हातभार लावावा !

Submitted by कुमार१ on 18 October, 2021 - 02:42

नमस्कार !
एक गमतीदार प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे २५ वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे.
हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी…..
……….

हातकणंगलेमध्ये राहणारा विजय हातावर पोट भरत असे. मजुरांच्या व्यथांची त्याला जाण होती. त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायातून तो पेटून उठे. व्यवस्थेशी संघर्ष करताना वेळप्रसंगी हातावर शीर घेऊन लढायला त्याची तयारी असे. त्याची मिळकत बेताची असल्याने हात राखून खर्च करायची त्याला सवय होती. यथावकाश तो मोठा झाल्यावर त्याच्या दोन हातांचे चार हात झाले. अर्थात त्याच्या संसारासाठी काही परिचितांनी हात लावले.

आता विजयने ठरवले की वाटेल तितके कष्ट करून बायकोला सुखात ठेवायचे. आपले स्वतःचे घर घेण्याच्या निर्धाराने त्याने हाती कंकण बांधले. त्याच्या वस्तीतील आजूबाजूचे पुरुष त्यांच्या बायकांवर येता-जाता हात टाकत. हे त्याला पाहावत नसे. म्हणून त्या वस्तीतून बाहेर पडायचा त्याने निर्धार केला. तो जोमाने कष्ट करू लागला. लवकरच त्याचा हात चालू लागला. बचतीचे महत्त्व तो जाणून होता. त्यामुळे कुठल्याही चैनीसाठी तो हात आखडता घेई. त्याचे आई-वडील हेच त्याचे दैवत होते. ते वगळता अन्य कोणापुढे त्याने हात जोडले नाहीत. त्याचे मित्र त्याला वारंवार व्यसनाकडे ओढू पाहात. पण तत्परतेने तो हात झाडी. आपले घर बांधणे हेच त्याचे स्वप्न होते आणि फक्त त्या स्वप्नाच्याच मागे तो हात धुऊन पाठीस लागला होता !

काही वर्षातच त्याचे स्वप्न साकार झाले व त्याचे हात पोचले. मात्र त्याचे पूर्वीचे सहकारी आळशी व व्यसनाधीन असल्याने गरिबीतून बाहेर पडू शकले नाहीत. उन्नतीसाठी प्रयत्न न करता निव्वळ कपाळावर हात मारणे हाच त्यांचा उद्योग होता. विजय त्यांना वारंवार सांगे की हातपाय गाळू नका, उठा, अधिक कष्ट करा.

कालांतराने विजयने चाकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यासाठी त्याने 2 नोकर हाती धरले. पण ते दोघेही नीट काम करीत नसल्याचे त्याच्या लवकरच लक्षात आले. अळमटळम करणे व नको तिथे हात घालणे हाच त्यांचा दिनक्रम होता. विजयच्या हाताला हात लावण्याचे नाटक मात्र ते छान करीत. तसेच विजयकडून हातउसने पैसे घेण्यात त्यांचा हातखंडा होता ! त्यातील एक जण बरेच उसने पैसे घेतल्यानंतर विजयच्या हातावर तुरी देऊन गेला.

विजय मात्र एक हाती लढतच राहिला. स्वतः अधिक कामे करुन तो त्याचा विकास घडवी. आता त्याला बरीच कंत्राटे मिळू लागली. योग्य मुदतीत काम करून देण्यासाठी तो वचनबद्ध असे. कंत्राटदारांना जणू तो आपला हात कापून देई. त्याच्या गुणांवरच त्याला नवी कंत्राटे मिळत. ती मिळवण्यासाठी कुणाचे हात चेपायची त्याला गरज पडली नाही. यथावकाश त्याला व्यावसायिक स्पर्धक निर्माण झाले. त्यांनी त्याचे खच्चीकरण करण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु विजय काही कच्चा बच्चा नव्हता. त्याने त्या सर्वांना चांगलाच हात दाखवला.

विजय आता आर्थिक सुस्थितीत होता पण त्याची जीवनशैली मात्र अजूनही पूर्वीसारखीच साधी होती. चंगळ वगैरे अजिबात नाही. दोन वेळच्या जेवणानंतर हातावर पाणी पडले की तो तृप्त असे. आयुष्यात कुठलेही काम करण्यासाठीच त्याने आपले हात वाहिले होते. कित्येक तांत्रिक कामे सफाईने करणे हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता. त्या कामात त्याच्या बरोबरीच्या लोकांना त्याचा हात धरणे अवघड होते.......

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हातापायी केली/झाली
हात सरसावले
तळहातावर शीर घेऊन लढला
त्याने त्याला चांगला हात दाखवला
हातावर हात घेऊन बसला
हातवारे करत होता
हात चोळत गेला
उजव्या हाताचं डाव्या हाताला माहित नव्हतं

म्हणी

हात ओला तर मित्र भला
हातच्या कंकंणाला आरसा कशाला

छान.

चंगळ वगैरे अजिबात नाही >>> > > घरच्या जेवणावरच तो आडवा हात मारीत असे.

मस्त केलय!

हात दाखवुन अवलक्षण, बोट दिले तर हात धरणे, हातोहात फसवणे

सर्वांना धन्यवाद !
ज्यांनी नुसते वाक्प्रचार दिले आहेत त्यांनी गोष्ट पुढे चालू ठेवून त्यात घालावेत. म्हणजे रंजकता वाढेल
Happy

वा, खूपच छान! हा प्रकार डॉक्टरांनी फारच चांगला हाताळला आहे. पाहता पाहता सर्व मायबोलीकर खाली नवीन वाक्प्रचार लिहिण्यास हात सरसावून पुढे आले. ही वाक्लढाई (वाग्युद्ध) अशीच चालू राहिली, तर लवकरच प्रकरण हातघाईवर येईल. पटापट वेगवेगळे वाक्प्रचार लिहून हे काम हातावेगळे करा.

जरा वाचायला विचित्र, ई वगैरे वाटेल, पण 'हात धुवून पाठमागे लागणे' ह्यापेक्षा 'पाठीमागे लागून मग हात धुणे' जास्त हायजीनिक आहे. नाहीतर 'डाव्या हातचा मळ' जाणार कसा?

छान भर घालत आहात सर्वजण.

हात धुवून पाठमागे लागणे' ह्यापेक्षा 'पाठीमागे लागून मग हात धुणे' जास्त हायजीनिक >>> भारीच Happy Happy

नवीन प्रकार हाताळून तुम्ही 'आपला हात जगन्नाथ' हे दाखवून दिले आहे आता 'हात दाखवून अवलक्षण' न झाले म्हणजे मिळवले. Lol रिकाम्या हाताने कुठे जाऊ नये हो, म्हणून स्वहस्ते प्रतिसाद टाईपते आहे. शब्दच्छल असो वा शब्दखेळ आमचे हात नेहमी सरसावलेले. Wink

हायजिनिक हात Lol
जे एखाद्या गोष्टीला डाव्या हातचा मळ समजतात त्यांच्या उजवा हातावर हातमोजा चढवलेला असतो का Proud

Happy
हा धागा म्हणजे होमोसेपियनच्या हाती कोलीत होणारे. मीही या ("हस्ती") दंतकथा लिहिते. Proud

(हस्तीवर श्लेष, हसत व हातांनी या दोन्ही अर्थाने)

सगळ्यांचेच हात पिवळे झाले असल्याने
हातात बांगड्या भरणे वाक्प्रचार किती अयोग्य आहे याची सर्वांना जाणीव आहे. बरोबर? मग करा हात पुढे.
लौकर वाक्प्रचार लिहून वेळ हातातून निसटून जाणार नाही हे बघावे, पण हात चलाखी टाळावी.

जे एखाद्या गोष्टीला डाव्या हातचा मळ समजतात >> जिनके घर शीशे के हो च्या चालीत वाचलं.

'हस्ती'दंतकथा शब्द आवडला. बाकीच्यांचेही प्रतिसाद छान.

एक गोष्ट मानली पाहिजे की प्रतिसाद मिळण्यासाठी डॉक्टरसाहेबांना हात पसरावे लागत नाहीत कधी. Light 1

गोष्ट छान आहे.
विजयने परिस्थितीसमोर कधीही हात टेकले नाहीत.

एकंदरीतच विजय हात लावेल तेथे सोने करून दाखवायचा. तो कधीच हातचे राखून काम करायचा नाही. हीच त्यांची हातोटी होती. त्याची बायको त्याला हातात हात घालून मदत करायची. त्याच्या प्रत्येक यशात तिचा हात असायचाच. त्याने कधिही हात उसने घेतले नाहीत कारण सावकार हातोहात फसवतील हे त्याला माहित होते. तो त्यांच्या पासून चार हात दूर रहायचा.

(अवांतर : बहासा इंडोनेशिया मधे "हाती हाती " म्हणजे "सावकाश" पुढे धोका आहे, काळजी घ्या. Happy )

वरील सर्वांनाच मनापासून धन्यवाद !

प्रत्येकाने आपले हस्तकौशल्य दाखवून मूळ गोष्टीमध्ये छान भर घातली आहे.

Pages