न बोलता

Submitted by वैभव जगदाळे. on 2 October, 2021 - 16:44

मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना तीने पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. होस्टेलवर राहत असल्यामुळे येता जाता दिसायची. कपाळावर छोटासा काळा गंध. केस नेहमी बांधलेले. डाव्या बाजूने केसांची एक बट सतत गालाशी लगट करत असायची. मग ती तिच्या नाजूक करंगळीने हलकेच ती बट कानामागे सरकवायची.ती हे करत असताना ही वेळ पुढे सरकूच नये असं वाटायचं. माझ्यासह कॉलेजमधल्या कित्येक पोरांच्या काळजाचा ठोका तिने चुकवला होता. काहीही करून हिच्याशी जवळीक कशी साधता येईल याचे मार्ग शोधायला मी सुरुवात केली. तसं हे काम म्हणजे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. एकतर मला पोरी पटवण्याचं ज्ञान आणि अनुभव दोन्हीही शून्य. त्यात आपण राहायला गबाळे, बरं आपल्या अंगात न कुठली कला ना आपण अभ्यासात हुशार हे काय आपल्याला जमणार नव्हतंच. पण एकदा प्रयत्न करून बघू असं ठरवलं आणि माझ्या एका सिनियर मित्राचा सल्ला घेण्यासाठी एकदा त्याच्या रूमवर गेलो. हा मित्र म्हणजे एका वर्षात तीन तीन गर्लफ्रेंड बदलणारा, आमच्यासारख्या सिंगल पोरांना नेहमीच प्रेमाचे धडे देणारा. मी त्याला माझ्या मनातलं सांगितलं, आणि "ती मला खूप आवडते काहीतरी आयडिया दे यार" म्हणून गळ घातली.
"अरे सोपं आहे. उद्यापासून तू तिला फॉलो करायला लाग. म्हणजे काय करायचं...ती जिकडे जिकडे जाईल तिच्या मागे सावलीसारखं चिटकून राहायचं.अरे तिला अगोदर कळू तर दे की तू तिच्यावर लाईन मारतो ते.तिला एकदा ते कळलं ना की मग पुढे काय करायचं ते मी सांगतो."
मला त्याचं ऐकावंच लागणार होतं कारण या बाबतीत माझी अक्कल काहीही कामाची नव्हती.
झालं...! त्याचा हा अर्धवट सल्ला घेऊन मी मोहिमेवर निघालो. दुसऱ्या दिवशी शक्य होईल तितकं स्वतःला टापटीप आवरून बाहेर पडलो.ती हॉस्टेल मधून निघाल्यापासून  तिच्या मागे मागे निघालो.वर्ग, लायब्ररी,कँटीन ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे मी तिच्या मागे सावलीसारखा जात होतो. पण पहिल्याच दिवशी मला कळलं की तिला माझ्यासारख्या अजून तेरा सावल्या आहेत आणि यात ती कोणाचीच दखल घेत नाही.मी निराश झालो होतो.आता काय आपला निभाव लागणार नाही असं वाटायला लागलं पण इतक्या लवकर हत्यार टाकणारा मी नव्हतोच.मी माझं हे काम पुढे अविरत चालू ठेवलं.एवढ्या दिवसांत तिच्याही लक्षात ते आलं होतं पण ती कोणालाच भाव द्यायची नाही. तिला हे नेहमीचं होतं. आमच्याकडं दुर्लक्ष करून ती तिच्या कामात व्यस्त असायची. पुढे पुढे काही मुलांच्याही हे लक्षात आलं आणि हळू हळू एक एकाने माघार घ्यायला सुरुवात केली पण मी जवळ जवळ तीन महिने तिचा जोरदार पिच्छा करत होतो. आतापर्यंत तिच्या बहुतेक सगळ्या सावल्या गळून पडल्या होत्या आणि माझ्या माहितीप्रमाणे आता मी एकटाच होतो जो सतत तिच्या मागे असायचो. तसे तिचे चाहते खूप होते पण सतत मागावर असणारा मी एकटाच.
आता जवळ जवळ तीचं पाहिलं सेमिस्टर संपत आलं होतं तरीही माझा हा नित्यक्रम चालूच होता. तिही आता मला चांगलं ओळखत होती. ती कधी कधी नजर रोखून पाहायची तेव्हा माझी भीतीने गाळण उडत होती .तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत व्हायची नाही. मग मी उगाचच नजर फेरून इकडे तिकडे बघायचो.
"माझ्या मागे फिरू नकोस ते मला आवडत नाही" असंच काहीतरी तिची नजर सांगत असावी.
मधल्या काळात एका मैत्रिणीकडून कळलं की,ती माझी चौकशी करत होती. माझ्याबद्दल जवळ जवळ सगळ्याच गोष्टी तिने माहीत करून घेतल्या होत्या. तिने माझी चौकशी केली हे ऐकून  खूप बरं वाटलं. म्हणजे आपल्या एवढ्या कठोर कार्याची तिच्याकडून कुठेतरी दखल घेतली जातीय याचं समाधान लाभलं. आता बोलायची वेळ आलीये असं मला वाटायचं पण हिम्मत होत नव्हती.
या सगळ्या भानगडीत मी बरेच दिवस दांड्या मारल्या. वर्गात शिक्षकांनी माझी चौकशी केल्याचं कानावर यायचं पण मी तिकडे लक्ष देत नसायचो. एक दिवस योगायोग घडलाच. झालं असं की, तिची क्लास टेस्ट होती. सकाळी सकाळी ती तिच्या वर्गाबाहेर पॅसेजमध्ये भिंतीला पाठ लावून पुस्तक वाचण्यात गुंग होती आणि तिच्या विरुद्ध बाजूला तिच्यापासून थोडं दूर मी उभा होतो. आणि आमचे एक सर नेमकं त्याच वेळेला तिच्या डिपार्टमेंट मध्ये कशाला तरी आले होते. त्यांनी मला पाहिलं आणि मागून येऊन आवाज दिला.
"इथं काय करतोय?"
"म् म्  मी...काही नाही....निघालोच होतो लेक्चरला"
माझा आवाज फुटत नव्हता
"तू मागचे सलग चार प्रॅक्टिकल अबसेन्ट आहेस"
"ते मी जरा आजारी होतो सर..."
खोटं बोलताना माझा आत्मविश्वास धुळीला मिळतो त्यादिवशीही तसंच झालं
"खोटं बोलतोस? मी पाहतो ना तुला रोज इथं चकाट्या पिटत असतोस ते"
आता मात्र सरांचा आवाज चढला होता इतका की तिला स्पष्ट ऐकू जाईल. ती मध्येच मान वर करून आमच्याकडे पाहत  होती आणि मी मान खाली घालून ऐकत होतो. एवढा अपमान आणि तेही तिच्यासमोर मला मेल्याहून मेल्यासारखं वाटलं. सगळी इज्जत मातीमोल झाली. त्या दिवसापासून मला तिच्यासमोर जायची लाज वाटायला लागली. दुसऱ्या दिवसापासून मी तिला टाळायला सुरुवात केली. ती लांबून येताना दिसली की मी रस्ता बदलायचो. जवळपास चार दिवस मी तिला तोंड दाखवलं नाही. पण पाचव्या दिवशी ती अचानकच समोर आली मी तिच्याकडे पाहिलं.तिच्या डोळ्यात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं जाणवत होतं मला. आज तिच्या नजरेत पूर्वीसारखी कठोरता नव्हती. आज तिची नजर सौम्य वाटत होती. तिच्या नजरेत नाराजी होती, प्रश्न होता की,"तू कुठे होतास? का असा अचानक गायब झालास?" तिच्या त्या एका नजरेने माझ्यातला न्यूनगंड , संकोच कुठल्या कुठे पळाला.तुझं माझ्या मागे फिरणं मला आवडत नाही हा भाव तिच्या नजरेत त्यांनंतर मला परत कधीच दिसला नाही.
एव्हाना तिच्या आणि माझ्या मित्र मैत्रिणींना आणि अख्ख्या कॉलेजला आमचं काय चाललंय याची बातमी लागली होती. माझे बरेच मित्र "अरे आता तरी बोल बाबा शंभर टक्के होकार आहे तिचा. ती मुलगी आहे. ती बोलणार नाही तुलाच हिम्मत करावी लागेल."असं सांगायचे किंबहुना मलाही ते कळत होतं.पण मी तेवढी हिम्मत करू शकत नव्हतो.तिने साधं माझ्याकडे बघितलं तरी माझं हृदय दुप्पट वेगानं धडधड करायचं आणि तिच्यापुढे जाऊन बोलणं म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती.
असेच काही दिवस गेले. एके रविवारी आम्ही कॉलेजच्या मैदानावर क्रिकेटचा सामना भरवला होता. फिल्डिंग करत असताना झेल घेण्याच्या नादात जोरात धावत होतो. धावता धावता पायाला काहीतरी खूप जोरात टोचलं. तोल जाऊन मी जोरात खाली पडलो. फुटलेल्या काचेच्या बाटलीचा एक तुकडा पायात शिरला होता. पाय रक्तबंबाळ झाला होता. जोरात पडल्यामुळे दोन्ही गुडघ्यांना चांगलंच खरचटलं होतं. कोपरही फुटला होता. माझ्या मित्रांनी तातडीने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. पायाला आठ टाके पडले होते गुडघ्यावर आणि कोपरांवर मोठं ड्रेसिंग केलं होतं. आता पुढचे काही दिवस त्या पायावर उभं राहता येणार नव्हतं. म्हणून मला चार पाच दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. माझा नाष्टा आणि जेवणाचा डबा माझा एक मित्र आणून द्यायचा. इतर वेळी मी एकटाच पडलेलो असायचो. अशाच एका दुपारी मी खिडकीत नजर लावून बसलो होतो. अर्थातच तिचा विचार करत. सगळीकडे भयाण शांतता होती पण त्या शांततेला चिरत एक आवाज माझ्या कानांवर पडला. पैंजनांचा आवाज! आणि मी ओळखलं ही तिचीच पैंजण आहेत. तिच्या मागे फिरता फिरता तिच्या पैंजनांचा आवाजही मला पाठ झाला होता.  म्हणजे ती आलीये?? मला भेटायला आलीये??? माझा विश्वासच बसेना. मी दाराकडे पाहिलं ती उभी होती. तिच्या उजव्या हातात एक छोटी पिशवी होती. त्यात तिने काही फळं आणली होती माझ्यासाठी. ती हळू हळू चालत माझ्या  जवळ आली. हातातली पिशवी माझ्या जवळच्या स्टुलवर ठेवताना तिच्या बांगड्यांचा सुमधुर आवाज झाला. आता ती माझ्या अगदी जवळ उभी होती. माझ्या वेदना गायब झाल्या होत्या, माझ्या अंगावर काटा आला होता, मला काहीच सुचत नव्हतं, माझी धडधड वाढली होती, माझे हात थरथरत होते, माझ्या घशाला कोरड पडली होती, मला जवळ जवळ घाम फुटला होता. मी हिम्मत करून तिच्याकडं पाहिलं. तिची नजर माझ्यावर होती. माझ्या जखमा ती पाहत होती नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्या दिवशी प्रेम, काळजी, दुःख, नाराजी,आपुलकी अशा सगळ्याच भावना मला तिच्या डोळ्यांत दिसल्या.तिच्या अश्रूंचा एक थेंब हळूच  गालावरून घरंगळत माझ्या हातावर पडला. मला भरून आलं. पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिच्या डोळ्यांत पाहत पाहिलं. अजूनही आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नव्हतो. पण आज सगळीच कोडी सुटली होती आणि तीही कायमची.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !