तोंड भरून बोला !

Submitted by कुमार१ on 25 October, 2021 - 04:31

गंमती वाक्प्रचारांच्या : भाग २

भाग-१ इथे : https://www.maayboli.com/node/80360
...................................................................................................................

मागील भागात आपण हाताचे वाक्प्रचार एकत्र गुंफून एक गमतीशीर गोष्ट रचली. या भागात ‘तोंड’ या शब्दावरूनचे २५ वाक्प्रचार घेऊन अन्य एक गोष्ट रचली आहे.
तोंडाचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.
……….

तोंडाळ
राव हे जमीनदार घराण्यातले. ऐशोरामी जीवन आणि सतत तोंडपाटीलकी चालू. जमिनीच्या व्यवहारात अनेक लबाड्या करून मग अधिकार्यांचे तोंड दाबण्यात माहिर. असे हे गृहस्थ आज चक्क एक व्याख्यान ऐकायला आलेले पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. लोक जमेपर्यंत कार्यक्रम सुरू होत नव्हता. पण अखेर त्याला तोंड लागले. वक्ता बोलू लागला पण त्याच्या बोलण्यात दम नव्हता. उगाच इकडचे तिकडचे बोलत तोंडची वाफ दवडत होता. कसेबसे त्याने भाषण संपवले.

मग अध्यक्ष बोलायला उठले. ते मात्र सुरुवातीपासूनच तोंड वाजवू लागले. ते पडले राजकारणी. त्यांना तोंड सांभाळायची सवय कुठली असणार ? घणाघाती बोलता-बोलता त्यांच्या तोंडचा पट्टा सुटला. मग मात्र श्रोत्यांनी तोंडे आंबट केली. पण अध्यक्षांना त्याची कसली फिकीर? ते आपले तोंड करून बोलतच राहिले.

आता काही श्रोत्यांना असह्य झाले व त्यांनी तोंड काळे केले. अन्य काही श्रोते जमीनीकडे बघत तोंड चुकवू लागले. अध्यक्ष गरजतच होते,

“लोकांना माझे तोंड दिसते. पण मी जनतेच्या हिताचेच बोलत असतो !”

अखेर त्यांचे भाषण आटोपले. त्याबरोबर अनेक श्रोत्यांनी पळ काढला. आता तिथे तोंडाळराव आणि अध्यक्षांचे काही कार्यकर्ते तेवढे उरले होते. मग त्या कार्यकर्त्यांनी हळूच अध्यक्षांच्या जवळ जाऊन तोंड उघडले. अध्यक्ष अजून त्यांच्याच धुंदीत. त्यांनी या दीनवाण्या कार्यकर्त्यांवरच तोंडसुख घेतले. त्यावर बिचाऱ्या कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

त्यांचे झाल्यावर तोंडाळराव अध्यक्षांच्या जवळ आले आणि त्यांच्या तोंडाशी तोंड देऊ लागले. पण आज अध्यक्षांचा पारा चढलेला होता. ते रावांवर गुरकावले,

“नका सांगू आम्हाला तुम्ही. मागच्या प्रकरणात तुम्हीच आमच्या तोंडाला पाने पुसलीत. चला, निघा इथून”.

अध्यक्षांच्या या हल्ल्याने तोंडाळरावांचे तोंड उतरले. पण अध्यक्ष कुठले शांत बसायला ? ते तोंड टाकतच राहिले. तसा हा अध्यक्ष चक्रमच माणूस. कायम तोंडावर नक्षत्र पडलेला.

त्यांच्याशी साधी तोंडओळख सुद्धा करून घ्यावी वाटायची नाही लोकांना. त्यांनी अनेक होतकरू तरुणांना तोंडघशी पाडले होते.
याउलट आपले तोंडाळराव. पक्का तोंडचाट्या माणूस. पण कधी प्रकरण अंगाशी येऊ लागले तर मात्र पक्का तोंडचुकार. बाकी सातबाराचे हिशोब त्याला अगदी तोंडपाठ असत…..
……….

मंडळी,
चालवा आता आपापली तोंडे आणि कथा पुढे जाऊ द्या......
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सभा अशी अर्धवट झाली तर तोफे च्या तोंडी शेवटी कार्यकर्ताच जाणार ना.
मधून मधून तोंडी लावणे म्हणून काही हलके फुलके घालायचे की.

हाता तोंडाशी आलेली संधी गेली. नंतर कार्यकर्ते कितीतरी दिवस तोंड चुकवत होते. उगाच अध्यक्षांच्या तोंडी लागलो असे झाले त्यांना. खरे म्हणजे मुख्य भाषणानंतर तोंडी लावायला म्हणून तोंडाळरावांचे भाषण ठेवले होते. पण तीच चूक झाली, बिचारे तोंडावर आपटले. . निवडणुकीचे तिकिट मिळणार होते पण या चुकीने तोंडचा घास काढून घेतला. कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही. आता कधी तोंड देखले म्हणून सुद्धा त्यांचे नाव काढणार नाहीत. पण त्यामुळे एका नविनच वादाला तोंड फुटले.

वा !
सर्वजण छान भर घालत आहात ....

काहीही धागा आहे हा आणि हातवाला पण असं म्हटलं तर तोंडळ म्हणाल.
हात तोंड नेक्स्ट काय?
हमबोलेगातोबोलोगेकेबोलताहै

पण कुणालाच कळले नाही की अध्यक्ष कुठल्या तोंडाने तोंडाळरावांशी तोंड वर करून बोलत होते.

अध्यक्षांचे भाषण ऐकून काहीजण म्हणाले की त्यांचे तोंड आहे कीं तोबरा आहे? अजून काही जण त्यांच्यावर नाराज होते. ते तर तोंड जळो त्याचे असे म्हणत निघून गेले

अध्यक्षांचे भाषण ऐकून काहीजण म्हणाले की त्यांचे तोंड आहे कीं तोबरा आहे? अजून काही जण त्यांच्यावर नाराज होते. ते तर तोंड जळो त्याचे असे म्हणत निघून गेले