चष्मा... एक बनवून घेणे( स्वत: करता, स्वत:ला नाही)!

Submitted by अदित्य श्रीपद on 5 September, 2021 - 10:59

मला, १९९३ साली, इयत्ता दहावीत असताना चष्मा लागला. त्यानंतर आजतागायत म्हणजे २८ वर्षे मी चष्मा वापरत आलो आहे. हल्ली हल्ली, म्हणजे २-३ महिन्यापूर्वीपासून दिवसभर कम्प्युटरवर काम केल्याने डोळे थकल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे त्रास होऊ लागल्याने नंबर तपासून आलो. त्यावेळी आता डोळ्यांना जवळचा नंबर देखिल आला असून बाय फोकल किंवा प्रोग्रेसिव लेन्स असलेला चष्मा घ्यावा लागणार असे निष्पन्न झाले. अनेक जणांकडून ऐकल्यामुळे आणि अगदी घराजवळ लेन्स्कार्टचे शोरूम असल्याने हा काय प्रकार असेल ते एकदा(चे) पाहावे असा विचार करून त्या शोरूम मध्ये गेलो.
तिथे आत गेल्या गेल्या हे प्रकरण आपल्यला झेपणारे (आणि मुख्य म्हणजे परवडणारे) नाही हे जाणवले होते. पण आता आलोच आहे तर बघू तरी काय प्रकार आहे! असा विचार करून पुढे गेलो. तिथल्या बाईने मला चष्म्याच्या फ्रेम्स दाखवायला सुरुवात केली. हल्ली चष्म्याना इंग्रजीत स्पेक्टकल्स म्हणत नाहीत तर आयवेअर असे छान सोपे सुटसुटीत नाव आहे.(हे आवडले आपल्याला – ‘मेल्या! चांगल्याक चांगला म्हणू व्हया.’ असा आमचा मालवणी दोस्त म्हणत असे.) नंबरचे चष्मे म्हणजे प्रेस्क्रीपशन आयवेअर बरका! असो, तर त्या ताईनी( हो बाई म्हणणे कसेसेच वाटते, खरे तर मॅडमच म्हटले पाहिजे) आम्हाला जी माहिती दिली ती अशी-
चष्म्याच्या फ्रेम्स दोन प्रकारच्या आहेत. जॉन जेकब, एअर, विन्सेंट असे विदेशी ब्रँड आणि लेन्स्कार्टच्या स्वत: बनवलेल्या फ्रेम्स. ह्या ज्या विदेशी कंपन्या आहेत, त्यांच्या फ्रेम्स आणि प्रोग्रेसिव लेन्सेस असे मिळून एक चष्मा साधारण २५ हजार रुपयाना पडत होता. अर्थात मला आधीपासून अंदाज असल्याने आणि मुख्य म्हणजे हृदयविकार, उच्च रक्तदाब असे काही विकार नसल्याने (फार)काही त्रास झाला नाही. मी विचारले ह्या चष्म्यात असे काय आहे, कि २५ हजार रुपये किंमत होते? हा प्रश्न विचारल्या बरोबर ताईंच्या मनातली माझी किंमत घसरल्याचे त्यांच्या डोळ्यातून जाणवले. (हा अनुभव काही नवीन नाही म्हणा आम्हाला.)असो तर त्यानी ह्या चष्म्याच्या काचा कशा पातळ असतात चष्मा कसा लाईट वेट असतो शिवाय त्याची काच इतकी उच्च प्रतीची असते कि तुमच्या डोळ्यांचे व्यंग पूर्णपणे सुधारून तुम्हाला अगदी नवदृष्टी कशी देते, त्या काचा अँटी ग्लेअर म्हणजे चकाकी रोधी असून कहर म्हणजे त्या ब्ल्यू लाईट म्हणजे निळाप्रकाश गाळणाऱ्या असल्याने तासंतास कम्प्युटर, मोबाईल स्क्रीन वगैरे बघितल्याने रेटीना, म्याक्युला (हे म्हणे डोळ्याचे आतले महत्वाचे अवयव असतात) ह्यांना होणारे नुकसान टाळतात. डोळ्याचा कॅन्सर(बापरे!) होण्याची संभावना देखिल ५० टक्क्यांनी कमी होते...असे पुराण(इंग्रजीतून) लावले. शिवाय ना सर! हा तुमचा आमच्याकडचा पहिलाच चष्मा असल्याने तुम्हाला एकावर एक चष्मा फुकट सुद्धा मिळेल अर्थात काचा प्रेस्क्रीपशन लेन्सेस असल्याने त्यांचे ९ हजार वेगळे पडतील अशी मौलिक माहिती पुरवली. (अहो म्हणजे दोन चष्मे ३४ हजाराचे झाले कि. एक चांगला कॅमेरा येईल त्यात. हे आम्ही मनात.) बर, म्हटले आज ऑर्डर दिली तर कधी मिळेल? तर म्हणाल्या ८ ते १० दिवस लागतील. अरे! का? एवढा वेळ का लागेल?असे खोटे खोटे चित्कारत विचारले तर म्हणाल्या काचा ज्या आहेत न सरsss! त्या दिल्लीला बनतात. त्यामुळे एवढा वेळ लागतो. म्हटले असे का? पुण्यात काय काचा बनवणारे लोक नाहीत कि पुण्यात पूर्वी चष्मे बनत नसत! तर म्हणाल्या तसे नाही सर! आम्हाला हव्या त्या क्वालिटीच्या काचा फक्त दिल्लीलाच बनतात.
हा सगळा वेळ ताई माझ्याशी इंग्रजीच फाडत होत्या ( माझे इंग्रजी अगदी उत्तम नसले तरी ताई इतके बिनअस्तराचे नाही.पण... असो!)त्यांच्या शर्टाच्या खिशावर नाव होते उर्वी. मी म्हटले तुमचे नाव काय? त्या म्हणाल्या उर्वी. हो ते मी वाचले पण आडनाव काय आहे?(काय अगोचर इसम आहे हा! असे भाव तरळले त्यांच्या डोळ्यात) तर म्हणाल्या साठे. म्हणजे मराठीच कि. तरीही इंग्रजी आणि ते देखिल पुण्यात आणि समोरचा माणूस मराठीत बोलत असताना का फाडायचे, असेल, कंपनीची सक्त ताकीद असेल त्यांना तशी. हल्ली त्याला कार्पोरेट पॉलिसी म्हणतात.
नाही बुवा मला इतके दिवस थांबणे नाही परवडणार (हे आपले एक कारण किंवा पळवाट)असे म्हणून बाहेर पडलो आणि आपल्या नेहमीच्या नाक्यावरच्या चष्मेवाल्याकडून चष्मा त्या ताईनी सांगितलेल्या आणि कौतुकलेल्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट बनवून घेतला. एकूण किंमत ४७५० पडली. दोन दिवसात चष्मा बनला. शिवाय त्याने जादा ब्रिज पॅड, ते काचा पुसायचे कापड आणि द्रावण फुकट दिले.
जाता जाता एक, हे जे काही ब्ल्यू लाईट म्हणजे निळाप्रकाश गाळणाऱ्या काचांची माहिती सांगितली जाते ना! ते एक थोतांड आहे. खाली दिलेली लिंक टीचकून पहा... अर्थात ही आमची पश्चातबुद्धी/ मागाहून सुचलेले शहाणपण किंवा वरातीमागून नाचवलेलं घोडं
https://www.youtube.com/watch?v=NkJY9bgLyBE
आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

मला गेले काही दिवस फक्त रात्रीचे अंधुक दिसत होते तेही फक्त वाचताना, डॉकने सांगीतले डोळे ड्राय होतायेत म्हणुन ड्रॉप्स दिले अन अँटी ग्लेअर पण बनवुन घेतले. ईकडे वाचल्यामुळे ते ब्लु लाईट प्रकार फेक आहे कळले होते तसे चष्मेवाल्याला सांगीतले तर तो हसला म्हणे तुम्ही स्वत: बघीतले न लाईट आरपार होत नाहीये, यु ट्युब वरचे सगळेच काही खरे नसते, तुम्हाला नाही घ्यायचा तर नका घेऊ पण झाले असे की मला फक्त २८०० रुपयात मनासारखी फ्रेम अन काच मिळुन खर्च येत होता सो मी ब्लु वालाच घेतला.
पण ह्या चष्म्याने सगळे थोडे मोठे मोठे दिसतेय. हे नॉर्मल आहे कि नाही माहित नाही.

मुला साठी मायोपिया कंट्रोल चष्मा बनऊन घेतला, १५ हजार अ‍ॅडीशनल घेतले, कारण नंबर झरझर वाढत होता आणि मुलगा स्टुडंट.
४ महिन्यांनी नंबर पर १.० डिग्रीने वाढला, फसवीले गेल्याचे फीलींग आले आणि या धाग्याची आठवण पण झाली. Sad
आता दुसर्या रेप्युटेड दुकानातून ५ हजाराचा साधा चष्मा फ्रेम विथ ग्लास असा घेतला,ब्लू आणि स्मार्ट फोन संरक्षण काच त्या पॅकेज मध्येच असल्याने त्याचे वेगळे पैसे पडले नाहित.

तो हसला म्हणे तुम्ही स्वत: बघीतले न लाईट आरपार होत नाहीये >>
ते लेन्स ब्लू लाईट फिल्टर करतात हे खरं आहे. पण त्याचा खरच फायदा होतो का हा प्रश्न आहे. (UV light फिल्टर केल्याने फायदा होतो .)
ब्लू लाईट फिल्टर झाल्याने काही प्रॉब्लेम होत नसावा, तज्ज्ञांनी खुलासा करावा.

खूप छान माहिती आरारा, धन्यवाद!
ब्लु लाईट फिल्टर म्हणजे नक्की कोणती वेव्हलेंथ ब्लॉक करतात? कारण निळ्या रंगाच्या छटा तर दिसतात सगळ्या

ब्लु लाईट फिल्टर म्हणजे नक्की कोणती वेव्हलेंथ ब्लॉक करतात? कारण निळ्या रंगाच्या छटा तर दिसतात सगळ्या >>>> त्यांच्याकडे एक निळ्या प्रकाशाची टॉर्च असते, नुसता यु व्ही ब्लॉकर किंवा डे नाईट चष्म्याच्या काचेतुन तो निळा प्रकाश आरपार होतो पण ह्या ब्लु लाईट ब्लॉकर चष्म्यातुन नाही. त्यामुळे जे जास्त लॅपटॉप , कॉम्प्युटर, मोबाईल वापरतात त्यांना जास्त त्रास होणार नाही, डोळ्यांवर कमी ताण येतो म्हणे.

मानवकाका, नुसता ब्लु लाईट ब्लॉकर चष्मा नसतो, ते यु व्ही प्लस ब्लु लाईट ब्लॉकर असे असते असे मला त्या चष्म्यावाल्याने सांगीतले.
मी ज्यांच्याकडे बनविला त्यांचे दुकान डोळ्यांच्या दवाखान्यातच असल्याने जर काही प्रॉब्लेम झालाच तर डॉक परत चेक करुन वीस दिवसात काचा विनामुल्य बदलुन देतात हा एक फायदा तसेच फ्रेम पण बर्यापैकी स्वस्त आहेत. माझ्या मैत्रिणीने लेन्सकार्ट मधुन घेतला त्यात फक्त फ्रेम पाच हजाराला पडली, आता क्वालिटीत फरक असेल म्हणा पण ते लक्षात येत नाही, दिसायला सारख्याच वाटतात जी मला फक्त १४००/- ला पडली अन काचेचे १४००/-

UV, त्यावरील Voilet आणि वर ब्लुची सुरवात हा स्पेक्ट्रम फिल्टर होतो असे दिसते. < 450 nm wavelength.
कदाचीत हा ब्लू स्पेक्ट्रम ब्लॉक करणे असेलही फायद्याचे, early research/study असेल.

आता हे फिल्टर करायला लेन्सवर coating केले असते. (UV / anti glare सगळेच).

ते नीट टिकायला लेन्स फार जपून नाजूक पद्धतीने हाताळायला पाहिजे. शर्ट/बनियन/साडी/ओढणी/रुमाल यांनी पुसू नये. त्यासोबत मिळणारे अति सॉफ्ट कापड त्यानेच पुसावे. तेही लेन्स वर धुळीचे कण नसताना.
लेन्स नळाखाली धरून हात न लावता दोन्ही बाजू वाहत्या पाण्यात धुवायच्या मग सॉफ्ट कपड्याने आधी कापड फक्त लावून न पुसता पाणी शोषून घ्याचये. मग त्या चष्म्याच्या अति सॉफ्ट कापडाने पुसायचे. इति आमचा ऑप्टिशियन.

मला चस्म्याची गरजच असल्याने नेहमीतर बेस्ट ऑफ द बेस्ट बनवून घेते. घरी असा एक होता व एक क्लिनिक मध्ये जाउन काही तरी मेजर डिसीज बद्दल वाचले होते मुंबई टा इम्स मध्ये म्हणून घाबरून जास्तीच्या टेस्ट करून घेतल्या व तिथून साडेचार हजाराचा कर्वून घेतला. पण हा म्हणजे ज्या दिवशी पहिला लॉक डाऑण सुरू झाला त्याच दिवशी सकाळी साडेसातला मधूनच तुटला.

मग जो जुना महा गाचा होता तो शोधला व घातला. अजून तरी चालले आहे. आरारा म्हण तात ते बरोबर आहे. महत्वाचा पीस मदतीचा म्हणून घ्या. चश्मा घातला तरी मी सुंदरच दिसते. ते सगळं आतून येतं . आणि चस्म्हा काढून हलकेसे हसले की समोरचा गारदच होतो. Wink

मग त्या चष्म्याच्या अति सॉफ्ट कापडाने पुसायचे.
<<

त्या अतीसॉफ्ट कापडाला 'मायक्रोफायबर क्लॉथ' म्हणतात.

याची खासियत अशी की हे धूळ आत शोषून घेते.

मात्र, मळल्या नंतर, म्हणजे दिसेल इतपत धूळ त्यात गेली, की नंतर कापड धुवून धूळ बाहेर निघू शकत नाही. त्या कापडाचा सँड-पेपर होतो.

तेव्हा मळली की ती चिंधी फेकून द्यायची असते अन नवी आणायची असते. चष्मावाला फारतर २-५ रुपये घेईल त्याचे.

Pages