स्वयंपाकघर......एक जिव्हाळा.....

Submitted by वैशू on 30 October, 2021 - 10:25

स्वयंपाकघर......

आम्हा तमाम स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय.'रांधा,वाढा,उष्टी काढा' व 'चूल आणि मूल' एवढ्याच परिघात फिरणारं स्रियांचं आयुष्य.आणि त्या पण बापड्या कंबर कसून दिवसरात्र पुरूषांच्या दिमतीला हजर.रोजचं जेवण,सणावाराचा स्पेशल स्वयंपाक,चटण्या,लोणची,पापड, वाळवणं...अमकं आणि तमकं.नित्य व नैमित्तिक जेवणावळी,नातेवाईक,दिवाळीचा डबे भरभरून फराळ,लाटणं,घाटणं,वाटणं,तळण,दळण..एक का दोन...
पुरूष यथेच्छ ताव मारणार आणि तृप्तीचा ढेकर देणार की झालंच यांच्या जन्माचं सार्थक.सणावाराला दोनचार डाग घडवले आणि लुगडी आणून दिली की स्रिया खुश...
'स्री' ही क्षणाची पत्नी असते...व अनंतकाळची माता असते' अशी गोंडस विशेषणं देऊन तिच्या गळ्यात पोरांचं लेंढार मारलं की मग ती कसली येतेय स्वयंपाकघराची लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर? पण त्याही परिस्थितीत दूरदृष्टी असलेल्या काही स्त्रियांनी व पुरूषांनी स्वयंपाकघरात अडकलेल्या स्त्रीला अक्षरशः खेचून बाहेर काढलं आणि 'बाई गं..याच्यापलीकडेही विश्व आहे बरं का...!' म्हणून तिचे डोळे खाड्कन उघडले.
आणि मग झाला स्त्री चा 'स्वयंपाकघराबाहेरील प्रवास' सुरू.
सुरूवातीला तमाम परंपरावादी मंडळींनी या सगळ्याला कडाडून विरोध केला. पण बायका देखील कसल्या चिवट.अजिबात मागे हटल्या नाहीत आणि त्यांना देखील काही अस्तित्व आहे हे सत्य त्यांनी समाजाच्या गळ्यात उतरवलेच.
मग सावकाश सगळ्यांच्याच हे पचनी पडू लागले...हळूहळू अंगवळणीच पडले म्हणा ना. स्वयंपाकघरातील स्त्रियांची सद्दी संपुष्टात येऊ लागली.
'स्री' इज इक्वल टू 'स्वयंपाकघर' हे समीकरण रद्दबातल ठरू लागलं.स्रियांनी इंगाच असा दाखवला राव की सर्वांच्याच हाताची घडी आणि तोंडावर बोट...अळी मिळी गूप चिळीच म्हणा ना..! मग स्त्रियांची शस्रास्त्रे देखील बदलली.झारे,चमचे,सुर्या घेऊन युध्दभूमी गाजवणार्या स्त्रिया लेखणी घेऊन लढू लागल्या.आधी स्वयंपाकघर ही स्रियांची कर्मभूमी
होती.तांदूळ निवडता निवडता आणि भाज्या चिरताचिरता एकीकडे सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची...आता ट्रेनमध्ये,ऑफिसमध्ये,सोशल मीडियावर मनं मोकळी होऊ लागली.
'अय्या आणि ईश्श्य' मधून बाहेर पडून ती 'व्हाॅटस् अप ड्यूड' पर्यंत येऊन पोहोचली.
इथे स्वयंपाकघरात बदलाचे वारे वाहू लागल्यावर काही ठिकाणी सत्तापालट झाला.महाभारतात भीमाने बल्लवाचार्याची ड्यूटी करून पुरुष पाककलेतही हार जाणार नाहीत याचं सूतोवाच केलं होतंच.
आता आधुनिक पुरूषही तोच वारसा घेऊन पुढे सरसावले.स्वयंपाक ही केवळ स्त्रीची मोनाॅपाॅली नसून पुरूषांनादेखील अन्नग्रहणासोबतच ते शिजवण्याचं कौशल्यही आत्मसात करता आलं पाहिजे हे पटू लागलं. 'कालाय तस्मै नमः!' स्वयंपाकघराची सूत्रे आता त्यांच्याही हाती आली. सास्वा,मुले,सासर माहेरची मंडळी सगळेच जेवणाच्या बाबतीत जुगाड करू लागले.स्त्री बाहेरची व घरातली आघाडी कौशल्याने सांभाळत होतीच तरीदेखील सर्वांना तिच्या कष्टांची जाणीव होऊ लागली.दखल घेतली जाऊ लागली.
व मग कधी हाॅटेलचा रस्ता धरला जाऊ लागला तर कधी 'वन डिश मील' खाऊन उदरभरण केले जाऊ लागले.त्याव्यतिरिक्त टू मिनीट नूडल्सनी वेळेची मारामारीदेखील संपवली.हळूहळू पारंपारिक पदार्थ स्वयंपाकघरातून काढता पाय घेऊ लागले आणि काॅन्टिनेन्टल फूड तिथे ठाण मांडून बसले. परदेशी पदार्थांनी बाजी मारली.मूलाबाळांच्या पसंतीस उतरलेल्या फास्ट फूडला नावे ठेवता ठेवता हळूहळू आजीआजोबादेखील पिझ्झा बर्गर अगदी आवडीने बोटं चाटूनपुसून खाऊ लागले.
पण मग ती कुठे कमी पडत होती का? तर मुळीच नाही.महिषासुरमर्दिनीप्रमाणे आपल्या दशभुजा चालवत ती सगळ्याच समस्यांना चारी मुंड्या चीत करत होती.घरात बल्लवाचार्य सक्रिय झाले तरी ह्या अन्नपूर्णेला हृदयापाशी पोहोचण्यासाठी पोटातून आत शिरावं लागतं ही मेख चांगलीच माहित होती.आज एकीकडे संसाराला हातभार लावत असतानाच ती स्वयंपाकघरही तितक्याच तत्परतेनं सांभाळतेय.इतकंच काय पण कधी कुकिंगचे क्लासेस घेऊन,कधी त्या स्पर्धांसाठी जज बनून,यू ट्यूब चॅनलवरून,ब्लॉग्ज लिहून तर कधी भाजीपोळीचे डबे पुरवून तिने स्वयंपाकघराशी असलेलं आपलं नातं कायम ठेवलंय.आशाताईं भोसलेंसारख्या प्रतिथयश गायिकासुद्धा जेव्हा स्वयंपाकघरात रमतात, हाॅटेल्सची चेन जगभर चालवतात तेव्हा मनस्वी कौतुक वाटतं आणि संजीव कपूर, विकास खन्ना,रणबीर ब्रार,तुषार देशमुखसारखे शेफ्स स्वयंपाकघरावर अधिराज्य गाजवताना पाहिले की ते कौतुक द्विगुणित होते.आणि खर्या अर्थाने अन्नपूर्णा प्रसन्न झालीच असणार याबद्दल पुरेपूर खात्री पटते..

........वैशाली कुशे........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
स्वयंपाकात निपूण असणे कौशल्याचे काम आहे.
ऐर्यागैर्यांना जमत नाही मला तर अजिबात जमत नाही.