नाच रे मोरा!

Submitted by मेधाविनी घरत on 27 September, 2021 - 19:42

मनू घुश्यात पावले टाकत घरी निघाली होती. रागाने लाल झालेल्या तिच्या गोबऱ्या गालावर डोळ्यातले गरम अश्रू ओघळत होते. नकट्या नाकावराचा तिचा चष्मा अश्रूंनी ओलसर झालेल्या गालावरून सारखा खाली घसरत होता. तो एका हाताने सावरत,कधी गणवेशाच्या बाहीने गाल पुसत आणि दप्तराचे ओझे पाठीवर वागवत मनू रस्त्याने चालली होती.

"कित्ती वाईट्ट आहेत जाधव बाई!!! ती प्रियांका, अदिती, मयुरी , हर्षदा, पल्लवी, प्रणिता , भक्ती, दर्शनी सगळ्या सगळ्या खूप खूप दुष्ट आहेत!!!"

"असं कसं मला काढून टाकलं? मी १६ दिवस प्रॅक्टिस केली होती सगळ्यांसोबत. मम्मी नको म्हणत होती, चिडचिड करत होती तरी रोज इतक्या दूर प्रियांकाच्या घरी जाऊन सगळ्यांबरोबर तालीम केली होती."

" मला काढून टाकताना जरासुद्धा विचार केला नाही त्यांनी!! मी त्यांच्या ग्रुप मधली नाही ना!! मयुरी तर आज आली गावाहून. तिने इतके दिवस तोंडसुद्धा दाखवलं नाही. पण ती त्यांची मैत्रीण आहे ना. मला काढून लगेच तिला घेऊन टाकलं. तिला तर स्टेप्स सुद्धा माहीत नाहीत. जाधव बाईंनी सुद्धा त्या सगळ्यांचं ऐकलं. काय तर म्हणे, " आपल्या वर्गाचा डान्स आहे. सगळं छान दिसलं पाहिजे. कोणाला काढलं तर रडायचं नाही लहान बाळासारखं ! "

" उगाच मोठ्ठं भाषण दिलं. आणि मग म्हणाल्या, "मानसी शिंदे, तुला चष्मा आहे ना?? तुला चष्मा नाही सांभाळता येणार नाचताना. आणि चानिया चोलिवर चष्मा नाही चांगला दिसणार स्टेजवर. आपण असा करू मयुरीला घेऊ नाचात, काय मत आहे बाकी सगळ्या मुलींचं???"

मग काय, बाकी सगळ्या त्यांनाच सामील. सगळ्यांनी मयुरीसाठी एकमुखाने हात वर केले दात दाखवत. माझ्यासाठी कोणीच काही बोललं नाही. आपण गुपचूप दप्तर घेऊन वर्गाबाहेर पडलो तरी कोणाच्या लक्ष्यात आलं नाही.

रागातच मानसी घरी आली. दप्तर कोपऱ्यात फेकलं आणि अंगावरचा गणवेश अक्षरशः ओरबाडून काढला आणि बाथरूम मध्ये जाऊन पोटभर रडून घेतलं.

मनुचे आईवडील नोकरी करीत. दिवसभर ती आणि तिचा धाकटा भाऊ आजीसोबत असतं. आई बिचारी ऑफीस मधून दमून भागून यायची. जेवण, भांडी, मनुचा गृहपाठ, दुसऱ्या दिवशीची तयारी यात रात्र होत असे. वडील सुद्धा जमेल तेवढा हातभार लावत.

मनू अतिशय हुशार होती.शाळेत पहिल्या तिनात तिचा नंबर असे. वक्तृत्व, चित्रकला , कथाकथन यांच्या आंतरशालेय स्पर्धा ती गाजवत असे. तिची आई हौसेने तयारी करून घेई. बक्षीस घ्यायला मनू स्टेज वर गेली की आईचं ऊर भरून येई. मनूला सुद्धा फार मस्त वाटे.' मानसी शिंदे, प्रथम क्रमांक!! ' असे म्हटले की टाळ्यांच्या कडकडात पावले टाकत स्टेज वर बक्षीस घ्यायला जाताना तिची कळी खुलते असे.
संपूर्ण शाळेत ती एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे. तिचे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरातले वातावरण फार अभ्यासू होते. अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे, चांगल्या विद्यार्थ्यासारखे वागणे हेच आपले परम कर्तव्य आहे अशी लहानग्या मनुची समजून होती. लहानपणापासून तेच तिच्या मनावर बिंबवले होते.

मनूला मित्रमैत्रिणी नव्हत्याच. ती,सौरभ आणि शर्वरी असे तिघे चष्मिष्ट वर्गात बाईंनी पहिल्या बेंच वर बसवले होते. तेवढीच त्यांची ओळख. मनू सतत मन लावून शिक्षकांचे ऐके. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला येत. तिचा हात नेहमी उत्तरासाठी वर!! सगळा गृहपाठ , वर्गपाठ वळणदार अक्षरात पूर्ण असे. इतर मुलामुलीसारखे बालसुलभ खोड्या करणे, शिक्षकांची माफक टिंगल करणे, शाळेला दांडी मारणे, वगैरे तिच्या डोक्यातच नसे. तिला उलट आपल्या वर्गमित्रापेक्षा तिचे शिक्षक जवळचे वाटत. ती भक्तिभावाने त्यांचे ऐके. शिक्षक जणू काही तिला एकटीलाच शिकवायला वर्गात येतात इतकी ती समरसून लक्ष देई.

तर अशी ही आपली बोअरिंग मनू!!

पण मनूला नाच करायला भारी आवडत असे. टीव्ही दाखवतात तसे पाहून ती आरशापुढे नाचून पाही. अर्थात आईबाबांच्या नकळत. तिला काही जमत नसे. पण सिनेमात जश्या मुली नटून थाटून नाचतात आणि मग सगळे कौतुकाने पाहतात तसे ती स्वतःला मनातल्या मनात पाहत असे. कितींदा पलंग तिचा स्टेज बने. नाही म्हणायला मनू फार लहान असताना आईने तिला भरतनाट्यम शिकायला नेले होते. पण मनूला त्या मुद्रा वगैरे फारच कंटाळवाणे वाटले. तिने सपशेल नकार दिला. मग आई चिडली,
"तुला काय मग सिनेमात नाचायचे आहे तसे कंबर हलवत ??"
आईचा राग ऐकून मनू गप्प झाली. तिला लक्ष्यात आले, सिनेमात नाचतात तसे तिच्या आईवडिलांना अजिबात आवडणार नाही. तसेही आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध काही करणे मनूच्या समीकरणात बसतच नसे.

तिची उर्मी तिला स्वस्थ बसून देत नसे. दुसरीत असताना तिने शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घेण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा लहान मुलींचा नाच वर्गशिक्षक बसवित. मनू उत्साहाने चार दिवस नाचाची तालीम करत होती. सगळ्या मुलींसोबत गिरक्या घेऊन नाचताना तिचा आनंद गगनात मावेना. पण पाचव्या दिवशी मुख्याध्यापिका बाई तालीम पाहायला आल्या. त्या वर्गशिक्षिका बाईंच्या कानाला लागल्या. काय झालं, कोणास ठाउक, मनूला नाचातून काढून टाकलं.मनू हिरमुसली. आपण चांगले नाचात नाही म्हणून आपल्याला काढलं की आपल्याला चष्मा आहे म्हणून काढलं हे तिला कळेना. पण बाईना कोण विचारतो? घरी सांगायची सोय नव्हती. अभ्यासात काही अडचण असती तर आईसाहेब कंबर कसून आल्या असत्या, पण नाचबीच तिच्या घरी अत्यंत शुल्लक बाब होती.
आई म्हणाली असती, " काय करायचा आहे नाच??तू तुझा अभ्यास बघ.

आजही असंच झालं. आता मनू सहावीत होती. नाच सगळ्या मुली मिळून बसवीत. शिक्षिका फक्त शेवटी बघून जात. आता आपल्याला कोणी काढणार नाही अशी मनुची खात्री होती. पण सगळं मुसळ केरात. मनू फारच खट्टू झाली. पण सांगते कुणाला? शिवाय ती आदर्श विद्यार्थिनी होती, रडारड आणि आदळआपट करून तिला त्या कोषातून बाहेर येणं शक्य नव्हतं.
" मानसी शिंदे अश्या शुल्लक कारणासाठी रडते म्हणजे काय? बाईना काय वाटेल? "

मनू गप्प बसली. पुन्हा कधी आपण नाचात भाग घ्यायचा नाही. आपण बरे नी आपला अभ्यास बरा! तिने मनाची समजूत काढली.

"डॉ. भाकरे , विहान गॅदरिंग मध्ये भाग घेणार आहे का? "

विहान ची टीचर अस्खलित इंग्रजी मध्ये तिला विचारात होती.
आज २० वर्षानंतर डॉ.मानसी भाकरे तिच्या ५ वर्षाच्या विहानला घरी न्यायला नेहमीप्रमाणे शाळेच्या दारात उभी होती.

इतका साधा प्रश्न ऐकून ती का दचकली ते तिचं तिला कळेना. उगाच मन भूतकाळात फिरून आलं.

"बाप रे!! वीहान नीट नाचेल ना? आणि नाही नाचला तर ते त्याला काढून टाकतील. मग त्याला वाईट वाटेल. आपण काही बोलू पण नाही शकणार."

"डॉ. भाकरे, ..."

विहान ची टीचर प्रश्नार्थक चेहरा करून पाहत होती.

" या बाईला डॉ. बाईला साधं इंग्रजी सुद्धा कळत नाही की काय? खरंच शिकलेली आहे का मठ्ठ आहे?" असे भाव टीचर क्या नजरेत दाटून आलेले तिने पाहिले आणि मनूने स्वतःला सावरलं.

" विहान , नाचणार आहे का? म्हणजे तो नाचेल का पण? " मनूने गडबडून विचारलं. खर म्हणजे चाचरत.

"हो, त्याला नाचायचं असेल तर तो नाचू दे की" टीचर हसून म्हणाली.

मनूने विहानं कडे पाहिलं, " बाळा, तुला डान्स करायचा आहे का सगळ्यांसोबत? "

" हो, मम्मा!!" विहान ने जोरात मान डोलावली.

" ठीक आहे, मग उद्या पासून एक तास उशिरा या हां त्याला घ्यायला. नाचाची तालीम करायला आम्ही मुलांना थांबवणार आहोत." टीचर ने तिला सांगून टाकले.

तिचा विश्र्वासच बसेना. असे काय आपण छोट्याश्या गोष्टीने भारावून गेलो. तिला स्वतःचेच हसू आले. पण अगदी स्नेहसंमेलनाचे दिवसापर्यंत तिला उगाच भीती वाटत होती. विहान चा हिरमोड तर नाही ना होणार!

रोज तिला वाटे आज टीचर सांगेल की उद्यापासून त्याला नको पाठवू, त्याला नाही जमत. मनाची घालमेल नवऱ्याला सांगून तरी काय उपयोग. त्याने थट्टा केली असती. खर तर तिलाही आपण इतके बालिश कसे विचार करतोय , कळेना.

अखेर, एक दिवसावर स्नेहसंमेलन आल.

सगळ्या मुलांना नाचात घालायचा रंगीत कॉस्च्युम दिला. घरी येऊन पहाते तर विहान चे दप्तर रिकामे. त्याला कॉस्च्युम मिळाला नव्हता. मनूच्या काळजात धस्स झालं.

" अरे , देवा!! त्याला काढून टाकलं का? आता तो रडेल का? आपली भीती खरी ठरली. आता उद्या त्याला काय सांगायचं? "

मनूला काही सुचेना .

इतक्यात तिचा फोन वाजला, टीचर चा फोन होता.

"आता, टीचर म्हणेल, सॉरी तुमचा मुलगा नाही नाचात चांगला, त्याला नाही घेतलं आम्ही.!!! " तिने डोळे घट्ट मिटून ऐकण्याची तयारी केली.

" हॅलो, डॉ. भाकरे, सॉरी हां!! Vihaan चा कॉस्च्युम फार ढगळ होत होता त्याला. मी दुसरा मागवला आहे. उद्या मी त्याला घालून घेऊन. तुम्ही काळजी करू नका. त्याला नेहमीचे कपडे घालून पाठवा."

मनूला हायसं वाटलं. तिने ओके म्हणून फोन ठेवला.

" आता तुमच्यासमोर नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत, बालवाडी चे छोटे छोटे स्टार्स" शिक्षिकेने उत्साहात घोषणा केली. मनू सावरून बसली. नजर स्टेज वरच्या बच्चे कंपनी मध्ये Vihaan ला शोधत होती. सगळी चिल्ली पिल्ली दुडकत दुडकत रांगेने स्टेज वर आली. पालकांनी एकच जल्लोष केला. मग अर्धी मंडळी बिचकली. उरलेली हात हलवून आईबाबा कडे टाटा करू लागली. मग टीचर ने सगळ्यांना जागोजागी नीट उभे केले. तिला Vihaan दिसला. तो सगळ्या प्रेक्षकांना पाठ करून स्टेज वरचा रंगीबेरंगी प्रोजेक्टर पाहण्यात गुंतला होता. मनूला हसू फुटलं.

अखेर संगीत सुरू झालं. पुढच्या रांगेतली जरा शहाणी पिल्लं छान माना डोकावून नाचू लागली. पाठली काही जणं गिरक्या घेत होती, काही रडत होती काही पुढे येत होती. पण एकूणच मजेशीर कार्यक्रम चालला होता. Vihaan उड्या काय मारत होता, हात उडवत होता, कधी पाठी वळून प्रोजेक्टर काय पाहत होता तर कधी बाजूच्या मित्रांचं पाहून थोडे शिकवलेल नाचून पाहत होता. एकूणच स्वारी खुश होती. २-३ मिनीटे स्टेज वर नुसती मज्जा चालली होती.

तिचे डोळे तिच्या नकळत भरून आले. Vihaan ला मुळीच नाच जमत नव्हता. पण त्याला कोणी काढून टाकले नव्हतं. तो उड्या मारत होता, आनंदाने गिरक्या घेत होता. त्याच्या निखळ आनंदावर कोणीच विरजण घातलं नव्हतं.

कितीतरी दिवसांनी तिला लहान मुलासारखा आनंद झाला होता!!!

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहिली आहे गोष्ट ... मी खूप रिलेट केली. माझी मुलगी लहान असताना सोसायटीच्या गरब्या मध्ये तिला अजिबात जमत नव्हत्या स्टेप्स म्हणून रडत रडत घरी आली होती ती. मला ही खूप वाईट वाटलं होतं. " काय झालं असत तिथे तिला चार उड्या मारू दिल्या असत्या तर ,सगळी लहान मुलंच होती" वैगेरे काय काय वाटलं होतं. तिला थोडा गायडन्स मिळाला तर जमेल म्हणून मग नाचाचा क्लास लावला. पुढच्या वर्षी खूप आनंदात गरबा खेळून आली. त्यावेळचा तिचा आनंदित उत्फुल्ल चेहरा अजून डोळ्यासमोर आहे. तिला एवढं आनंदी बघून मला तिच्या पेक्षा जास्त आनन्द झाला होता.

धन्यवाद हर्पेन, वावे, मनिमनोहर आणि सामान्य वाचक.
माझा पहिलाच प्रयत्न आहे.मनात फार घालमेल चालली होती. म्हटलं इतक्या अनुभवी लेखक आणि चोखंदळ वाचकांसमोर कसा टिकाव लागायचा. विषय फार खोल नव्हता ना!!
तुमच्या प्रतिक्रिया वाचून फार बरं वाटलं.

खूप छान
शेवट तर अतीच आवडला।
किप इट अप। लिहित रहा आणि इथे पोस्टही करत रहा Happy

खूप छान आहे कथा. लिहीत रहा.

ही कथा अगदी माझीच वाटली. Proud शाळेच्या १५ ऑगस्ट् च्या समुह गाण्यात मी कायम असायचे. एकदा मात्र गावाला गेल्याने २ दिवस उशीर झाला. मी आपली गेले प्रॅक्टिसला. पण जे गाणे बसवत होते त्यापैकी एक सर मला खूप वाटेल तसे बोलले. बहुतेक घरचा किंवा शाळेचा राग माझ्यावर निघाला. Proud मला रडु आवरेना. बाकी मुली पण घाबरल्या. दुसरे पाटील सर कडक शिस्तीचे असले तरी तसे मायाळुच होते. त्यांना पण वाईट वाटले माझा चेहेरा बघुन. पण नंतर मी शाळेत गाणेच बंद केले.

लहान मुलांचे भाव विश्व खूप वेगळे असते. त्यामुळे चार चौघातला अपमान बहुतेक जिव्हारी लागतो.

सुंदर कथा..!!
छान फुलवली आहे ...

खूप रीलेट झाली ही गोष्ट. संसाराच्या रगाड्यात आपल्या लहान मुलांचे भावविश्व समजून घेता येत नसेल आईबाबांना. पण त्यावेळी हळव्या मनावर उठलेले ओरखडे काही वेळा सहजासहजी बरे होत नाहीत.

अवल,नताशा, धनुडी,रश्मी,मृणाल, धनावंती,रुपाली, एस , सर्वांचे खूप मनापासून आभार.
मनाला फार उभारी आली तुमचे सकारात्मक प्रतिसाद वाचून.
लहान मुलांचा आनंद लहानसहान गोष्टी मध्येच असतो.
त्यांना सदैव perfection च्या फुटपट्टी ने मोजू नये असे मला मनापासून वाटते.
कथाबिज अतिशय सामान्य असल्यामुळे वाचकांच्या पसंतीस उतरेल की नाही याची खूप धास्ती वाटत होती.
आता समाधान वाटते आहे.
धन्यवाद.

कथेचा जीव लहान असला तरी छान फुलवली आहे. खूप सुंदर!

मुलांना पण भावभावना असतात हे शिक्षकांनी, पालकांनी समजून घ्यायलाच हवे.

शर्मिला, कविन,अंकु, माऊ मैया,स्वाती,अंजली,वंदना, आस्वाद, निर्मल सर्वांचे मनापासून आभार.
पहिल्या प्रयत्नाला गोड मानून स्वीकारल्यामुळे फार बरं वाटलं. धन्यवाद.

कथा एकांगी वाटली.
मनू गप्प बसली. पुन्हा कधी आपण नाचात भाग घ्यायचा नाही. आपण बरे नी आपला अभ्यास बरा! तिने मनाची समजूत काढली. >> मनुचा अभ्यासाच्या बाबतीत तिच्यापेक्षा हुशार मुलांनी, शिक्षकांनी पाणऊतारा केला असता तर मनुने काय केले असते?
मनुला नाच येत नाही ह्या कारणापेक्षा तिच्या बोअरिंग ईमेजमुळे ईतर मुलींनी तिला टाळले असेही असू शकते ना.
मनुला तिच्या शिक्षक आईबाबांनी फ्रेंडशिप, सोशल एग्झिस्टन्स, नेटवर्किंग ह्याचे महत्व शिकवायला हवे होते.

लंगड्या गायीला वासरे सुद्धा आपल्यात घेत नाही ती शहाणी असली तरी.

हम्म्म.. मुद्दा बरोबर आहे अश्विनी.

पण गुण आणि दोष सगळ्यांमध्ये असतात.

शिवाय ती लहान आहे, आपले कुठेतरी चुकते आहे म्हणजे कदाचित आपल्याला नृत्य येत नसावे एवढे विचार करण्यापर्यंत तिची मजल आहे. पण या पलीकडे जाऊन आपल्याला सोशल होता येत नाही हा प्रॉब्लेम आहे एवढा विचार ती लहान वयात करेल असे मला सुचले नाही.

तिने efforts टाकले आहेत. आईच्या इच्छेविरुद्ध जाणे तिची पद्धत नसून देखील ती नाचाच्या प्रॅक्टिस साठी जाते. पण याहून जास्त क्रांतिकारक ती काही करेल असा तिचा स्वभाव मी इमॅजिन केला नाही.
गोष्टीतली मनू दिवसभर घरी एकटी असते, आईवडील नोकरीत व्यस्त आहेत, आजी धाकट्या भावाला सांभाळण्यात गर्क आहे, तिला तिच्यातली घालमेल व्यक्त करायला आणि तिचे दोष समजाऊन सांगायला कोणी नाही.
किंबहुना , मनूला नाचात भाग घेता ना येणे हा फार मोठा प्रश्न आहे हसे तिच्या आईवडिलांना किंवा शिक्षकांना वाटत नाही.
आईवडिलांच्या मते अभ्यास महत्त्वाचा आहे आणि शिक्षकांना मुलांच्या निखळ आनंदापेक्षा perfection महत्त्वाचे वाटते.

गोष्ट एकांगी आहे हे तुमचे म्हणणे मला पटले.पण तिचे भावविश्व रेखाटले आहे. तिने बाल बुद्धीला सुचेल तसे केले.

आपली इच्छा मारून पुढे जाणे चूक आहे, पण अश्या अनेक मनू मला माहित आहेत.

अखेर, गोष्ट माणसाच्या गुणदोषांतून बनते. परफेक्ट माणसांची गोष्ट कशी बनेल?

पण मी तुमच्या सूचना नक्की ध्यानात ठेवीन.

आणि मनूला पण सांगते.

वीरू,भक्ती साळुंके,जाई, हीमु, हर्पेन, जेम्स बाँड मनापासून धन्यवाद.
सकारात्मक प्रतिक्रिया वाचून हुरूप आला.
Sharmila.R मनुची बाजू समजून घेतल्याबद्दल आभार.
Afterall she is just a kid.

कथा छाने
7वीत मला नाचातुन काढलं होतं. बाकी नाच ओके होता पण त्यात रंगीबेरंगी धरती ही नटली म्हणून पदर पुढे काढून एक कॉम्प्लिकेटेड उडी मारायची स्टेप होती ती काय मला जमेचना बरेच रिटेक मारून.त्यामुळे 'उद्यापासून येऊ नको' सांगीतले. थोडे वाईट अर्थात वाटलेच.पण आपल्याला ती स्टेप येत नाहीये हे स्वतःला कळल्याने मूड आणि बाकी मजेत फार फरक नाही पडला.

आता शाळेत सर्व मुलांना काही न काही रोल देतात नाच, नाटकात ते मला फार आवडते.टीचर्स च्या पेशन्स ची मात्र परीक्षा असते, 45-5० मुलांना फिट करता येईल असे कार्यक्रम शोधणे हे.

एकदा मुलीच्या शाळेत सर्कस थीम होती.त्यात सर्व मुलांना जमतील तसे वेगवेगळे नाच,कसरती,उड्या असं करून अगदी छान फिट केलं होतं.म्हणजे, सगळे वेगवेगळ्या गोष्टी करत होते आणि कार्यक्रम पण बघायला कंटाळवाणा झाला नव्हता.

मुलं मोठी झाली की आपोआप सारख्या स्किल ची एकत्र येऊन भाग घेतात,ज्याना आपण नीट करत नाही हे कळलेलं असतं ते दुसर्या गोष्टींवर लक्ष घालून तिथे काहीतरी करतात.पण लहान असताना तरी सगळीकडे सामील करून स्टेज डेअरिंग वाढवावे हे हल्लीच्या शाळांचे बरोबर वाटते.

छान आहे गोष्ट! असे घडते बऱ्याचदा... मनू, मनू चे आईबाबा , मनुचे टीचर ह्या सर्व भूमिकेतून जावे लागते वेगवेगळ्या वेळी परफेक्शन च्या नादात... पण छोटी मुले हिरमुसली होतात हे मात्र अगदी खरे. तुम्ही " break the stereotype' हा संदेश छान दिला आहे कथेतून !