नरकातल्या गोष्टी - भाग ३ - निर्माता!! (पूर्वार्ध)

Submitted by अज्ञातवासी on 18 October, 2021 - 13:45

'मुलगा झाला हो...
चाळीत हाळी दिली गेली, आणि जल्लोष झाला.
मात्र मुलाचा बाप कुठेतरी तर्र होऊन पडला होता.
आई चार घरी धुणीभांडी करून याला आणि याच्या बापाला पोसायची.
मिळेल ते खायची, खाऊ घालायची.
याला शाळेत टाकलं. मन लावून शिकत होता, पण त्या दिवशी...
न जाणे का, शेजारच्या मुलांनी याला खूप मारलं. खारच खाऊन होती.
मग याने एकाचं डोकं फोडलं...
त्या दिवसापासून हा कधीही शाळेत गेला नाही.
जर गांजाची एक पुडी इथून तिकडे पोहोचवली, तर पाच रुपये मिळतात, हा शोध त्याला फार लवकर लागला.
दिवसाला पन्नास रुपये तो सहज कमावू लागला.
त्याने बटुकभाईची गँग जॉईन केली... लवकरच बटुकभाईचा सगळ्यात जवळचा पंटर म्हणून तो ओळखला जाऊ लागला.
आणि, एके दिवशी बटुक भाईलाच उडवून त्याने स्वतःची गँग स्थापन केली.'
"परफेक्ट." चित्रू ओरडलाच... "ही इज डूइंग गुड!"
"येस. बाय डिफॉल्ट कुंभीपाक हेल..." त्याचा एक सहायक अदबीने म्हणाला.
"नो स्टूपिड, सुकर मुख." त्याचीच सहकारी नाकावरचा चष्मा सावरत फणकाऱ्याने म्हणाली.
"चित्रू सर, ही नेहमी मला टोकते."
"कारण तू डंब आहेस. लक्षात आहे ना, हु वॉन्टस टू बी हेलेनियर मध्ये तू तिसऱ्या प्रश्नालाच आऊट झालास. मी मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली."
"स्टॉप इट..." चित्रू म्हणाला. "दोघांनी आता कामाला लागा. हिशेब इतका चोख असला पाहिजे की डिस्टिंक्शन मध्ये हा कुंभीपाक मध्ये पडला पाहिजे..."
"व्हॉट द हेल!" चष्मावालीने हात उडवले, व ती तावातावात निघून गेली.
"हू केर्स." चित्रू आपल्याच खुशीत होता. तेवढ्यात सटू तिकडून आली.
"हाय चित्रू. आज काय विशेष? खुशीत दिसतोय."
"थॅन्क्स टू यू. तू त्या माफियाची स्टोरी लिहिली होती ना, तसच घडतंय.
"म्हणजे?" सटूने चमकून विचारले.
"तो फुल जोशात पाप करतोय. माफिया जोमात, बाकी सगळे कोमात."
"नॉट पॉसिबल." ती म्हणाली.
"का?" चित्रूची उत्सुकता वाढली.
"कारण मी त्याच्या आयुष्यात ट्रिगर पॉइंट लिहीलाय, जिथून त्याचं आयुष्य पूर्ण बदलेन."
"म्हणजे?" चित्रूच्या कपाळावर आठ्या आल्या.
"तो त्याच्या चाळीतल्या बालमैत्रिणीच्या प्रेमात होता. ती परत येईल व दोघांचं प्रेम जुळेल. त्याला लहानपणीच्या आठवणी छळतील आणि तिच्या प्रेमात तो चांगुलपणाच्या सर्व गोष्टी करेल. कळलं चित्रू?"
"व्हाय सटू, व्हाय?" चित्रू निराशेने म्हणाला.
"सॉरी चित्रू, तुझ्या फक्त हिशेबासाठी मी एका निष्पाप जीवाला राक्षस नाही बनवू शकत."
"मॅडम." चित्रूचा साथीदार मध्येच म्हणाला.
"काय?"
"तो ट्रिगर पॉइंट येणारच नाही."
"का?" सटूने आश्चर्याने विचारले.
"माफियाच्या चाळीच्या कोपऱ्यावरचा पानवाला माहितीये? ज्याच्या कपाळी तुम्ही पळून जाऊन लग्न लिहिलं होतं?
हो..."
"ती माफियाची बालमैत्रीण कधीच त्याच्यासोबत पळून गेली."
"येस...येस...सटू बघ, म्हणून मी सांगतो, हिशेबात गफलत नको. आता बघ, तुझ्याच फेऱ्यात तू गुरफटलीस." चित्रू हर्षारीतेकाने म्हणाला.
"नो...नो..." सटूने आवंढा गिळला. तरीही एक चुकार अश्रू तिच्या गालावर ओघळलाच.
"माझ्या एका चुकीमुळे त्याचं आयुष्य बरबाद होणार चित्रू." तिच्या तोंडातून एवढेच शब्द बाहेर पडले, आणि ती धावत तिथून निघून गेली.
चित्रूला जरा वाईट वाटलं, पण नंतर मस्त शीळ घालत तो हिशेब करू लागला.
चार दिवसांनी.
"चित्रू सर." चष्मावाली म्हणाली.
"बोल." चित्रू हिशेब करता करताच म्हणाला.
"सटू मॅडम चार दिवसांपासून आल्या नाहीत."
चित्रूने किंचित मान वर केली.
"लिहीत असेल एखादी इंटरेस्टिंग स्टोरी. तू टेन्शन घेऊ नको." तो चाचरत म्हणाला.
"चार दिवसापासून त्यांनी काही लिहिलेलं नाही, अशी न्युज आहे."
"काय????" चित्रू उडालाच...
"हो. कोरं कपाळ घेऊन अर्भके जन्माला येतायेत. त्यांचं आयुष्य आता कसही भिरभिरू शकतं. इन शॉर्ट...
...त्यांचं भविष्य आता ते लिहितील."
"नो...नो... नो... अशाने तर हिशेबाबरोबर माझ्या मेंदूच्याही चिंध्या होतील."
चष्मावाली काहीही बोलली नाही.
"असिस्टंट, आपली लंबोदरगिनी काढ. सूर्यलोकात जायचंय." चित्रू घाईत म्हणाला.
"इट्स लेम्बोर्गिनी." असिस्टंट नाराजीने म्हणाला.
"हो, काढ पटकन. पळ."
थोड्याच वेळात लेम्बोर्गिनी चित्रूसमोर उभी राहिली...
... तिच्यावरचा रेडा डौलाने मान हलवत होता...
सुर्यलोकात.
"सटू."
"बोल चित्रू." तिने शून्यात बघत विचारले.
"नाही, अग सहज. असच इकडून सनीकडे चाललो होतो, म्हटलं तुलाही भेटून जावं. कशी आहेस?"
"छान आहे. मोकळं वाटतंय. काहीही न लिहून."
"अग असं कसं. तू एक बेस्ट लेखिका आहेस. तू नाही लिहिलं तर कसं चालेल?"
"मस्त चाललंय. आता प्रत्येकजण त्याचं भविष्य स्वतः घडवेन."
"सटू, असं करू नकोस, प्लिज."
"चित्रू मला एकटं सोड, प्लिज..."
"सटू?"
"टेक केयर चित्रू. बाय..."
ती तिथून उठून निघून गेली.
चित्रूही मान खाली घालून तिथून निघून गेला.
लोक रांगेत उभे होते. चित्रूचे असिस्टंट सोप्या केस हॅण्डल करून त्यांची रवानगी स्वर्ग आणि नरकात करत होते.
तेवढ्यात चित्रूचा मोबाईल वाजला.
'बुरे खेलमे, जायेंगे हेलमे' ग्रुपवर मेसेज होता...
'जब इंसान का घमंड खत्म होता है, तब उसका अहंकार खत्म होता है,
लेकीन जब इंसान का वजुद खत्म होता है, तब वो खुद खत्म होता है!'
खाली फराटेदार 'राज' अशी सही!!
"काही काम नाहीत यांना." चित्रूने रागाने फोन ठेवला.
पुन्हा फोन वाजला.
चित्रूने मेसेज बघितला.
'सो ट्रू,' दोन उभे अंगठे आणि एक डोळे भरून आलेली ईमोजी.
सटूचा रिप्लाय...
चित्रू उडालाच.
'सटू जिवाचं काही बरं वाईट तर नाही करून घेणार ना?'
चित्रूच्या डोळ्यासमोर निरनिराळे चित्र उभे राहिले.
"सटू नाही..." तो न राहवून ओरडला...
"काय झालं?" एक असिस्टंट चमकून मागे वळला.
"गाडी काढ. पटकन गाडी काढ."
पुन्हा लेम्बोर्गिनीवरचा रेडा आळस देत उठला...
गाडी थांबली, आणि चित्रू धावत महालात शिरला.
"डॅडी.. व्हेर आर यू?"
"चित्रू, माय बॉय. बऱ्याच दिवसानी. कसा आहेस?" एक उत्साही म्हातारा समोर आला.
"मी मस्त, पण एक इमर्जन्सी आलीय."
"वेट... आपण बसून बोलुयात. एकदम सॉफ्ट चेयर बनवून घेतल्यात, तुला आवडतील."
दोन कमळ थिमच्या खुर्च्या आणल्या गेल्या.
चित्रू बसला, आणि त्याने सविस्तर सर्व कथा सांगितली.
"डॅडी. तुम्हीच आता काहीतरी करु शकता."
"चित्रू, मी काहीही नाही करू शकणार. सटूने जे लिहिलं, तेच होणार." म्हातारा विचार करून म्हणाला.
"असं कसं? तुम्ही निर्माते आहात. तुम्हीच तर सगळं निर्माण केलंय. तुम्ही काहीही करू शकतात."
"हो, पण ऑलरेडी निर्माण झाल्यावर मी त्यात बदल करू शकत नाही."
"मग काय उपयोग? मोठी शेखी मिरवत असतात, मी निर्माणकर्ता..."
"आहेच मी. पण तू जे मागतोय, तो तर शुद्ध त्यांच्या भावनांशी खेळ झाला. म्हणे त्या दोघांचं लग्न करा, आधी प्रेम करून, किंवा या पानवालीच आता लग्न तोडा. खेळ नाहीये हा चित्रू. तसंही लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात.तुम्ही नरकवाले त्यात हस्तक्षेप करूच शकत नाही. अरे या गाठी तर साक्षात ब्रह्मदेवाने बांधलेल्या..."
...म्हाताऱ्याने बोलता बोलताच जीभ चावली.
"बोला... आता बोला... खेळ तुम्ही केलात. का बांधली गाठ ही? बोला...? जगात सात बिलियन लोक आहेत, तुम्हाला हीच गाठ मारायची होती? बोला? चूक सटूची नाही, तुमची आहे. आता काही नाही. तुम्ही त्यांच्या मनात द्वेष निर्माण करा, आणि लग्न मोडा हे!"
"मी काय मनीषकुमार आहे का, मन मॅनीप्यूलेट करायला?" म्हातारा बोलला.
चित्रूचे डोळे चमकले.
"मनू सध्या कुठे आहे?" त्याने म्हाताऱ्याला विचारले.
"चित्रू, हा खेळ नको, संतुलन बिघडेल."
"मनू सध्या कुठे आहे डॅडी?"
"नाशिक." म्हातारा पुटपुटला.
"मनू, मी येतोय, तयार रहा!" चित्रूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती.
...आणि क्षणार्धात चित्रू आणि त्याची लंबोदरगिनी अदृश्य झाली...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>तसंही लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात.तुम्ही नरकवाले त्यात हस्तक्षेप करूच शकत नाही.
मस्त. हे वाचल्यावर मी एकदम ख्याक करून हसलो.

लेखिका, दिग्दर्शक, निर्माता सगळे एकदमच वाचले..
मनू सगळ्या कथांमध्ये हजेरी लावणार आहे का?
छान लिहिलंय.. आता सीमंतीनी म्हणतेय तसं नट यायला हवा Lol