माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - कविन

Submitted by कविन on 15 September, 2021 - 01:44

आत्तापर्यंत इथे वाचलेले बकेट लिस्ट म्हणजे सोन्याची घडीव बकेट्स म्हणता येतील त्यापुढे आमचं म्हणजे आपलं पत्र्याच टिनपाट म्हणाव लागेल पण थोरामोठ्यांनी आधीच म्हणून ठेवलय,

राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे ।
म्हणोनी काय कवणे । चालोची नये ।।

त्या वचनाला प्रमाण मानून आमचही बकेटचं ठिगळ जोडावच म्हणते. जाता जाता 'कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलत' प्रश्नाच्या उत्तरातही भर पडेल.

लहानपणी हे लिस्टबिस्टच काही माहिती नसल्यापासून एक गोष्ट कायम वाटायची ते म्हणजे 'मला काहीतरी वेगळं करायच आहे.' पण वेगळं म्हणजे नक्की काय हे आजतागायत कळलेलं नाही तो भाग वेगळा. त्यामुळे ही गोष्ट लिस्टच्या तळाला गपगुमान झोप काढतेय.

'छोटा बच्चा जानके मुझको …', 'छोटा पॅक बडा धमाका' 'उंची नाही वाढत तर झाडाला लटक' 'फुंकरीने उडशील,बोट लावल तर पडशील' 'सिंगल पसली नाजुक मछली' असले काहीबाही फिशपॉंड आणि विशेषण ऐकत टिनेज पार पडल्यामुळे जेव्हा नवऱ्याने माझ्या बकेटातल्या लिस्टीत काय आहे विचारलं होतं तेव्हा मी त्याला "मला जाड व्हायचय" सांगून बुचकळ्यात पाडलं होतं. (त्यावेळी बकेट आणि लिस्ट असं भारदस्त नाव नव्हत गप्पांत पण तत्समच अर्थाच काही असाव) हे ध्येय ऐकल्यानंतर त्याचा जो चेहरा झाला होता तो २० वर्षांनंतरही लक्षात आहे माझ्या Lol
२० वर्षात अथक मेहनत घेऊन. मैदा साखर हॉटेलिंगला आयुष्यात जमा करुन आणि व्यायामाला निग्रहाने परमनंट मेंबर न बनू देऊन 'xs ते xl' प्रवास साध्य करत लिस्टमधल्या या गोष्टीवर मी टिकमार्क केल आहे. आता उलट्या दिशेने प्रवास करायची वेळ आली आहे Lol (पण तो आता नवीन लिस्टचा भाग झाला. अजून २० वर्षांनी बघू काय आणि किती जमलय)

बरेच वर्ष मला एकटीला जाऊन नाटक / सिनेमा बघायचा होता. एकटीने कसं जाणार? वगैरे काही प्रश्न कधी पडला नव्हता मला. म्हणजे बऱ्याच बायकांना असा प्रश्न पडून साधं हॉटेलात जायला किंवा रस्त्यावर पाणीपुरी खायला कचरताना बघितलय मी. मला असा कधी प्रश्न पडत नाही खाण्यापिण्याबाबतीत. पण नाटक आणि चित्रपट हे तशीच एखादी कंपनी असेल तरच एंजॉय करता येतात असा समज बरीच वर्ष मनात घर करुन होता. तो समजच तपासून बघायला एकदा एकटीने जाऊन बघायच होतं. पण हे करुन बघायला मात्र वयाची चाळीशी यावी लागली. याच अजून एक कारण म्हणजे घरातून लागणारा सुरुंग. 'मला बघायच नाटक चित्रपट घरातल्या दोन मेंब्रांपैकी कोणाला ना कोणाला बघायचच असायच आणि मग पुढल्यावेळी बघ एकटीने अस म्हणत माझा बेत हाणून पाडला जायचा.
दोन वर्षांपुर्वी मात्र त्याच ऑफीसच अर्जंट काम आणि तिच्या कॉलेजमधे त्या शनिवारी असलेली टेस्ट असा दुग्धशर्करा योग जुळून आला आणि मी माझ्या एकटीच तिकीट
'book my show' वरुन बूक करुन 'मेट्रोला' जाऊन 'सांड की आंख' बघून आले. 'एकटीनेही तितकच एंजॉय करता येतो की चित्रपट' यावर शिक्कामोर्तब करुन मनातल्या मनात जितं जितंचा नाचही करुन झाला. नाचकाम मनातल्या मनातच कारण आमची बटूकमुर्ती घडवतान 'गळ्यात सुर आणि पायात ताल द्यायला' 'तो' विसरलाय.

काही दिवसांनी मेट्रोलाच परत सांड की आंख बघायला मला नवऱ्याला कंपनी द्यायला जावं लागलं तो भाग वेगळा. तो आमचा मुव्ही मॅरेथॉन दिवस होता खरतर पण एका धावेने बाद झालो आम्ही. मुव्ही मॅरेथॉनही आहे बकेट लिस्टीत पण ती पुजा मात्र जोडीने करायची आहे.
मूव्ही मॅरेथॉन म्हणजे ९-१२, १२-३, ३-६, ६-९ यापैकी सलग ३ स्लॉट्स थिएटरमधे ३ मुव्ही एकाच दिवशी बघायचे आहेत. त्यादिवशी आम्ही स्टर्लिंग सिनेमाला मॉर्निंग शो 'ड्रिमगर्ल' बघून बाहेर पडलो आणि तडक मेट्रोला जाऊन 'सांड की आंख' बघितला. तो संपल्यावर तिथेच अर्ध्यातासात असलेला शो बघायची फार इच्छा होती पण अगदीच टिनपाट मुव्ही होते त्यावेळेस. हुकलाच त्यामुळे मूव्ही मॅरेथॉनचा योग. पुन्हा केव्हातरी बघू आता लॉकडाऊन संपल्यानंतर.

आता मला सोलो ट्रिपला जायच आहे एकदा. किमान ८-१० दिवसाची तरी सोलो ट्रिप हवी. ते केसरीवाली grp women trip वगैरे प्रकारची नाही. सोलो म्हणजे निव्वळ सोलो. मै और मेरी बॅकपॅक, बस और कोई नही. बघू कधी जमतय आता. तस तर नवऱ्याबरोबर एक किमान मुंबई पुणे , मुंबई नाशिक अशी टुव्हिलर राईड करायचेही पेंडिंग आहे कधीचे. तसतर आत्मविश्वास वाढवून दुचाकी आणि चारचाकीही शिकून घ्यायची आहे मला. शिकण्यावरुन आठवले पोहायलाही शिकायचे आहे (xl ते m प्रवासात पोहणे साथ देईल हा बोनस)

बाकी टेरेस फ्लॅट मधे रहायला मिळावं, दक्षिण मुंबईत काही काळ रहाता यावं, एकातरी परदेशी भाषेची ओळख व्हावी, कथा छापील अंकात दिसाव्यात, एकातरी पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत आपलं नाव उमटावं, झेपतील असे ट्रेक करुन पहावेत, लहानमुलांच्या ट्रेक कॅंपच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवून अनुभव घ्यावा, व्यवसायाचे कष्ट कळायला आणि थोडा आत्मविश्वास वाढायला काही गोष्टींची विक्री करुन पहावी, बायोकंपोस्टचा प्रयोग करुन पहावा या आणि अशा बऱ्याच गोष्टी घडायच्या तेव्हा घडत गेल्या आणि लिस्ट वर टिकमार्क उमटत गेले. काही लिस्टीत नसलेल्या गोष्टीही अचानक लाभल्या.

काही सुप्तावस्थेतल्या गोष्टींचे योग असतील तेव्हा त्यावरही टिकमार्क घडून येतील.

मुळात फार काही भव्यदिव्य प्रेरणादायी असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतं. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे एकच असतात. बाकी आमच्यासारखे गल्लीतले क्रिकेटर आणि बाथरुम सिंगर्स.

आमच्या आयुष्याची गाडी
ना रोलर कोस्टर असते,
तरीही प्रिय ती आम्हा
जसे डेली मस्टर असते

तस्मात Love you Jindagi म्हणत हा लेख गांजण्याकरिता लिहून पुर्ण करत आहे Proud

इती टिनपाटादी बकेट लिस्ट निवेदन तुर्तास समाप्तम

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान लिहिलंय
आवडलं
हे सगळं टिनपाट वगैरे काही नाही हा Happy

अरे किती मस्त लिहिलंय! आवडलं.
कॉलेजला असताना एकटीने जाऊन मी एक चित्रपट पाहिलाय! मराठी चित्रपट होता, मातीमाय नावाचा. सोबत यायला कुणी मिळेना. शेवटी एकटीच गेले. प्रभातला तो शेवटच्या दिवशीचा शो बघायला दहाबारा प्रेक्षक होते फक्त. बरेचसे असेच एकेकटे आलेले. त्यामुळे आम्ही गप्पा वगैरे मारल्या एकमेकांशी ओळख नसताना. त्यातल्या एका काकूंना तर मी नंतर लिमयेवाडीपर्यंत लिफ्ट दिली Lol सिनेमा मस्त होता. नंदिता दास-अतुल कुलकर्णी.

त्यामुळे आम्ही गप्पा वगैरे मारल्या एकमेकांशी ओळख नसताना. त्यातल्या एका काकूंना तर मी नंतर लिमयेवाडीपर्यंत लिफ्ट दिली Lol>> भारीच की Proud मला अशी कोणी कॉलेजकुमारी न भेटल्याने मी मात्र पब्लिक ट्रान्स्पोर्टला आपले म्हंटले होते Lol

नाटक मात्र गृपसोबत तिकीट बुक करुनही एकटीने पार वेगळ्या रांगेत वेगळ्या लोकांच्यामधे बसून बघण्याचा योगही आला होता लॉकडाऊन पुर्वी Lol झालं असं होतं की माझ्या जुन्या गावच्या गृपचा नाटक बघायचा कार्यक्रम ठरला. नेमकी एकजण तिकीट काढल्यानंतर बाद झाली. त्या तिकिटावर यायला कोणी सिंगळू मैत्रिण आधी मिळेना. आणि नंतर अचानक दोन घरचे सिनियर मेंबर तयार झाले. मग त्यांच्यापैकी कोणा एकीचा हिरमोड करणही मला जमेना. मग मी अजून एक तिकीट बूक करायच ठरवल तर तोपर्यंत मधल्या सीट्स बुक्ड झाल्या होत्या. नाटक हाऊस फुल होण्याची गॅरेन्टी घेऊनच गावात आलं होतं त्यामुळे मी गृपपासून दूर असलेली अधली मधली सिंगलू सीट बुक करुन टाकली. अशा रितीने एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखं कौटुंबिक नाटक मी एकटीनेच बघितलं Lol एका लग्नाची पहिली गोष्ट लग्न ठरल्या ठरल्या जोडीने पाहिल होतं. २० वर्षात कौटुंबिक नाट्याची प्रगती जोरदारच झाली म्हणायची Lol

एकदम अयशस्वी प्रयत्न..!!

तुम्ही फार गांजण्याचा प्रयत्न केलात.. पण सपशेल फेल..

मला तर आवडलं बुवा संपूर्ण लिखाण..

छानच की! आवडलं. एकटं पिक्चर बघण्याबद्दल लिहीलयस तसं मी कधी एकटी हॉटेल मध्ये जाऊन खाल्लं नाहीये, हा तसं बसने पुण्याला जातानाच्या हॉल्टला खाल्लंय. पण प्रॉपर हॉटेल मध्ये जाऊन एकटीने नाही खाल्लं.

हा तसं बसने पुण्याला जातानाच्या हॉल्टला खाल्लंय. पण प्रॉपर हॉटेल मध्ये जाऊन एकटीने नाही खाल्लं.>> अय्यो! काय सांगतेस? घुसायचं बसायचं ऑर्डर द्यायची आणि हाणायचा आडवा हात Lol करुन बघ एकदा

एकदा मात्र मी आणि लेकीने वेंधळेपणाने धमालच उडवून दिली होती. जस्ट लॉकडाऊन पुर्वीची गोष्ट आहे. काहीबाही सणबिण होता म्हणून मी आणि लेकीने नेमका एथनिक पंजाबी सूट घातला होता. हातात हिरव्या बांगड्या कपाळावर हळद्कुंकू असा सगळा अवतार होता माझा. नर्सरीमधून केलेली खरेदी आटोपून उडप्याच्या हॉटेलात काहीबाही खाऊन टॅक्सी पकडून घरी जायचे असा प्लॅन होता. नर्सरी बाहेर आल्यावर डाव्या हाताला उडपी आणि उजव्या हाताला बार & रेस्टॉरन्ट. आम्ही जर्रा गडबडीत दिशा चुकलो Proud आत जाऊन पार टोकाच्या टेबलावर टेकलो. आत जातानाही तिथे अचानक झालेली शांतता बदललेल वातावरण जाणवलं होतं पण फारस लक्ष न देता, "बोल काय मागवायच?" असं लेकीला माझ्या खर्ड्या आवाजात विचारलं आणि चार नजरा आमच्याकडे वळल्या. हे जरा फारच झालं असं वाटून मी आजुबाजूला पहिल्यांदाच नीट बघितलं आणि मग एकदम ट्युब पेटली Lol एकदा तसच बसून काय खायच ते खाऊन बाहेर पडाव असं दोघींनाही वाटल होतं पण ती वेळ जरा ऑड होती आणि आतल पब्लिक फार काही डिसेन्ट नव्हतं म्हणून फोन लावण्याचा बहाणा करत पडलो बाहेर आणि मग योग्य त्या उडप्याकडे जाऊन योग्य ती ऑर्डर दिली Lol

कविन Lol Lol Lol
खूप सुंदर लिहीले आहेत. अतिशय मस्त.

मस्त लिहिलंय Lol
सांड की आख हा पिक्चर मला माहित ही नाही, आणि तू दोनदा बघितलायस! बकेट लिस्ट मध्ये टाकला पाहिजे! Proud

Lol कवे

उडपी किस्सा Rofl

सोलो ट्रिप माझ्याही लिस्टीत आहे!

छान लिहिलेय, मजेशीर, आवडले..
काही रिलेटही झाले..
एक म्हणजे ते वजन वाढवणे. माझेही एकेकाळी तेच ध्येय असायचे. आणि हल्ली थोडेसे पोट आत घेणे ध्येय झालेय
आणि दुसरे म्हणजे एकेकाळी सिंगलू असताना शाहरूखचे पिक्चर मी एकट्याने जाऊन बघायचो. मग आयुष्यात गर्लफ्रेंड (पुढे तीच बायको म्हणून) आल्यावर एकट्याने पिक्चर बघायचे सुखच जणू संपले. एकदा मग केली हिंमत आणि एकटाच डिअर झिंदगी बघून आलो. तेव्हा कळले की असे केले तर चालते. आपण उगाचच घाबरून काही गोष्टी गृहीत धरतो Happy

मस्तच लिस्ट आहे ही. Lol
हे एकट्याने हॉटेलात जेवणं भारतात नाही पण इकडे केलं मी, अजूनही करते. बकेट लिस्ट वर नव्हते, घरच्यांचा वैताग आला लिस्टवर होते.
मला श्री कविन यांचा बुचकळ्यात पडलेला चेहरा इमॅजून हसू येतंय.

हा लेख वाचला होता पण प्रतिसाद देण्याचं राहून गेलं वाटतं. सुरेख लिहिलंयस कवे. बारवाला किस्सा भारीच आहे. Biggrin

सोलो ट्रीपची तुझी मनिषा लवकर फलदृप होवो!

मस्त लिहिले आहेस.
"मला जाड व्हायचय" सांगून >>>>>> हे माझेही स्वप्न होते.ते इतके साकार झालेय की विचारता सोय नाही.

>>>>>>>ते इतके साकार झालेय की विचारता सोय नाही.
देवकी Happy काय गं!!!

Pages