माझ्या आठवणीतली मायबोली - जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 September, 2021 - 14:45

जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी (१४ वर्षे ९ महिने मायबोलीच्या नोंदीमध्ये आहेत. पण १५ वर्षे कस भारी वाटत ना) कुठलीतरी रेसिपी शोधत असताना मायबोलीवर ती रेसिपी सापडली. तेव्हा हितगुज हे ठळक अक्षरात येत असल्याने साईटचे नाव हितगुज आहे ह्याच भ्रमात मी कित्येक दिवस होते. वाचण्यासाठी विविध प्रकारची लेखने, कविता, रेसिपीज, अस बरचस साहित्य एकत्रित मिळाल्याने ही साईट मला अत्यंत प्रिय झाली व रोज मी मायबोली वाचू लागले. मला बऱ्यापैकी रेसिपीज येत होत्या त्यामुळे आपणही आपल्याकडील रेसिपीज लिहूया, कविता लिहूया अस वाटून मी मायबोलीवर जागू (माहेरचे जागृती हे नाव होते म्हणून) या नावाने रजिस्ट्रेशन करून सभासद झाले आणि आंतरजालावर जागू या नावाने माझी थोडीफार ओळख अजूनही आहे याचा मला आनंद आहे.

तुम्ही मायबोलीवर यायला लागल्या पासून तुम्हाला काय बदल जाणवले? :

मायबोलीवर अनेकवेळा तांत्रिक बदल घडले. त्या जुन्याची प्रचंड सवय झालेली असल्याने नवीन बदल अंगळवणी पडायला जरा उशीरच व्हायचा त्यामुळे जुनं ते सोनं असच प्रत्येक वेळी वाटायच. पण पुढे त्या नवीन बदलाचीही सवय व्हायची. जसं की जुने हितगुज, नवीन हितगुज.

इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली?:

त्यावेळी वाॅट्स अ‌ॅप स्मार्ट फोन चा सुळसुळाट नव्हता. पीसी, लॅपटाॅपवरच मायबोली पाहता यायची. पण मायबोलीवरील संपर्क आणि विचारपूस या सुविधा त्या वेळी खूप वापरात असायच्या ज्याच्यामुळे मायबोली आयडींबरोबर थेट संवाद साधता यायचा. आता आपण वाॅट्स अ‌ॅप चे मेसेजेस जसे चेक करतो तसे तेव्हा विचारपूस आणि संपर्क आलाय का हे चेक केलं जायच.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहीतच नव्हती?

त्या वेळी मायबोलीवर पडीकच असल्याने बहुतेक सेवा माहीत होत्या.

मायबोलीने तुम्हाला काय दिल? :

मायबोलीनं काय दिल म्हणाल तर मी प्रामाणिकपणे सांगते माझ्या कलेमध्ये होणाऱ्या प्रगतीमध्ये मायबोलीचा मोठा वाटा आहे. रेसिपीचे लिखाण म्हणा की लेख म्हणा मायबोलीकरांनी प्रतिक्रियेतून माझा उत्साह वाढवला आत्मविश्वास वाढवला ज्यामुळे माझ्या लिखाणात प्रगती झाली, माझी वेगळी ओळख निर्माण झाली.
अनेक क्षेत्रातील गुरु मला मायबोलीवर मिळाले. त्यातील काही ठळक म्हणजे रेसिपी आणि निसर्गाबद्दल ज्ञानात भर पाडली ती दिनेशदांच्या धाग्यांनी. पुढे मी निसर्गाच्या गप्पा हा धागा काढला. https://www.maayboli.com/node/70924 या धाग्याला प्रचंड प्रतिसाद मायबोली निसर्गप्रेमींनी दिला. दिनेशदा, साधना, शांकली आणि कितीतरी जणांनी त्यात झाडांची ओळख, मार्गदर्शन केलेले आहे. आमचे निसर्गाच्या गप्पांचे गटग झाले त्यातही झाडांबद्दलचे ज्ञान वाढत गेले. माझ्या घरचे, निरुदांच्या आरण्यक मधील, शालीदांच्या ओतूरमधील आमचे सहकुटुंब झालेल्या गटगंनी आमच्या परिवाराचाही एकमेकांशी चांगले भावबंध जुळून आले आहेत.
आधी चारोळ्या कवितांचे धागे होते त्यात वैभव जोशी, माणिक या आयडींमुळे लिखाणातले नुस्के समजले. जे लिहितेस ते परत परत वाच हा धडा शिकले. कविता हा प्रांत काही मला जमला नाही पण या धड्यांचा मला पुढे माझ्या लेखांमध्ये उपयोग झाला. मी लेख लिहिणेही आधी मनावर घेतले नव्हते रेसिपीच लिहीत होते. पण एक दिवस मंजू/मंजूडी चा विचारपूसमध्ये निरोप आला अग तू लेखन का बंद केलस? खूप चांगलं लिहितेस तू लिहिणे चालू कर आणि माझ्यात प्रचंड आत्मविश्वास तिने जागा केला. मी लेख लिहायला लागले आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. पुढे मायबोली दिवाळी अंकांमध्ये लेख स्वीकारले गेले तो आनंदही वेगळाच होता. एकदा माझे बुलबुलचे नर्सिंगहोम आणि माहेरपण ( https://www.maayboli.com/node/21700 ) हा धागा वाचून भरत यांनी मला लोकसत्तातील वास्तुरंगमध्ये अस लेख येतात तिथे देऊन बघ सांगितले. मी लेख पाठवला आणि तो सिलेक्ट होवून माझा लोकसत्तात लिहिण्याचा प्रवास चालू झाला. एकदा चिनुक्सचा व्यनी आला तुझी रेसिपी माहेर अन्नपूर्णात दे. त्याने ती घेतली आणि अजूनही दर वर्षी अन्नपूर्णात माझी रेसिपी स्वीकारली जाते हा वेगळाच आनंद आहे. अवल ही गुरु क्रोशे या विणकामासाठी लाभली. अनेक कलाकृती तिने सोप्या पद्धतीने आ‌ॅनलाईन शिकविल्या. जिप्सीमुळे फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. अश्विनी के ने अनेक वेळा आध्यात्मिक गोष्टी सांगून मनोबल वाढवले आहे. डाॅ. कैलास गायकवाड यांच्यामुळे आमच्या उरणमध्ये मला इनरव्हिल संस्थेमार्फत मेडिकल कँप घेण्याचे सामाजिक कार्य पार पाडता आले. सगळ्यांची नावे लिहिणे शक्य नाही पण अनेकांच्या लेखाने वाचनाचा आनंद दिलाआहे. अनेकांनी माझ्या रेसिपी, लेख, फोटोंवर दिलेल्या प्रतिसादांमुळे मला मार्गदर्शन मिळाले, अजून लिहिण्याचा उत्साह मिळाला आत्मविश्वास वाढवला. चुका दाखविल्याने त्यात सुधारणा करता आल्या. अनेक देशी-विदेशी मायबोलीकर मित्र-मैत्रिणिंची पुंजी तयार झाली आहे मायबोलीमुळे. अमुक ठिकाणी अमुक काम आहे. अमुक मायबोलीकर तिथे राहतो/राहते तिथली माहिती/मदत त्या मायबोलीकराकडून मिळते ही किती मोठी देणगी आहे मायबोलीची.
मायबोलीच्या चॅटिंग ग्रुप्स जसे ठाणे, नवी मुंबई, कट्टा या ग्रुप्समुळे खूप मायबोलीकर जोडले गेले. इतकी त्यावेळी या ग्रुप्सवर थट्टा मस्करी व्हायची पण रागवारागवी फार क्वचित असायची उलट सगळे धमालच करायचे. कुणाला काही समस्या असतील त्यांना सल्ले मिळायचे.
मायबोलीचे गटग व्हायचे. मी फार कमी गटग अटेंड केलेत पण जे केले ते अविस्मरणीय आहेत. ठाणे गटग, नवी मुंबई गटग म्हणजे नुसती धमाल असायची आणि त्याचा वृत्तांत नंतर मायबोलीवर यायचा त्यात सगळ्यांचे मनोगत, किस्से अशा प्रतिक्रियांनी भरून जायचा. यामुळे बरेच मनोरंजन झाले आहे.
या सर्वच गोष्टीसाठी सर्व मायबोलीकर व मायबोलीची मी ऋणी आहे.

तुम्ही मायबोलीला काय दिल?
----------

तुमचं कुठलं लेखन गाजल?

मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब हा धागा वाॅट्स अ‌ॅपवरही मागे व्हायरल झाला.
https://www.maayboli.com/node/23836

रानभाज्या
https://www.maayboli.com/node/17870

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)
https://www.maayboli.com/node/49476

चूल माझी सखी
https://www.maayboli.com/node/43308

स्वयंपाकातील विठोबा
https://vishesh.maayboli.com/diwali-2013/1412

कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजल?

हे काही सुचत नाहीये. पण माझ्या माशांच्या रेसिपीज पाहून काही मासे न खाणाऱ्या व्यक्ती मासे खाऊ लागल्या . ::)) काही मायबोलीकरांना मासे दिसले की जागू आठवायची.

लिखाणातील चूकभूल समजून घ्यावी. या वर्षीच्या गणेशोत्सवात हे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल संयोजकांचे आभार.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
प्रांजळ, सरळ साधं सोपं आणि गोड Happy

जागुतै मस्त लिहिता तुम्ही..
मला बाजारात ( पावसाळी ) एखादी भाजी दिसली कि ती आणायच्या आधी मी तुमच्या रानभाज्या लेखन आधी वाचते. तुमच्या लेखनात त्या भाजीचा उल्लेख असेल तरच घेऊन येते.. तुमच्यामुळे कधीच न खाल्लेल्या भाज्या खायला शिकले..

Pages