माझ्या आठवणींतली मायबोली - गौरी

Submitted by गौरी on 23 September, 2021 - 03:28

नवा धागा काढून लिहिण्याइतका जीव या लेखनात नाही, म्हणून हे मी आधी प्रतिसाद म्हणून लिहिलं होतं या उपक्रमाच्या धाग्यावर. (इतकी वर्षं सुप्तावस्थेत असणार्‍या आयडीच्या लेखनावर काही प्रतिक्रिया येतील असं मला वाटलं नव्हतं. Happy ) पण हे नव्या धाग्यात हलवावं असं तिथे अनेकांनी सुचवलं. त्यामुळे हा नवा धागा काढतेय.

***

२००४ मधली गोष्ट. ऑफिसमधल्या मित्राने विचारलं, ‘श्वास’ बघायला येणार का? आम्ही काही जण जाणार आहोत. मी त्याला दोन तिकिटं ठेवायला सांगितली, आणि आई आणि मी गेलो. पंधरा एक जणांचा ग्रूप होता तो. भेटल्याभेटल्या भरपूर गप्पा सुरू झाल्या सगळ्यांच्या. सगळे एकमेकांना चांगले ओळखणारे, नियमित भेटणारे वाटले. मी काही तेव्हा तोंड उघडलं नाही. मध्यंतरामध्ये आणि सिनेमा संपल्यावर आई आणि मी सिनेमाच्याच विचारात होतो, त्यामुळे परत कुणाशी ओळख करून घ्यायचा किंवा बोलायचा प्रयत्नही केला नाही.

त्याच आठवड्यात मला एका इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. मोठी कंपनी, बर्‍याच दिवसांनी मी देत असलेला इंटरव्ह्यू यामुळे तसं बरंच दडपण होतं मनावर. आत गेले, आणि इंटरव्ह्यू घेणार्‍याने पहिला प्रश्न केला, “अग, तू परवा ‘श्वास’ बघायला होतीस ना मायबोलीच्या ग्रूपमध्ये?” माझं दडपण वगैरे पळून गेलं कुठल्या कुठे. नंतरचा इंटरव्ह्यू म्हणजे निवांत गप्पा मारल्यासारखा झाला. पुढे मी सिलेक्ट झाले, तिथे जॉईनही झाले, पण इंटरव्ह्यू घेणार्‍याला ऑफिसमध्ये कधीच बघितलं नाही. (तो ऑनसाईट गेला तोवर.) मायबोलीची सदस्यही नसताना मायबोलीकरांसोबत असल्याने मला हे मिळालं आहे. (ऑफिसमधला हा मित्र आणि इंटरव्ह्यू घेणारा या दोघांचेही मायबोली आयडी मला आठवत नाहीत. बहुतेक सायबर मिहिर आणि भ्रमर / मिलिंद.) पण ऑनलाईन ओळखीतून लोकांमध्ये एकमेकांविषयी इतका विश्वास, आत्मीयता निर्माण होऊ शकते हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं.

यापूर्वी एक – दोन वेळा मिहिरनेच सांगितल्यामुळे मायबोलीवर चक्कर झाली होती, पण अजून घरी इंटरनेट नव्हतं. ऑफिसमध्ये नेहेमीच पेटलेलं असायचं त्यामुळे निवांत वाचायला मिळण्याची शक्यता नव्हती. रोमन लिपीतलं मराठी वाचणं कष्टाचं होतं. त्यात मायबोलीवर बहुतेक होमसिक झालेले परदेसिया गप्पा मारतात असं पहिलं इम्प्रेशन होतं. पुण्यातच असल्याने बाकी मराठी वाचायला बोलायला भरपूर संधी होती. त्यामुळे मायबोलीवर येण्याबाबत विशेष उत्सुकता नव्हती.

२००८ मध्ये जर्मनीला एकटीच होते. तेव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. मायबोलीचा तेव्हा परत नव्याने शोध लागला. दोन – चार लेख इथेही लिहिले. पण मी मायबोलीवर यायचे ते मुख्यत: वाचायला. दाद, नंदिनी, कवठी चाफा, कौतुक शिरोडकर, दिनेशदा (बहुतेक ट्युलिपही.) यांचं लिखाण मनापासून आवडायचं. गप्पांच्या पानांवर मी फिरकायचे नाही, कारण मी उगवणार कधीतरी आठवडाभाराने, तोवर काय घडून गेलंय याचा मला पत्ता नसायचा. वादविवाद प्रकाराचाही मनापासून कंटाळा असल्याने त्यात एकदाच थोडं काही बोलले असेन. यानंतर कित्येक वर्षं मी फक्त निसर्गाच्या गप्पांच्या पानावर प्रतिसाद द्यायचे. त्या गप्पा थंडावल्यावर तेही प्रतिसाद थांबले आणि मी कायम रोमात असणार्‍यातली झाले. इतक्या दिवसांनी वाचल्यावर ते लेखन शिळे झालेले असायचे, त्यामुळे प्रतिक्रिया दिल्या नाहीत कधी. अजूनही वाचनासाठी मायबोलीवर मधून मधून येतेच. फार नियमित इथे येता आलं नाही, तरी मी आल्यावर वाचनाचा कोटा पूर्ण करूनच जाते. अनया, धुंद रवी, हार्पेन, चिनूक्स, सई केसकर, मनीमोहर, सीमंतिनी, मी अनु यांचं लेखन विशेष लक्षात राहिलं, अमेरिकन गुलामगिरीवरची मालिकाही. सध्याच्या लेखनापैकी जिज्ञासाचं ‘नातं निसर्गाशी’ आणि त्यावरचे प्रतिसाद अगदी नीट वाचले. (टंकाळा नसता तर जिज्ञासा मांडतेय तेच लिहायला मला आवडलं असतं, म्हणून जास्तच जिव्हाळ्याने. :))

मायबोलीला मी सर्व्हरस्पेस न खाणारा एक वाचक दिला. Wink बाकी लेखन, गाजलेलं लेखन, प्रतिसाद, गांजणारं लेखन असलं काहीही केलेलं नाही.

विचारपूस सुविधेचा किती वापर होतो, त्यातून तुमचं मायबोलीज्ञान किती वाढतं, लोक इतरांच्या विपूंमध्ये किती बागडतात हे मला अजिबातच माहित नव्हतं.

मायबोलीमध्ये काय बदल झाले हे सांगण्याइतकी नियमित मी इथे येत नाही. पण राजकीय वादविवाद फारच टोकाला जाताहेत आता, कुठल्याही धाग्यावर सुरू होताहेत असं वाटतं.

इतकी वर्षे झोपा काढल्यावर आज अचानक हे लिहावंसं का वाटलं मला? इथे लिहिलं नाही, तरी मायबोलीकडून बरंच काही मिळालं आहे. रोमातल्या, अधूनमधून डोकावणार्‍या बर्‍याच जणांना कदाचित असंच म्हणायचं असेल. ते व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार! मायबोलीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटेखानी पण छान लिहिलंय!
माझं नाव लेखन विशेष लक्षात राहणार्‍या लोकांमधे दिग्गज म्हणता ये ईल अशा लेखकांच्या बरोबरीने लिहिलेले पाहून आनंद झाला. खरंतर अत्यानंदच Proud

लोक इतरांच्या विपूंमध्ये किती बागडतात हे मला अजिबातच माहित नव्हतं. >>> ह्याला विपौड्या Proud असे नावही आहे.

इथे लिहिलं नाही, तरी मायबोलीकडून बरंच काही मिळालं आहे. रोमातल्या, अधूनमधून डोकावणार्‍या बर्‍याच जणांना कदाचित असंच म्हणायचं असेल. ते व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार! हे ही खूप आवडलं.

छान लिहिलंय.लेखात माझं नाव आल्याचं पाहून अर्थातच आनंद झाला.अर्थात माझ्याबरोबर ज्यांची नावं आहेत ते खूप प्रो छान लिहितात.माझ्या सारख्या त्यांना विषय मर्यादा पडत नाहीत(हे विनय म्हणून नसून खरंच लिहिते आहे.) पण अर्थातच मस्त वाटलं.

गौरी मस्त लिहिलं आहेस. तुझ्या नोकरीचा किस्सा भारीच आहे.

गौरी माबो मान्यवरांच्या यादीत माझं नाव वाचून आनंदाने टाडोपा च झालं. थॅंक्यु so much. टडोपा शब्द ही माबोचच देणं.

बाकी आमच्या कोकणातल्या गावची पताका नेटच्या महाजालावर फडकवण माबोमुळेच शक्य झालं आहे . मी maximum कोकणावरच लिहिलं आहे. " मायबोलीच्या आठवणी" मध्ये लिहिलं आहेच. पुन्हा एकदा थॅंक्यु माबो. थॅंक्यु गौरी.

कविन, हर्पेन, मंजूताई, रूपाली विशे - पाटील, मी अनु, वावे, मनीमोहोर, धनुडी, अंजू - इथे आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचे आभार!

हर्पेन, तुझ्या लिहिण्याचे विषय सगळे close to heart आहेत माझ्या Happy

मी अनु, तुझी लिहायची शैली आवडते खूप.

मनीमोहोर, तो नोकरीचा किस्साच मुख्य सांगायचा होता! Happy तुमच्या लेखनातून कोकणाचं प्रेम इतकं भरभरून दिसतं म्हणूनच ते अगदी लक्षात राहिलं!