विविध धर्मात आढळणारी मुलांची एकसारखी नावे

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 October, 2021 - 17:55

आज शाहरूखच्या मुलाचा आर्यनचा व्हॉटस्सप ग्रूपवर विषय निघाला. ग्रूपवर एक आर्यन नावाचा मुलगाही आहे. अर्थात तो मराठी मुलगा आहे. त्याला शाहरूख बिलकुल आवडत नाही. किंबहुना जिथे त्याला शाहरूखवर टिका करायची संधी मिळते, ती तो सोडत नाही. आणि दरवेळी मी त्याला चिडवतो, लाज नाही वाटत, बाबांना असे बोलतोस Wink

तर सांगायची गंमत अशी की गौरी आणि शाहरूख या हिंदू-मुस्लिम दांपत्याने आपल्या मुलाचे नाव असे ठेवले आहे की ते कुठल्या धर्माचे म्हणावे चटकन कळत नाही. किंबहुना मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्याच जास्त जवळचे वाटते.

सलील! अस्सेच एक नाव. एक शालेय मित्र. अर्थात आमची शाळा राजा शिवाजी विद्यालय, मराठी माध्यम असल्याने तो मराठीच हे आम्हाला माहीत होते. तसेच सलीलचा अर्थ पाणी हे सुद्धा त्याच शाळेत शिकलो होतो. तरीही बाहेरचे लोकं जेव्हा त्याचे नाव ऐकायचे तेव्हा त्यांना तो मुस्लिमच वाटायचा. बहुधा सलीम, साहील, या साधारण तश्याच मुस्लिम नावांमुळे असेल. की सलील नावही असते मुस्लिमांत??

समीर! या नावाचे माझे लहानपणी चाळीत, शाळेत, क्लास वगैरे मध्ये मिळून टोटल पाच सहा मित्र होते. सारेच मराठी होते. पुढे दहावीला डोंगरावर अभ्यास करायला जायला लागलो तेव्हा समीर शेख नावाचा सातवा मित्र मिळाला. जो मुसलमान होता. तेव्हा मला पहिल्यांदा समजले की हे नाव मुसलमानांमध्येही असते आणि ते देखील बरेपैकी कॉमन असते. सलमानच्या एका चित्रपटात समजले की समीर म्हणजे हवां का झोंका. पण तो अर्थ नेमका कुठल्या भाषेत ते अजूनही माहीत नाही.

ईशा! नात्यातल्या एका भावाने मुलीचे नाव ईशा ठेवले. जवळपास पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात एकच गोंधळ. हे कुठले नाव? हे नाव आपल्यात नसते, हे तर मुस्लिमांत असते, वगैरे वगैरे. खरे खोटे अल्लाह जाणे. पण भावाने आणि वहिनींनी सांगितले की पार्वतीचे एक नाव आहे. खरे खोटे राम जाने. पुढे जाऊन समजले की धर्मेंद्र यांचीही एक ईशा देओल नावाची मुलगी आहे आणि घरातले वातावरण निवळले. पण त्याही पुढे जाऊन कोणीतरी सांगितले की धर्मेंद्र यांनीही दुसरे लग्न करायला ईस्लाम धर्म स्विकारलेला आणि वातावरण पुन्हा गोंधळले Happy

असो, तर अभिषेक नाईक! ऐकल्यासारखे वाटतेय नाव Happy ऋन्मेष या आयडीमागचे खरे नाव. ऑर्कुटवरची माझी सेक्युलर विचारसरणी आणि अमन की आशा ईमेजमुळे मला गंमतीने अबू शेख म्हटले जायचे. पण एकदा माझ्या अभिषेक नाईक या नावाला एक मुस्लिम महाविद्यालयच फसले होते.

तर गंमत अशी झाली होती, वीजेटीआयला डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेण्याआधी मी जवळचेच म्हणून आमच्या भायखळा येथील साबूसिद्धीकी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेलो होतो. तिथे मला मॅकेनिकलला अ‍ॅडमिशन हवे होते. जे माझे दहावीचे मार्क्स पाहता मिळायची शक्यता कमीच होती. कारण त्या कॉलेजला मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ७० ते ८० टक्के आरक्षण होते. पण तरीही ते तेथील कर्मचार्‍यांच्या चुकीने मला जवळपास मिळालेच होते. कारण माझ्या अभिषेक नावातील 'षेक' ला 'शेख' समजून आणि 'नाईक' हे आडनावही मुस्लिमांतही असल्याने माझा फॉर्म चुकून त्या आरक्षणाच्या टोपलीत गेला होता. अ‍ॅडमिशनही त्या लिस्टमधील मेरीटनुसार पक्के झालेले. फी भरणारच होतो. ते माझ्याच लक्षात आले की अरे आपल्याला मुस्लिम कोट्यात टाकत आहेत. पुढे काही गडबड होऊ नये या हिशोबाने मी ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून दिली. आणि माझे अ‍ॅडमिशन होता होता राहिले.
नंतर तिथले ऑफिस कर्मचारी येऊन माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही काही बोलला नसता आणि एकदा पैसे भरले असते तर तुमचे अ‍ॅडमिशन झाल्यातच जमा होते. पुन्हा फिरून आम्ही वा कोणी रद्द केले नसते. पण नशीबात ते नव्हतेच म्हणा. वा त्यापेक्षाही चांगले होते म्हणूया.. Happy

असो, तर मला स्वतःलाही मुलाच्या वेळी असेच एखादे नाव ठेवायचे होते. जे हिंदूतही असावे आणि मुसलमानांमध्येही वा शीखांमध्येही. त्या नावावरून त्याचा धर्म चटकन कळू नये. एक नाव जवळपास फायनलही केले होते. कबीर ! ज्यावरून संत कबीरही आठवावेत आणि चक दे चा रुबाबदार शाहरूख, कबीर खानही डोळ्यासमोर यावा. पण नावांची चर्चा करताना बायकोच एकदा बेसावधपणे म्हणाली, की मला ते ऋन्मेष नावही छान वाटते. आणि मग मलाही तो मोह आवरला नाही.

अर्थात मुलीचे नाव ठेवताना यातले काहीही डोक्यात नव्हते. किंबहुना बारश्याचा दिवस, बारश्याची संध्याकाळ उजाडली आणि घरी जमलेल्या बायका पाळणा हलवायचा विधी करू लागल्या तरी नावाबाबत माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते. अखेर माझे वडीलच म्हणाले, की मुलगी परीसारखी दिसतेय तर तुर्तास परी नाव ठेवा. पुढे सावकाश विचार करून ठरवा आणि जे छानसे सुचेल ते रजिस्टर करून घ्या. परी आपले घरचे नाव राहील. पण त्यानंतर कसले काय. परी हे नाव बोलायला ईतके सुटसुटीत आणि गोड वाटू लागले, आणि त्या नावाशीच भावनिक नाते जोडले गेले, की उगाच कागदोपत्री दुसरे नाव ठेवायची गरजच काय असा विचार केला आणि तेच फायनल झाले.

पुढे जेव्हा मी तिला गार्डनमध्ये नेऊ लागलो तेव्हा परी हाक मारताच किमान चार मुली मागे वळून बघायच्या. कारण बहुतेक मुलींचे हे घरचे नाव असावे. पण आमच्या नाक्यावरच्या सुपरमार्केटमधील मुस्लिम दुकानदाराच्या याच वयाच्या भाचीचे खरेखुर्रे नाव होते. हे असे काही समजले की माझी बायको चिडायची, बघ किती कॉमन नाव ठेवलेस. हे तर मुस्लिमांमध्येही निघाले. पण फायदा हा व्हायचा की त्या मुस्लिम मामाकडून या भाचीलाही वरचेवर फ्री चॉकलेट मिळायचे Happy

तर तुमच्या माहीतीत अशी काही सर्वधर्मीय नावे असतील आणि त्यातून घडणारे काही किस्से असतीत तर जरूर शेअर करा. त्यातले एखादे नाव आवडलेच तर तिसर्‍या अपत्याच्या वेळी त्याचा विचार करू शकतोच Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात नावांचे जात्याधारीत वर्गीकरण सुद्धा होईल. उदा सिद्धार्थ आणि गौतम मी नावे महाराष्ट्रात गेल्या ३०-४० वर्षात प्रामुख्याने नवबौद्ध समाजात दिसतील तर सवर्णांच्या त्यांचा वापर कमी झालेला दिसेल. >>

टण्या, मुद्दा बरोबर आहे पण उदाहरणे चुकीची वाटतात. ही दोन्ही नावे आजूबाजूला नवबौद्ध नसणार्‍या अनेक जातींत पाहिली आहेत, गेल्या काही वर्षांतच. अमेरिकेत व्हाइट्स आणि आफ्रिकन-अमेरिकन्स मधे कॉमन असलेल्या नावांवर बहुधा त्या आउटलायर्स वाल्या लेखकानेच लिहीलेले आहे. तसेच भारतातही आहे. ठराविक जातीत काही काळ काही नावे जास्त आढळतात. पण १०-२० वर्षांनंतर तीच दुसर्‍या जातींमधे जास्त दिसू लागतात. आईवडलांना मम्मी/पप्पा म्हणणे जसे वाढत गेले आहे तसेच.

तसेच उत्तरेत, पंजाबी व बंगाली लोकांमधे एकेकाळी प्रचलित असलेली नावे मराठीतही गेल्या काही वर्षांत दिसू लागली. कुणाल, आलोक वगैरे. उत्तरेत एकदम पंकुडी, दिया, तुलिका वगैरे असतात त्या अजून आल्या नसाव्यात मराठीत. आमच्या ओळखीत तरी नाहीत Happy

ओंकार पाटील, चिन्मय मुंडे, गौरी शिंदे, तन्मय माळी, विभावरी कांबळे अशी नावे दिसतात. पण
शिवाजी जोशी, तानाजी देशपांडे, सायकली वैशंपायन, पिऱ्या जैन अशी नावे पाहण्यात नाही आली.

ही दोन्ही नावे आजूबाजूला नवबौद्ध नसणार्‍या अनेक जातींत पाहिली आहेत, गेल्या काही वर्षांतच >>>> हेच लिहिणार होतो.

आमच्या ओळखीचे एक हिंदू सदगृहस्थ आहेत (बरेच देवधर्म करतात). मोठी मुलगी १ जुलै ला जन्मली म्हणून तिचे नाव ज्यूली ठेवलय. तर धाकटीच एका जवळच्या मुस्लिम मित्राच्या सूचनेवरून सना ठेवलय. ३०-३५ वर्षांपूर्वी.
आवडेल ते ठेवावे. आता वेगळ नाव ऐकून दचकायला होत नाही. नावा बाबतीत तरी समाज धर्म आणि जातीच्या पलिकडे पहायला लागलाय ही आशादायक परिस्थिती आहे.

इंडोनेशियात गेलात तर तुम्हाला आपली संस्कृत नाव धारण केलेली मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक भेटतील.
विष्णू महमद आमच्या कंपनीत होता, तर गीता ज्यूलिया मला एका ट्रॅव्हल एजन्सी मधे भेटली होती. त्या देशात हे अगदी कॉमन आहे. संस्कृत नाव असणे हे ते लोक त्यांच्या संस्कृतीचा भाग मानतात. माणसांचच काय पण कंपन्यांच्या नावातही बरेचदा संस्कृत शब्द मूळ स्वरूपात किंवा थोडा अपभ्रंशित स्वरूपात असतो. सुशिला, जया आणि विजया ही तर नेहमीची नावे.

काही वर्षापुर्वी इंडोनेशियात मुलाचे नाव संस्क्रुत मध्ये ठेवायचा कायदा होता. तेव्हा इंडोनेशियात जन्मलेल्या चायनीज लोक पण हरी ,विष्णू , संतोष , सुप्रिया ही नावे ठेवत असत. कालांतराने हा कायदा रद्द झाला तरीही आजुनही काही लोक आजुनही संस्क्रुत नावे ठेवतात.

मलेशिया मध्ये सुध्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकात संस्क्रुत नावे ठेवतात.

कायदा? म्हणजे सक्ती होती?>>>> मी स्वतः वाचले नाही पण सक्ती होती असे माझे काही इंडोनेशियान मित्र सांगतात.. हल्ली सक्ती नसली तरी आजुन् ही बरीच लोक संस्क्रुत नावे ठेवतात.

@रुन्मेष ,
सर्व धर्मात आढळणारी एक समान नावे असे धाग्याचे नाव होऊ शकत नाही का ?
हिंदू आणि मुस्लिम धर्मच का हवा ?

नगरवाले बिलकुल. माझे वर लेखात आलेले अनुभव या दोन धर्मातील कॉमन नावांबद्दल असल्याने. आणि या दोन धर्मात तेढ असूनही यात समान असलेल्या दुव्यांबद्दल एक आकर्षण असल्याने तसे शीर्षक आले. असो, शीर्षक बदलतो.

अमन वर्माला पहील्यांदा हम लोग मधे बघितलं होतं >>> याबद्दल माफ करा (वय झालं आता). तो आसिफ शेख होता. भरत यांनी विपुत नीट माहीती सांगितली. त्यांना धन्यवाद.

त्यात कोण होता, आठवत नाही. ती सिरियल बोअर झाली म्हणून फार बघितली नाही. हीरो आवडायचा, तो हमलोगमध्ये बडकीचा नवरा दाखवलेला, डॉक्टर होता त्यात.

मी मेक्सिकन, तसेच काही लॅटिनो लोकांत सरिता आणि इंदिरा ही नावे ऐकली आहेत. ती तिथे कशी गेली किंवा स्पॅनिश भाषेत त्याचा काही अर्थ होतो का याबद्दल जास्त माहिती नाही.

निकिता नावाची माझी मैत्रीण होती.त्याचा अर्थ "यश/ यशस्वी " म्हणून तिला सांगितल्यावर खूप खूश होती.ते रशियन नाव आहे.
सीमा हे नाव हिंदू आणि मुस्लीम या दोनही जमातीत आहे.सीमा, संस्कृत शब्द आहे.फारसी आणि संस्कृत या भाषा जवळच्या आहेत असे भाषा अभ्यासकांचे मत आहे.अर्थात उर्दूमध्ये सीमाचा काय अर्थ ठाऊक नाही.

Pages