संजीव गुरूनाईक - भाग - २ - शतपावली... -

Submitted by विजयश्रीनन्दन on 29 September, 2021 - 09:54

आज रविवार. मग उद्या सकाळी पळणे नाही. रनर्स चा सोमवार हा विश्रांती दिवस. कोणी, कधी, का ठरवलं माहीत नाही आणि कधी त्यावर विचार करावा असा विचार सुद्धा जवळपास फिरकला नाही. पण हा नियम कित्येक वर्ष पाळत आलोय..

तर, उद्या निवांत. म्हणजे आज उशिरा झोपता येईल. आजची कामे उद्या केली तरी चालतील.

डिनर उरकलं. दार लोटलं आणि समुद्राकडे पावले वळली. आज पौर्णिमा. घरामागील टेकडी आडून पूर्ण चंद्रबिंब डोकावत होते. चालता चालता दूर पर्यंत आलो होतो. ओल्या वाळूत उमटणारी पाऊलखुणांना भरतीच्या लाटा पुसत होत्या. मधूनच वाळूतून पांढरे खेकडे डोकावत होते.

फेसाळणार्या लाटांनी माग पुसून काढला होता. माझ्या आयुष्याचा मोठा कालखंड पण असाच पुसला गेला होता. कारगिलच युद्ध, पूर्वेच्या राज्यात झालेली मोहीम, ती रणधुमाळी. बर्फाळ भागात सहा महिने आंघोळी शिवाय राहणे.. ती मजा काही औरच होती.

त्या सगळ्यात घर फुटलं, एकटा पडलो, नातेवाईक, मित्र, जवळचे सगळे मला कधीच विसरून गेलेले. अर्धांगिनी तिच्याबरोबर मुलाला घेऊन माहेरी गेलेली कधी परत आलीच नाही. मी पण दोन एक वर्षांनंतर विचारणं सोडून दिलेलं.

रिटायरमेंट घेऊन परत आलो. समुद्र किनारी सी-फेसिंग घर घेतलं आणि आलो इथं. पण काही वेळा आजही दचकून झोपेतून उठतो. कानाजवळून गोळी गेल्याचा भास होतो. त्रिपठिची शेवटची किंकाळी ऐकू येते....अचानक....अगदीच अचानक पायाला खडा टोचला. जाणवलं खूपच दूर आलोय

खरचं आता खूपच दूर आलोय. सगळ्यांपासून आणि घरापासून पण. मागं फिरलो.

चंद्रप्रकाशात माझं घर दिसत होतं, टेकडीच्या पायथ्याशी. काही वेळा मला माझं घर ब्रॅन कॅसल असल्यासारखं वाटतं आणि मी त्याच्यातला काऊंट ड्रॅक्युला. एकाकी पण सदैव आनंदात असणारा, गरज पडेल तेव्हाच बाहेर पडणारा आणि समाजात मिसळणारा ड्रॅक्युला.

मकर राशीत डोकावणारा आकाशातील रजनीश दहा वाजल्याचे सांगत होता. कंपाऊंड जवळ येताच ब्राऊनी लाडिवाळपणे गुरगुरला. त्याला ही सवय झालेली, रविवार रात्री हा मालक एकटाच फिरणार.

गेट बंद करून पोर्च ची लाईट लावत दार बंद केलं....
.
.
.
.
.
विजयश्रीनंदन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच मोठे भाग आहेत. एका बैठकीत एवढे वाचायला कष्ट पडतात.
४-५ ओळींचे थोडे लहान भाग टाकलेत तर वाचायला नक्कीच सोपे जाईल.

फारच मोठे भाग आहेत. एका बैठकीत एवढे वाचायला कष्ट पडतात.
४-५ ओळींचे थोडे लहान भाग टाकलेत तर वाचायला नक्कीच सोपे जाईल.>>>>सहमत

chan