण्यासारखे नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदीच ओके ओके सिनेमा आहे. मेलबर्नमध्ये प्रीमियर साठी खुद्द सलील कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे आले होते म्हणून बराच वेळ (आणि अर्थातच पैसे) खर्च करून आवर्जून बघायला गेलो होतो पण another movie अस वाटलं! सलील कुलकर्णी इतकं छान संगीत देतात म्हणून त्यांनी केलेला सिनेमा पण भारी असेल अशा भ्रमात राहू नये एव्हढे त्या दिवशी समजले Lol

अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे!