माझ्या आठवणीतली मायबोली - कविन

Submitted by कविन on 11 September, 2021 - 05:19

१२ वर्ष ८ महिने झाले या गावचं रेशनकार्ड काढून असं आत्ताच परत जाऊन बघून आले. ऑफीस कलीगने या साईटबद्दल पहिल्यांदा सांगितलं आणि मग कुतूहल स्वस्थ बसू देईना म्हणून थोडं बिचकत, अंदाज घेत इथे डोकावले आणि स्वतःच्या घरात हक्काने ऐसपैस मांडा ठोकून बसावं तशीच सहज रुळले. पहिलीच उडी कट्टा नावाच्या गप्पांच्या बाफवर मारली होती. त्यावेळची पहिली पोस्टही आठवते कारण पहिल्याच पोस्टीत मी टायपो केला होता आणि आपणहून मस्करी डोक्यावर ओढवून घेतली होती Lol
पण ही मस्करीच "माझीया जातीचे" मित्रमंडळ देऊन गेली. आज तेच सगळे कट्टर्स विस्तारीत कुटूंबाचा अविभाज्य भाग आहेत. विशाल, नचि + पजोसारखे मित्रही आज मित्रगटापुरते राहिले नसून ते कुटूंबाचाच भाग आहेत. हे सगळेच माबोमुळे जुळून आलेले योग आहेत. डुआयडी घेऊन यायची वेळ या एका तपात ना कधी आली आणि यापुढेही कधी येईल असं वाटत नाही. (एक पासवर्ड लक्षात रहाताना इथे फे फे उडते हे ही आहेच कारण Wink )

- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
हे असं काही सांगता नाही येत मला. कित्ती आयले कित्ती गेले, तुमको लगता है तुम्मीच पैले असं मी स्वतःलाच ऐकवते जेव्हा मला 'पुर्वीच माबो राहिलं नाही' टाईप डायलॉग मारावासा वाटतो.
राजकारण, धर्मकारण आणि एकूणच या सगळ्यावरुन वाद चिखलफेक करणारे धागे, कुठलाही धागा भरकटवण्याची क्षमता बाळगून असणारे अ‍ॅक्टीव्ह आयडी जेव्हा सतत पहिल्या दोन पानात दिसतात तेव्हा मी उलट्या पावली परत जाते पण हा माझ्या स्वभावाचा दोष म्हणता येईल. इथे पुर्वीही बरेवाईट होतं आजही आहे आणि तसच ते उद्याही असणार आहे. बरवाईट हे देखील सापेक्षच (हा सापेक्ष शब्द देखील इथूनच माझ्या डिक्शनरीत अ‍ॅड झाला. बरा असतो अधूनमधून वापरायला हे पण इथेच शिकले Wink ) इथे प्रवाहीपण आहे आणि तेच जास्त महत्वाचे आहे.

हितगूज दिवाळी अंक बंद झाला आणि सामाजिक उपक्रमाला पुर्वी इतका प्रतिसाद मिळणे बंद झाले, ववि बंद झाला त्याचे मात्र वाईट वाटले. जरी काही बदल अपरिहार्य असले आणि यात दोष असा कुणाचाच नसला तरी चुटपूट लागली इतकच. जसं आमचं आजोळच घर आता परत पुर्वीसारखं नांदतं नाही होऊ शकत याचा स्विकार मनाने केला आहे, आणि आजोळचं घर बंद झालं याचा अर्थ आजोळ आणि माहेरची माया , प्रेम कमी झाले असे नाही, स्वरुप बदलले आहे तरी त्या घराबद्दल एक हळवा कोपरा अजूनही मनात आहे तसच काहीसं या बंद झालेल्या उपक्रमांबद्दलही वाटत इतकच.

- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
इथल्या लेखाची लिंक फेसबुक किंवा व्हॉटस अ‍ॅपवर शेअर करता येते हे आवडतं आणि इथल्या पाककृतींच अ‍ॅप बेस्ट आहे

- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
आठवत नाही

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
भरपूर आणि सर्वदूर पसरलेले मित्र मैत्रिणी, विस्तारीत कुटूंबाचा भाग बनलेले मैत्र, ड्राफ्ट कथा वाचून परखड मत देणारे मित्रमंडळ, विरामचिन्हांची आणि इतरही जुजबी ते मेजर कल्हई लावून देणारे ललिताप्रीतिसारखे कसलेले कल्हईकार Proud (व्याकरण आणि चिन्हांबाबत आता त्यामानाने बरीच सुधारणा झालेय माझ्यात पुर्वीपेक्षा त्याचं श्रेय याच सगळ्या हक्काने पायावर कुर्‍हाड मारु देऊन कान पकडून चुका दाखवणार्‍या मित्रमंडळालाच तर जातं Wink )

सामाजिक उपक्रम टीमचा भाग व्हायची संधी - त्यातून मिळालेले समाधान आणि शिकलेले धडे.
ववि समितीत शिकलेले व्यवस्थापन, त्यानिमित्ताने जाहिराती आणि इतरही काम करताना केलेली मजामस्ती. या उपक्रमांनी संयम तर शिकवलाच पण कोंडलेली वाफ जर शेलक्या विशेषणांच्या रुपाने बाहेर पडली तर समजून घेऊन let go करणारे मित्रमंडळही माबोनेच दिलं

- तुम्ही मायबोलीला काय दिलं
नोंदवण्यासारखे अजूनतरी काही दिले नाही

- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
मला कायमच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले आहेत इथे. अगदी नवीन असतानाही हाच अनुभव होता. टिका झाल्या तरी कायम कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारच्याच झाल्या. त्यातून मला कुठे सुधारणा करता येईल हेच समजले.

ला फ्लोर दे अमोर हिने झप्पकन चाहते वर्गात वाढ केली.

अ‍ॅनिव्हर्सरी हि गूढ(?) कथा ट्रेनप्रवास करताना आठवते कायम अशा धर्तीचे प्रतिसाद अजूनही अधूनमधून खाजगीत ऐकवतात म्हणून त्याची वेगळी गंमत वाटते मला.

फिरुनी नवे जन्मेन मी हिच्यामुळे प्रगती पुस्तक फंडावाली कविन अशी ओळख दिली.

काही हरकत नाही आधी काकाकत पोस्ट केलेली आणि लक्षवेधी म्हणून तेव्हा निवड झालेली कविता.

कन्फेशन आणि
व्यथा एका पोटाची यांना पल्लीकडून चित्रभेट मिळाली म्हणून त्या माझ्यासाठी खास आठवणीतल्या आहेत.

प्रेमाची गोष्टं माबोच्या known कुंपणाबाहेर unknown जगात पाठवलेली ही पहिली कथा. या कथेमुळे पहिल्यांदा छापील अंकात नाव आणि लिखाणासाठी मानधन मिळणे या गोष्टींना अनुभव खात्यात जमा केले.

Fingers crossed - short film : आमच्या प्रवासाचा प्रवास हा खास अनुभव निव्वळ मायबोलीने दिलेल्या मित्रमंडळामुळेच आहे.

- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं

हे काय वर इतक्या लिंक्स दिल्यात ते गांजणच तर आहे Lol

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय . लेखकाचे नाव वाचून धागा वाचायला घ्यावा अशा तुम्ही एक !! ला फ्लोर कथा परत एकदा त्याच उत्सुकतेने वाचली .

आवडल्या आठवणी! लेखांच्या लिन्कबद्दलही धन्यवाद. बहुतांश अजून वाचलेले नाहीत. फिंगर्स क्रॉस्ड मात्र लेखही वाचला होता व फिल्मही पाहिली होती. तुम्ही (म्हणजे त्या ग्रूपने) नंतर तसे काही पुन्हा केलेले दिसत नाही.

तुम्ही (म्हणजे त्या ग्रूपने) नंतर तसे काही पुन्हा केलेले दिसत नाही.>>> हो फारेन्डा, अजूनतरी काही नवीन धाडस केले गेले नाहीये. पहिल्यावेळी योग होता म्हणून झाले बघू पुढे अस काही परत कधी जुळून येतय.

लेखकाचे नाव वाचून धागा वाचायला घ्यावा अशा तुम्ही एक >> हि फार मोठी कॉम्प्लिमेन्ट दिलीत. दिन बन गया मेरा तो

सगळ्याच प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार Happy

Pages