माद्रिदचा पालासिओ रेआल

Submitted by पराग१२२६३ on 2 October, 2021 - 00:45

800px-Palacio_Real_y_Jardines_de_Sabatini_(3522631319) (1)_0.jpg

रॉयल पॅलेस (स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला आहे. हा राजवाडा ‘पालासिओ दे ओरिएन्ते’ या नावानेही ओळखला जातो. स्पॅनिश राजांचे हे अधिकृत निवासस्थान असल्यामुळे स्पेनमध्ये या वास्तुला अतिशय मानाचे स्थान लाभले. या नव्या राजवाड्याचे बांधकाम १७३८ ते १७६४ दरम्यान चालले. या वास्तूत स्पॅनिश राजाचे वास्तव्य असल्यामुळे तो पुढे रॉयल पॅलेस (पालासिओ रेआल) म्हणून ओळखला जाऊ लागला.

या तीन मजली आयताकृती राजवाड्यामध्ये तब्बल २८०० आलिशान कक्ष, ४४ आकर्षक जिने आहेत. यातील प्रत्येक कक्षामध्ये उच्च दर्जाची वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे. सालोन दे लोस आलाबार्देलोस, स्तंभ कक्ष (स्पॅनिश भाषेतील नाव- सालोन दे लास कोलुमनास), सिंहासन कक्ष (साला देल त्रानो), गॅस्परिनी कक्ष (सालितास गास्पारिनी), पोर्सेलन कक्ष (साला दे पोर्सेलानास) आदी कक्ष आहेत. तसेच राजघराण्यातील व्यक्तींना आणि सरदारांना राहण्यासाठी कक्ष, सेवकांचे कक्ष, प्रशासकीय कार्यालय आही कक्षही येथे आहेत.

स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये वसलेला ‘पालासिओ रेआल’ (रॉयल पॅलेस) स्पॅनिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होते. जगातील अतिभव्य राजवाड्यांपैकी एक असलेला हा राजवाडा खुला होऊन २०२१ मध्ये २६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या राजवाड्यात तब्बल २८०० प्रशस्त कक्ष आहेत. सध्या या राजवाड्यात स्पॅनिश राजांचे वास्तव्य नसले तरी त्याचा वापर प्रामुख्याने राजकीय समारंभासाठी होत आहे.

रॉयल पॅलेस (स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला आहे. हा राजवाडा ‘पालासिओ दे ओरिएन्ते’ या नावानेही ओळखला जातो. स्पॅनिश राजांचे हे अधिकृत निवासस्थान असल्यामुळे स्पेनमध्ये या वास्तुला अतिशय मानाचे स्थान लाभले. सन १९३१ पर्यंत याच राजवाड्यात स्पॅनिश राजघराण्याचे वास्तव्य होते. त्यानंतर स्पॅनिश राजांनी आपला मुक्काम माद्रिदच्या बाहेर असलेल्या ‘पालासिओ रेआल’पेक्षा छोट्या ‘पालासिओ दे ला झार्झुएला’मध्ये हलविला.

‘पालासिओ रेआल’ उभारला जाण्याआधी तेथे ‘रेआल आल्काझार’ म्हणजेच भुईकोट अस्तित्वात होता. पण त्या आधीपासून ही जागा स्पेनमधील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राहिली होती. या जागेवर दहाव्या शतकात एक भुईकोट बांधण्यात आला होता. त्यावेळी इबेरियन द्वीपकल्पाचा बहुतांश भाग अरब राजवटींच्या अधिपत्त्याखाली होता. कोर्डोबाचा अमीर महंमद (पहिला) याने आपली स्पेनमध्ये सत्ता स्थापन केल्यावर हा किल्ला बांधला होता. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथे स्वतंत्र तोलेदो राज्याची निर्मिती करण्यात आली. पुढे १०८५ मध्ये कास्तिले राज्याच्या आलोन्सो (चौथा) याने तोलेदोवर ताबा मिळविला. चौदाव्या शतकात अरबांचा पराभव झाल्यावर सन १३२९ मध्ये स्पॅनिश राजा आल्फान्सो (अकरावा) याने त्याचा दरबार माद्रिदमध्ये भरविला. त्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत त्या किल्ल्यातील आरेखनामध्ये बदल करण्यात आले नाहीत.

ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो आदींनी धाडसी सागरी मोहिमा राबवून नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला होता. परिणामी त्या काळात ज्ञात झालेल्या जगापैकी निम्म्या प्रदेशावर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे राज्यकारभाराचा वाढलेला व्याप सांभाळण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी राजधानी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. १५६१ मध्ये स्पेनचा राजा फिलीप (दुसरा) याने आपला दरबार माद्रिदमध्ये आणल्यावर आल्काझारच्या जागी नव्याने किल्ला उभारण्यात आला. मात्र १७३४ मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हा संपूर्ण किल्ला आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यामुळे तत्कालीन राजा फिलीप (पाचवा) याने याच जागेवर एक नवा आणि स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाला साजेसा राजवाडा उभारण्याचे आदेश दिले.

या तीन मजली आयताकृती राजवाड्यामध्ये तब्बल २८०० आलिशान कक्ष, ४४ आकर्षक जिने आहेत. यातील प्रत्येक कक्षामध्ये उच्च दर्जाची वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे. सालोन दे लोस आलाबार्देलोस, स्तंभ कक्ष (स्पॅनिश भाषेतील नाव- सालोन दे लास कोलुमनास), सिंहासन कक्ष (साला देल त्रानो), गॅस्परिनी कक्ष (सालितास गास्पारिनी), पोर्सेलन कक्ष (साला दे पोर्सेलानास) आदी कक्ष आहेत. तसेच राजघराण्यातील व्यक्तींना आणि सरदारांना राहण्यासाठी कक्ष, सेवकांचे कक्ष, प्रशासकीय कार्यालय आही कक्षही येथे आहेत.

‘पालासिओ रेआल’च्या प्रत्येक दिशेचे आरेखन वेगळ्या प्रकारचे आहे. राजवाड्याच्या बांधकामात चुनखडक आणि ग्रॅनाईटचा वापर बऱ्याच प्रमाणात करण्यात आला आहे. राजवाड्याच्या पूर्वेकडील भाग सहा मजली असून उत्तर आणि पश्चिमेकडे तळघरेही बांधलेली आहेत. राजवाड्याच्या पहिल्या दोन मजल्यांच्या भिंतींचा बाह्यभाग आयताकृती दगडांच्या मोठ्या आकारातील ठोकळ्यांपासून बनविलेला आहे. त्यावरील दोन मजल्यांवर पांढऱ्या रंगातील अखंड दुमजली स्तंभ तयार करण्यात आले आहेत.

राजवाड्याच्या दक्षिणेकडील बाजूच्या आल्मुदेना कॅथेड्रलसमोर असलेल्या भव्य संचलन प्रांगण असून त्याच्या समोर उंच कुंपण बसविलेले आहे. राजा चार्लस् (तिसरा) याच्या काळात ‘पालासिओ रेआल’मध्ये काही आकर्षक कक्ष तयार करण्यात आले. त्यात राजाकडे आलेल्या विशेष पाहुण्यांसाठी २५२ कक्ष, राजघराण्याची बॉलरुम, स्वागतकक्ष, संगीतकक्ष आदींचा समावेश होतो. ‘पालासिओ रेआल’मध्येच राजघराण्यातील व्यक्तींसाठी ‘बॅसिलिका’ (राजाचे चर्च) उभारण्यात आले आहे. 'ला रेआल आर्मेरिया' (शस्त्रास्त्र कक्ष) येथे राजांकडून वापरली गेलेली शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहे.

राजवाड्यातील तीन कक्षांचे एकत्रीकरण करून १८८५ मध्ये अवाढव्य भोजनकक्ष तयार करण्यात आला. या कक्षाच्या छतावर अप्रतिम चित्रे रंगविण्यात आली आहेत. गास्पारिनी कक्षाला त्याची निर्मिती करणाऱ्या मातेओ गास्पारिनी याचे नाव देण्यात आले आहे. या कक्षाच्या भिंती आणि छतावर सोनेरी आणि चंदेरी रंगांमध्ये कलाकुसर केलेली आहे. येथील भिंती रेशमी एम्ब्रॉयडरीने सजविलेल्या आहेत. याची सजावट गिओवानी बातिस्ता तिपोलो याने केलेली आहे. या कक्षाच्या भिंतीवर सजावटीसाठी मखमलीचा वापर करण्यात आला आहे.

सुमारे १३ हेक्टर परिसरात पसरलेला हा राजवाडा अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. हा संपूर्ण परिसर स्पॅनिश राजघराण्याचे आलिशान राहणीमान आणि स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे. मान्झानारेस नदीच्या किनारी वसलेला ‘पालसिओ रेआल’ आज माद्रिदला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.

सविस्लेतर खाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_2.html?m=1

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users