चक्रव्यूह

Submitted by Kavita Datar on 19 September, 2021 - 07:48
Social Networking Crimes

साधनाने गौरीच्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले. एक प्रकारची उदास, निराश शांतता तिच्या मनाला भिडली. गौरीला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. साधनाने तिचे कपड्यांचे कपाट उघडले. त्याबरोबर गौरीबद्दलच्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली. गौरी गेल्यापासून तिला एक प्रश्न सारखा सतावत होता, "अवघ्या सतरा वर्षांची माझी लेक, असे काय झाले की तीला स्वतःला संपवून घ्यावेसे वाटले?"
व्यवस्थित आवरलेल्या कपाटातील कपड्यांकडे सुन्न नजरेने पाहात तिने कपड्यांच्या खणा खालचा ड्रॉवर उघडला. त्यात गौरीच्या हेअरपिन्स, बँड्स वगैरे एक्सेसरीज सोबत एक डायरी साधनाच्या दृष्टीस पडली. डायरी उचलून तिने तिची पान चाळली. डायरीत गौरीने तारखेनुसार काही नोंदी करून ठेवल्या होत्या. जवळच्या खुर्चीत बसून साधना डायरी वाचू लागली.

३०/०३/२०१८
आज खूप कंटाळा आलाय. अभ्यासाचाही मूड होत नाहीये. आजही आईला उशीर होणार असं दिसतंय. ती तरी काय करणार. इअर एंडींगमुळे बँकेत तिला जास्त काम असणार. त्यामुळे उशीर होणारच. माझे बाबा असते तर आईला एवढं काम करावंच लागलं नसतं. घरातली कामं, तिच्या ऑफिसच्या, माझ्या कॉलेजच्या वेळा सांभाळणं यातच तीचा दिवस मावळतो. एकच स्वप्न आहे तिचं. . मी शिकून खूप मोठं व्हावं. आणि तिचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार. . . चला. . . थोडा वेळ फेसबुकवर जाते म्हणजे वेळ तरी जाईल.

३१/०३/२०१८
काल फेसबुकवर साहिलची फ्रेंड रिक्वेस्ट आली. खरं तर मी त्याला ओळखत नाही. आईने सांगितलंय, अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करायच्या नाहीत. पण कसला भारी दिसतो ना तो त्याच्या प्रोफाइल फोटोमध्ये. . . मी त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केलीये.

०१/०४/२०१८
आज अभ्यास झाल्यावर मी फेसबुक मेसेंजरवर साहिलशी खूप वेळ चॅट केलं. He is damn interesting. मस्त वाटलं त्याच्यासोबत चॅट करून.

०२/०४/२०१८
चॅट करताना मी आणि साहिलने आज एकमेकांचे सेल नंबर घेतले. त्याने लगेच मला कॉल केला. काय मस्त बोलतो? आवाज तर एखाद्या बॉलिवूड हिरो सारखाच वाटतो. खरं तर आईला हे सगळं अजिबात आवडणार नाही. पण मी कधी तरी त्याच्याशी बोलत जाईन. सारखं सारखं नाही.

०४/०४/२०१८
काल मी फक्त अभ्यास केला. मोबाईलला हात पण लावला नाही. खरंतर इलेव्हन्थची एक्झाम आताच संपलीय. पण ट्वेल्थचे क्लासेस कधीच सुरू झालेत. आणि ट्वेल्थला पहिल्यापासून खूप अभ्यास करायचा आहे. नीटची एक्झाम देऊन मेडिकलला जायचंय मला. आईचीही तीच इच्छा आहे. आजही स्वतःला आवरतेय. फेसबुकवर गेले तर साहिल नेहमी ऑनलाइन असतोच. मग त्याच्याशी बोलण्यात खूप वेळ जातो आणि उगाच गिल्टी वाटत राहातं. आईला कळलं तर आवडणार नाही म्हणून आणि अभ्यासाचा वेळ गेला म्हणूनही. असं करते फक्त पाहते. . फेसबुकवर साहिल ऑनलाइन आहे का? असेल तर पाच दहा मिनिटं त्याच्याशी चॅट करते. . फक्त पाच दहा मिनिटंच हं. . .

०५/०४/२०१८
काल फेसबुकवर गेले तर साहिल ऑनलाइन दिसलाच. पाच दहा मिनिटं चॅट करणार होते. पण तास-दीड तास कसा गेला कळलंच नाही. आत्ता अर्ध्या तासा पूर्वी त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. एफबी प्रोफाइलवर दिसतो त्यापेक्षा वयाने थोडा मोठा असावा. वीस एकवीस वर्षांचा. पण कसला हॅण्डसम दिसतो. . . आणि बोलतो पण मस्त. . असं वाटतं. . .त्याच्याशी बोलत राहावं. येत्या रविवारी जेएम रोडवरच्या सीसीडीमध्ये भेटायचं म्हणतोय. जावं का? त्याला भेटायची तर खूप इच्छा आहे.

०८/०४/२०१८
आज आम्ही सीसीडी वर भेटलो. खूप गप्पा झाल्या. त्याचे आई-बाबा नगरला असतात. तो इथं पुण्यात तीन मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून राहतो. इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे. त्याचे ते माझ्याबद्दलचे पॅशनेट लूक मला आतपर्यंत मोहरून गेले. बोलता बोलता त्याने माझे हात हातात घेतले आणि माझ्या सर्वांगात वीज चमकून गेली. आय शुड कन्फेस. . .आय लव्ह हिम. . येस. . आय एम इन लव विथ हिम. . . .

१४/०४/२०१८
आजकाल डायरी लिहायला सुद्धा वेळ होत नाही. अभ्यासातही मन लागत नाही. या आठवड्यात मी कुठलीही विकली क्लास टेस्ट दिली नाहीये. बस. . . साहिल. . साहिल. . आणि फक्त साहिल. . . त्याच्याशी चॅट, फोन कॉल, व्हिडिओ कॉल आणि त्याचे विचार. . दुसरं काही सुचतच नाही. या आठवड्यात आम्ही दोनदा भेटलो. उद्या त्याच्या फ्लॅटवर भेटायचं ठरलंय.

१६/०४/२०१८
काल मी गेले होते साहिलच्या फ्लॅटवर त्याला भेटायला. आम्ही दोघंच होतो तिथे. त्याने मला मिठीत घेऊन कपाळावर, गालांवर आणि ओठांवर किस केलं. नंतर हळुवार उचलून बेडवर ठेवलं. मी त्याच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाले होते की. . . माझे कपडे केव्हा दूर झाले कळंलच नाही. Ohh... I lost my virginity. . गिल्टी वाटतंय. But it was a heavenly experience. . and after all we love each other. पण. . पण आईला कळलं तर. . .

३०/०४/२०१८
आज काल आम्ही साहिलच्या फ्लॅटवरच भेटतो. तेही आठवड्यातून दोन तीनदा. . राहवतंच नाही एकमेकांशिवाय. .We both are passionate about sex. आज त्याने आम्हा दोघांचा सेल्फी व्हिडीओ काढला. . तसं करताना . . . म्हणला. . तुझी आठवण आल्यावर पाहात जाईन. मी नको म्हणत होते तरीही. . .

२०/०५/२०१८
आईला काही कळलंय का ? विचारत होती. . की मी क्लासेसच्या विकली टेस्ट्स का दिल्या नाहीत? क्लासच्या सरांचा तिला एसएमएस आला होता. माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली. ."तु मोठी झाल्यासारखी वाटतेय आणि आजकाल तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो गं. अभ्यासाचे टेन्शन आहे का?" मी काही तरी सांगून वेळ निभावून नेली.

२५/०५/२०१८
Oh god !!! How could He do this to me???? He is a big cheater. .रडून माझे आज डोळे आग करताहेत. त्या जागीही खूप खूप दुखतंय. . . आई गं !!! आज. .आज. . .साहिलने त्याच्या मित्रांबरोबर. . मला. . . शी . . . किळस येतेय मला स्वतःचीच. मी नाही म्हटले तर म्हटला, त्याच्यासोबतचा व्हिडिओ आईला पाठवेल आणि पोर्न साइटवर सुद्धा अपलोड करेल. अरे देवा !! कुठे अडकले मी ? आता यातून बाहेर कशी पडू ??आईला सगळं सांगू का ? नको. तिला खूप खूप वाईट वाटेल. नकोच. . .

१५/०६/२०१८
गेल्या काही दिवसांत माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झालीय. कितीदा तरी साहिलने आणि त्याच्या त्या तिन्ही मित्रांनी माझ्यावर अत्याचार करून माझ्या शरीराचे लचके तोडले आहेत. घाणेरडे पॉर्न व्हिडिओज दाखवून मला नाही नाही ते करायला लावतात. नाही म्हटले तर माझ्यासोबत काढलेले व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देतात. मी आईचे ऐकायला हवे होते. अनोळखी साहिलची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायलाच नको होती. म्हणजे आज असं काही झालंच नसतं. माझं आयुष्य पहिल्या सारखंच सरळ, छान असतं. मी, आई, मैत्रिणी, अभ्यास किती छान होतं सगळं. मीच माझ्या हाताने सगळं घालवलं. सगळ्यांना दूर करून या घाणेरड्या चक्रव्युहात अडकले. आता हे सगळं थांबवून, यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसतोय मला. . . स्वतःला संपवायचं. . . आई मला माफ कर. . .पण दुसरा काहीच मार्ग दिसत नाहीये. . .

साधनाने डायरी मिटली. गौरीच्या आठवणीने आणि तिने भोगलेल्या यातनांची कल्पना आल्याने ती ओक्साबोक्शी रडू लागली. अर्धा तास असाच गेल्यावर ती एका निश्चयाने उठली. तिला आठवले, तिची ऑफिसातली मैत्रीण आणि सहकारी चित्रा, तिचा भाऊ विजय पुणे सायबर सेल चा इंचार्ज आहे. तिने चित्राला फोन लावला. आणि विजयची भेट करून देण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी साधना आणि चित्रा विजयच्या ऑफिसमध्ये आल्या. साधनाने येताना गौरीची डायरी आणि मोबाइल फोन सोबत आणले होते. विजयला सर्व हकिकत सांगून साधना म्हणाली, "इन्स्पेक्टर, प्लीज लवकरात लवकर या दुर्घटनेचा तपास लावून माझ्या गौरीच्या आत्महत्येला कारणीभूत नराधमांना शिक्षा करा." "ताई, तुम्ही निश्चित राहा. मी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतो." इन्स्पेक्टर विजय ने तिला दिलासा दिला.

इन्स्पेक्टर विजय ने सर्वप्रथम गौरीच्या मोबाईलचा पासवर्ड त्यांच्या सेलमधील सायबर सिक्युरिटी ऑफिसरकडून क्रॅक केला. मोबाइलमधील फेसबुक मेसेंजर वरचे साहिल कडून आलेले मेसेजेस, जेथून आले होते, त्या आयपी अॅड्रेसचा शोध घेतला. आणि ते लोकेशन शोधून काढले. महिन्याभरातच साहिल आणि त्याच्या तिन्ही मित्रांच्या भोवती पोलिसी फास आवळला गेला.

गौरीच्या अकाली जाण्याने साधना पूर्णपणे एकाकी झाली होती. तिला सर्वच अर्थहीन वाटत होते. पण गौरीच्या आत्महत्येला जबाबदार असणारे नराधम गजाआड झालेले पाहून तिला काही प्रमाणात गौरीला न्याय मिळाल्याचे
समाधान वाटत होते.

*********************************************

©कविता दातार

Group content visibility: 
Use group defaults

चांगली कथा तर कसे म्हणणार? ?
दुर्दैवाने अशा अनेक घटना सत्यात घडत आहेत. न कळत्याच काय, पण कळत्या वयातील स्त्रिया सुद्धा अशा प्रकारे अडचणीत येत आहेत.
तुमच्या अशा लिखाणामुळे जागरूकता निर्माण होईल अशी आशा. .

आजच पेपरमध्ये अशीच एक बातमी आली आहे. .. ठाण्यातील आहे. वाचून काटा आला अंगावर. .

एकतर मुळात मुलींनी आणि खरे तर मुलांनीही सो मि वर खूप सावधान असावे. . आणि त्यातूनही दुर्दैवाने काही घडले तर लगेच पालकांशी बोलावे.. एकदा काय ते ओरडा बसेल पण पुढच्या नरकयातना तरी टळतील.

एकतर मुळात मुलींनी आणि खरे तर मुलांनीही सो मि वर खूप सावधान असावे. . आणि त्यातूनही दुर्दैवाने काही घडले तर लगेच पालकांशी बोलावे.. एकदा काय ते ओरडा बसेल पण पुढच्या नरकयातना तरी टळतील.>>> +१११ . अगदी खरंय. चूक झालीये आपल्या कडून तर पालकांकडे सरेंडर करावे , शेवटी फॅमिली सोडून इतर कोणीही आपली चूक पदरात घेणार नाही, पण हे ब्लॅकमेलिंगला घाबरून गुन्हेगाराची हिंमत अजिबात वाढवू नये असे वाटते, त्याचे अन्याय अजिबात सहन करू नये, कर मेल्या तुला काय करायचंय ते म्हणावं सरळ, i know , हे बोलायला सोपं आहे करायला कठीण, पण जर मुलींनी अशी हिंमत दाखवली, तर हळूहळू चित्र बदलेलही कदाचित. बदनामीला न घाबरता सरळ सोमी वर स्वत:च खरं काय ते समजवायचा प्रयत्न तरी करावा. हेमावैम. पण अशी परिस्थिती यायला अजून किती काळ जावा लागेल, देव जाणे.

एकतर मुळात मुलींनी आणि खरे तर मुलांनीही सो मि वर खूप सावधान असावे. . आणि त्यातूनही दुर्दैवाने काही घडले तर लगेच पालकांशी बोलावे..
>>>>>

हे पालकांनीही लक्षात घ्यावे. मुले काय करतात, काय बघतात यावर लक्ष असावे. तरी कधी मुले अडकली अश्या चक्रव्यूहात तर त्यांनी आपल्याला ते सांगावे यासाठी तसेच विश्वासाचे नाते तयार करावे. तशीच परीस्थिती उद्भवल्यास आपली मान त्यांच्यामुळे झुकणार वगैरे नंतर पहिले आपण त्यांच्यासोबत उभे राहू हा विश्वास द्यायला हवा.

चांगली कथा.
खरं तर इथे मुलीची चूक असेल तर एवढीच की पहिल्यांदा मुलाने व्हिडीयो काढल्या काढल्या घरी सांगितले नाही. मुलगी मायनर आहे. मुलाला मायनर मुलीशी संबंध ठेऊ नये, संमतीशिवाय व्हिडीयो करू नये इ जाणीव नाही. अनोळखी मुलाची फ्रेंड्स रिक्वेस्ट तिने मान्य केली ही "चूक" पश्चातदृष्टीत चूक ठरते. अनोळखी मुले/फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स मुले रिक्वेस्ट्स पाठवतात व त्यातले अनेकजण डिसेंटही असतात. मैत्रीवर थांबतात. हा साहिल फारच वाईट निघाला.

अनोळखी मुलाची फ्रेंड्स रिक्वेस्ट तिने मान्य केली ही "चूक" पश्चातदृष्टीत चूक ठरते. अनोळखी मुले/फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स मुले रिक्वेस्ट्स पाठवतात व त्यातले अनेकजण डिसेंटही असतात. मैत्रीवर थांबतात.
>>>>

सहमत आहे. माझेही असेच रॅंडम फ्रेंड रिक्वेस्टवर जुळलेले. फक्त फरक ईतकाच की मैत्रीवर थांबलो नाही. तर लग्न केले Happy
मॉरल हेच की सोशलमिडीया हे मित्र बनवायचे माध्यम असण्यात गैर नाही. सध्याच्या काळात हे एक प्रभावी माध्यम आहे आणि पुढेही राहणार. पण नाते संबंध पुढे नेताना सजगता हवी. अन्यथा लहानपणापासून आपल्यासोबत वाढलेला शेजारचा ओळखीचा मुलगाही असे फसवू शकतो.

स्मार्टफोनच्या या काळात हि ब्लॅकमेलिंग किड अजून वाढेल आणि आपल्या वयात येणाऱ्या मुलांना आधीच विश्वासात घेऊन अश्या प्रकारांपासून कसे वाचावे. याचबरोबर तरीही फसलात तर अत्महत्येच्या आधी कैक मार्ग असतात याची कल्पना देणे गरजेचे.