स्टॅंड - १

Submitted by मोहिनी१२३ on 1 November, 2021 - 13:20

त्यादिवशी प्रोजेक्ट जरा फारचं पेटलं होतं. सकाळी ९ वाजल्यापासून सर्वात मोठी कॅान्फरस रूम १२ तासांसाठी बुक झाली होती. नेहमी ११ वाजता निवांत येणारी नेहा १०:५८ ला धावतपळत पोचली होती.
तिला डेस्कवर न जाता डायरेक्ट कॅान्फरस रूम मध्ये यायचा मेसेज ब्लॅकबेरी वर आला होता.

ती मिटींग रूम मध्ये आली तेव्हा ती रूम खचाखच भरली होती. तिने थोडं स्थिरस्थावर झाल्यावर कोण कोण आहे याची पाहणी करायला प्रारंभ केला.बरेच सिनियर मॅनेजमेंटचे लोक दिसत होते. ती त्या प्रोजेक्टच्या एका कंपोनंट वर काम करत होती. त्या कंपोनंट चे टेस्टिंग लिड करत होती. त्या प्रोजेक्टचे काम एकूण ४ कंपन्यामध्ये विभागले होते. त्या कंपनीतलेही त्या प्रोजेक्ट संबधित सिनीयर लोक तिथे दिसत होते. त्या प्रोजेक्टचे नेतृत्व मात्र सर्वाथाने तिच्या कंपनीकडे होते.

तिला अजूनही मिटींग इतक्या तातडीने ,कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय का बोलावली याचा अंदाज येत नव्हता. सिनिअर्सची धुवाधार चर्चा-आरोप-प्रत्यारोप-खलबतं चालू होती. बिग पिक्चर- डेव्ह ॲाप्स-डेड लाईन-परफॅार्मन्स-रिसोर्स क्रंच असे नेहमीचे शब्द कानावर पडताच तिला जोरात जांभईच आली. तोंडावर हात ठेऊन तिने ती दाबायचा अयशस्वी प्रयत्न केला. तेवढ्यात तिला अनुराधा दिसली.

अनुराधा व्हेंडर कंपनीची सिनीयर मॅनेजर. ७ वा-८ वा महिना चालू असलेली, जडावलेली. तिची कंपनी नेहाच्या कंपनीच्या जवळच होती. त्यामुळे कधी कॅब नाही मिळाली तर ती चालत या कंपनीत मिटींगला यायची. मागच्या आठवड्यात ती पाय ओढत चालत येत असताना नेहाने पाहिलं आणि तिला वाईट वाटलं.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users