अज्ञातवासी - S2E01 - तयारी!

Submitted by अज्ञातवासी on 28 October, 2021 - 12:18

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/78527

"खानसाहेब..."
"बोला मोक्षसाहेब..."
"निघतो मी."
"निघतो?... अणि मी?..."
"रात्रीच्या प्रेतांची अजून विल्हेवाट लावयाचीय खानसाहेब. नको."
"अब्बू, मी जाते सोबत. तिकडून झोया येत म्हणाली."
"नाही झोया. तू नाही... मोक्ष अधीरपणे म्हणाला."
"मीच. खानसाहेब नसतील तर मीच..."
"खानसाहेब." मोक्षने खानसाहेबांकडे बघितले.
"झोया. जा..."
झोया हर्षभरीत झाली.
"झोया. जितक्या गोळ्या भरून घेता येईल, तितक्या घे. एकेची कुठलीही रायफल नको. उझी ठेव. जा..."
झोयाने मान हलवली, आणि ती आत गेली.
"खानसाहेब." मोक्षने आश्चर्याने खानसाहेबांकडे बघितले.
"तुमचा जीव महत्वाचा आहे, आणि माझी मुलगी तुमच्यासाठी जीव देईन, हेही मला माहितीये."
"तिथे आज काय होईल, हे कुणालाही माहिती नाही खानसाहेब."
"काही होणार नाही. तुम्ही खुर्चीवर बसलात, तर आपण सगळे जगू...
...आणि संग्राम बसला तर हळूहळू सर्वांना तो मारून टाकेन..."
"मोक्ष त्यांच्याकडे बघतच राहिला.
तुम्हाला काय वाटलं? तुम्ही थांबला नाहीत, तुम्ही हे सगळं सोडून गेलात, तर हे सगळं सुरळीत होईन? नाही... आमचं जीवन नरक बनेल, आणि आमचंच नाही, तर जे मोक्ष शेलार यांच्या सोबत असतील, सर्वांचंच..."
मोक्ष शांतपणे सगळं ऐकत होता.
"म्हणून या क्षणाला मी फक्त दोन जणांवर विश्वास ठेऊ शकतो, एकतर मी, नाहीतर झोया."
तेवढ्यात झोया तिकडून तयारीनिशी आली...
खानसाहेबांनी तिच्याकडे कौतुकाने बघितले.
"चला निघा आता. वेळ कमी आहे..."
शेजारीच एक स्कॉर्पिओ उभी होती.
दोघेही तिच्यात बसून निघाले...
*****
"गुलाल?"
"रेडी."
"पैशाची माळ?"
"रेडी."
"एक लाख फटाके?"
"रेडी."
"कॅमेरामन?"
"रेडी."
"बॅनर वाले?"
"रेडी."
"एक नंबर." पक्या ओरडला.
"काय चाललय रे." संग्राम मागून येत म्हणाला.
"तयारी चाललीय भाऊ, तयारी." पक्या खिदळत म्हणाला.
"तयारी करा, पण रात्रीच्या तयारीचही लक्षात ठेवा." संग्राम म्हणाला.
"भाऊ, खास आकर्षण आहे. तयार रहा..." पक्याने डोळे मिचकावले.
संग्राम फक्त हसला.
वाडा माणसांनी गच्च भरला होता. जगन अण्णांची पुण्यतिथी म्हणजे शेलारांसाठी दासऱ्याहून मोठा सोहळा.
वाड्याच्या मध्यभागी खुर्ची ठेवलेली होती... तिच्यामागे उंचावर राजशेखर शेलार आणि जगन अण्णांचा फोटो ठेवला होता. खुर्चीभोवती साधे बॅरिकेड्स लावलेले होते व एक लाकडी गेट्सुद्धा होता.
वाड्याच्या उजव्या बाजूला ह.भ.प दामोदर महाराजांचं कीर्तन होतं. निवृत्ती महाराजांचे परमशिष्य. त्याच्याच मागे उपस्थितांना बसण्यासाठी खुर्च्या होत्या.
डाव्या बाजूला जेवणासाठी टेबले मांडली होती.
वाड्याच्या मागच्या बाजूने भोजनाचा खमंग सुवास दरवळत होता.
"बायांनो, हात चालवा. गर्दी वाढतच चाललीय, अजून स्वयंपाक वाढवावा लागेल." काकू जमेल तितक्या बायांना सूचना देत होत्या.
"सत्यभामा." सौदामिनीबाई मागून आल्या...
"बोला मोठ्या बाई. अग तू पटकन कोथिंबीर चिरून ठेव बरं..." काकू एका मुलीला सूचना देत म्हणाल्या.
"किती करतेस घरासाठी. सगळं तुलाच करायचं असतं. कर ना थोडावेळ आराम." सौदामिनीबाई म्हणाल्या.
"घरातली कर्ती बाई आहे मी. मीच जर आराम केला, तर लोकांनी उपाशी जायला नको." काकू ठसक्यात म्हणाल्या.
"तू कधी माझं ऐकणार नाहीस. पण खरच कित्येक दिवसांनी घर भरल्यासारखं वाटतंय."
"म्हणजे???"
"म्हणजे..." सौदामिनीबाई जरा अडखळल्या.
"मोठ्या बाई, ज्या घरातला कर्ता पुरुष नुकताच गेलेला आहे ना, त्या घरात इतक्या लवकर कसं भरल्यासारखं वाटेल?"
"ते आहेच ग, म्हणूनच तर वेळ आहे ना आता, कुणीतरी जबाबदारी घेण्याची? आता संग्राम कायम दादासाहेबांबरोबर असायचा. शेवटी त्याच्याच उरावर आलं सगळं. आता काहीही झालं तरी लहानच आहे ना तो? त्यांनी नाटकी उसासा सोडला."
"मी काय म्हणते बाई, गरज काय आहे जबाबदारी घेण्याची?"
"म्हणजे," सौदामिनीबाई चपापल्या.
"जबाबदारी कुणी घ्यायची, हे अजून ठरलेलं नाहीच. लगेच त्याला माघार घेऊ द्या... म्हणजे इतकं ओझं नको. पोरगं लहान आहे हो, कोलमडून जाईल."
"पण कुणीतरी शेलारानेच जबाबदारी घ्यायला हवी ना?" सौदामिनीबाई राग लपवत म्हणाल्या.
"मग ताकाला जाऊन भांडं का लपवायचं? सांगा ना? जे मनात आहे तेच ओठांवर येऊ द्या मोठ्या बाई."
सौदामिनीबाई अस्वस्थ झाल्या.
"आणि चिंता करू नका. जे तुम्हाला हवंय तसच होईल. कारण कितीही झालं तरी त्या खुर्चीवर शेलारच बसेल, आणि माझी काहीही हरकत नाही त्याला. माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या भवितव्याची चिंता सध्यातरी त्यांच्या भावाने मिटवली आहे."
"संग्राम त्यांचा भाऊ नाही का सत्यभामा?"
"आहे ना. पण त्याचीच तर भीती वाटते. म्हणून आताच सांगते. शुभम कधीही संग्रामच्या वाटेत येणार नाही, पण संग्राम वाट चुकून शुभमकडे गेलाच...
...तर ही सत्यभामा उकळत्या तेलात त्याला तळून काढेल. समजलं???" काकूंच्या नजरेत अंगार होता...
सौदामिनीबाई तणतणत तिथून निघून गेल्या.
"महादेवा, वाचव आम्हाला." सत्यभामाबाई पुटपुटल्या.
तेवढ्यात तिकडून रुपाली धापा टाकत काकूंकडे आली...
"काकू," तिचा श्वास वरखाली होत होता.
"अग हळू, काय झालं एवढं. बस बरं बाजूला य खुर्चीवर आधी."
"काकू... मोक्ष आलाय, परत..." तिचा श्वास जोरात वरखाली होत होता...
काकूंनी तिच्याकडे आश्चर्याने बघितले...
...आणि त्या घाईघाईने वाड्यात निघाल्या...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग..!!
पुढील लेखनास शुभेच्छा..!!

कथा पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा.
आपले लिखाण आवडते.
आता अंतिम भाग आल्यानंतर च सलग कथा वाचणार असे ठरवले आहे.

मस्त
आता दुसरा सिजन लवकर पूर्ण करा..... Happy Happy Happy

खूप दिवसांनी हा भाग आला. मला तर वाटले होते की मायबोलीवरच्या अनेक कथांप्रमाणे ही पण अर्धवटच राहणार की काय. .

छान..
कधीतरी ही कथा पूर्ण कराल या अपेक्षेत.. पु ले शु

सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद!

अजूनही अज्ञातवासी २० टक्के सुद्धा पूर्ण नाही. पाच सीजन करायला हवेत बहुतेक.
ही कादंबरी पूर्ण व्हायला कमीत कमी वर्ष लागेल. आठवड्याला सध्या दोन भागाचं टार्गेट ठेवतोय.
धन्यवाद!!