लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे

Submitted by कुमार१ on 29 October, 2021 - 23:59

लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे.

साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात. किंबहुना त्या बहुसंख्यांच्या वाट्याला येत नाहीत. (ज्या थोड्या फार लोकांना त्यात यश येते त्यालाही चोरटेपणाची किनार असते). मात्र त्या संदर्भातील कल्पनाविलास हा सर्व तरुणांच्या मनात सतत चालू असतो. मग ती मानसिक भूक शमविण्यासाठी विविध प्रकारच्या लैंगिक साहित्याचा अनुभव घेतला जातो. अशा साहित्यप्रकारांत ऐकीव ज्ञान, लिखित माहिती आणि दृश्य माध्यमांचा समावेश होतो.

आज आंतरजालाच्या व्यापक उपलब्धतेमुळे लैंगिकतेसंदर्भातल्या अगणित दृश्यफिती आपल्याला सहज पाहता येतात. ते सर्व अनिर्बंध स्वरूपात उपलब्ध आहे. परंतु सुमारे ४० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा मुख्यत्वे मौखिक व लिखित प्रकारे या विषयाच्या माहितीची मर्यादित देवाणघेवाण होई. कालांतराने या परिस्थितीत बदल होत आपण आजच्या मुक्तस्त्रोत स्थितीत पोचलो आहोत. या साहित्याची गेल्या चार दशकांतील स्थित्यंतरे आणि माझे तारुण्यातील अनुभव या लेखाद्वारे सादर करीत आहे. स्वानुभव लिहीत असल्यामुळे या पुढचा पूर्ण लेख फक्त पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.

सुरुवात करतो प्राथमिक शाळेपासून. साधारण इयत्ता चौथी होईपर्यंत लैंगिक अवयवांना दिलेली बोलीभाषेतील नावे माहीत झाली. त्यावरून एकमेकांना चिडवणे इतपतच मजल पोचली होती. “मी मुलगा आहे”, ही जाणीव पक्की होण्यापलीकडे त्या वयात फारसे काही घडले नाही.
माध्यमिक शाळेतील दीर्घकाळ हा खऱ्या अर्थाने या बाबतीत जडणघडणीचा ठरतो. या शाळेत ‘असल्या’ साहित्याची प्रथम ओळख झाली ती स्वच्छतागृहांतील भिंतींवर ! इथल्या साहित्यात लेखी मजकूराबरोबर कसेबसे घाईत काढलेल्या रेखाचित्रांचाही समावेश होता. स्त्री व पुरुषांच्या जननेंद्रियांची चित्रे काढून ती एकत्र गुंफलेली दाखवणे हा इथल्या ‘लेखकांचा’ आवडता उद्योग होता. हे साहित्य प्रसवण्याची दोन ठिकाणे असतात - मूत्रालय आणि शौचालय. या दोन्ही ठिकाणच्या भिंतीवरील साहित्यामध्ये जाणवण्याइतका गुणात्मक फरक असतो.

त्या काळी शाळांमध्ये बेशिस्तीच्या कारणांवरून विद्यार्थ्यांना वेताच्या छड्या व अन्य मार्गांनी मार देण्याची पद्धत होती. शाळेत उशिरा येण्यापासून या छडीचा प्रसाद खावा लागे. या कामासाठी जे शिक्षक नेमलेले असत ते मारकुटे म्हणून प्रसिद्ध होत. मग काय, अशा शिक्षकांना स्वच्छतागृहातील भिंतींवर विद्यार्थी अगदी ‘मानाचे स्थान’ देत. त्यांचा उद्धार करून त्यांच्या नावे विविध लैंगिक मजकूर मोकळेपणाने लिहिलेला असे. इथल्या भिंतलेखकांमध्ये काही प्रकार होते. पेन्सिल किंवा पेनने लिहिणारे विद्यार्थी म्हणजे सामान्य किंवा नवोदित लेखक. दर्दी असणारे विद्यार्थी त्यांचा मजकूर कर्कटकने भिंतीवर कायमस्वरूपी कोरून ठेवत. तो मजकूर आपली इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत करी. शाळा सोडल्यानंतर काही वर्षांनी शाळेत जाणे झाले तेव्हा कुतूहलाने स्वच्छतागृहाला भेट दिली. नवी रंगरंगोटी झाल्याने जुने साहित्य नष्ट झालेले असले तरी या भिंती आता नव्या लेखकांच्या साहित्याने नटलेल्या होत्या ! एकंदरीत लैंगिक लेखन-वाचनाची पायाभरणी इथल्या भिंतींवर होते हे नाकारण्यात अर्थ नाही. या भिंतींच्या जोडीला वर्गातील बाक हे देखील असले साहित्य प्रसवण्याच्या दुय्यम जागा असतात. मुळात भिंतीं व बाकांवर काहीतरी लिहिणे हा जरी बेशिस्तीचा भाग असला, तरी त्या वयातील विद्यार्थ्यांच्या उर्मीचे ते एक प्रकटन असते असे म्हणता येईल.

त्याकाळी सरकारी पातळीवरून कुटुंबनियोजनाचा जोरदार प्रचार असे. यामध्ये दोन किंवा तीन पुरेत, लाल त्रिकोण व निरोध यांचा उल्लेख असलेल्या जाहिराती ठळकपणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असत. त्या वाचून मित्रपरिवारात निरोधचा उपयोग यावर कुतूहलयुक्त चर्चा झाल्याच्या आठवतात.
kutumb niyo.jpg

शाळा संपवून आता कॉलेजमध्ये प्रवेश केला. तेव्हा अकरावी शाळेत झाली होती व बारावीचे एकच वर्ष विज्ञान महाविद्यालयात होतो. एकंदरीत ते वर्ष घासून अभ्यासाचे वगैरे असल्याने लैंगिक साहित्याचा नवा शोध वगैरे काही लागला नाही. मित्रांच्या गप्पांतूनच् जी काय माहितीची देवाण-घेवाण झाली तेवढेच.

पुढे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझे काही मित्र अन्य अभ्यासशाखांमध्ये गेले. असे वेगवेगळ्या ठिकाणी शिकणारे मित्र एकमेकांच्या वसतिगृहांना अधूनमधून भेटी देत. त्यातूनच लैंगिक कथांच्या छोट्या पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. तेव्हा ही पुस्तके शहरातील काही मोजक्या पदपथांवर मिळत. तेव्हा तरी त्यांना ‘पिवळी पुस्तके’ असे नाव काही पडलेले नव्हते. ती अगदी अन्य पुस्तकांप्रमाणेच पांढऱ्यावर काळे केलेली होती. या पुस्तकांकडे जाण्यापूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत एक विशेष माहिती लिहितो.

या अभ्यासात कॉलेजच्या पहिल्याच वर्षी शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. एखादा मुलगा जेव्हा त्याचे पाठ्यपुस्तक विकत घेई तेव्हा त्यातील ‘ते’ प्रकरण प्रथम वाचायची त्याला जबरदस्त घाई असे. ते पुस्तक उघडल्यानंतर एक लक्षात येते ते म्हणजे, हृदय, फुप्फुसे, पचनसंस्था या क्रमाने पुढे जात ‘जननेंद्रियांची कार्ये’ हा धडा पुस्तकाच्या शेवटच्या भागात असतो. पुस्तकाची पहिली तीनचतुर्थांश पाने एका दमात उलटून टाकून विद्यार्थी या कुतूहलाच्या विषयात शिरतो. त्यातही वयात येतानाचे बाह्य शारीरिक बदल, बीजांडे, मासिक पाळी इत्यादी माहिती मागे सारून थेट संभोग या विषयावर झडप घातली जाते. एकदा का ते वर्णन वाचले, की आत्मा कसा शांत होतो. जणू काही स्वतःलाच ते सुख क्षणभर मिळाल्याचा भास होतो ! आपले अन्यत्र शिकणारे मित्र ही माहिती कुठल्यातरी किरकोळ बाजारू पुस्तकातून वाचत असतात. तीच माहिती आपण आज अधिकृत पाठ्यपुस्तकात वाचल्याने मनात काहीशी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते.

वैद्यकीय अभ्यासात दुसऱ्या वर्षी न्यायवैद्यकशास्त्र हा विषय असतो. त्यात बलात्काराचा बराच शास्त्रीय उहापोह असतो. त्याची पूर्वपीठिका म्हणून कुमारी स्त्रीच्या योनीवर एक स्वतंत्र प्रकरण असते. त्यामध्ये योनीचे विविध आकार, त्यांची सचित्र माहिती, योनीपटलाचे (hymen) प्रकार आणि कौमार्य हे प्रचंड उत्सुकतेचे विषय हाताळलेले असतात. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच या दुसऱ्या वर्षाच्या विषयाची कुणकुण लागते. मग मुलांना कुठला दम धरवणार ? फावल्या वेळात ग्रंथालयात जाऊन त्या विषयाचे पुस्तक अधाशीपणे घेतले जाते. मग त्यातली वरील प्रकरणे वाचून हातावेगळी केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्षात दुसऱ्या वर्षात प्रवेश करतात तोपर्यंत ही मूलभूत माहिती त्यांच्या दृष्टीने शिळी झालेली असते.

कॉलेजच्या स्वच्छतागृहांमध्ये शाळेच्या तुलनेत भिंतसाहित्याचे प्रमाण खूप कमी झालेले दिसले. परंतु ते शून्य होत नाही. या वयातही काही जणांमध्ये तिथे लिहिण्याची उर्मी टिकून असते. आता त्या साहित्यातील अर्वाच्चपणा कमी होऊन त्याला कल्पकता व काहीशी सौंदर्यदृष्टी येते. वर्गातील बाकांवरील लेखनात तर ती अधिक जाणवते. तिथे वाचलेले काही लैंगिक विनोद आणि मार्मिक टिपण्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. त्या वयामध्ये विद्यार्थी या विषयातील कोंडलेली वाफ अशा लिखाणातून मुक्त करीत असतात. या वर्तनावर फार शिस्तीचा बडगा दाखवून उपयोग होत नाही हे लक्षात येते.

आता परत वळतो तथाकथित पिवळ्या पुस्तकांकडे. वसतिगृहात राहिल्याने या पुस्तकांचे वाचन अगदी मनमोकळेपणाने करता आले. अशी तीन चार पुस्तके एकमेकांच्या खोल्यांमधून फिरत असत. त्यांचा नक्की खरेदीदार कोण हे कधी कळायचे नाही. ती वाचण्यात मात्र सर्वांचाच वाटा असायचा. ती सर्व इंग्लिशमध्ये होती. त्यातल्या कथा बर्‍यापैकी रंजक असत. स्त्रीदेहाची इत्थंभूत वर्णने कलात्मक असायची. एकंदरीत त्या अवयवांचा मोठ्ठा आकार हा त्या वर्णनातील ठळक भाग असायचा. त्या वाचनातून अशा ‘मोठे’पणाच्या वर्णनाची अनेक विशेषणे, तुलनात्मक शब्द व त्यांचे लाक्षणिक अर्थ ही ज्ञानप्राप्ती झाली. Voluptuous हा शब्द मी आयुष्यात प्रथम या पुस्तकांत वाचला आणि तो मेंदूत कायमचा कोरला गेला. त्याकाळी थेटरातले चित्रपट वगळता एकूणच रंजक दृश्यमाध्यमांचा तुटवडा होता. त्यातही काही प्रौढांसाठीचे इंग्लिश चित्रपट सोडले तर बाकी चित्रपट लैंगिकदृष्ट्या सामान्य प्रकारचे असायचे. त्यामुळे लैंगिक वाचन हे महत्त्वाचे मनोरंजनसाधन होते. त्यातून जर का अशा पुस्तकाचे वाचन एकांतात केले, तर त्यातून होणारे विलक्षण कल्पनारंजन हे वर्णनातीत असायचे. आजही असे रंजन मला प्रत्यक्ष दृश्य पाहण्यापेक्षा अधिक आनंद देते. लिखित माध्यमाचे हे सामर्थ्य कालातीत आहे.

आमचा एक अभियांत्रिकीचा मित्र खास ही पुस्तके वाचण्यासाठी आमच्या खोलीत आला होता. त्याने गादीवर बसून भिंतीला पाठ टेकून आणि पाय पोटाशी घेऊन असे एक पुस्तक प्रथम वाचले. वाचून उत्तेजित झाल्यावर तो आम्हाला म्हणाला, “यार, फारच भारी आहे हे. आता १० मिनिटे तरी मी उठून उभा राहू शकणार नाही !” या उद्गारातून त्या लेखन-वाचन सामर्थ्याचा मुद्दा लक्षात यावा. त्या वयातील या प्रकारच्या वाचन, मनन व सामूहिक चर्चेने एका रंजक स्वप्नसृष्टीला जन्म दिला हे निःसंशय. पदवीचे शिक्षण संपल्यावर मित्रांत त्या छोट्या पुस्तकांची विभागणी झाली. प्रत्येकाने असे एकेक पुस्तक आठवण म्हणून पुढे दीर्घकाळ जपले होते. कालांतराने असली पुस्तके पिवळ्या जिलेटीन कागदात पॅक करून येऊ लागली. म्हणून बहुधा त्यांना ‘पिवळी’ नाव पडले असावे.

वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्‍याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते. प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते.

Debonair-india.jpg

कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती ! मराठीतील ‘हैदोस’बद्दल इतरांकडून काही ऐकण्यात आले पण ते प्रत्यक्ष पाहण्याचा काही योग आला नाही.
याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !

हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे मित्र बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.

पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते. तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.
अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा(कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना असे X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी) :

१. X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच.
२. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके.
३. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये.

अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.
आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).

अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.
कालांतराने संगणक युग अवतरले. पुढे आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स व सीडीज मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली त्यानंतरची प्रगती आणि आजची परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...

असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या अनैसर्गिक आणि विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ लैंगिक संबंधांवर आधारित लेखन अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.

या धाग्यावरील चर्चेत सर्वांचे स्वागत आहे. या विषयाची ’दुसरी बाजू’ म्हणजे स्त्रियांचे या विषयातले अनुभव आणि दृष्टीकोण. ती देखील चर्चेतून पुढे आल्यास चर्चा परिपूर्ण होईल.
………………………………………………………………………………………………..
चित्रसौजन्य : अनुक्रमे महाराष्ट्र शासन व विकिपीडिया .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०० लोकात एक दोन माणसे वेगळे वर्तन करत असतील तर ती विकृती .च त्या मुळे बाकी ९९ लोकांना विचित्र वाटत.अशी साधी सरळ व्याख्या विकृत पणाची करता येईल.

धक्कादायक वाटणाऱ्या या विषयावर सआदत मंटो यांची एक प्रसिद्ध कथा आणि चित्रफित आहे....... ठंडा गोस्त.

देवकी धन्यवाद
ते नाव अगदी ओठावर होते पण आठवत नव्हते.

लैंगिकतेशी संबंधित असल्याने इथे लिहितो.
स्वीडनमध्ये शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे तर या देशाने पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपची घोषणाही केली आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/sex-is-sports-in-sweden-first-europ...

लैंगिकतेशी संबंधित :

" प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांचा श्वानावर बलात्कार, ४० श्वानांची हत्या; आता मिळाली २४९ वर्षांची शिक्षा"
https://www.loksatta.com/desh-videsh/zoologist-adam-britton-sentenced-24...

. . . प्राण्यांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या मानवी प्रवृत्तीसाठी झूफिलिया हा शब्द वापरला जातो. तर बेस्टीयालीटी हा शब्द प्राण्यांवर होणाऱ्या बळजबरीकरता वापरला जातो. आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखविणे बेकायदेशीर आहे. जगभरात प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे आहेत. . . .

>>>>>>>.आपल्याकडे अनेक प्राचीन शिल्पात मानव - प्राणी - मानव लैंगिक संबंध दाखवले आहेत.
असू शकेल.
कन्सेन्टशिवाय कोणताही लैगिक व्यवहार हा शिक्षेस पात्र आणि दुर्व्यवहार आहे. लहान मुले, जनावरे, आणि काय न काय ब्लडी विकृत माणसं.

जनावरांमधे कायदे नसतात. माणसांमधे असतात. ओके?
२४९ वर्ष सजा म्हणजे जोक च आहे.. तो माणूस ५० चा धरला तरी २० वर्ष अजून जगेल.

*२४९ वर्ष सजा म्हणजे जोकच आहे..
>>>
खरंय ! एखादा गुन्हेगार जेव्हा अनेक गुन्हे एकाच कालावधीत करतो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते.
हा पहा एक गिनीज बुक विक्रम
https://www.guinnessworldrecords.com/world-records/longest-jail-sentence-(multiple-counts)/#:~:text=The%20longest%20jail%20term%20to,the%20six%20counts%20against%20him.

६ बालकांवर बलात्कार केलेल्या Charles Scott Robinson या गुन्हेगाराला 30, 000 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता.
................
काही निकालपत्रांमध्ये हे पण लिहिलेले असते :
" या सर्व शिक्षा एकदम भोगायच्या आहेत"
अशा शिक्षांचा एकूण कालावधीही प्रचंड मोठा असतो.

Zoophilia
>>
यासंदर्भात थोडी अधिक माहिती :
‘लैंगिक संबंधास संमती देणाऱ्या मानवी जोडीदाराव्यतिरिक्त’ इतर सर्व प्रकारची लैंगिकता paraphilias या नावाने ओळखली जाते. अशा philia चे जवळजवळ 547 प्रकार आहेत !

https://en.wikipedia.org/wiki/List_of_paraphilias

जेव्हा मानवी आयुष्याच्या आतापर्यंतच्या मर्यादेपेक्षा अतिशय दीर्घ कालावधीसाठी तुरुंगवाससाची शिक्षा ठोठावली जाते त्यामागचा कायद्याचा दृष्टिकोन येथे एका प्राध्यापकांनी स्पष्ट केला आहे
https://www.bbc.com/news/blogs-magazine-monitor-23495284

हा एक प्रकारे प्रतीकात्मक न्याय असतो. तसेच, सामान्य जन्मठेपेमध्ये पॅरोल मिळणे, चांगल्या वर्तवणुकीमुळे लवकर सुटका होणे, हे प्रकार संभवतात. पण जेव्हा हजारो वर्ष शिक्षा ठोठावली जाते तेव्हा सहसा वरील सुटकेचे मुद्दे उद्भवत नाहीत.
या प्रकारे गुन्हेगार आयुष्यभर ( गुन्हेगाराच्या आणि संबंधित फिर्यादींच्याही) गजाआड राहिल्यास पीडिताच्या नातेवाईकांनाही समाधान वाटते.

मासिक पाळी म्हणजे विटाळ आणि लैंगिक विषयावरील पुस्तक म्हणजे अश्लील ( आणि ते पण स्त्रियांनी वाचणे म्हणजे बाब्बो !) , हा दृष्टीकोन भारतीय समाजाच्या काही घटकांमध्ये अजूनही कसा मुरलेला आहे यावर प्रकाशझोत टाकणारा
‘विचार मैथुन’ हा हिंदी लघुपट आवडला.

https://www.youtube.com/watch?v=iuBDLNcvxiY

‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या गाजलेल्या नाटकाच्या लेखिका वंदना खऱ्यांची अभ्यासपूर्ण मुलाखत इथे आहे
https://www.youtube.com/watch?v=so9dG9xq1Cw

त्यात त्यांनी या विषयावरील समाजातील काही शब्दप्रयोगांना हरकत घेतली असून त्या ऐवजी पर्यायी शब्द सुचवले आहेत ते असे :
१. ‘लैंगिक शिक्षण’ ऐवजी लैंगिकता शिक्षण’
( ‘लैंगिकता’मध्ये वयात येण्याच्या शारीरिक बदलांपासून पुढील सर्व गोष्टींचा समावेश होतो)

२. विनयभंग, छेडछाड ऐवजी लैंगिक हल्ला.

हे मूळ इंग्लिश नाटक 'Vagina monologues' जेव्हा पाश्चात्य देशात चालत होते तेव्हा तिकीट काढायला आलेले लोक त्या नाटकाचे नाव घ्यायला कचरत असतं; ते नाव अस्पष्ट आणि अर्धवट उच्चारीत. तेव्हा तिथल्या तिकीट विक्रेत्या बाईने त्यांना ते पूर्ण उच्चारायला लावले आणि मगच तिकीट दिले, अशीही आठवण त्यांनी मुलाखतीत सांगितली.

यु ट्युबवरती 'banned vinyl' अशी सर्च दिली तर भयंकर एक्स्प्लिसिट गाणी येतात.

Pages