वास्तवाची ठेच

Submitted by SharmilaR on 28 September, 2021 - 00:54

वास्तवाची ठेच

आज ठरवलंच आहे, मन मोकळं करायचंच. कागदावरच. समोरासमोर तुझ्याजवळ नाही. कारण तुलाही माहित आहे, आता तसं होणं अवघड आहे, तुलाही अन मलाही.
आपण एकेकाळच्या घट्ट मैत्रिणी. पण आता दोन ध्रुवावर दोघे आपण .... च्या अवस्थेत आहोत. मी तुझ्या कविता जेवढ्या समजून घेतल्या, तेवढं तुला समजून घेणं नाही जमलं मला. किंबहुना मला वाटायचं, तू व्यक्त होतेयस ना कवितेतून, मग आता भावना अन व्यवहार याची गल्लत नको करुस. ठरवून आयुष्य अवघड नको करुन घेऊस. जरा उघड्या नजरेनं जगाकडे बघ. पण तूच लिहिल्याप्रमाणे,

हर एक पावलावर लागतेच आहे वास्तवाची ठेच|
तरी डोळे मिटून चालण्याचं वेड अजून गेलंच नाही||

तुला नाही माझं म्हणणं पटलं. आणि तरीही तुला माझं अँप्रुवल हवं होतं, जे देणं मला नाही जमलं .
कॉलेजच्याहि आधीपासूनची आपली मैत्री. कॉलेज मध्ये जास्तच जवळ आलो. अभ्यासाच्या नावडीने अन कवितेच्या आवडीने आपल्याला बांधलं होतं. तू भरभरून लिहायचीस अन मी तुझा प्रत्येक शब्द मनात साठवायचे. पण तू ठरवून प्रेमाचा शोध घेत होतीस तो मला मान्य नव्हता.

अपुरी माझी स्वप्ने , अपुरी प्रीतीची आस|
वाट पाहून तुझी डोळे माझे उदास||
तुझीच आहे प्रतीक्षा अन तूच विश्वास|
तुझ्यावरच आहे निर्भर माझा श्वासोश्वास ||

हि तुझी अवस्था. तुला सतत वाटायचं, घरून तुला कधी प्रेम, कौतुक नाही मिळत. सतत मोठ्या बहिणीशी तुझी तुलना व्हायची अन प्रत्येक गोष्टीत तीच सरस असायची. तिच्या पावलावर पाऊल ठेऊन चालण्याची घराची अपेक्षा, अन म्हणूनच मग वेगळं असण्याची तुझी धडपड , खरतर हट्टीपणा, तुला घरापासून खूपच दूर नेत होता.

तशीच वेळ आली तर
काटेही धरावे हाती|
कोमेजू देऊ नये मात्र
पुष्पे नाजूक प्रीतीची||

असं म्हणत तू जणू काट्यांच्याच शोधात होतीस.

या हट्टीपणाने तू पदवी शिक्षण अर्धवट सोडून चित्रकला महाविद्यालयात डिप्लोमा ला प्रवेश घेतलास अन आपले शिक्षणाचे मार्ग वेगळे झाले. तरीही रविवारी, सुट्टीच्या दिवशी आपण भेटत होतो. अशाच भेटींमध्ये तू तुझं गुपित उघडं केलं . तुझ्याच कॉलेज मध्ये भेटलेला तो. माझी प्रतिक्रिया फारशी उत्साहाची नव्हती. (मी केअरटेकर च्या भूमिकेत होते?) . तू भरभरून बोलायचीस. एकदा मला त्याला भेटायचा आग्रहच धरला, मी काहीतरी कारण काढून टाळलं.

दोन दिवसांनी तू अचानक त्याला घेऊन तू माझ्या कॉलेज ला हजर.

"हा अशोक." तू ओळख करून दिलीस.
उंच....किडकिडीत....अन चेहऱ्यावर फारसे भाव नसलेला. (म्हणजे माझं आतलं मनं चुकीच नव्हतं तर! मी बरोबर असल्याचं एवढं दुःख कधीच नव्हतं झालं.) त्याच्या घरचे त्याला नक्की "असोक " म्हणत असावेत, माझ्या मनात आलं. चेहऱ्यावरून पूर्ण माणूस कळत नसेल कदाचित, पण चेहरा मनाचा आरसा असतो ना गं ! मला कळत नव्हतं तुला तो का आवडला?

तुझेच शब्द तुला ऐकवावेसे वाटले,

वास्तवात ये सखे, स्वप्नात तू रमू नकोस ||

बरं झालं, तू कॉलेजला माझ्या घाईच्या वेळेत आलीस. मला सटकण्याच निमित्त मिळालं .
अर्थातच तुला माझ्या चेहऱ्यावर अँप्रुवल दिसलं नाही. (म्हणजे चेहरे वाचण्याचं कसब तुझ्यात आहे तर! माझा उपरोध कळायच्या पलीकडे तू होतीस. ) तुझ्या नंतरच्या भेटीत हाच मुद्दा असायचा. आता त्याची पार्श्वभूमीही कळत गेली. दूरच्या खेड्यावर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणारे आई आणि आजोबा. वडील लहानपणीच गेलेले. तो पण दहावी नंतर काही वर्षे मजुरीचं काम करायचा. कुठूनतरी कळलं, कलामहाविद्यालयात डिप्लोमा केला की शाळेत लगेच नौकरी मिळते. मग राखीव जागेवर प्रवेश मिळाला अन आता कसाबसा डिप्लोमा पूर्ण करण्याची वाट बघतोय. तुला कसं कळत नव्हतं तू ज्याच्या शोधात होतीस ते हे नाही. कदाचित असलीच तर सहानभूती होती फक्त. त्याच्या सोबत राहून तुला ज्या आयुष्यभर गृहीत धरल्या त्या बेसिक सुविधाही मिळणार नव्हत्या. तुझी कविताही होरपळणार होती. प्रेमबीम तर दूरच.
आतापर्यंत तुझ्या घरीही कुणकुण लागली होती. त्यांचा अर्थातच सक्त विरोध होता. आम्ही सगळे एका पारड्यात गेलो. तुझ्यावरची बंधने जरा कडक झाली. कॉलेजच्या वेळा आणि मला भेटणं एवढ्यालाच फक्त परवानगी होती.
माझं शिक्षण संपवून, तिथला बाडबिस्तरा गुंडाळून मी शहर सोडायला निघाले. तू मला शेवटचा निरोप द्यायला स्टेशनवर आलीस. तुला किमान माझं अँप्रुवल हवं होतं. मी तुला समजावयाचा प्रयत्न करत होते. तुझा हट्टी स्वभाव माहित असल्यामुळे शेवटी मी म्हटलं,
"किमान एक काम कर, अजून दोन-तीन वर्ष लग्न नको करुस. आधी नीट सेटल हो. "
"नाही थांबू शकत."
"का?" मला आशा होती, दोन-तीन वर्षात तू उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकशील. मुख्य म्हणजे प्रेम आणि वास्तव यातला फरक कळेल.
"आय एम प्रेग्नन्ट." काही वेळेस इंग्रजिच मदतीला धावून येतं .
तुझ्या वाक्याचा अर्थ डोक्यात जाईपर्यंत गाडी सुटली.
आठ दिवसांनी तुझं पत्रं आलं.-
" मी स्टेशनवर तुझ्याशी खोटं बोलले. काहीही करून निदान तू तरी 'हो' म्हणावं असं वाटत होतं ....... मी काल लग्न केलंय अशोकशी. घरातून अर्थातच पळून आले. आत्ता तरी माझा पत्ता नाही देता येत.... "
मध्ये बरीच वर्षे गेली. पुलावरुन बरंच पाणी गेलं होतं . आता माझं माहेर तुझ्या माहेरा जवळ राहायला आलं. (तुला कुठे होतं माहेर ? घराने तुझ्याशी संबंध तोडले होते तेव्हाच....)
एकदा मी चार दिवासांच्या मुक्कामी माहेरी आले. दुपारी आरामात लोळतेय तर तुझी आई भेटायला आली.
"माझं एक काम करशील?" सुरवातीच्या जरा जुजबी चौकशा झाल्यावर त्यांनी विचारलं.
"सांगा न काकू? मी परकी आहे का?"
"नाही ग... म्हणून तर आलेय तू आल्याचं कळल्याबरोबर. मला माहित आहे तू कित्ती प्रयत्न केलेस तिला सावरण्याचे....."
"हं ....."
"एकदा तिचं पत्रं आलं होतं. नेमकं माझ्या हातात पडलं म्हणून वाचता तरी आलं..... तुला तर माहित आहे मी तिच्याकडे गेलेलं घरात नाही चालणार. ती कशी आहे, हे एकदा तरी बघावंसं वाटतंय. तू जाऊन बघून येशील? हा तिचा पत्ता."
"जाईन मी उद्याच. "

दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर लगेच निघाले. आधी मानसी कडे जायचं होत. कित्ती दिवसांपासून म्हणत होती, इथे आलीस की आधी मला भेट. मानसी माझी लग्नानंतरची मैत्रीण. तिच्या लग्नानंतर इथे सेटल झालेली. म्हटलं घराबाहेर पडतेच आहे तर आज दिवसभरात दोघींनाही भेटेन. मानसीला सरप्राईज द्यायचं होतं .

तुम्हा दोघींची घरं अगदी दोन टोकांना. आधी मानसिकडे जायचं ठरवलं. भरदुपारी तिच्या बंगल्यासमोर गाडी पार्क केली तेव्हा नजरेत भरलं ते बंगल्यासमोरचं हिरवागार लॉन. कडेनं सुरेख फुलझाडं लावली होती. कसली फुलंली होती बाग! मानसी मुळात हौशीच. प्रत्येक गोष्ट नेटकेपणाने करणारी. फाटकाच्या आवाजाने स्वतः मानसीच बाहेर आली. तिच्या आश्चर्य अन आनंदाला उधाण आलं. माझ्या सरप्राईजच सार्थक झालं !! किती बोलू नि किती नको असं झालं होतं तिला. एकीकडे चहापाणी विचारत उत्साहानं घर दाखवत होती.
"ही माझी क्लास ची खोली. सध्या एकच दहावीची बॅच घेते सकाळची. दिवसभर घरातलं पुरतं मग. सतत येणारा - जाणारा अन चहापाणी चालू असतं ". मानसीचे सासू-सासरे एका मोठ्या राजकीय पक्षाचं काम बघायचे.
"तू काय तबला पण शिकवते का?" तिथे असलेले तबला - डग्ग्याचे सेट बघून मी विचारलं.
"ते काम श्री चं. रोज वेळ मिळत नाही मग तो रविवारी तबल्याचे क्लास घेऊन हौस भागवतो." हसत मानसी म्हणाली. श्री, मानसीचा नवरा इंजिनिअर होता.
गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. गप्पा अन खाण्याने पोट तुडुंब भरलं होतं. मानसीचं ओसंडणारं सुखं बघून मन अगदी तृप्त झालं होतं . संध्याकाळ व्हायला आली होती.
"मी निघते ग आता. अजून मला एका ठिकाणी जायचंय. " तिचा रात्रीच्या जेवणाचा आग्रह तोडून मी निघाले.

तुझ्या घराचं टोक गाठता- गाठता अंधारून आलं होत. या भागात पहिल्यांदाच येत होते. जरा आधीच निघायला हवं होतं, घर सापडायला सोपं गेलं असतं .
अरुंद बोळाच्या तोंडाशीच गाडी लावली. आणखी आत नेणं शक्यच नव्हतं. सांडपाण्याचे ओहोळ वाहत होते. मानसीकडून निघतांना झालेला आनंद अन तृप्ती केव्हाच वाहून गेली होती. हातात पत्ता घेऊन विचारत- विचारत निघाले. पत्ता विचारतांनाच फक्त तोंडावरचा रुमाल निघत होता. सापडलं एकदाचं घरं. भिंतींना फळ्यांचा टेकू दिला होता. दाराची फळी अर्धवट लोटलेली होती. बाहेर कुणीच नव्हतं. मी डोकावून बघितलं. दोनखणी घर होतं. भिंतीजवळ चारसहा पेंटिंग्स होती. जवळच रंगाचे ब्रश सुकवायला ठेवले होते. मी कडी वाजवली. आतून एक म्हातारा काठी टेकवत चाचपडत दाराजवळ आला. मी तुझी चौकशी केली.

"आताच कलास संपला . भायेर गेलेती . कवा येतील म्हाईत नाई ". काय काम वैगेरे विचारायच्या भानगडीत तो पडला नाही.
घरंच तुझी परिस्थिती सांगत होतं. पण तुझ्या आईला तुला भेटायचं होतं .मी पर्स मधून कागद पेन काढला . माझ नाव पत्ता लिहिला. अन शक्य असेल तर एकदोन दिवसात येऊ शकशील का विचारलं.

दोन दिवसांनी तू आलीस. एकटी नाही. शेजारणीला घेऊन. तुला आता मला किंवा आईला एकटं भेटायचंच नव्हतं . मुलीला घरी ठेवल्याचं कारण सांगून पटकन निघायचंही होतं. मी तुझ्या आईला बोलावून घेतलं. आमच्याशी बोलतांना तुला शेजारणीची ढाल होतीच. सगळं टाळायचा प्रयत्न दिसून येत होता......

कुंतीसारखं आयुष्यभराचं दुःख तू मागून घेतलं होतस. तूच खूप आधीच लिहून ठेवलं होतंस ,

निसरड्या जमिनीवर
तोल सावरण्याची सवय झाली|
धगधगत्या निखार्यांना
ओंजळीत धरण्याची सवय झाली||
असेल कुणाच्या दारी
रिमझिमती बरसात
कोसळत्या आसवांना
आपलं म्हणायची सवय झाली ||
*********

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शर्मिला, छान मांडलीय व्यथा,
आपल्या आजूबाजूला अश्या स्वप्नाळू पोळलेल्या मुली दिसतातच..
90's मध्ये हिरोईन बनायचं म्हणून घर सोडून पळून आलेल्या मुली, त्यांचा struggle, हे खूपच कॉमन होतं.. विचारशक्ती गहाण पडते बहुतेक तेव्हा

कथा म्हणून मस्तच. पण आवडली म्हणणार नाही. शालेय मैत्रिणीची सेम कथा होती. आता कॉन्टॅक्ट मध्ये नाही. पण फार जवळून पाहिली आहे सियुएशन.

कथा म्हणून मस्तच. पण आवडली म्हणणार नाही. शालेय मैत्रिणीची सेम कथा होती. >>
बरोबर आहे. मैत्रीण आठवली की खूप त्रास होतो. माझी कथा पण त्या त्रासातूनच जन्माला आलीय.