नीली वर्दीवालों का दल

Submitted by पराग१२२६३ on 8 October, 2021 - 07:37

8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील. हवाईदलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे 8 ऑक्टोबरला हिंदन हवाईदल स्थानकावर मुख्य आणि दिमाखदार समारंभ पार पडला.

भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर खोर्सचे इंडियन एअर फोर्स (भारतीय हवाईदल) झाले. दुसरे महायुद्ध, 1948, 1965 आणि 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धे, 1984 मधले ऑपरेशन मेघदूत, 1987 मधले ऑपरेशन पुमालाई आणि ऑपरेशन पवन, 1999 मधला कारगिल संघर्ष या महत्वाच्या प्रसंगांमध्ये भारतीय हवाईदलाने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे.

युद्धप्रसंगी शत्रूला सर्वात जलदतेने प्रत्युत्तर देणारे आपले हवाईदल नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सर्वात जलदतेने मदतकार्य पोहचवत आहे. एप्रिल-21 मध्ये देशात आलेल्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यावेळी तातडीने देशाच्या विविध भागांमधून आणि विदेशांमधूनही ऑक्सिजन टँकर्स आणून ते ऑक्सिजन भरणा केंद्रांपर्यंत पोहचवण्यात हवाईदलाने अतिशय महत्वाची भूमिका बजावली.

मालदिव, श्रीलंका यांसारख्या ठिकाणी निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत तेथील लोकनियुक्त सरकारच्या विनंतीवरून त्याच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाने मोहीम राबवली होती. जगाच्या कोणत्याही प्रदेशात उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतून आपल्या नागरिकांबरोबरच इतर देशांच्या नागरिकांची सुटका करण्यात आपल्या हवाईदलाने कायमच सक्रीय योगदान दिले आहे. या वर्षी अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा सत्ता ताब्यात घेतल्याने तेथे अतिशय अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांबरोबरच अन्य देशांच्या नागरिकांचीही भारतीय हवाईदलाने सुरक्षित सुटका केली. भारतीय हवाईदलाने काँगो, सिएरा लिओन इत्यादी देशांमध्ये राबवण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांततारक्षण मोहिमांमध्ये भार घेतलेला आहे.

पहिला प्रतिसाद देणारा (First Responder) या नात्याने आपल्या हवाईदलावरील जबाबदारी वाढलेली असून त्याची कार्यकक्षा मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे.

आज भारतीय हवाईदलात रफालसारखी मध्यम पल्ल्याची अत्याधुनिक लढाऊ विमाने; एमआय-17 व्ही-5, चिनूक आणि अपाचे यांसारखी हेलिकॉप्टर्स; आकाश, ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे; रडार अशी विविध प्रकारची साधनसामग्री सामील झाली असून येत्या काळात 114 मध्यम पल्ल्याची बहुउद्देशीय लढाऊ विमाने, हलकी हेलिकॉप्टर्स, एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा, सी-295 लहान मालवाहू विमाने हवाईदलाला मिळणार आहेत. अशा निळ्या वर्दीतील आपल्या आकाशयोद्ध्यांना 89 व्या वर्धापन दिनी कडक सलाम...

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_8.html

Group content visibility: 
Use group defaults

छान आढावा.

<< भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर खोर्सचे इंडियन एअर फोर्स (भारतीय हवाईदल) झाले. दुसरे महायुद्ध, 1948, 1965 आणि 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धे, 1984 मधले ऑपरेशन मेघदूत, 1987 मधले ऑपरेशन पुमालाई आणि ऑपरेशन पवन, 1999 मधला कारगिल संघर्ष या महत्वाच्या प्रसंगांमध्ये भारतीय हवाईदलाने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. >>
------- २०१९ बालाकोट हवाई हल्ल्याचा अनुल्लेख खटकला Happy