माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - आस्वाद

Submitted by आस्वाद on 15 September, 2021 - 13:34

हज़ारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले...
कित्ती तरी गोष्टी आहेत बकेट लिस्ट मध्ये.... काही पूर्ण झाल्या, काही अजून अपूर्ण आहेत. अनेक गोष्टी अपूर्ण आहेत कारण अजून त्याची वेळ आलेली नाहीये.

सुरुवात पूर्ण झालेल्या इच्छांपासून करते.
मला हायस्कुलला असल्यापासूनच हॉस्टेलवर राहण्याची फार फार हौस होती. लोकांना होस्टेलची भीती वाटते. मला मात्र प्रचंड आकर्षण होतं. इंजिनीरिंगला ऍडमिशन घेताना मी नेहमी दूरचे कॉलेजेस शोधायची. आई-बाबांच्या खूप मागे लागली की मला परगावी ऍडमिशन घ्यायची. पण आईने स्पष्ट नकार दिला. शिक्षण झालं की जायचंच आहे परगावी, आतापासून नको, असं तिचं म्हणणं होतं. नाईलाजाने मी नाद सोडला. तसंच मासिकं (लोकप्रभा इ), सिनेमे बघून मुंबईला राहावं, अशी एक सुप्त इच्छा होती. शिक्षण झाल्यावर दोन्ही इच्छा एकदमच पूर्ण झाल्या. माझा पहिला जॉब मुंबईलाच होता. आणि कंपनीने फ्रेशर्स साठी राहण्याची व्यवस्था केली होती ट्रैनिंग पिरियड मध्ये. (३ महिने) कंपनीने एका इमारतीमध्ये सगळे फ्लॅट्स घेतले होते. आणि प्रत्यके २ BHK फ्लॅट मध्ये ४-५ मुली राहत होत्या. working वूमन'स हॉस्टेलच जणू. मला खूपच आनंद झाला. मी ते ३ महिने खूप एन्जॉय केले. जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. याच मैत्रिणी पुढे रूममेट्स झाल्या. खूप जपून ठेवलेत हे दिवस मी आणि आम्ही सगळ्याच मैत्रिणींनी मनांत. आजही याच मैत्रिणी सर्वात जवळच्या वाटतात.

हळूहळू एकेकीचे लग्न होऊन किंवा नवीन जॉबमुळे सगळ्या जणी पांगू लागल्या. मी पण जॉब चेंज केलाच होता. नवीन जॉब घराजवळच होता. मी बरेचदा लंचमध्ये घरी येई जेवायला. त्यावेळी (१२-१ वाजता) गृहिणींची बाजार करण्याची, मुलांना शाळेतून आणण्याची वेळ असायची. त्यांना पाहून बरेचदा मनात विचार यायचा, यांचं आयुष्य किती छान आहे! मस्त निवांत दुपार मिळते. आपल्याला पण असा निवांत वेळ मिळावा, असं वाटे. नोकरी सोडून द्यावी, GRE ची तयारी करावी, असं वाटे. MS तेव्हा बकेट लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर होतं. पण हिम्मत होत नव्हती. थोडेच दिवसांत लग्न ठरलं आणि नवरा न्यूयॉर्कला होता. मला जॉब सोडायला कारण मिळालं. लग्नाच्या २-३ महिने आधीच मी जॉब सोडला. आई-बाबांबरोबर ते दिवस एन्जॉय केले. मग न्यूयॉर्कला आल्यावर TOEFL, GRE ची तयारी केली. मला हवी असलेली निवांत दुपार काही महिने एन्जॉय केली. आणि मग MS ला ऍडमिशन घेतली. या सगळ्या गोष्टींसाठी मी मुद्दाम काही प्रयत्न नाही केले. घडत गेल्या.

पण आता जी बकेट लिस्ट आहे, त्यासाठी प्रयत्न आणि हिम्मत दोन्ही लागणार आहे. घर सध्या टॉपवर आहे. खूप फिरलो गेल्या १० वर्षांत. दर २-३ वर्षांत नवीन घर, नवीन जागा. आता एका जागी सेटल होऊन फॉरेव्हर होम घ्यायचं आहे. त्या घरात मला एक रूम माझ्यासाठी हवीये. तिथे फक्त पुस्तकं, रंग, कलाकुसरीसाठीचे साहित्य ठेवेन मी. मॅन केव्हसारखीच 'वूमन केव्ह'/Creative room बनवायची आहे मला.

आताशा वाटू लागलंय की स्वतःचा एक Tangible business असावा. छोटासा कॅफे नाहीतर शॉप.

माझं एक स्वप्न आहे की एक वर्षभर नोकरी सोडून द्यावी आणि रमत गमत world tour करावी. पण यासाठी नवऱ्याला पटवणं जिकिरीचं काम आहे.आजपर्यंत इतक्या गोष्टी पटवल्यात त्याला. ही पण हळूहळू पटवेन.. हाहा... यापैकी थोडा तरी भाग आई-बाबा, ताई यांच्यासोबत करायची इच्छा आहे.

मी चुटूर-फ़ुटूर समाजसेवा करत असते. पण लहान मुलांसाठी, विशेषतः २ वर्षांच्या आतल्या चिमुरड्यांसाठी आणि गरोदर/बाळंतिणींसाठी काही करायची इच्छा आहे. त्यांना पोषक आहार, स्वतःची निगा राखण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू (self-care packet) असं काहीसं मनात आहे. बघूया किती पूर्ण होतंय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. तुमच्या सगळ्या बकेटलिस्ट मधल्या इच्छा लवकर पूर्ण होवोत आणि त्या पूर्ण झाल्या की आम्हाला त्यांची पण गोष्ट ऐकायला आवडेल इथे.

मस्त.
तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास शुभेच्छा!>+१

छान ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. तुमच्या सगळ्या बकेटलिस्ट मधल्या इच्छा लवकर पूर्ण होवोत आणि त्या पूर्ण झाल्या की आम्हाला त्यांची पण गोष्ट ऐकायला आवडेल इथे.>>+१

मलाही लॉकडाऊन कृपेने घर टेरेस गार्डनिंग निवांतपणा अस सगळ एंजॉय करता आलं. इतकी वर्ष घड्याळ्याच्या काट्यांवरच नाचत होते. निवांत बसून घराशी संवाद साधता आला. (घरातल्यांशी नव्हे घराशी. घरातल्यांशी होतच होता पण घर विकेंडलाच तावडीत सापडायच). तुला फिरस्ती बरीच झाली म्हणून एकाजागी सेटल व्हायचेय आणि माझ्या लिस्टीत 'खुप झालं एकाजागी आता किमान थोडी फिरस्ती होऊ दे' असं लिहील होतं Proud पॅकिंग अनपॅकिंग घर लावायच प्लॅनिंग वगैरे एंजॉय करायला मला स्टाफ क्वार्टर्सला शिफ्ट झाल्यामुळे मिळाल करायला आणि मग एकदाची माझ्या लिस्टीतली हि गोष्ट पुर्ण झाली. :प

मला मुक बधिरांसाठीची साईन लॅंग्वेज शिकायची आहे कधीपासून. लहान असताना टिव्हीवर लागणाऱ्या साईन लॅंग्वेजमधल्या बातम्या मी कधी चुकवायचे नाही. यूट्यूबवर बघून थोडे शिकायचा प्रयत्न केलाय पण निर्मला निकेतनमधे प्रॉपर कोर्स असतो कळलेय. लॉकडाऊनमुळे सुरु नाही झालाय यंदाचा. तो करता आला तर आवडेलच मला.

मला ओला उबेर ड्रायव्हर आणि झोमॅटो स्विगी डिलिव्हरी गर्ल म्हणून पण 'एकदाच' काम करुन बघायच आहे. भिकेचे डोहाळे बाकीच्यांच्या भाषेत पण अनुभव घ्यायचा आहे मला. पण हे सगळ ड्रायव्हिंग शिकल्यानंतरच, तोवर हे मनातले मांडेच

वाह, कविन! छानच आहे तुमची बकेट लिस्ट.
मी इतके फिरलेय ना लहानपणापासून की त्याचा एक वेगळा लेख होईल. गेल्या ३५ वर्षांत मी २१ घरं बदलले. आणि ९ शाळा/युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेय. आता असं वाटतं की बास झालं.
तुम्हाला ओला/उबर चालवायचीय, मला पिझ्झा स्टोर मध्ये काम करायचंय गम्मत म्हणून.
इथे ASL (अमेरिकन साइन लँग्वेज) शाळेत शिकवतात. त्याचे पुस्तकं मिळतात. ही Govt site आहे. तुम्हाला कदाचित कामी येईल: https://www.nj.gov/humanservices/ddhh/education/asl/

धन्यवाद सामो, किशोर मुंढे, अमितव, अजय, sonalisl!!

आवडल, छान लिहले आहे.
गेल्या ३५ वर्षांत मी २१ घरं बदलले. आणि ९ शाळा/युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेय. >> वॉव. मस्तच , यार लेख वाचायला आवडेल.
लवकरच तुमचे स्वताचे पाहिजे तसे घर होण्यासाठी शुभेच्छा!

लेखन आवडले. Happy Cafe , स्वतःचा व्यवसाय काढण्यासाठी शुभेच्छा. माझ्या मैत्रिणीनेही असेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुड अर्थ नावाचे Cafe , दोन तीन वर्षांपूर्वी घेतले. ती तिच्या निर्णयावर खूष आहे आणि जम बसवतेय.