लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे.
साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात. किंबहुना त्या बहुसंख्यांच्या वाट्याला येत नाहीत. (ज्या थोड्या फार लोकांना त्यात यश येते त्यालाही चोरटेपणाची किनार असते). मात्र त्या संदर्भातील कल्पनाविलास हा सर्व तरुणांच्या मनात सतत चालू असतो. मग ती मानसिक भूक शमविण्यासाठी विविध प्रकारच्या लैंगिक साहित्याचा अनुभव घेतला जातो. अशा साहित्यप्रकारांत ऐकीव ज्ञान, लिखित माहिती आणि दृश्य माध्यमांचा समावेश होतो.
आज आंतरजालाच्या व्यापक उपलब्धतेमुळे लैंगिकतेसंदर्भातल्या अगणित दृश्यफिती आपल्याला सहज पाहता येतात. ते सर्व अनिर्बंध स्वरूपात उपलब्ध आहे. परंतु सुमारे ४० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा मुख्यत्वे मौखिक व लिखित प्रकारे या विषयाच्या माहितीची मर्यादित देवाणघेवाण होई. कालांतराने या परिस्थितीत बदल होत आपण आजच्या मुक्तस्त्रोत स्थितीत पोचलो आहोत. या साहित्याची गेल्या चार दशकांतील स्थित्यंतरे आणि माझे तारुण्यातील अनुभव या लेखाद्वारे सादर करीत आहे. स्वानुभव लिहीत असल्यामुळे या पुढचा पूर्ण लेख फक्त पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.
सुरुवात करतो प्राथमिक शाळेपासून. साधारण इयत्ता चौथी होईपर्यंत लैंगिक अवयवांना दिलेली बोलीभाषेतील नावे माहीत झाली. त्यावरून एकमेकांना चिडवणे इतपतच मजल पोचली होती. “मी मुलगा आहे”, ही जाणीव पक्की होण्यापलीकडे त्या वयात फारसे काही घडले नाही.
माध्यमिक शाळेतील दीर्घकाळ हा खऱ्या अर्थाने या बाबतीत जडणघडणीचा ठरतो. या शाळेत ‘असल्या’ साहित्याची प्रथम ओळख झाली ती स्वच्छतागृहांतील भिंतींवर ! इथल्या साहित्यात लेखी मजकूराबरोबर कसेबसे घाईत काढलेल्या रेखाचित्रांचाही समावेश होता. स्त्री व पुरुषांच्या जननेंद्रियांची चित्रे काढून ती एकत्र गुंफलेली दाखवणे हा इथल्या ‘लेखकांचा’ आवडता उद्योग होता. हे साहित्य प्रसवण्याची दोन ठिकाणे असतात - मूत्रालय आणि शौचालय. या दोन्ही ठिकाणच्या भिंतीवरील साहित्यामध्ये जाणवण्याइतका गुणात्मक फरक असतो.
त्या काळी शाळांमध्ये बेशिस्तीच्या कारणांवरून विद्यार्थ्यांना वेताच्या छड्या व अन्य मार्गांनी मार देण्याची पद्धत होती. शाळेत उशिरा येण्यापासून या छडीचा प्रसाद खावा लागे. या कामासाठी जे शिक्षक नेमलेले असत ते मारकुटे म्हणून प्रसिद्ध होत. मग काय, अशा शिक्षकांना स्वच्छतागृहातील भिंतींवर विद्यार्थी अगदी ‘मानाचे स्थान’ देत. त्यांचा उद्धार करून त्यांच्या नावे विविध लैंगिक मजकूर मोकळेपणाने लिहिलेला असे. इथल्या भिंतलेखकांमध्ये काही प्रकार होते. पेन्सिल किंवा पेनने लिहिणारे विद्यार्थी म्हणजे सामान्य किंवा नवोदित लेखक. दर्दी असणारे विद्यार्थी त्यांचा मजकूर कर्कटकने भिंतीवर कायमस्वरूपी कोरून ठेवत. तो मजकूर आपली इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत करी. शाळा सोडल्यानंतर काही वर्षांनी शाळेत जाणे झाले तेव्हा कुतूहलाने स्वच्छतागृहाला भेट दिली. नवी रंगरंगोटी झाल्याने जुने साहित्य नष्ट झालेले असले तरी या भिंती आता नव्या लेखकांच्या साहित्याने नटलेल्या होत्या ! एकंदरीत लैंगिक लेखन-वाचनाची पायाभरणी इथल्या भिंतींवर होते हे नाकारण्यात अर्थ नाही. या भिंतींच्या जोडीला वर्गातील बाक हे देखील असले साहित्य प्रसवण्याच्या दुय्यम जागा असतात. मुळात भिंतीं व बाकांवर काहीतरी लिहिणे हा जरी बेशिस्तीचा भाग असला, तरी त्या वयातील विद्यार्थ्यांच्या उर्मीचे ते एक प्रकटन असते असे म्हणता येईल.
त्याकाळी सरकारी पातळीवरून कुटुंबनियोजनाचा जोरदार प्रचार असे. यामध्ये दोन किंवा तीन पुरेत, लाल त्रिकोण व निरोध यांचा उल्लेख असलेल्या जाहिराती ठळकपणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असत. त्या वाचून मित्रपरिवारात निरोधचा उपयोग यावर कुतूहलयुक्त चर्चा झाल्याच्या आठवतात.
शाळा संपवून आता कॉलेजमध्ये प्रवेश केला. तेव्हा अकरावी शाळेत झाली होती व बारावीचे एकच वर्ष विज्ञान महाविद्यालयात होतो. एकंदरीत ते वर्ष घासून अभ्यासाचे वगैरे असल्याने लैंगिक साहित्याचा नवा शोध वगैरे काही लागला नाही. मित्रांच्या गप्पांतूनच् जी काय माहितीची देवाण-घेवाण झाली तेवढेच.
पुढे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझे काही मित्र अन्य अभ्यासशाखांमध्ये गेले. असे वेगवेगळ्या ठिकाणी शिकणारे मित्र एकमेकांच्या वसतिगृहांना अधूनमधून भेटी देत. त्यातूनच लैंगिक कथांच्या छोट्या पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. तेव्हा ही पुस्तके शहरातील काही मोजक्या पदपथांवर मिळत. तेव्हा तरी त्यांना ‘पिवळी पुस्तके’ असे नाव काही पडलेले नव्हते. ती अगदी अन्य पुस्तकांप्रमाणेच पांढऱ्यावर काळे केलेली होती. या पुस्तकांकडे जाण्यापूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत एक विशेष माहिती लिहितो.
या अभ्यासात कॉलेजच्या पहिल्याच वर्षी शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. एखादा मुलगा जेव्हा त्याचे पाठ्यपुस्तक विकत घेई तेव्हा त्यातील ‘ते’ प्रकरण प्रथम वाचायची त्याला जबरदस्त घाई असे. ते पुस्तक उघडल्यानंतर एक लक्षात येते ते म्हणजे, हृदय, फुप्फुसे, पचनसंस्था या क्रमाने पुढे जात ‘जननेंद्रियांची कार्ये’ हा धडा पुस्तकाच्या शेवटच्या भागात असतो. पुस्तकाची पहिली तीनचतुर्थांश पाने एका दमात उलटून टाकून विद्यार्थी या कुतूहलाच्या विषयात शिरतो. त्यातही वयात येतानाचे बाह्य शारीरिक बदल, बीजांडे, मासिक पाळी इत्यादी माहिती मागे सारून थेट संभोग या विषयावर झडप घातली जाते. एकदा का ते वर्णन वाचले, की आत्मा कसा शांत होतो. जणू काही स्वतःलाच ते सुख क्षणभर मिळाल्याचा भास होतो ! आपले अन्यत्र शिकणारे मित्र ही माहिती कुठल्यातरी किरकोळ बाजारू पुस्तकातून वाचत असतात. तीच माहिती आपण आज अधिकृत पाठ्यपुस्तकात वाचल्याने मनात काहीशी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते.
वैद्यकीय अभ्यासात दुसऱ्या वर्षी न्यायवैद्यकशास्त्र हा विषय असतो. त्यात बलात्काराचा बराच शास्त्रीय उहापोह असतो. त्याची पूर्वपीठिका म्हणून कुमारी स्त्रीच्या योनीवर एक स्वतंत्र प्रकरण असते. त्यामध्ये योनीचे विविध आकार, त्यांची सचित्र माहिती, योनीपटलाचे (hymen) प्रकार आणि कौमार्य हे प्रचंड उत्सुकतेचे विषय हाताळलेले असतात. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच या दुसऱ्या वर्षाच्या विषयाची कुणकुण लागते. मग मुलांना कुठला दम धरवणार ? फावल्या वेळात ग्रंथालयात जाऊन त्या विषयाचे पुस्तक अधाशीपणे घेतले जाते. मग त्यातली वरील प्रकरणे वाचून हातावेगळी केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्षात दुसऱ्या वर्षात प्रवेश करतात तोपर्यंत ही मूलभूत माहिती त्यांच्या दृष्टीने शिळी झालेली असते.
कॉलेजच्या स्वच्छतागृहांमध्ये शाळेच्या तुलनेत भिंतसाहित्याचे प्रमाण खूप कमी झालेले दिसले. परंतु ते शून्य होत नाही. या वयातही काही जणांमध्ये तिथे लिहिण्याची उर्मी टिकून असते. आता त्या साहित्यातील अर्वाच्चपणा कमी होऊन त्याला कल्पकता व काहीशी सौंदर्यदृष्टी येते. वर्गातील बाकांवरील लेखनात तर ती अधिक जाणवते. तिथे वाचलेले काही लैंगिक विनोद आणि मार्मिक टिपण्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. त्या वयामध्ये विद्यार्थी या विषयातील कोंडलेली वाफ अशा लिखाणातून मुक्त करीत असतात. या वर्तनावर फार शिस्तीचा बडगा दाखवून उपयोग होत नाही हे लक्षात येते.
आता परत वळतो तथाकथित पिवळ्या पुस्तकांकडे. वसतिगृहात राहिल्याने या पुस्तकांचे वाचन अगदी मनमोकळेपणाने करता आले. अशी तीन चार पुस्तके एकमेकांच्या खोल्यांमधून फिरत असत. त्यांचा नक्की खरेदीदार कोण हे कधी कळायचे नाही. ती वाचण्यात मात्र सर्वांचाच वाटा असायचा. ती सर्व इंग्लिशमध्ये होती. त्यातल्या कथा बर्यापैकी रंजक असत. स्त्रीदेहाची इत्थंभूत वर्णने कलात्मक असायची. एकंदरीत त्या अवयवांचा मोठ्ठा आकार हा त्या वर्णनातील ठळक भाग असायचा. त्या वाचनातून अशा ‘मोठे’पणाच्या वर्णनाची अनेक विशेषणे, तुलनात्मक शब्द व त्यांचे लाक्षणिक अर्थ ही ज्ञानप्राप्ती झाली. Voluptuous हा शब्द मी आयुष्यात प्रथम या पुस्तकांत वाचला आणि तो मेंदूत कायमचा कोरला गेला. त्याकाळी थेटरातले चित्रपट वगळता एकूणच रंजक दृश्यमाध्यमांचा तुटवडा होता. त्यातही काही प्रौढांसाठीचे इंग्लिश चित्रपट सोडले तर बाकी चित्रपट लैंगिकदृष्ट्या सामान्य प्रकारचे असायचे. त्यामुळे लैंगिक वाचन हे महत्त्वाचे मनोरंजनसाधन होते. त्यातून जर का अशा पुस्तकाचे वाचन एकांतात केले, तर त्यातून होणारे विलक्षण कल्पनारंजन हे वर्णनातीत असायचे. आजही असे रंजन मला प्रत्यक्ष दृश्य पाहण्यापेक्षा अधिक आनंद देते. लिखित माध्यमाचे हे सामर्थ्य कालातीत आहे.
आमचा एक अभियांत्रिकीचा मित्र खास ही पुस्तके वाचण्यासाठी आमच्या खोलीत आला होता. त्याने गादीवर बसून भिंतीला पाठ टेकून आणि पाय पोटाशी घेऊन असे एक पुस्तक प्रथम वाचले. वाचून उत्तेजित झाल्यावर तो आम्हाला म्हणाला, “यार, फारच भारी आहे हे. आता १० मिनिटे तरी मी उठून उभा राहू शकणार नाही !” या उद्गारातून त्या लेखन-वाचन सामर्थ्याचा मुद्दा लक्षात यावा. त्या वयातील या प्रकारच्या वाचन, मनन व सामूहिक चर्चेने एका रंजक स्वप्नसृष्टीला जन्म दिला हे निःसंशय. पदवीचे शिक्षण संपल्यावर मित्रांत त्या छोट्या पुस्तकांची विभागणी झाली. प्रत्येकाने असे एकेक पुस्तक आठवण म्हणून पुढे दीर्घकाळ जपले होते. कालांतराने असली पुस्तके पिवळ्या जिलेटीन कागदात पॅक करून येऊ लागली. म्हणून बहुधा त्यांना ‘पिवळी’ नाव पडले असावे.
वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते. प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते.

कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती ! मराठीतील ‘हैदोस’बद्दल इतरांकडून काही ऐकण्यात आले पण ते प्रत्यक्ष पाहण्याचा काही योग आला नाही.
याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !
हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे मित्र बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.
पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते. तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.
अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.
एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा(कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना असे X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी) :
१. X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच.
२. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके.
३. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये.
अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.
आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).
अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.
कालांतराने संगणक युग अवतरले. पुढे आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स व सीडीज मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली त्यानंतरची प्रगती आणि आजची परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...
असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या अनैसर्गिक आणि विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ लैंगिक संबंधांवर आधारित लेखन अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.
या धाग्यावरील चर्चेत सर्वांचे स्वागत आहे. या विषयाची ’दुसरी बाजू’ म्हणजे स्त्रियांचे या विषयातले अनुभव आणि दृष्टीकोण. ती देखील चर्चेतून पुढे आल्यास चर्चा परिपूर्ण होईल.
………………………………………………………………………………………………..
चित्रसौजन्य : अनुक्रमे महाराष्ट्र शासन व विकिपीडिया .
गिल्टी फिलींगमुळे मी
गिल्टी फिलींगमुळे मी एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर करायच्या चालून आलेल्या कैक संधी नाकारल्या आहेत. > मीबी त्यातूनच जातोय पण मी बिनलग्नाचा असलो तरी असले उद्योग केल्याने बिनलग्नाचाच राहायला नको म्हणून या संधी नाकारतो. कॉलेजकाळाची फार आठवण येत राहते आजकाल
Amul Macho ची ये तो बडा टॉइंग
Amul Macho ची ये तो बडा टॉइंग हैं जाहिरात बघायचो तेव्हा आमच्या चाळीतील एका विवाहीत तरुण स्त्रीची आठवण यायची. चाळीत कपडे धुवायला कॉमन मोरी होती,हि तिच्या शेजारच्या बाईला मदत करायचे निमित्त करून नेमके त्या बाईच्या नवऱ्याचे अंडरवेअर , पँट धुवायला घ्यायची. स्त्रिया अप्रत्यक्षपणे व्यक्त होतात.
>>>>>>>>प्रत्येक स्त्रीला
>>>>>>>>प्रत्येक स्त्रीला पहिला लैंगिक (?) अनुभव हा रस्त्यात, बसमधे, चित्रपटगृहात, गर्दीच्या ठिकाणी किंवा ओळखीच्या दादा/काकांकडून मिळालेला असतो आणि तो घृणास्पद असतो. #metoo इज व्हेरी रिअल
+१००१
महान संस्कृती असलेल्या आपल्या देशात लोल!!!
डॉ. कुमार, तुम्ही मांडलेला
डॉ. कुमार, तुम्ही मांडलेला क्लिव्हेजवाला मूद्दा खरा असला तरी तो सर्वत्र लागू पडत नाही. बऱ्याच आदिवासी जमातींत स्त्रियांचे स्तन अनावृत्त असतात. तिथे पुरुष स्त्रियांचे दंड/पोटऱ्या पाहून उत्तेजित होतात असे ओझरते वाचल्याचे स्मरते.
अजून फूट फेटिश, हेअर फेटिश, आर्मपिट फेटिश असे बरेच प्रकार मी ऐकले आहेत.
धन्यवाद.
धन्यवाद.
चर्चेत चांगले मुद्दे आले आहेत :
1. स्त्रिया अप्रत्यक्षपणे व्यक्त होतात. >>> +११.
2. तिथे पुरुष स्त्रियांचे दंड/पोटऱ्या पाहून उत्तेजित होतात >>> शक्य आहे.
अर्धनग्नता पूर्ण नग्नतेपेक्षा जास्त मादक वाटते
@ऋन्मेष
@ऋन्मेष
प्रांजळ प्रतिसाद आवडला.
"लैंगिक साहित्य" व ई
"लैंगिक साहित्य" व ई
सर , हा विषय छान व्यक्त केला....
मुळात "लैंगिक शिक्षण , गरज...." ह्या विषायावर आपल्या समाजाची नीटपणे समजण्याची आणि जोखण्याची क्षमता कमी पडते...
चंद्रकांत काकोडकरांसारखं soft
चंद्रकांत काकोडकरांसारखं soft porn लिहिणाऱ्या लेखिकाही होत्या.
'वयात येणाऱ्या मुलींना सावधगिरीचा संदेश देणाऱ्या' कादंबरीत भावना चालशळवणारी वर्णनं होती.
एकदा तर दिवाळी अंकात लव्ह बर्ड्स नावाची कथा होती. त्यातही वर्णनाची रेलचेल.
काकोडकर फार वाचले नाहीत , पण
काकोडकर फार वाचले नाहीत , पण आमच्या त्या वयात अप्सरा व मेनका हि मासिके विशेषतः त्यांचे दिवाळी अंक मुलांना वर्ज्य असायचे. त्यानंतर डॉ. जीवन आणि लीना मोहाडीकरांचे लैंगिक माहितीपर अनेक लेख वाचल्याचे स्मरते. जत्रा मासिक / व श्री. व.बा. बोधे यांच्या त्यातील कथा हे त्यावेळी सहज उपलब्ध असणारे साहित्य होते.
चांगल्या मनमोकळ्या चर्चेबद्दल
चांगल्या मनमोकळ्या चर्चेबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
....
" ह्या विषायावर आपल्या समाजाची नीटपणे समजण्याची आणि जोखण्याची क्षमता कमी पडते. >> +११
आणि या विषयाची निषिद्धता हा अजून एक मुद्दा.
हा जो निषिद्धतेचा मुद्दा आहे त्यावरून एक किस्सा पुढे सांगतो......
समाजाचे राहू दे, पण खुद्द
समाजाचे राहू दे, पण खुद्द वैद्यकीय महाविद्यालयातली निषिद्धता सांगतो.
लेखात म्हटल्याप्रमाणे वैद्यकीयच्या पहिल्या वर्षाला शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. त्यातील जननेंद्रिय विभाग शिकवायला आम्हाला एक प्राध्यापिका होत्या. नेहमीप्रमाणे जननेंद्रियांची माहिती, मासिक पाळी इत्यादी गोष्टी व्यवस्थित शिकवून झाल्या. मग त्यांनी वर्गात रुक्ष चेहऱ्याने सांगितले,
“यानंतरचे संभोगाचे प्रकरण मी काही वर्गात शिकवणार नाही, तुम्ही ते पुस्तकात वाचा.”
त्यानंतर पुढच्या व्याख्यानात त्यांनी थेट गरोदरपणाचा पहिला महिना इथपासून पुढे शिकवायला. सुरुवात केली.
गमतीचा भाग पुढे आहे.
या बाईंचे यजमान आमच्याच कॉलेजात दुसरा विषय शिकवायचे. ते दरवर्षी त्या बाईंना टोकायचे, “तुम्ही संभोगाचे प्रकरण वर्गात शिकवायला एवढे का लाजता ? निव्वळ पुरुष व स्त्री बीजांड यांचे मिलन गर्भाशयात होते या एका वाक्यात तुम्ही या महत्त्वाच्या विषयाची बोळवण करून टाकता ! तुम्हाला जर बोलून शिकवायला ते अवघड वाटत असेल तर रेखाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमातून तुम्ही ते वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे”.
मला त्यांचा दृष्टिकोन आवडला. सध्या त्या शिक्षणात काय परिस्थिती आहे मला कल्पना नाही.
लिहिताना जाणीव झालीय की
लिहिताना जाणीव झालीय की प्रतिसाद थोडा लांबलचक होईल, पण हरकत नाही. 90 साली नुकतेच 18 पूर्ण करून लार्सन अँड तुब्रो पवई मध्ये लागलो होतो, व रहायचो वांद्रे येथील विठ्ठल मंदिराच्या वसतिगृहात. रोज लोकलने वांद्रे ते गोरेगाव जाणे व तिथून पुढे कंपनी बस व येताना हे सर्व उलट्या क्रमाने असा प्रवास व्हायचा. सुरवातीचे 2 3 महिने विशेष काही झाले नाही.
नंतर माझ्या डिपार्टमेंट मधील लायब्ररी बाबतीत समजले व मी मेम्बरशीप घेतली. 40 एक सभासद असतील, त्यात मी सर्वात लहान. नंतर समजले की देबोनियर मासिकाच्या बाबतीत माझा नंबर जवळजवळ दोन महिन्यांनी येतो. कारण पाहिले तर समजले की यातील सेन्टर स्प्रेड फार भारी असते म्हणून. यास्मिन, जसमीन, लिली अशा नावाच्या मॉडेल्सचे टॉपलेस फोटो, A3 आकारात अतिशय गुळगुळीत कागदावर उत्तम छापलेले असायचे, व खाली नाव असायचे फोटोग्राफर जयेश शेठ. या माणसाचा प्रचंड हेवा वाटायचा.
माझा रूम पार्टनर जेजे स्कुल
माझा रूम पार्टनर जेजे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये MFA करायचा, मग त्याची मनधरणी करून, काहीही करून जयेश शेठची ओळख काढ म्हणून विनवणी केली. सुदैवाने माझ्या हॉस्टेल पासून जवळच म्हणजे गेईटी गेलेक्सि च्या गल्लीत, कॉपर चिमणी च्या बाजूलाच, एकदा "जयेश शेठ स्टुडिओ" ही पाटी पाहिली अन घुसून ओळख सुदधा करून घेतली.
अर्थात फार काही फायदा झाला नाही पण या जयेश शेठशी ओळख असल्याची शेखी मात्र 2 वर्षे मिरवली.
नंतर पेंट हौस व हसलर या
नंतर पेंट हौस व हसलर या मासिकविषयी ऐकले. काहीच कारण नसताना, निव्वळ परवडते म्हणून थेट बोरिवली ते चर्चगेट पहिल्या वर्गाचा त्रैमासिक पास काढला, अन मग शनिवारी रविवारी थेट VT गाठू लागलो. फॅशन स्ट्रीट जवळ, जुन्या पुस्तक बाजारात त्यावेळी हसलर व पेंट हौस चे अंक 30 रुपयाला मिळत व पुन्हा परत केल्यावर 10 रु कापून घेऊन उरलेले पैसे परत मिळत. त्याच वेळी माझा मोठा भाऊ IIT मुंबई मध्ये आला, मग काय 10 रुपयात, मी माझे वसतिगृह मित्र, भाऊ व त्याचे मित्र, या मासिकाचा फडशा पाडायचो.
नंतर नॅन्सी fridey चे माय सिक्रेट गार्डन्स हे पुस्तक मिळवले. यात तर अमेरिकेत स्त्रियांच्या फॅन्टसी विषयी लेख होते, यात जवळचे कुटुंबीय, पाळीव प्राणी इत्यादी विषयीची लैंगिक गोष्टीचे तपशीलवार वर्णन असे.
कुणाला काही यात आक्षेपार्ह वाटणार नाही अशी आशा आहे.
कुणाला काही यात आक्षेपार्ह
कुणाला काही यात आक्षेपार्ह वाटणार नाही अशी आशा आहे.

>>अजिबात नाही. मनमोकळ्या प्र बद्दल आभार.
..............
नंतर समजले की देबोनियर मासिकाच्या बाबतीत माझा नंबर जवळजवळ दोन महिन्यांनी येतो. >>>
वाचनालय आणि डेबोनेर या बाबतीतला माझा अनुभव जो पूर्वी इथे लिहिला होता (इथे पुस्तके राहतात (https://www.maayboli.com/node/73148)
तो पुन्हा उद्धृत करतो :
हे वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक त्यांना हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची.
“यानंतरचे संभोगाचे प्रकरण मी
“यानंतरचे संभोगाचे प्रकरण मी काही वर्गात शिकवणार नाही, तुम्ही ते पुस्तकात वाचा.” >> बाप रे! वैद्यकीय महाविद्यालयात ही अवस्था, तर मग इतरांची काय कथा! वाचून वाईट वाटले. त्यांना शिकवायला शिष्ट वाटत नसेल तर तेवढ्या भागासाठी वेगळ्या शिक्षकांना, स्पेशल लेक्चर घ्यायला सांगायला हरकत नव्हती.
लैंगिक शिक्षण आमच्या वेळेस
लैंगिक शिक्षण आमच्या वेळेस शाळा/कॉलेजात नव्हते पण बहिणीची मेडिकलची पुस्तके उपयोगी ठरली. पौगंडावस्थेत आल्यापासून घरात इंटरनेट असल्याने पुस्तके/मासिके वगैरे मिळवण्याच्या फ़ंदात कधी पडलो नाही किंवा त्याचा काळ लोटला होता. बीएसएनलचा दोन एमबीचा महागडा प्लॅन होता. पॉर्न पाहताना दोनदा पकडल्याने मी मोक्कार रट्टे खाल्ले होते आणि घरचे मला कौन्सिलीरकडे घेऊन गेलते. आतापर्यंत बराच टीबी डेटा गोळा झाला असेल पण काही वर्षांपासून पॉर्न प्रकरण बंदच आहे. आता थोडे रोमँटिक/सॉफ्टकोर टाइपच आवडते पाहायला. बहुतेक टीनएज आणि कॉलेज सम्पल्यावर कंटाळा आला असावा किंवा करिअर-आयुष्यातल्या बाकी महत्वाच्या प्रायॉरिटीज यातील व्यस्ततेमुळे पॉर्नसाठी वेगळा वेळ दिलेला आठवत नाही. असेही वेब्सिरीज/सिनेमातच या गोष्टी बऱ्याचदा समोर येत असल्याने स्पेशल काही शोधावे लागत नाही.
वर काही लेखकांची नावे आली
वर काही लेखकांची नावे आली आहेत. त्यात अजून एक भर म्हणजे बाबा कदम.
त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये भरपूर मालमसाला असायचा
छान.
छान.
१. तेवढ्या भागासाठी वेगळ्या शिक्षकांना, स्पेशल लेक्चर घ्यायला सांगायला हरकत नव्हती. >>> +११
२. वेब्सिरीज/सिनेमातच या गोष्टी बऱ्याचदा समोर येत असल्याने स्पेशल काही शोधावे लागत नाही. >> अ ग दी !
..................................................................................
आता माझे वैद्यकीय क्षेत्रातले अन्य काही अनुभव २-३ टप्प्यांत लिहितो.
१.
हा प्रसंग आहे आम्ही पहिल्या वर्षात शिकत असतानाचा. आमच्या प्राध्यापिकांनी मासिक पाळी वगैरेचे शास्त्रीय व्याख्यान संपवले आणि कुणाला काही प्रश्न आहेत का ते विचारले.
एका मुलग्याने हात वर करून एक महत्वाचा प्रश्न विचारला,
“मासिक पाळी चालू असताना संभोग केला तर शास्त्रीय दृष्ट्या काही अडचण असते का ?”
आमच्या बाईंनी मार्मिक उत्तर दिले,
“त्या काळात संभोग करायला अडचण काहीच नसते. परंतु कुठल्या पुरुषाला आपल्या ‘अंगावर’ ते रक्त घ्यायला आवडेल ते सांगा बरं !”
सुंदर शंकानिरसन. या प्रश्न उत्तरामुळे त्या बाईंचे हे व्याख्यान कायम स्मरणात राहिले.
आमच्या बाईंनी मार्मिक उत्तर
आमच्या बाईंनी मार्मिक उत्तर दिले,>> त्यात केवळ शास्त्रीयदृष्ट्या अडचणीचे काही आहे का नाही यावरच बोलणे सयुक्तिक होते. पुढे किळस, ओंगळ वगैरे व्यक्तीसापेक्ष गोष्टींत बोलणे यात मार्मिकपण कसले आहे? असले टाबु बाळगून शिकविणारे खरेच महान असतील.
नॅन्सी फ्रायडे ची पी डी एफ
नॅन्सी फ्रायडे ची पी डी एफ आहे जालावरती उपलब्ध पण महाभयंकर कंटाळा येतो ती वाचायचा. या वयात किक फक्त अध्यात्म देतय असं कळलं

अवांतर - पण फ्रायडे बाईंचच माय मदर मायसेल्फ - फार आवडलेले पुस्तक आहे. मुलीच्या जडणघडणीत आईचा किती महत्वाचा वाटा असतो हे मानसशास्त्र विश्लेषकाच्या भूमिकेतून इतकं छान हाताळलय. या वीकेंडला पहा ते लायब्ररीत आहे का ते. आणि रिव्ह्यु टाकते परत वाचुन.
टॅबू समजल्या जाण्याऱ्या
टॅबू समजल्या जाण्याऱ्या विषयावर संयतपणे केलेले लिखाण आवडले. प्रतिसादही विषयाला धरून आहेत
वेगळा विषय कुमारजी.
वेगळा विषय कुमारजी.
लहानपणापासून एकटे राहील्यामुळे, काही वर्षे खेडेगावात असल्यामुळे नंतर तर इंजिनियरींग कॉलेज त्यामुळे लिखित व ऐकीव "विषया"चे शिक्षण एकदम समृद्ध (?). एकीकडे आकर्षण तर एकीकडे इंगळी म्हणजे मोठा विंचू ही द्विधा. पण अतिरेकीपणाचा स्वभावच नसल्याने त्रास नाही. माझ्या व बहिणीच्या न कळत्या वयात एकट राहण्याच्यचा कुणी गैरफायदा घेतला नाही ही वाडा संस्कृतीची देण किंवा आमच नशिब चांगल अस म्हणू
आपल्या साठी बरवाईट काय हे सगळ्यांना कळतच. रेषा कुठे हे आपसूकच कळत. आज काल जरा जागृती जास्तच झालीय. चांगल आहे.
समलिंगी विकृती म्हणजे हे आत्ता आत्ता पर्यंत होत. अर्थात स्विकृत अस्विकृत गोष्टींच्या व्याख्याही बदलत आहेत.
खजूराहो आणि कामसूत्रे निर्माण करणारी आपली संस्कृती काळाच्या ओघात व्हिक्टोरियन मॉरल्स स्विकारत गेली. आता कालचक्र परत उलट फिरतय अस म्हणायच का. ? माझ्या मते वाईट काही नाही. आनंद महत्वाचा. अल्पकालीन की दीर्घ कालीन हे ज्याच त्यान ठरवाव.
चांगला विषय आणि उत्तम चर्चा
चांगला विषय आणि उत्तम चर्चा
शाळेत असताना बराच सोवळा होतो इतका की शिव्या देताना ज्या विशिष्ट अवयवांचा उल्लेख होतो तो नक्की कुठला अवयव आहे हे वर्गमित्राला विचारल्याचे समरते
त्यावर वरण भात वाला बामन असली नंतर बरीच हेटाई झाली होती त्यामुळे परत कधी कुणाला विचारायला गेलो नाही
नंतर मग व्हीडिओ आणून रीतसर बघणे झालं आणि पहिल्या वेळी अक्षरशः किळस वाटलेलं
त्याबद्दल इतकी उत्सुकता होती ते इतकं ओंगळवणे असेल असे वाटल नव्हतं
नंतर मग एकेक टप्पा पार करत गेलो आणि पॉर्न म्हणजे बॉलिवूडी हिरोचे अचाट कार्यक्रम असतात हे कुठंतरी वाटायला लागलं
लग्नापूर्वी मात्र शशांक सामंत यांचे नवविवाहीत चे कामजीवन कार्यक्रम बघायला गेलो, तेही होणाऱ्या बायकोला सोबत घेऊन
बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि शंका निरसन झाले
सर्वच नवं विवाहित आणि विवाहच्छूक यानी बघायला हवाच असा कार्यक्रम
नंतर मग 35 शी नंतर पुन्हा एकदा पॉर्न कडे वळलो आणि फँटसी च्या नावाखाली सगळे प्रकार पाहून झाले, अनलिमिटेड नेट, आणि मोबाईल वर बघण्याची सोय यामुळे किती पटकन हे सगळं आपल्या मुलांच्या साठी बॉम्ब तयार करून ठेवला आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हेही प्रकर्षाने जाणवले
पण इरोटीका हा वेगळाच प्रकार आहे
एक वैयक्तिक अनुभव असा जो मी माझे काही मित्र आहेत त्यांना मी निःसंकोचपणे सांगितलं आणि करच म्हणून आग्रह केला
टिपिकल कामुक कथा अत्यंत रददड आणि डेली सोपं इतक्या निर्बुद्ध असतात
त्यावेळी मग सिडने शेल्डन, जॉन ग्रीशम यांच्या पुस्तकात गरमागरम वर्णने असतात हे कोणाकडून कळलं आणि ती गुपचूप वाचायला घेतली
वर्णने शोधण्याचा नादात काही पाने वाचून झाली आणि जाणवले की कामुक वर्णने सोडून प्लॉट म्हणून ही जबरा पुस्तके आहेत आणि एकेक करत पुस्तके वाचायचा सपाटा लावला
तोवर इंग्लिश वाचायचा जाम कंटाळा यायचा पण ही पुस्तके वाचायला मजा यायला लागली आणि हळूहळू इंग्रजी वाचनाची गोडी वाढली
आता बरेचसे इंग्रजी वाचन झाले त्याचे श्रेय निर्विवादपणे या लेखकांना
एरवी काही वाट्याला गेलो नसतो
सो तुम्हाला इंग्रजी वाचन वाढवायचे आहे तर ही वाचायला सुरु करा
कामुक वर्णने ही बोनस वाटतील
मनमोकळे प्रतिसाद , अभिप्राय
मनमोकळे प्रतिसाद , अभिप्राय आणि पूरक माहितीबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार.
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
>>.सर्वांना दिवाळीच्या
>>.सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !>> +११
हे एक चांगले पुस्तक आहे:
सेक्सायन https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5011064970797475105
मौज दिवाळी अंक २०२१ मध्ये
लेखाचा विषय छान आहे. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन.
टीप: मौज दिवाळी अंक २०२१ मध्ये सुबोध जावडेकर यांचा याच संदर्भात एक लेख आला आहे.
दुर्लक्षित आणि टॅबू विषयावर
दुर्लक्षित आणि टॅबू विषयावर चांगलं लिहिलंय.
काही अपवाद वगळता प्रतिसादही आवडले.
'वाचत सुटलो त्याची गोष्ट' (निरंजन घाटे) पुस्तकात 'टॅबू विषयातला खजिना' हे एक प्रकरण आहे. त्यात त्यांनी निर्मळपणे आणि दिलखुलास पद्धतीने या विषयावर लिहिलं आहे- लहान वयात कानांवर पडणार्या द्व्यर्थी संवादांचे अर्थ लावण्यापासून ते तरूण वयात ते-ते लिखित साहित्य मिळवून वाचण्यापर्यंत.
घाटेंनी उल्लेख केलेल्या काही शृंगारिक/लैंगिक इंग्रजी साहित्याबद्दल मला पुस्तक संपादन सुरू असताना पहिल्यांदा समजलं. संपादन समज वाढवण्याच्या उद्दीष्टाने मी तेव्हा त्याबद्दलची माहिती नेटवर शोधून वाचली होती. शृंगारिक/लैंगिक साहित्यनिर्मितीचं पाश्चात्यांचं वेगवेगळ्या काळातलं भान - हा मुद्दा मला त्यादरम्यान ठळक जाणवला. (उदा. बॅरिंग-गुल्डची कवनं)
अभिप्राय आणि सुयोग्य पूरक
अभिप्राय आणि सुयोग्य पूरक माहितीबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !
>>> द्व्यर्थी संवादांचे अर्थ
>>> द्व्यर्थी संवादांचे अर्थ लावण्यापासून>>>
इथे दादा कोंडके यांची आठवण येते. यातले ते खरेच दादा !
Pages