संजीव गुरूनाईक - भाग - १ - एक संध्याकाळ

Submitted by विजयश्रीनन्दन on 29 September, 2021 - 09:46

सी फेसिंग घराच्या गच्चीवर चहा पिण्याची मजा काही औरच...

संध्याकाळी टेरेस वर चहा घेऊन बसलो होतो. समोर नारळांच्या झाडामधून समुद्रात बुडणार्या सहस्त्ररश्मी ला न्याहाळत होतो. दिवाकराला सामावून घेताना रत्नाकराचा आनंद उफाळणार्या लाटांमधून व्यक्त होत होता....

दिवाभितांचे राज्य सुरू होणार म्हणून त्यांचे आनंदाचे चित्कार कानी पडत होते. तर दिवसभर भटकून घराकडे जाणार्या पक्ष्यांची लगबग सुरू होती....

मावळतीला पाण्यावर येऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेणारे मासे आणि त्यांची वाट बघत घिरट्या घालणारे पाणकावळे दिसत होते. मधूनच सोनेरी सूर्यप्रकाशात पांढरी मान आणि लाल पंख पसरवून समुद्री गरूड सूर मारत होते...

बंगला शहरापासून दूर असल्याने वर्दळ नसायची. पण तरूणाईचे गीत गात, भविष्याची स्वप्ने रंगवित, होऊ घातलेल्या जोडीदाराच्या खांद्यावर निश्चिंतपणे डोके टेकवलेली रमणी आणि सूर्याकडे बघत शांत बघणारा युवक हे दृश्य असायचे...

तेव्हा पण एकमेकांच्या बोटांमध्ये बोटे गुंतवून एक जोडपे दिसत होते.. मन म्हणाले "व्वा!!! क्या बात है"

दिनकराने निरोप घेतला. त्याच्या विरहाने नभ आरक्त दिसू लागले. चित्कार करत वटवाघळे गावाच्या दिशेने उडू लागली. असे वाटत होते जणू रोमन सैनिकांनी किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी कूच केली..

घड्याळ गरजले. मधूर स्वरात सात वाजल्याची जाणीव करून दिली. रात्रीचा स्वयंपाक आणि उदरभरण यांच्या विचारात चहाचा पेला उचलून स्वयंपाक घराकडे पावले वळली. नकळत गच्चीचे दार बंद केले. वीसेक वर्षांच्या सवयीने आता तेही नकळत झाले..
.
.
.
.
.
.
विजयश्रीनंदन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults