संजीव गुरूनाईक - भाग ३- जान्हवी

Submitted by विजयश्रीनन्दन on 29 September, 2021 - 09:57

सकाळचं जॉगिंग, प्राणायाम, आन्हिक, नाश्ता उरकला होता. वेळ सकाळचे ९:३० झालेले.

आज मंगळवार. आठवडे बाजार भरण्याचा दिवस. मिलिटरीत मेस सेक्रेटरी असल्यापासून सवय लागली, आठवडा भराची भाजी, फळे एकदाच आणायची. आई नेहमी म्हणायची "जितकं लागेल, जसं लागेल तसं आणत जा. एकदम सगळं आणू नको". पण सवय ती सवयच. नाही मोडली.

घराच गेट बंद केलं. ब्राऊनी ला आवाज दिला. आणि बाजाराकडे निघालो. पायीच जायच हा पण अलिखित नियम होता.

दुधी, दोडकी, कार्ली, कांदे अस करत करत खरेदी झाली. रिक्षा स्टॅंड वर चहा प्यायचा आणि घराकडे निघायचा नेहमीचा शिरस्ता.

चहा घेतला, मागं फिरलो आणि घात झाला......ओझरती झलक फक्त.... रिक्षामध्ये ते डोळे दिसले....चित्पावनी तांबूस घारे डोळे.. एका क्षणात ३० वर्षे मागे गेलो...

चित्पावनी अंगकांती, पाणीदार तांबूस घारे डोळे, सुंदर हसरा चेहरा, नाव पण मोहक जान्हवी नाईक.

शाळेतील सख्ख्या बहिणी बरोबर बोलायला घाबरणारा मी तिच्याबरोबर कसा बोलेन.. पण ती आवडली होती. ती आणि मी अकरावी सायन्स ला. मी बायोलॉजी सोडलेलं तीने बायोलॉजी घेतलेलं. वर्ग वेगवेगळे.

मग उगाचच तिच्या वर्गासमोर चकरा मारायच्या. तिला एकदा बघितलं तरी दिवस चांगला जाईल असा विचार करायचा, मोह टाळता न आल्याने परत परत चकरा मारायच्या...

रोज सकाळी ठरवायचं की आज तिच्याबरोबर बोलेन, पण तिनं बघितलं तरी तसचं माग फिरून धूम ठोकायची..

लायब्ररी मध्ये बसून तासंतास बसून विचार करायचो की, ही ब्राह्मणकन्या "बेडकाचं Dissection" करताना झी हॉरर् शो च्या अर्चना पूरण सिंग सारखी हसत असेल की त्या बेडकाचं त्रास जाणून अलका कुबल सारखी रडत असेल.

संध्याकाळी सुरभी च्या रेणुका शहाणे सारखं जमिनीवर बसून अभ्यास करत असेल की पूजा भट्ट सारखी दंगा घालत असेल.

तिला घरी काय बोलावत असतील, परी, जानू, पिंकी, ताई की अजून काही. तिला इतर कोणी जानू म्हणत असेल हा विचारच जीवघेणा होता. तिच्या घरच्यांनी तिचं नाव दुसरं ठेवलं असतं तर ते काय असतं.

तिचा गोरा चेहरा, बॉबकट केस, काळ्या फ्रेमचा चष्मा, घारे डोळे, ती सडपातळ तर नक्कीच नव्हती. एकंदरीत, चित्पावनांची सुंदर ब्राह्मण कन्या होती ती. नऊ वारी साडी मध्ये कशी दिसेल याची चित्रे पण रेखाटली होती..

शेवटी एक दिवस धीर गोळा गेला आणि तिच्या जवळ गेलो. तिला थोडसं दुरूनच आवाज दिला "जान्हवी, थोडा वेळ आहे? बोलायचं होतं" ती हसली. जीव भांड्यात पडला. आणि...

जोरात खेकसल्याचा आवाज आला "ओ बाबा, रस्ता के मधोमध उभे रहके मरणेका है क्या तुमको? जरा बाजू मे थांबो ना.. अभी मेरी गाडी की तुमको धडक लगती ना..."

आजू बाजूचे हसत होते. भूतकाळातून वर्तमानात आलो. ॲक्टिव्हा चालवणारी बाई मलाच ओरडत होती. भाजीच्या पिशव्या घेऊन माझ्याच तंद्री मध्ये घराकडे चालत होतो आणि रस्त्याच्या मध्ये आलो होतो.

चालत चालत गेट जवळ आलो. फाटका शेजारी कंपाऊंड ला पाटी झळकत होती. "संजीव गुरूनाईक." ब्राऊनी गुरगुरला. दार उघडून घरात आलो. मागे ब्राऊनी होता..
.
.
.
.
.
.
विजयश्रीनंदन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान. वाचतो आहे.
फक्त इतके छोटे भाग टाकु नका आणि प्रत्येक भागाला क्रमांक द्या म्हणजे वाचकांना सलग वाचता येईल.

छान